आजच्या काळात समाजासमोर उभ्या राहिलेल्या अनेक समस्यांपैकी
एक गंभीर समस्या म्हणजे भोंदू बाबांचे वाढते जाळे. श्रद्धा ही भारतीय संस्कृतीचा
कणा आहे; पण जेव्हा हीच श्रद्धा विवेकशून्य बनते, तेव्हा ती शोषणाचे साधन बनते. काही तथाकथित ‘गुरु’
लोकांच्या अडचणी, भीती आणि भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेतात, चमत्कारांचे आमिष दाखवतात आणि लोकांच्या आयुष्यावरच ताबा
मिळवतात. कोट्यवधींची संपत्ती, आलिशान आश्रम, आणि त्यामागे असणारे राजकीय पाठबळ—हे चित्र केवळ वेदनादायक
नाही, तर धोकादायक आहे.
अलीकडच्या काळात आपण वारंवार पाहतो की, काही तथाकथित ‘बाबा’ लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात, कोट्यवधींची संपत्ती जमवतात आणि काही वेळा त्यांना राजकीय वरदहस्तही
लाभतो. या सगळ्या घटना केवळ धक्कादायक नाहीत, तर समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षणही आहेत. अशा वेळी एक मूलभूत प्रश्न आपल्या
समोर उभा राहतो—आपल्या समाजात नेमके काय कमी पडते आहे?
याचे उत्तर शोधताना आपल्याला ‘संस्कार’ या संकल्पनेपर्यंत
यावे लागते. कारण कायदे, नियम, शिक्षा या गोष्टी आवश्यक असल्या तरी त्या फक्त बाह्य नियंत्रण ठेवतात; मनावर नियंत्रण ठेवत नाहीत. एखादा कठोर कायदा अस्तित्वात
असला, तरी तो गुन्हेगाराला थोडा वेळ थांबवू
शकतो, पण त्याच्या मनातील वाईट प्रवृत्ती
पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. उलट, जर एखाद्या
व्यक्तीवर लहानपणापासून चांगले संस्कार झाले असतील, तर त्याच्या मनात चुकीचा विचारही उभा राहत नाही.
याच संदर्भात एक साधे उदाहरण द्यायचे झाले तर, रस्त्यावर सिग्नल लाल असताना गाडी
थांबवणारा माणूस दोन प्रकारचा दिसतो. एक तो, जो पोलिसांच्या भीतीने थांबतो; आणि दुसरा तो, जो ‘नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे’ या
संस्कारामुळे थांबतो. पहिला माणूस पोलिस नसतील तर नियम तोडण्याची शक्यता असते; पण दुसरा माणूस कुठेही असला तरी नियम पाळतो. हाच फरक
कायद्याने नियंत्रित समाज आणि संस्कारांनी घडवलेल्या समाजात आहे.
आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या दुकानात
चुकून जास्त पैसे परत मिळाले, तर काहीजण ते परत
करतात, तर काहीजण गप्प बसतात. कायद्याने त्यांना
पकडणे कठीण असते; पण त्यांच्या अंतःकरणातील संस्कार
त्यांना योग्य निर्णय घ्यायला भाग पाडतात. म्हणजेच, या उदाहरणांतून ‘बाह्य नियंत्रण’ आणि ‘आंतरिक नियंत्रण’ यातील फरक स्पष्ट होतो.
इतिहासात आपण पाहिले आहे की, अंधश्रद्धेचा अतिरेक समाजाला किती मोठ्या संकटात ढकलू शकतो. ‘चमत्कार’ या
नावाखाली अनेकांनी आपले आयुष्य, संपत्ती आणि कधी
कधी कुटुंबही गमावले आहे. काही प्रकरणांमध्ये तर महिलांवर अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि मानसिक गुलामी यासारख्या घटना समोर आल्या
आहेत. प्रश्न असा आहे की, एवढ्या शिक्षणानंतरही लोक अशा जाळ्यात का
अडकतात? याचे मूळ कारण म्हणजे ‘संस्कारांचा अभाव’
आणि ‘विवेकशक्तीची कमतरता’. शिक्षण म्हणजे फक्त पदवी किंवा नोकरी नव्हे; तर योग्य-अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता. जर ही क्षमता
विकसित झाली नाही, तर उच्चशिक्षित व्यक्तीदेखील
अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकू शकते. अलीकडच्या काळात ही वारंवार
दिसू लागले आहे.
पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती ही केवळ आर्थिक किंवा सामाजिक
रचना नव्हती, तर ती संस्कारांची शाळा होती.
आजोबा-आजींच्या गोष्टी, आई-वडिलांचे मार्गदर्शन, मोठ्या भावंडांचे अनुकरण,
या सर्व
माध्यमांतून मूल्यांची जपणूक होत असे. ‘सत्य’, ‘प्रामाणिकपणा’, ‘परस्पर आदर’, ‘श्रद्धा ही मूल्ये विवेकासह’
नकळत मनात रुजत
असत. त्यामुळे व्यक्ती फक्त शिक्षित होत नव्हती, तर ती सुशिक्षित आणि सुसंस्कृतही होत होती.
