बुधवार, १४ जानेवारी, २०२६

तिळगुळ घ्या… आणि शब्दांना गोडवा द्या

 


भारतीय सण-उत्सव हे केवळ परंपरा जपण्यासाठी नसून ते आपल्याला आयुष्य जगण्याची दिशा देतात. मकर संक्रांत हा त्यापैकीच एक अत्यंत अर्थपूर्ण सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, उत्तरायण सुरू होते आणि निसर्ग नव्या ऊर्जेने भरून येतो. या बदलत्या ऋतूंसोबतच माणसानेही आपली दृष्टी, विचार आणि वाणी सकारात्मक करावी, असा संदेश हा सण देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” ही म्हण त्याचाच सार आहे. मकर संक्रांत येते तेव्हा नुसता सूर्यच उत्तरायणाला वळत नाही; माणसाच्या अंतर्मनालाही एक नवी दिशा मिळते. आकाशात पतंग उडत असतात, जमिनीवर तिळगुळाचा सुगंध दरवळत असतो आणि वाऱ्यात एक अदृश्य पण हळवा प्रश्न घोंगावत असतो — आपण खरंच गोड बोलतो का?

मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याची एक सकारात्मक दृष्टी देणारा दिवस आहे. सूर्य उत्तरायणाला लागतो, दिवस मोठे होऊ लागतात आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होतो. पण या सणाचा सर्वात गोड संदेश आहे — तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.” ही म्हण फक्त औपचारिक शुभेच्छा नसून आयुष्य जगण्याचं एक तत्वज्ञान आहे. आयुष्यात माणूस अनेक अनुभवांतून जातो. सुख-दुःख, यश-अपयश, नाती-तणाव हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला येतंच. अशा वेळी माणसाचं मन आधीच थकलेलं असतं. त्या थकलेल्या मनावर एक गोड शब्द जादूसारखा काम करू शकतो. आपल्या शब्दांत अपार ताकद असते. एखादा कठोर शब्द आयुष्यभराची जखम देऊ शकतो, तर प्रेमाने बोललेला एक शब्द संकटातही आधार बनतो. रागात बोललेला शब्द आयुष्यभर बोचत राहतो, तर प्रेमाने उच्चारलेला शब्द मनात घर करून राहतो. माणसं कधीकधी दूर जातात, प्रसंग बदलतात, पण शब्दांची आठवण कायम राहते.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” ही म्हण ऐकायला साधी वाटते, पण तिचा अर्थ अतिशय खोल आहे. तिळगुळ हे केवळ खाद्यपदार्थ नाहीत; ते जीवनाचे प्रतीक आहेत. तिळ कडू असतो, जसा आयुष्यातील संघर्ष, अपयश, दुःख आणि वेदना. गुळ गोड असतो, जसा प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा आणि माणुसकी. आयुष्य कडूपणाविना नसते, पण त्या कडूपणाला गोडव्यात गुंफण्याचं सामर्थ्य आपल्या वाणीत असतं. ही केवळ सणाची औपचारिकता नाही; हा जीवनाचा मौन उपदेश आहे. कारण शब्द हे नुसते उच्चार नसतात; ते अनुभूती असतात, स्मृती असतात, कधी कधी तर आयुष्यभर सोबत राहणाऱ्या सावल्याही असतात. तिळ कडू असतो. तो दाताखाली आला की चेहरा आपोआप वाकडा होतो. आयुष्यही तसंच असतं. कडवट अनुभव, अपमान, अपयश, अपेक्षाभंग—हे सगळं माणसाला नकोसं असतं, पण टाळता येत नाही. गुळ मात्र गोड असतो. तो कडूपणावर एक हळवी चादर पसरतो. शब्दांतील गोडवा हाच तो गुळ आहे, जो आयुष्याच्या कडवट क्षणांना सहनशील बनवतो.

माणूस जखमी होतो तो बहुतेक वेळा परिस्थितीमुळे नाही, तर शब्दांमुळे. रागाच्या भरात बोललेला एक वाक्यांश, उपेक्षेने फेकलेला एक शब्द, किंवा मौनातून उमटलेली थंड प्रतिक्रिया — हे सगळं खोलवर जखम करते. जखमा भरतात, पण शब्दांचे ओरखडे मनावर राहतात. काही शब्द तर असे असतात की ते माणसाच्या आत कुठेतरी कायमचं घर करून बसतात. आज संवादाचे मार्ग वाढले आहेत, पण संवादातली संवेदना हरवत चालली आहे. आपण पटकन बोलतो, पटकन प्रतिक्रिया देतो, पण समोरच्या मनाचा ठाव घेण्याइतके थांबत नाही. प्रत्येक माणूस आतून काहीतरी लपवत जगत असतो — एखादी भीती, एखादा अपमान, एखादी न सांगता आलेली वेदना. अशा वेळी आपला एक साधा, प्रेमळ शब्द कोणाच्या तरी मनात उजेडाचा दिवा लावू शकतो.

