“एकमेकांशी नाते असलेल्या आपल्या लोकांचा एक गट म्हणजे कुटुंब” असे काहीसे कुटुंबाबद्दल म्हणता येईल. माणसाच्या जन्मापासूनच कौटुंबिक नात्यांना सुरुवात होते. आपण एका एका नात्यात गुंफत जातो आणि मग ही नात्यांची वीण जितकी घट्ट तितके आपण सुखी आनंदी व्हायला लागतो. आपल्या कुटुंबाची निवड ही आपण करत नसतो, तर ती एक दैवी देणगी असते. कुटुंबात अनेक नाती असतात आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, आजोबा, आजी, पणजोबा, पणजी, खापरपणजोबा, खापर पणजी, काका, काकी, वहिनी अशी कितीतरी नाती आपणास माहीत आहेत. एवढ्या सगळ्यांच्या गोतावळ्यात राहायला मिळणे हे म्हणजे स्वर्ग सुखच.
सशक्त समाजासाठी कुटुंब या घटकाला खूपच महत्त्व आहे. आजकाल त्रिकोणी-चौकोनी कुटुंब यांचे प्रमाण वाढत चालले
असले तरी एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे मात्र सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. अगदी विभक्त
कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तीलाही कधीनाकधी वेळप्रसंगी एकत्र कुटुंबाची गरज ही
लक्षात येतेच. आपल्या
कुटुंबाबद्दल सर्वांनाच गर्व असतो, आदर असतो. कोणतेही धन हे कुटुंबापेक्षा जास्त नसते. मायेची
सावली देणारी आपली आई वात्सल्य, प्रेम, क्षमा यांची प्रचिती जिच्या प्रत्येक कृतीत
आपणास दिसते. अशा आईचं
कुटुंबात खूप वरचं स्थान असतं. पृथ्वीच्या
रक्षणासाठी भगवंताला दहा अवतार घ्यावे लागले; पण पोटच्या पोराच्या पालनासाठी आई
किती अवतार घेते? याची मोजणीच करता येणार नाही. कुटुंबाचे रक्षण
करणारे, एक सल्लागार आपले वडील, यांची आपल्याला
आदरयुक्त भीती नेहमीच वाटत राहते. कोणत्याही गोष्टीत आपला भागीदार असणारा आपला भाऊ, नेहमीच आपले शुभचिंतन करणारी आपली बहीण (तिला तर दुसरी आईच
म्हणता येईल) अशा नात्यांचे रंग इतके विविधरंगी आहेत की तिथे इंद्रधनुष्याच्या
रंगांनाही या रंगांचा मोह होईल.
आपण लहान असताना एखादी गोष्ट आपल्याला हवी असायची, त्यावेळी आई-बाबांकडून ती गोष्ट मिळण्याची शक्यता नसल्याचे
लक्षात आल्यावर आपण हलक्या आवाजात आजोबांकडे केलेली मागणी आणि त्याची झालेली
पूर्तता. एखादी
चुकीची कृती आपल्या हातून घडली आणि आता बाबांचा पारा चढणार त्यांचा हात आपल्यावर
पडणार एवढ्यात आपण गाठलेला आईच्या कुशीचा आसरा. आपल्या प्रत्येक
चांगल्या कृतीला दिलेली शाबासकी, आणि नकळत
घडलेल्या चुकीला तितक्याच विशाल हृदयाने कुटुंबातील सर्वांनी केलेली माफी एव्हढेच नव्हे तर आपल्या भावंडांबरोबरची आपली लहानपणीची भांडणे अशा कितीतरी गोष्टी आठवून बघितल्यावर या
नात्यांचा गोडवा अधिकच वाढत जातो.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत ही आपल्या देशाची एक ओळख होती; परंतु परिस्थितीनुरूप, गरजेनुरुप त्यात बदल होऊन आता विभक्त कुटुंब पद्धतही मोठ्याप्रमाणात प्रस्थापित होताना आपण पाहत आहोत. काही ठिकाणी आजही एकत्र कुटुंबपद्धत जिवंत आहे आणि याचं परदेशी नागरिकांना आजही अप्रूप आहे. एकत्र कुटुंब पद्धत असो की विभक्त कुटुंब पद्धत, कुटुंब ही गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्ती व्यक्तींनी कुटुंब बनते, अनेक कुटुंबांचे एक गाव, अनेक गावांचा तालुका, अनेक तालुक्यांचा जिल्हा, अनेक जिल्ह्यांचे राज्य आणि अनेक राज्यांचा देश, त्यामुळे चांगला देश घडवायचा असेल तर प्रथम व्यक्ती घडली पाहिजे. ही व्यक्ती कुटुंबाची घटक असते, कुटुंबाचे संस्कार त्या व्यक्तीवर होत असतात, त्यामुळे देश घडवण्यामध्ये प्रत्येक व्यक्ती बरोबर प्रत्येक कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे आहे. स्वावलंबी, आत्मनिर्भर, समाधानी कुटुंब ही देशाची एक संपत्तीच मानता येईल.
