बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन – पुरुषत्वाची नव्याने व्याख्या करण्याची गरज

 


      आज 19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. जगभरात या दिवशी पुरुषांच्या योगदानाबरोबरच त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याबद्दलही चर्चा केली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जगताना अनेकदा पुरुषांच्याच भावना, संघर्ष आणि वेदना यांची गळचेपी होताना दिसते.

      पुरुष प्रधान संस्कृती जरी पुरुषांनीच बनवली असली तरी पुरुषच त्या साचेबद्ध अपेक्षांमध्ये अडकलेले दिसतात. भारतीय किंवा मराठी संस्कृतीवर एक नजर टाकली तर “पुरुष हा घराचा कर्ता, शक्तीचा आधार, कमावता आणि निर्णायक” अशी प्रतिमा पारंपरिकपणे रंगवली गेली आहे. या चौकटीत समाज पुरुषावर काही अपेक्षा लादतो. पुरुष मजबूत असतो, त्याने जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजेत, तो कधीच खचू नये, त्याने भावना दाखवायच्या नाहीत, त्याने रडणे म्हणजे त्याचा कमकुवतपणा. अशी ही प्रतिमा काहींना गौरवाची वाटेल, पण हजारो पुरुष आज या चौकटीमध्ये अडकून मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत.

            पुरुष रडत नाहीत” किंबहुना त्यांनी रडू नये ही समाजाची अपेक्षा असते. खरंतर रडणे हे भावनांचे ओझे कमी करण्याचे नैसर्गिक माध्यम आहे. पण समाज पुरुषाच्या हातात रुमाल देण्याऐवजी तलवार देतो आणि म्हणतो – लढ! एखादा पुरुष ताण, हार, वेदना, नैराश्य दाखवू लागला, तर त्याला ताबडतोब सुनावले जाते. बायकी झाला का?”, “इतकं काय होतंय?” इत्यादी, परिणामी रडू न देण्याचा आग्रह पुरुषाला आतून पोकळ करतो. मानसिक ताण, नैराश्य आणि अनेक वेळा आत्महत्येपर्यंत पोहोचवतो.

      अनेकदा पुरुषांवर कर्तृत्वाची सक्ती असते. प्रत्येक पुरुषासाठी ‘यशस्वीरूप’ होणे आवश्यकच असते. पुरुषाला समाज काही अटींवर स्वीकारतो. त्याला यशस्वी असावंच लागतं, कुटुंबाची जबाबदारी त्याने उचललीच पाहिजे, त्याने कमावलेच पाहिजे, त्याने स्वतः कमकुवत होऊ नये. एखाद्या पुरुषाची नोकरी गेली, व्यवसायात अपयशी झाला किंवा आर्थिक अडचण आली, तर त्याच्यावर समाजाचा कटाक्ष वेगळा पडतो.

स्त्री अपयशी झाली तर तिला सांत्वन मिळते, पण पुरुष अपयशी झाला तर त्याला दोष आणि टोमणे मिळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. पुरुषही माणूस आहे.  पुरुष फक्त ‘पुरुष’ नाही, तो एक मुलगा, एक पती, एक पिता, एक मित्र, एक नागरिक आहे. तो देखील समर्थनाची गरज असलेला, कौतुक ऐकण्याची इच्छा असलेला, कधीकधी खचणारा एक साधा मनुष्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यालाही भावना आहेत, त्यालाही भीती वाटते, त्यालाही रडावेसे वाटते, याची जाणीव सर्वांना असली पाहिजे.

आज याबाबत समाजाला बदलण्याची आवश्यकता आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त यावर विचार होण्याची गरज आहे. पुरुषाला देखील भावनिक स्वातंत्र्य देणे, “रडणे ही कमजोरी नाही” हे शिकवणे, पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी खुली चर्चा करणे, मुलांना लहान वयातच भावनांची अभिव्यक्ती शिकवणे, घरात आणि समाजात संवेदनशीलता वाढवणे याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणजे पुरुषांची स्तुती नव्हे, तर त्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक वेदनांचेही वास्तविक दर्शन आहे. नवे पुरुषत्व म्हणजे ताकद + संवेदनशीलता + स्वातंत्र्य + मानवीपणा असे मानले पाहिजे. आज आपण एक निर्णय घेतला पाहिजे. पुरुषाने रडणे लाजिरवाणे नाही, अपयश पेलण्यात तो एकटा नाही, समाजाने खरे तर स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही प्रथम माणूस म्हणून पाहिले पाहिजे”.