गोड बोलणं म्हणजे नेहमीच हसतमुख राहणं नव्हे. ते खोटं सौजन्यही नाही. गोड बोलणं म्हणजे शब्दांमागे माणुसकी ठेवणं. कठोर सत्यही सांगताना आवाजात कणव असणं. मतभेद व्यक्त करतानाही नात्याची वीण न तुटू देणं. ही कला सहज जमत नाही; ती संयमातून, आत्मभानातून आणि दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेण्याच्या प्रयत्नातून जन्माला येते. मकर संक्रांत आपल्याला सांगते—सूर्य जसा उत्तरायणाला वळतो, तशीच आपली वाणीही सकारात्मक दिशेला वळू दे. कारण जग बदलायला वेळ लागतो, पण शब्द बदलायला क्षण पुरतो. आणि तो क्षण अनेक आयुष्यांच्या वळणावर निर्णायक ठरू शकतो.

तिळगुळ सणापुरता असतो, पतंग संध्याकाळपर्यंतच आकाशात असतात; पण त्या दिवशी दिलेला गोड शब्द, त्या क्षणी दाखवलेली समज, कुणाच्या तरी आयुष्याला दिशा देऊन जाते. म्हणूनच गोड बोलणं ही केवळ सामाजिक गरज नाही, तर एक मानवी जबाबदारी आहे. या मकर संक्रांतीला आपण तिळगुळ हातात देताना मनातही गोडवा भरूया. शब्दांना धार देण्याऐवजी त्यांना गोडवा देऊया. कारण कधी कधी एका गोड शब्दाने जे साध्य होतं, ते हजार स्पष्टीकरणांनीही होत नाही.

🌞 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

माणूसपण देगा देवा

 


     कधीकाळी गावातील एखाद्या वडाच्या झाडाखाली पारावर टेकून बसलेल्या लोकांच्या गप्पा, हसणं, बोलणं, एकमेकांची विचारपूस करणं हे चित्र सर्रास दिसायचं, घरांची दारे कुलूपबंद नसत, आणि मनांमध्ये भिंती नसत. गावात एखाद्याकडे पाहुणा आला तर तो संपूर्ण गावाचा पाहुणा असायचा. आज मात्र हे चित्र पार बदललेले दिसते. आज दारे मजबूत झाली… पण मनं मात्र तुटलेली दिसतात. आजचा माणूस आपल्या हातात मोबाइल धरून दिवसभर “कनेक्टेड” असतो, पण अंतर्मनाने तो कधी नव्हे इतका डिसकनेक्टेड झाला आहे. नाती हळू हळू दुरावलेली दिसतात.

खरंच…
माणूस एकमेकांशी वाईट का वागतो?

द्वेषाची आणि संशयाची सावली इतकी गडद कशी झाली?

आणि नाती एवढी दुर्मिळ का झालीत?

हे प्रश्न मनात घर करतात. मला तर अनेकांच्या मनातल्या जखमांचा भार, न दिसणाऱ्या वेदना हेच त्याचे कारण वाटते. प्रत्येक माणूस चालतो तेव्हा त्याच्यासोबत काही, न दिसणाऱ्या जखमा चालत असतात. काही अपमानाच्या, काही दुर्लक्षाच्या, काही प्रेमभंगाच्या. जे दुखावलेले असतात, तेच कधी कधी इतरांना दुखावतात. बर्‍याचदा वाईट वागणारा माणूस वाईट नसतो; तो जखमी असतो.

