कधीकाळी गावातील एखाद्या वडाच्या झाडाखाली पारावर टेकून बसलेल्या लोकांच्या गप्पा, हसणं, बोलणं, एकमेकांची विचारपूस करणं हे चित्र सर्रास दिसायचं, घरांची दारे कुलूपबंद नसत, आणि मनांमध्ये भिंती नसत. गावात एखाद्याकडे पाहुणा आला तर तो संपूर्ण गावाचा पाहुणा असायचा. आज मात्र हे चित्र पार बदललेले दिसते. आज दारे मजबूत झाली… पण मनं मात्र तुटलेली दिसतात. आजचा माणूस आपल्या हातात मोबाइल धरून दिवसभर “कनेक्टेड” असतो, पण अंतर्मनाने तो कधी नव्हे इतका डिसकनेक्टेड झाला आहे. नाती हळू हळू दुरावलेली दिसतात.
खरंच…
माणूस एकमेकांशी
वाईट का वागतो?
द्वेषाची आणि संशयाची सावली इतकी गडद कशी झाली?
आणि नाती एवढी दुर्मिळ का झालीत?
हे प्रश्न मनात घर करतात. मला तर अनेकांच्या मनातल्या
जखमांचा भार, न दिसणाऱ्या वेदना हेच त्याचे कारण वाटते. प्रत्येक
माणूस चालतो तेव्हा त्याच्यासोबत काही, न दिसणाऱ्या जखमा
चालत असतात. काही अपमानाच्या, काही दुर्लक्षाच्या, काही प्रेमभंगाच्या. जे दुखावलेले असतात, तेच कधी कधी इतरांना दुखावतात. बर्याचदा वाईट वागणारा माणूस वाईट नसतो; तो जखमी असतो.
खरं तर संवाद
कमी झाल्यावर नाती ‘मूक’ होतात. आज घरात चार लोक असले तरी बोलणं फक्त दोन
मोबाईलमध्ये होतं. आपण एकमेकांसोबत नाही… आपण स्क्रीनसोबत जगतो. माणसाला माणसानेच
समजून घ्यायला हवे, पण आपण “टायपिंग…” मध्येच गुंतलो आहोत.
बोलणं थांबलं की
नाती हळूहळू श्वास घेणं थांबवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आनंदाला
विषारी करणारी एक गोष्ट म्हणजे तुलना. एकमेकांची तुलना करत करत आपण आयुष्याच्या
आनंदावर काळी रेघ ओढली आहे. कोणाचं घर मोठं? कोणाची नोकरी भारी? कोणाचं मूल हुशार? ही तुलना मनातल्या समाधानाला खाऊन टाकते… आणि मत्सराला जन्म देते. मत्सर
माणसाला कधी दुसर्याच्या डोळ्यातील आनंद दिसू देत नाही; मत्सर, सगळ्यात सुंदर नात्यांचाही गळा घोटतो.
स्वार्थ ही
नात्यांवर पडलेली धूळ असते. आज बहुतेक संबंधांचे गणित असे झाले आहे की, “मला काय मिळणार?” जगणे इतके व्यवहारिक
झाले आहे, की भावना आता बोनस समजल्या जातात. जोपर्यंत
आपण उपयोगी असतो तोपर्यंतच आपल्याला आदर मिळतो. पण नाती उपयोगासाठी नसतात; नाती उपजतात, वाढतात, टिकतात. आपण मात्र त्यांना बोलावून
आणण्याऐवजी आजकाल सोडून देणं पसंत करतो. स्वार्थामुळे हे माणूसपण हरवताना दिसते.
आज माणसातला
माणूस हरवताना दिसतो. आज फक्त भूमिका उरल्या आहेत. प्रत्येक माणूस दिवसभर अनेक
भूमिका निभावतो: आई, वडील, मुलगा, शिक्षक, अधिकारी… पण या भूमिका निभावताना आतला ‘माणूस’ कुठे
हरवतो ते आपण लक्षातच घेत नाही. आपण नम्रता विसरलो, कृपाशब्द विसरलो, एकमेकांच्या डोळ्यातून दुःख वाचणं विसरलो. माझ्या
एखाद्या विखारी शब्दामुळे कुणाचे तरी मन दुखावेल याचा विचार आपण करत नाही. जगण्याच्या
स्पर्धेत माणुसकी मागे पडली.
