बरेच दिवस रघुवीर घाटाला भेट द्यायची इच्छा मनात घर करून बसली होती. कामाच्या व्यापात आणि दैनंदिन धावपळीत ती इच्छा मात्र नेहमीच पुढे ढकलली जात होती. नुकतेच माझे मित्र प्रा.सागर यांनीही तसाच विचार मांडला आणि मग दोघांमध्ये क्षणभरही उशीर न लावता ठरलं. ‘चला, रघुवीर घाटाला जाऊया!’ या छोट्याशा निर्णयाने मन आनंदाने उड्या मारू लागलं.
रिमझिम पावसाच्या सरी अनुभवण्यासाठी आम्ही कार न वापरता बुलेटवर प्रवास करायचं ठरवलं. आकाशात मेघांचे रेशीम कापड पसरलेले, पावसाच्या रिमझिम सरी झेलत जाण्याची कल्पनाच मोहक होती. सकाळीच आमची बुलेट गर्जत रघुवीर घाटाच्या दिशेने निघाली. सप्टेंबरमधला तो रविवार, हलकेच सरी कोसळत होत्या. आकाश कधी ढगांनी भरून जायचं तर कधी एखादा निळसर झगमगता तुकडा डोकावायचा. पावसाचा अधून मधून होणारा शिडकावा अंगावर घेत, रेनकोट घालून आमची सफर सुरू झाली. सकाळचा गारवा, दमट मातीचा सुवास, हलका पाऊस आणि इंजिनाची गडगडाटी धून, सारं कसं आल्हाददायक.
खेडहून तीस किलोमीटरचा प्रवास म्हणजे डोंगरांच्या मिठीत शिरत जाण्याचा अनुभवच. रस्ता जरी खड्डेमय होता, तरी प्रत्येक वळणावर नवी हिरवाई, नवे झरे, आणि दूरवरून दिसणाऱ्या पांढऱ्या धबधब्यांची लकेर मन हरवून टाकत होती. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या रघुवीर घाटाने जणू आम्हाला उबदार मिठी मारली. वाटेत येणारी नागमोडी वळणं, खाली पसरणाऱ्या दऱ्या, हिरवीगार घनदाट झाडं आणि त्यांची ओलसर सुगंधी पाने, प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावासा वाटत होता. आम्ही घाटमाथ्याकडे जसजसे चढत होतो, तसतसे ढग आमच्याकडे जवळ येत होते, जणू आमचं स्वागत करायलाच ते उभे होते. खड्डेमय रस्ता थोडासा कटकटीचा ठरत होता; पण घाटमाथा जवळ येताच सगळा त्रास विरघळून गेला.
घाटमाथ्यावर पोहोचल्यावर दाट धुक्याची चादर सगळीकडे पसरली होती. सगळीकडे एक अलौकिक पांढुरकी शांतता. एखाद्या रहस्यमय कादंबरीत वावरतोय की काय, असं वाटावं इतकं ते दृश्य मोहक होतं. अचानक डोंगराच्या पायथ्यापासून जोरदार वारा सुटला आणि त्या वाऱ्याने धुक्याचे पडदे जणू हळूवार बाजूला केले. डोंगराच्या पायथ्यापासून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी सारा नजारा बदलून टाकला. समोर प्रकटलेली दृश्यं मन थक्क करून गेली, हिरव्यागार दऱ्या, झुळझुळ वाहणारी नदी, डोंगरातून झेपावणारे छोटे धबधबे आणि दूरवरचे निळसर आभाळ, सगळं एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासवरचं जिवंत चित्र भासू लागलं.