     खरं तर संवाद कमी झाल्यावर नाती ‘मूक’ होतात. आज घरात चार लोक असले तरी बोलणं फक्त दोन मोबाईलमध्ये होतं. आपण एकमेकांसोबत नाही… आपण स्क्रीनसोबत जगतो. माणसाला माणसानेच समजून घ्यायला हवे, पण आपण “टायपिंग…” मध्येच गुंतलो आहोत.
बोलणं थांबलं की नाती हळूहळू श्वास घेणं थांबवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

     आनंदाला विषारी करणारी एक गोष्ट म्हणजे तुलना. एकमेकांची तुलना करत करत आपण आयुष्याच्या आनंदावर काळी रेघ ओढली आहे. कोणाचं घर मोठं? कोणाची नोकरी भारी? कोणाचं मूल हुशार? ही तुलना मनातल्या समाधानाला खाऊन टाकते… आणि मत्सराला जन्म देते. मत्सर माणसाला कधी दुसर्‍याच्या डोळ्यातील आनंद दिसू देत नाही; मत्सर, सगळ्यात सुंदर नात्यांचाही गळा घोटतो.

     स्वार्थ ही नात्यांवर पडलेली धूळ असते. आज बहुतेक संबंधांचे गणित असे झाले आहे की, मला काय मिळणार?” जगणे इतके व्यवहारिक झाले आहे, की भावना आता बोनस समजल्या जातात. जोपर्यंत आपण उपयोगी असतो तोपर्यंतच आपल्याला आदर मिळतो. पण नाती उपयोगासाठी नसतात; नाती उपजतात, वाढतात, टिकतात. आपण मात्र त्यांना बोलावून आणण्याऐवजी आजकाल सोडून देणं पसंत करतो. स्वार्थामुळे हे माणूसपण हरवताना दिसते. 

     आज माणसातला माणूस हरवताना दिसतो. आज फक्त भूमिका उरल्या आहेत. प्रत्येक माणूस दिवसभर अनेक भूमिका निभावतो: आई, वडील, मुलगा, शिक्षक, अधिकारी… पण या भूमिका निभावताना आतला ‘माणूस’ कुठे हरवतो ते आपण लक्षातच घेत नाही. आपण नम्रता विसरलो, कृपाशब्द विसरलो, एकमेकांच्या डोळ्यातून दुःख वाचणं विसरलो. माझ्या एखाद्या विखारी शब्दामुळे कुणाचे तरी मन दुखावेल याचा विचार आपण करत नाही. जगण्याच्या स्पर्धेत माणुसकी मागे पडली.

     सरड्यापेक्षाही रंग बदलणारी माणसे जागोजागी आपणास दिसू लागली आहेत. म्हणूनच व. पु. काळे यांनी सांगितल्याप्रमाणे “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही, असे माणूस नावाचे यंत्र आहे” ही व्याख्या खरी वाटू लागते. माणूस आज दिवसेंदिवस अनाकलनीय, भावनाशून्य आणि यांत्रिक बनू लागला आहे. एखादी वाईट घटना समोर घडत असताना, मदत करायचे सोडून आपली बोटे मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात गर्क होतात. तेव्हा माणूसपण संपल्याचे जाणवते.

     खरंतर कोणाला त्रास होणार नाही अशा दोन शब्दांनी संवादाची सुरुवात झाली तर अनेक प्रश्न सुटतात. कधीकधी “कसा आहेस?” हे दोन शब्द एखाद्याला उभारी देऊ शकतात. क्षमा करायला शिकलं तर नाती अजून घट्ट होतील. मनातल्या रागाने आपणच स्वतः भाजत असतो, सोडून द्यायला शिकलो तरच नाती घट्ट होतील. आपणास एकमेकांशी तुलना थांबवावी लागेल. आपल्या वाटेवर आपणच चालतो. इतरांचा प्रवास वेगळा असतो. नात्यांना वेळ दिला तरच नाती टिकतात. कधी कधी एका हसण्याने, एका स्पर्शाने, एका मनापासूनच्या शब्दाने एका माणसाचं जगणं बदलतं. वेळ दिली की नाती बोलू लागतात. आपण वेळ काढला नाही की नाती शांत होतात. माणसामध्ये भावनांचा ओलावा असला पाहिजे, त्या ओलाव्याशिवाय जगणे म्हणजे कोरडं वाळवंट ठरेल.

     आजची बदलणारी परिस्थिती, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, यांत्रिक जीवनपद्धती यामुळे माणूस बदलतो आहे. माणुसकी म्हणजे करुणा, संवेदनशीलता, सहअस्तित्व आणि परस्पर सन्मान. दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही घटनांनी या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सामाजिक माध्यमांवरील द्वेष व अपमान, महिलांवरील अत्याचार व असंवेदनशील वागणूक, वृद्ध व आजारी व्यक्तींची उपेक्षा, गरीब व गरजूंचा अमानुष छळ,, मुलांवरील शोषण व बालमजुरी, धार्मिक-जातीय तेढीमुळे होणारी हिंसा, अपघातग्रस्तांना मदतीऐवजी व्हिडिओग्राफी या घटना आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. माणुसकी जपणं म्हणजे मोठ्या घोषणा नव्हेत; तर दैनंदिन आयुष्यातील लहान-लहान कृती—मदत, सहानुभूती, न्याय्य वागणूक.