सरड्यापेक्षाही
रंग बदलणारी माणसे जागोजागी आपणास दिसू लागली आहेत. म्हणूनच व. पु. काळे यांनी
सांगितल्याप्रमाणे “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही, असे माणूस नावाचे यंत्र आहे” ही व्याख्या खरी वाटू लागते. माणूस आज
दिवसेंदिवस अनाकलनीय, भावनाशून्य आणि यांत्रिक बनू लागला आहे. एखादी वाईट
घटना समोर घडत असताना, मदत करायचे सोडून आपली बोटे मोबाईलवर व्हिडिओ
बनवण्यात गर्क होतात. तेव्हा माणूसपण
संपल्याचे जाणवते.
खरंतर कोणाला त्रास होणार
नाही अशा दोन शब्दांनी संवादाची सुरुवात झाली तर अनेक प्रश्न सुटतात. कधीकधी “कसा
आहेस?” हे दोन शब्द एखाद्याला उभारी देऊ शकतात. क्षमा करायला
शिकलं तर नाती अजून घट्ट होतील. मनातल्या रागाने आपणच स्वतः भाजत असतो, सोडून द्यायला शिकलो तरच नाती घट्ट होतील. आपणास एकमेकांशी तुलना थांबवावी
लागेल. आपल्या वाटेवर आपणच चालतो. इतरांचा प्रवास वेगळा असतो. नात्यांना वेळ दिला
तरच नाती टिकतात. कधी कधी एका हसण्याने, एका स्पर्शाने, एका मनापासूनच्या शब्दाने एका माणसाचं जगणं बदलतं. वेळ दिली की नाती बोलू
लागतात. आपण वेळ काढला नाही की नाती शांत होतात. माणसामध्ये भावनांचा ओलावा असला
पाहिजे, त्या ओलाव्याशिवाय जगणे म्हणजे कोरडं वाळवंट ठरेल.
आजची बदलणारी परिस्थिती, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, यांत्रिक जीवनपद्धती यामुळे माणूस बदलतो आहे. माणुसकी म्हणजे करुणा, संवेदनशीलता, सहअस्तित्व आणि परस्पर सन्मान. दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही घटनांनी या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सामाजिक माध्यमांवरील द्वेष व अपमान, महिलांवरील अत्याचार व असंवेदनशील वागणूक, वृद्ध व आजारी व्यक्तींची उपेक्षा, गरीब व गरजूंचा अमानुष छळ,, मुलांवरील शोषण व बालमजुरी, धार्मिक-जातीय तेढीमुळे होणारी हिंसा, अपघातग्रस्तांना मदतीऐवजी व्हिडिओग्राफी या घटना आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. माणुसकी जपणं म्हणजे मोठ्या घोषणा नव्हेत; तर दैनंदिन आयुष्यातील लहान-लहान कृती—मदत, सहानुभूती, न्याय्य वागणूक.
आपण प्रत्येकाने थोडं थांबून “मी माणूस म्हणून काय केलं?” असा प्रश्न स्वतःला विचारला, तरच समाज अधिक मानवी बनेल.हरवलेले माणूसपण सिद्ध करणार्या, माणुसकीला काळिमा फासणार्या अनेक घटना जेव्हा घडतात, तेव्हा परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते, माणूसपण देगा देवा.
आजचा ब्लॉग खूप वाचनीय आणि अंतर्मुपुरेसे आहे असे मला वाटते.ख करणारा आहे.
उत्तर द्याहटवाआपण मोह,मत्सर , गर्व, आत्मपरीक्षण आणि आत्मप्रौढी वृत्ती ,प्रेमभाव ,सन्मान अशा अनेक शब्दांचा आपल्या जीवनातील नेमका अर्थ समजून घेत तसे आचरण करण्याचा किंचितसा प्रयत्न करू शकलो तरी पुरेसे आहे असे मला वाटते.
सारंग ठाणेकर.