आजच्या दिवसाची खरी भेट म्हणजे पुरुषाला समजून घेणे, त्याला मोकळे होऊ देणे आणि त्याच्या भावनांवर ताळेबंद न लावणे. चला, पुरुषांवर अनावश्यक अपेक्षांचे ओझे न लादता माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहूया.


९ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर विचार आहेत. ☺️☺️👌

    उत्तर द्याहटवा
  2. आपण आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्त जो लेख लिहिला आहे, त्या अनुषंगाने व्यक्त झाले आहात त्याबद्दल आपले मनापासून कौतुक आणि धन्यवाद ही देतो. असेच लेख आपल्या लेखणीतून (हातून) लिहिले जावेत अश्या शुभेच्छा देतो.
    खूपच छान लेख मोजक्या आणि संक्षिप्त रूपात लिहिलेला लेख बरेच काही सांगून जातो. धन्यवाद डॉ. राजेश सर 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लेख, मोजक्या आणि संक्षिप्त रूपात सुंदर लेखन

    उत्तर द्याहटवा
  4. प्रिय राजम सर....
    आपला लेख हृदयाला स्पर्श करून जाणारा आहे. पुरुषांच्या भावनिक जगाबद्दल, त्यांच्या न बोललेल्या वेदनांबद्दल आणि समाजाकडून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या साचेबद्ध अपेक्षांबद्दल आपण अतिशय नेमके आणि संवेदनशीलपणे लिहिले आहे. ‘पुरुष रडत नाहीत’ या चुकीच्या समजुतीच्या मागे किती ताण, किती घुसमट आणि किती अपूर्ण राहिलेलं व्यक्तिमत्त्व दडलेलं असतं—हे आपण ज्या स्पष्टतेने मांडलं आहे, ते डोळे उघडणारे आहे.
    आजच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने पुरुषत्वाचे नवे, मानवी आणि भावनिक परिमाण आपण ज्या सहजतेने उलगडले, ते खरोखर समाजाला बदलण्याचा मार्ग दाखवणारे आहे. ताकद आणि संवेदनशीलता ही एकमेकांची शत्रू नसून पूरक असतात, हे आपण सुंदरतेने पटवून दिले.

    आपला लेख केवळ विचार मांडत नाही, तर वाचकांना अंतर्मुख करतो; पुरुषांच्या न दिसणाऱ्या संघर्षांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. आजच्या काळात अशी लेखणी अधिक गरजेची आहे. मनापासून अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार – पुरुषांच्या भावनिक जगाचा आवाज इतक्या प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल.”

    उत्तर द्याहटवा
  5. डॉक्टर आनंद सिताराम खवणेकर२० नोव्हेंबर, २०२५ रोजी ६:४५ PM वाजता

    "रडू न देण्याचा आग्रह पुरुषाला पोकळ बनवतो". किती समर्पक शब्दांत तुम्ही विषयाची मांडणी केली आहे. पुरुषाच्या अंतरंगातील भावविश्व उत्कटरित्या उलगडून सांगितल्या बद्दल खूप धन्यवाद.डॉक्टर तुमच्या पुढील वैचारिक साहित्यासाठी अगणित शुभेच्छा. असेच नवनवीन विषयावर आशय संपन्न, दर्जेदार साहित्य आपण लिहाल अशी आशा बाळगतो........

    @डॉक्टर आनंद खवणेकर, डोंबिवली, 20/11/2025

    उत्तर द्याहटवा
  6. नेहमीप्रमाणे लय भारी...पुरुष म्हणजे सर्वांगाने नेमके काय ते आज समजले ...पुरुषाला गरीब बिच्चारा म्हणतात ,त्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडता का येत नाही .ते खंबीरपणे सर्व काही कसे हाताळतो याची या ब्लॉग मध्ये अत्यंत वैचारिक रित्या मांडणी बघून.वाचून कळले . धन्यवाद

    उत्तर द्याहटवा