     आपण प्रत्येकाने थोडं थांबून “मी माणूस म्हणून काय केलं?” असा प्रश्न स्वतःला विचारला, तरच समाज अधिक मानवी बनेल.हरवलेले माणूसपण सिद्ध करणार्‍या, माणुसकीला काळिमा फासणार्‍या अनेक घटना जेव्हा घडतात, तेव्हा परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते, माणूसपण देगा देवा.


बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन – पुरुषत्वाची नव्याने व्याख्या करण्याची गरज

 


      आज 19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. जगभरात या दिवशी पुरुषांच्या योगदानाबरोबरच त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याबद्दलही चर्चा केली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जगताना अनेकदा पुरुषांच्याच भावना, संघर्ष आणि वेदना यांची गळचेपी होताना दिसते.

      पुरुष प्रधान संस्कृती जरी पुरुषांनीच बनवली असली तरी पुरुषच त्या साचेबद्ध अपेक्षांमध्ये अडकलेले दिसतात. भारतीय किंवा मराठी संस्कृतीवर एक नजर टाकली तर “पुरुष हा घराचा कर्ता, शक्तीचा आधार, कमावता आणि निर्णायक” अशी प्रतिमा पारंपरिकपणे रंगवली गेली आहे. या चौकटीत समाज पुरुषावर काही अपेक्षा लादतो. पुरुष मजबूत असतो, त्याने जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजेत, तो कधीच खचू नये, त्याने भावना दाखवायच्या नाहीत, त्याने रडणे म्हणजे त्याचा कमकुवतपणा. अशी ही प्रतिमा काहींना गौरवाची वाटेल, पण हजारो पुरुष आज या चौकटीमध्ये अडकून मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत.

            पुरुष रडत नाहीत” किंबहुना त्यांनी रडू नये ही समाजाची अपेक्षा असते. खरंतर रडणे हे भावनांचे ओझे कमी करण्याचे नैसर्गिक माध्यम आहे. पण समाज पुरुषाच्या हातात रुमाल देण्याऐवजी तलवार देतो आणि म्हणतो – लढ! एखादा पुरुष ताण, हार, वेदना, नैराश्य दाखवू लागला, तर त्याला ताबडतोब सुनावले जाते. बायकी झाला का?”, “इतकं काय होतंय?” इत्यादी, परिणामी रडू न देण्याचा आग्रह पुरुषाला आतून पोकळ करतो. मानसिक ताण, नैराश्य आणि अनेक वेळा आत्महत्येपर्यंत पोहोचवतो.

      अनेकदा पुरुषांवर कर्तृत्वाची सक्ती असते. प्रत्येक पुरुषासाठी ‘यशस्वीरूप’ होणे आवश्यकच असते. पुरुषाला समाज काही अटींवर स्वीकारतो. त्याला यशस्वी असावंच लागतं, कुटुंबाची जबाबदारी त्याने उचललीच पाहिजे, त्याने कमावलेच पाहिजे, त्याने स्वतः कमकुवत होऊ नये. एखाद्या पुरुषाची नोकरी गेली, व्यवसायात अपयशी झाला किंवा आर्थिक अडचण आली, तर त्याच्यावर समाजाचा कटाक्ष वेगळा पडतो.

स्त्री अपयशी झाली तर तिला सांत्वन मिळते, पण पुरुष अपयशी झाला तर त्याला दोष आणि टोमणे मिळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. पुरुषही माणूस आहे.  पुरुष फक्त ‘पुरुष’ नाही, तो एक मुलगा, एक पती, एक पिता, एक मित्र, एक नागरिक आहे. तो देखील समर्थनाची गरज असलेला, कौतुक ऐकण्याची इच्छा असलेला, कधीकधी खचणारा एक साधा मनुष्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यालाही भावना आहेत, त्यालाही भीती वाटते, त्यालाही रडावेसे वाटते, याची जाणीव सर्वांना असली पाहिजे.