धन्यवाद सारंग सर, माझ्या ब्लॉगला आपण नेहमीच अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देत असता, यामुळे लेखनास नक्कीच प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. धन्यवाद...
हटवासुंदर लेख, खूप छान 👌👌👌
हटवावास्तववादी लिहिलात, 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअतिशय छान 👌👌👌
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाफार सुंदर लिहिले आहेस राजेश. Mahesh Angadi
उत्तर द्याहटवाधन्यवाद महेशजी
हटवाखूप सुंदर लेख आहे मला फारच आवडला माणसाने माणसाशी माणसासम वागवणे आणि ही त्यामध्ये माणसाची माणुसकी टिकून ठेवणे हे सध्याच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे हे तुम्ही तुमच्या लेखातून सिद्ध केले आहे परंतु हे मनोगत जे आहे ते मनोगत सर्वांनी अंगीकृत करून त्याचा आपल्या जीवनात वापर करावा असे मला वाटते
उत्तर द्याहटवाधन्यवाद मस्के सर
हटवातुमच्या लेखातून माणसा.. माणसा मधील, नात्यांमधील बदल मनाला थेट भिडतात.
उत्तर द्याहटवाआशय, विषय, शब्दरचना अप्रतिम
" स्वार्थ ही नात्यांवर पडलेली धूळ असते." अशा पद्धतीचे लिखाण तुमच्यासारखा प्रतिभा संपन्न, सिद्ध हस्त लेखकच करू शकतो.
माणसं अशी कशी वागू शकतात.?....
यावर तुमच्या लेखणी द्वारे तुम्ही वास्तवाचा धगधगीत उजेड टाकला आहे.
अप्रतिम ब्लॉग 🙏
.... डॉक्टर आनंद सिताराम खवणेकर.
( डोंबिवली) 28 डिसेंबर 2025
आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब.
उत्तर द्याहटवाआजच्या काळाची गरज असणारा हा लेख आहे. या लेखाद्वारे सध्यकाळातील समाजाची समस्या सांगून त्यावरचे उपाय ही सांगितले आहेत. समाजातील नातेसंबंध दृढ असतील तर समाज विकास पावतो. याच विचाराचे माध्यम ठेवून तुम्ही नेमक्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सुंदर लिखाण.अभिनंदन 😇🎉
उत्तर द्याहटवाआजच्या काळाची गरज असणारा हा लेख आहे. या लेखाद्वारे सध्यकाळातील समाजाची समस्या सांगून त्यावरचे उपाय ही सांगितले आहेत. समाजातील नातेसंबंध दृढ असतील तर समाज विकास पावतो. याच विचाराचे माध्यम ठेवून तुम्ही नेमक्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सुंदर लिखाण.अभिनंदन 😇
उत्तर द्याहटवासंयोगिता सासने
मस्त लेख. मन भारावून गेलं
उत्तर द्याहटवा“माणूसपण देगा देवा” सर तुमचा हा लेख म्हणजे आजच्या समाजासमोर धरलेला प्रांजळ आरसा आहे. हरवत चाललेली माणुसकी, तुटत चाललेली नाती आणि मोबाईलमुळे वाढलेलं भावनिक अंतर त्यांनी अतिशय सोप्या भाषेत प्रभावीपणे मांडलं आहे. लेख वाचताना प्रत्येक वाचक स्वतःशीच संवाद साधायला लागतो. मोठ्या शब्दांपेक्षा लहान कृतीतून माणुसकी जपण्याचा दिलेला संदेश मनाला खोलवर भिडतो. हा लेख वाचून “मी माणूस म्हणून काय करतोय?” हा प्रश्न स्वतःला विचारायला लावतो—आणि तेच या लेखाचं मोठं यश आहे.
उत्तर द्याहटवासर, आपण खूप छान विश्लेषण केले आहे 👍
उत्तर द्याहटवाखरंच आहे राजेश तू या लेखामधून लहानांपासून मोठ्यांचेही विचारपरिवर्तन केलं आहेस. असाच लिहत रहा मित्रा तुला मनापासून शुभेच्छा
उत्तर द्याहटवा