‘सिर सलामत तो पगडी पचास' अशी एक प्रसिद्ध म्हण
आहे. या
म्हणीत एक महत्त्वाचा संदेश सामावला आहे आणि याच संदेशाचे पालन करण्याची गरज आज
निर्माण झाली आहे. संपूर्ण जगाला
हादरवून सोडणाऱ्या एका सूक्ष्म विषाणूने आपल्याला खूप काही शिकवले आहे. अर्थात
त्यापासून आपण काही धडा घेणार असू, तर पुढचा काळ
आपणास सुसह्य होणार आहे.
आपत्ती ही दोन प्रकारची असते एक म्हणजे
‘दुष्टापत्ती’ आणि दुसरी असते ‘इष्टापत्ती’. दुष्टापत्ती ही वाईट गोष्टीच देऊन जाते, नुकसानच करून जाते; पण इष्टापत्ती ही जरी आपत्ती असली तरी काही
चांगल्या गोष्टीही देऊन जाते. आज कोरोनामुळे
जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे संपूर्ण जगालाच सक्तीची विश्रांती घ्यावी
लागली. संपूर्ण जगात लाखो लोक मृत्युमुखी पडले. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. लॉकडाऊनच्या काळात कारखाने बंद झाले, रस्त्यावरील वाहने बंद झाली, ए.सी. चा वापर
कमी झाला. या सर्व गोष्टींमुळे प्रदुषणाला खूप मोठा
ब्रेक लागला. पर्यावरणाने मोकळा श्वास घेतला.
निसर्गाने आपणास लाख मोलाचा देह दिला आहे आणि
तो देह सुस्थितीत, सुदृढ ठेवणे ही आपली जबाबदारी
आहे. या संकटाच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसाला
आता स्वच्छतेचे महत्त्व लक्षात येईल अशी अपेक्षा करूया. आपले
वाडवडील आपणास घरात येण्यापूर्वी हात, पाय, तोंड स्वच्छ धुवूनच घरात यायला सांगत होते. अशा
प्रकारची सोयही घराबाहेर केलेली असायची; पण आजच्या बदलत्या जीवनशैलीत या गोष्टीकडे
दुर्लक्ष झाले त्यामुळे आता तरी आपण त्यापासून योग्य तो धडा घेऊन सावध झाले पाहिजे.
सरकारने आर्थिक प्रश्नापेक्षा माणसाच्या
जीविताचा प्रश्न महत्त्वाचा मानून सर्व व्यवहार ठप्प करून लॉकडाऊन घोषित केले. पुढे
हे लॉकडाऊन संपले तरी कोरोना विषाणू संपूर्णपणे नष्ट झाला असे छातीठोकपणे सांगता
येणार नाही. त्यामुळे तो समूळ नष्ट होईपर्यंत तरी आपणास फार
जबाबदारीने वागावे लागेल. यापुढील काळातही असा एखादा भयाण विषाणू उद्भवणार
नाही असेही म्हणता येत नाही. त्यामुळे आरोग्य
यंत्रणांनी ही सतर्क राहण्याची तसेच आरोग्यासाठी योग्य गुंतवणुकीची ही गरज आज
निर्माण झाली आहे.
लॉकडाऊन च्या काळात काही बेजबाबदार लोकांनी
अनेकदा नियमांना धाब्यावर बसवले. संचारबंदी जमावबंदी ला फारसे मनावर घेतले नाही. या
काळात हजारो गुन्हे नोंदवले
गेले. यावरून
आपण किती सजग आहोत हे लक्षात येते. सरकार वारंवार सूचना देत असताना त्याचं पालन न
करता घराबाहेर पडणारे लोक, मोठ्या झुंडीने गावाकडे
निघालेले लोक या बातम्या आपण पाहतच आहोत. सरकारी सूचनांचे पालन करणे हे एक राष्ट्रकार्य
आहे. काही लोकांना नाईलाजाने हे नियम मोडावे लागत असावेत
असेही क्षणभर मान्य करू; परंतु त्यांचा हा नाईलाज या राष्ट्रकार्याहून मोठा होता
का? हा खरा प्रश्न आहे.
या काळात समाज माध्यमांवरून अनेक संदेश फिरले
त्यातील एका विभूतीने दिलेला संदेश मला फारच आवडला. नामोल्लेख न
करण्याचे कारण म्हणजे नेहमी प्रमाणेच हा संदेश जॅक मा आणि श्री. रतन टाटा अशा दोघांच्या नावाने प्रसारित झाला. संदेश
कोणाचाही असू देत पण त्यातील आशय मात्र खूपच महत्त्वाचा आहे. त्यात ते म्हणतात “2020 हे साल फक्त जिवंत राहायचे वर्ष
आहे, नफा - नुकसान विषयी अजिबात विचार करू नका. स्वप्न आणि योजनां विषयी चकार शब्दही काढू नका. यावर्षी स्वतःला जिवंत ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.” मला वाटते हा खरोखरच अनमोल असा संदेश आहे. कारण
परिस्थिती ओळखून वागणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. बेचिराख
झालेल्या जपानच्या हिरोशिमा, नागासाकी चे
उदाहरण सर्व जगासमोर आहेच ना? आपल्या मनगटावर आपला विश्वास असला तर आपण नक्कीच
पुन्हा एका नव्या दमाने पुढील परिस्थितीवर मात करणार आहोत. यासाठी आपल्याला भविष्याची चिंता करण्यापेक्षा
वर्तमान परिस्थितीशी सामना करायचा आहे. जगलो वाचलो तर पुढे खूप काही करता येईल. तुमच्या कर्तुत्वाला जग खुणावतंय; पण त्यासाठी
आपलं शिर सलामत हवं ना !


Very true..
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट-प्रेरणादायी लेख👌💐
उत्तर द्याहटवाVery True
उत्तर द्याहटवाNice Sir
उत्तर द्याहटवाChan sir...
उत्तर द्याहटवाVery true
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन
उत्तर द्याहटवापुढील लेखाची वात बघतोय
Good keep it up sirji
उत्तर द्याहटवा