आज याबाबत समाजाला बदलण्याची आवश्यकता आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त यावर विचार होण्याची गरज आहे. पुरुषाला देखील भावनिक स्वातंत्र्य देणे, “रडणे ही कमजोरी नाही” हे शिकवणे, पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी खुली चर्चा करणे, मुलांना लहान वयातच भावनांची अभिव्यक्ती शिकवणे, घरात आणि समाजात संवेदनशीलता वाढवणे याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणजे पुरुषांची स्तुती नव्हे, तर त्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक वेदनांचेही वास्तविक दर्शन आहे. नवे पुरुषत्व म्हणजे ताकद + संवेदनशीलता + स्वातंत्र्य + मानवीपणा असे मानले पाहिजे. आज आपण एक निर्णय घेतला पाहिजे. पुरुषाने रडणे लाजिरवाणे नाही, अपयश पेलण्यात तो एकटा नाही, समाजाने खरे तर स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही प्रथम माणूस म्हणून पाहिले पाहिजे”.

आजच्या दिवसाची खरी भेट म्हणजे पुरुषाला समजून घेणे, त्याला मोकळे होऊ देणे आणि त्याच्या भावनांवर ताळेबंद न लावणे. चला, पुरुषांवर अनावश्यक अपेक्षांचे ओझे न लादता माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहूया.


रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

रघुवीर घाटाचा मोहक थाट..

 


        बरेच दिवस रघुवीर घाटाला भेट द्यायची इच्छा मनात घर करून बसली होती. कामाच्या व्यापात आणि दैनंदिन धावपळीत ती इच्छा मात्र नेहमीच पुढे ढकलली जात होती. नुकतेच माझे मित्र प्रा.सागर यांनीही तसाच विचार मांडला आणि मग दोघांमध्ये क्षणभरही उशीर न लावता ठरलं. ‘चला, रघुवीर घाटाला जाऊया!’ या छोट्याशा निर्णयाने मन आनंदाने उड्या मारू लागलं.

        रिमझिम पावसाच्या सरी अनुभवण्यासाठी आम्ही कार न वापरता बुलेटवर प्रवास करायचं ठरवलं. आकाशात मेघांचे रेशीम कापड पसरलेले, पावसाच्या रिमझिम सरी झेलत जाण्याची कल्पनाच मोहक होती. सकाळीच आमची बुलेट गर्जत रघुवीर घाटाच्या दिशेने निघाली. सप्टेंबरमधला तो रविवार, हलकेच सरी कोसळत होत्या. आकाश कधी ढगांनी भरून जायचं तर कधी एखादा निळसर झगमगता तुकडा डोकावायचा. पावसाचा अधून मधून होणारा शिडकावा अंगावर घेत, रेनकोट घालून आमची सफर सुरू झाली. सकाळचा गारवा, दमट मातीचा सुवास, हलका पाऊस आणि इंजिनाची गडगडाटी धून, सारं कसं आल्हाददायक.

        खेडहून तीस किलोमीटरचा प्रवास म्हणजे डोंगरांच्या मिठीत शिरत जाण्याचा अनुभवच. रस्ता जरी खड्डेमय होता, तरी प्रत्येक वळणावर नवी हिरवाई, नवे झरे, आणि दूरवरून दिसणाऱ्या पांढऱ्या धबधब्यांची लकेर मन हरवून टाकत होती. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या रघुवीर घाटाने जणू आम्हाला उबदार मिठी मारली. वाटेत येणारी नागमोडी वळणं, खाली पसरणाऱ्या दऱ्या, हिरवीगार घनदाट झाडं आणि त्यांची ओलसर सुगंधी पाने,  प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावासा वाटत होता. आम्ही घाटमाथ्याकडे जसजसे चढत होतो, तसतसे ढग आमच्याकडे जवळ येत होते, जणू आमचं स्वागत करायलाच ते उभे होते. खड्डेमय रस्ता थोडासा कटकटीचा ठरत होता; पण घाटमाथा जवळ येताच सगळा त्रास विरघळून गेला.

        घाटमाथ्यावर पोहोचल्यावर दाट धुक्याची चादर सगळीकडे पसरली होती. सगळीकडे एक अलौकिक पांढुरकी शांतता. एखाद्या रहस्यमय कादंबरीत वावरतोय की काय, असं वाटावं इतकं ते दृश्य मोहक होतं. अचानक डोंगराच्या पायथ्यापासून जोरदार वारा सुटला आणि त्या वाऱ्याने धुक्याचे पडदे जणू हळूवार बाजूला केले. डोंगराच्या पायथ्यापासून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी सारा नजारा बदलून टाकला. समोर प्रकटलेली दृश्यं मन थक्क करून गेली, हिरव्यागार दऱ्या, झुळझुळ वाहणारी नदी, डोंगरातून झेपावणारे छोटे धबधबे आणि दूरवरचे निळसर आभाळ, सगळं एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासवरचं जिवंत चित्र भासू लागलं.