ही कुटुंब पद्धती या
आंतरिक नियंत्रणाची मजबूत पायाभरणी करत होती. घरातील वडीलधाऱ्यांचा अनुभव, नैतिक मूल्यांवर आधारित संवाद, आणि दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींमधून मुलांमध्ये
प्रामाणिकपणा, संयम आणि विवेक या गुणांची जोपासना होत
होती. ‘काय बरोबर आहे?’ हा प्रश्न विचारण्याची सवय तिथेच
लागायची.
आज मात्र परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब पद्धती, तंत्रज्ञानाचा अतिरेक, स्पर्धेचा ताण आणि वेगवान जीवनशैली यामुळे मूल्यशिक्षण मागे पडताना दिसते.
माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, पण विवेकाने विचार करण्याची सवय नसल्यामुळे लोक सहजपणे कोणत्याही
‘चमत्कारां’च्या किंवा ‘अवडंबरां’च्या जाळ्यात अडकतात. सोशल मीडियावर पसरवले जाणारे खोटे दावे, चमत्कारांचे व्हिडिओ, आणि भावनिक भाषणे लोकांना पटकन प्रभावित करतात. लोक सहजपणे अशा गोष्टींवर
विश्वास ठेवतात. आणि याच ठिकाणी भोंदू लोक आपला डाव साधतात.
यावर उपाय म्हणून केवळ नवीन कठोर कायदे बनवणे पुरेसे नाही.
प्रशासन सुरळीत चालण्यासाठी कायदे आवश्यक आहेत, ते शेवटचा उपाय आहेत, पण समाज सुदृढ राहण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि घराघरांत मूल्यशिक्षणाला पुन्हा
प्राधान्य देणे गरजेचे आहे. खरा उपाय म्हणजे ‘संस्कारक्षम समाज’ घडवणे. मुलांना प्रश्न विचारायला शिकवणे, विवेकाने विचार करायला प्रवृत्त करणे आणि अंधश्रद्धा व श्रद्धा यामधील फरक
समजावून सांगणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करणे, आणि ‘श्रद्धा + विवेक’ यांचा समतोल साधायला शिकवणे ही
काळाची गरज आहे.
तसेच, समाजातील प्रत्येक
घटकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे, शिक्षकांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता जीवनमूल्ये
रुजवणे, आणि माध्यमांनी जबाबदारीने बातम्या सादर
करणे आवश्यक आहे. समाजातील आदर्श व्यक्तींनी आपल्या वर्तनातून संदेश दिला पाहिजे की, यश हे प्रामाणिकपणा आणि कष्टातूनच मिळते, चमत्कारातून नाही. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊ शकतो.
शेवटी, समाज बदलण्याची
सुरुवात ही व्यक्तीपासूनच होते. कायद्याची भीती माणसाला थांबवू शकते, पण संस्कार त्याला योग्य मार्गावर चालायला प्रेरणा देतात.
म्हणूनच, आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे ती
‘संस्कारक्षम पिढी’ घडवण्याची. कारण जेव्हा मन शुद्ध असेल, तेव्हा समाजही नक्कीच सुदृढ आणि सशक्त बनेल. जेव्हा
माणसाच्या मनात विवेक आणि मूल्यांची ज्योत प्रज्वलित होते, तेव्हा कोणतीही अंधश्रद्धा, कोणताही भ्रम त्याला विचलित करू शकत नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने एक सशक्त, जागरूक आणि नैतिकदृष्ट्या समृद्ध समाज निर्माण होऊ शकतो.
प्रेरणादायी आणि छान लेख आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर, अप्रतिम लेखन.
उत्तर द्याहटवाविचार करायला लावणारा लेख...
उत्तर द्याहटवापरखड आणि सध्याच्या पिढीला प्रेरणा देणारा लेख.
उत्तर द्याहटवामार्मिक लेख..
उत्तर द्याहटवामूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी शाळा व महाविद्यालयांची मोठी जबाबदारी आहे..
खूपच छान
उत्तर द्याहटवासर, छान मांडणी, संस्कार संकल्पना योग्य पण या भोंदू बाबाचे वाढते प्रमाण, व त्याचे गंभीर प्रश्न याकडे पाहताना संस्काराकडे जाणे गरजेचे नाही. फक्त लोकांना अंधश्रध्दा, अज्ञान व अनभिज्ञ देवाबद्दलची अनाठायी भिती, विवेक विचार, व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकार केल्यानंतर वास्तवतेचे भान जेव्हा अंतर्मनाला जाणवेल तेंव्हाच व्यक्ती,समाज अशा सामाजिक स्थितीतून बाहेर पडेल. अन्यथा हिंदू समाज हा संस्कृतीच्या नावाखाली असाच भरडला जाईल. या समस्येला शिक्षीत समाज देखील कारणीभूत आहे. कारण प्रखर समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध करणारे कमीच असतात.
उत्तर द्याहटवा