हे झाले रक्ताच्या नात्याचं, रक्ताच्या नात्या पलीकडच्या नात्यांनीही कुटुंब तयार होतात. बाबा आमटे यांचे कार्य डोळ्यासमोर आणल्यावर निराधार, असहाय कुष्ठरोगी हे त्यांचं कुटुंब बनलं आणि बाबा हे अशा लोकांचे कुटुंबप्रमुख झाले. डॉ. अभय बंग, डॉ.राणी बंग, श्रीम.सिंधुताई सकपाळ, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब होईल. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्ती प्रमाणे सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून नाती जोपासली, एकमेकांना आपण आधाराचा हात दिला तर एक मोठे कुटुंब तयार होत जाईल. या कुटुंबातील सर्व नात्यांमध्ये माणुसकीचं नातं हे अधिक गडद होत जाईल. जशी त्या कुटुंबाची व्याप्ती वाढत जाईल तसे ‘हे विश्वचि माझे घर' ही ज्ञानेश्वरांची उक्ती खरी होईल.
वाचकांना विनम्र सूचना - लेखाबद्दल काही कॉमेंट लिहायची असेल तर खालील कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कृपया आपले नाव लिहा. तसेच लेखकाशी त्या विषयावर काही चर्चा करायची असल्यास वर असणाऱ्या कॉन्टॅक्ट मी या टॅब वर क्लीक करा व फॉर्म भरा. लवकरच तुमच्याशी संपर्क होईल. आपल्या बहुमूल्य सूचनांमुळे लेखन अधिक समृद्ध होईल असा लेखकाचा विश्वास आहे. धन्यवाद !
खूप छान आर्टिकल आहे. खरंच संपूर्ण कुटुंबाबद्दल जागृती निर्माण करण्याची वेळ आली आहे जे मोडकळीस आलेल्या कौटुंबिक नातेसंबंधांना बळी पडले आहेत आणि परिणामी त्यांच्या हातून बेकायदेशीर कृत्य झाले आहे .
उत्तर द्याहटवाहा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कुटुंबाबद्दल आपली जागृकता निर्माण करणे , पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे आणि समृद्ध कौटुंबिक संबंधाचे महत्त्व ओळखणे
मिलिंद पाटील
Khup Chan Sir 👍
उत्तर द्याहटवा(Ajit Mane)
Beautiful 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप छान... आजच्या मुलांना छोट्या कुटुंबात नातेसंबंधाची गरज समजत नाही. आपला लेख मुलांनी वाचला पाहिजे. समाजातील आत्महत्येसारख्या समस्या कमी होतील.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर !कुटुंब ,त्याचे महत्व कमीतकमी शब्दात मांडलेले आहे .एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांवर खूप चांगले संस्कार होऊ शकतात आणि त्याची सध्या खूप गरज असल्याचे जाणवते अशाच विषयावर नियमित व प्रासंगिक लिखाण प्रकाशित करावे ,धन्यवाद आणि शुभेच्छा ...
उत्तर द्याहटवाखरच सुंदर लेख आणि सुंदर विचार! सध्याची जीवन शैली लक्षात घेता एकत्र कुटुंब पद्धती स्वीकारता येईल असं वाटत नाही. परंतु याच लेखात मांडलेली दुसरी बाजू म्हणजे सामाजिक कुटुंब... परम पूज्य बाबा आमटे यांचे किंवा राणी बंग यांचे.....
उत्तर द्याहटवाआपण निदान या सामाजिक समाज रचनेचा मनापासून पाठपुरावा आणि स्वीकार केला तरी ब-यापैकी अपेक्षित यश साधता येईल.
प्रकाश खेडेकर... भाईदर जिल्हा ठाणे.
वा मस्त सर
उत्तर द्याहटवा