        त्या वाऱ्याने अंगावर हलकेच पाण्याचे तुषार उडत होते, जणू निसर्गानेच आपलं स्वागत केलं. त्या थंडगार वाऱ्याने अंगावर रोमांच उभे राहिले. रेनकोट आपसूकच उतरले आणि आम्ही त्या गारव्याचा, त्या थंडाव्याचा मनसोक्त आनंद घ्यायला लागलो, पावसाच्या सरींच्या तुषारांनी शरीराबरोबरच मन चिंब झाले आणि नकळत मोबाईलच्या कॅमॅऱ्याने सेल्फी घेणे सुरु झाले. क्षणभरासाठी आपण आभाळाच्या उंच शिखरांवर आहोत आणि ढगांचे पांढरेशुभ्र पुंजके आपल्याला हळुवार स्पर्श करून जात आहेत असं वाटलं. नुकत्याच कोसळलेल्या पावसामुळे डोंगर नटून बसल्यासारखे भासत होते. एखाद्या चित्रकाराने हिरव्या, पांढऱ्या आणि करड्या रंगांचे कुंचले उधळून एखादं मोहक चित्र रंगवलं आहे, अशी ती दृश्यं भासत होती. बालकवींनी वर्णिलेलं “क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” हे श्रावणातील ऊन पावसाचं खेळकर चित्र धुक्याला लागू होत होतं. क्षणभर दाट धुकं, क्षणभर निखळ आकाश हा निसर्गाचा लपंडाव मोहून टाकणारा होता.

        अशा प्रसन्न वातावरणात आम्ही त्या घाटावरच्या एकमेव हॉटेलमध्ये शिरलो. गरमागरम कांदा भजीचा सुवास पसरला आणि मोह आवरला नाही. बाहेर पावसाच्या सरी, आत हातात उकळत्या चहाचा कप आणि समोर गरमा गरम भजी, जणू पर्वतराजानेच दिलेला हा प्रसाद वाटत होता. हॉटेलच्या छोट्याशा गच्चीत बसून दूरवरचा घाट, वाऱ्याने डुलणारी झाडं, ढगांच्या सावल्या पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही. निसर्गाची ही संगत मनाला अगदी समाधान देऊन गेली.

        रघुवीर घाट खरंतर पर्यटनासाठी एक अद्भुत स्थळ आहे, पण तिथे फारशी गर्दी नसल्याने एक वेगळाच शांत, निर्मनुष्य अनुभव मिळाला. हे ठिकाण खरं तर अजूनही लोकांच्या नजरेआड आहे. गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त निसर्गाचा अवखळ खेळ. मात्र कोणत्याही सुविधा किंवा सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हे ठिकाण अजूनही दुर्लक्षित राहिलं आहे. कोकणातील अशा कितीतरी स्वर्गवत, सुंदर जागा जर सुनियोजित रितीने विकसित केल्या तर त्या स्थानिकांसाठी रोजगाराचं साधन बनू शकतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावू शकतात, हा विचार मनात चमकून गेला.

        परतण्याची वेळ झाली तेव्हा मन अजिबात तयार नव्हतं, मन जड झालं होतं. तरीही वास्तवाची जाणीव ठेवत आम्हाला तिथून निघावं लागलं. मात्र घाटातील ती हिरवाई, धुक्याची नाजूक चादर, ढगांच्या सान्निध्याची अनुभूती, पावसाळी गारवा,  हे सगळं मनात घट्ट कोरून आम्ही घाट उतरलो. बुलेट घाटमाथ्यापासून खाली सरकत होती, पण मन मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होतं, त्या क्षणांत जाऊन रमत होतं.

        खरंच, रघुवीर घाट ही केवळ एक सफर नव्हती, तर आत्म्याला भिडणारा अनुभव होता, जो कायम मनात राहील. भटकंतीच्या छंदात आणखी एक हक्काचं, लोभसवाणं ठिकाण मिळाल्याचा समाधानकारक आनंद या प्रवासानं दिला. पुढच्या वेळेस नक्कीच पुन्हा येथे यायचं, हा निर्धार मनात पक्का करूनच आम्ही घरी परतलो.