त्या वाऱ्याने अंगावर हलकेच पाण्याचे तुषार उडत होते, जणू निसर्गानेच आपलं स्वागत केलं. त्या थंडगार वाऱ्याने अंगावर रोमांच उभे राहिले. रेनकोट आपसूकच उतरले आणि आम्ही त्या गारव्याचा, त्या थंडाव्याचा मनसोक्त आनंद घ्यायला लागलो, पावसाच्या सरींच्या तुषारांनी शरीराबरोबरच मन चिंब झाले आणि नकळत मोबाईलच्या कॅमॅऱ्याने सेल्फी घेणे सुरु झाले. क्षणभरासाठी आपण आभाळाच्या उंच शिखरांवर आहोत आणि ढगांचे पांढरेशुभ्र पुंजके आपल्याला हळुवार स्पर्श करून जात आहेत असं वाटलं. नुकत्याच कोसळलेल्या पावसामुळे डोंगर नटून बसल्यासारखे भासत होते. एखाद्या चित्रकाराने हिरव्या, पांढऱ्या आणि करड्या रंगांचे कुंचले उधळून एखादं मोहक चित्र रंगवलं आहे, अशी ती दृश्यं भासत होती. बालकवींनी वर्णिलेलं “क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” हे श्रावणातील ऊन पावसाचं खेळकर चित्र धुक्याला लागू होत होतं. क्षणभर दाट धुकं, क्षणभर निखळ आकाश हा निसर्गाचा लपंडाव मोहून टाकणारा होता.
अशा प्रसन्न वातावरणात आम्ही त्या घाटावरच्या एकमेव हॉटेलमध्ये शिरलो. गरमागरम कांदा भजीचा सुवास पसरला आणि मोह आवरला नाही. बाहेर पावसाच्या सरी, आत हातात उकळत्या चहाचा कप आणि समोर गरमा गरम भजी, जणू पर्वतराजानेच दिलेला हा प्रसाद वाटत होता. हॉटेलच्या छोट्याशा गच्चीत बसून दूरवरचा घाट, वाऱ्याने डुलणारी झाडं, ढगांच्या सावल्या पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही. निसर्गाची ही संगत मनाला अगदी समाधान देऊन गेली.
रघुवीर घाट खरंतर पर्यटनासाठी एक अद्भुत स्थळ आहे, पण तिथे फारशी गर्दी नसल्याने एक वेगळाच शांत, निर्मनुष्य अनुभव मिळाला. हे ठिकाण खरं तर अजूनही लोकांच्या नजरेआड आहे. गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त निसर्गाचा अवखळ खेळ. मात्र कोणत्याही सुविधा किंवा सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हे ठिकाण अजूनही दुर्लक्षित राहिलं आहे. कोकणातील अशा कितीतरी स्वर्गवत, सुंदर जागा जर सुनियोजित रितीने विकसित केल्या तर त्या स्थानिकांसाठी रोजगाराचं साधन बनू शकतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावू शकतात, हा विचार मनात चमकून गेला.
परतण्याची वेळ झाली तेव्हा मन अजिबात तयार नव्हतं, मन जड झालं होतं. तरीही वास्तवाची जाणीव ठेवत आम्हाला तिथून निघावं लागलं. मात्र घाटातील ती हिरवाई, धुक्याची नाजूक चादर, ढगांच्या सान्निध्याची अनुभूती, पावसाळी गारवा, हे सगळं मनात घट्ट कोरून आम्ही घाट उतरलो. बुलेट घाटमाथ्यापासून खाली सरकत होती, पण मन मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होतं, त्या क्षणांत जाऊन रमत होतं.
खरंच, रघुवीर घाट ही केवळ एक सफर नव्हती, तर आत्म्याला भिडणारा अनुभव होता, जो कायम मनात राहील. भटकंतीच्या छंदात आणखी एक हक्काचं, लोभसवाणं ठिकाण मिळाल्याचा समाधानकारक आनंद या प्रवासानं दिला. पुढच्या वेळेस नक्कीच पुन्हा येथे यायचं, हा निर्धार मनात पक्का करूनच आम्ही घरी परतलो.
मस्त निसर्ग वर्णन
उत्तर द्याहटवावाह सुंदर, निसर्गातील भटकंतीचे मन ओले चिंब करणारे वर्णन 🌹👍👍
हटवाशब्दांकन अतिशय सुरेख सर आणि निसर्गवर्णन तर मनमोहकच वाटले.
हटवाभारीच वर्णन वाचल्यावर लगेच तिथे जावं असं वाटलं बघू कधी शक्य होतंय
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर वर्णन वाचल्यावर तिथल्या निसर्गाची रूप डोळ्यासमोर उभी राहिली,तिथेभेट द्यावी असं वाटलं याचं कारण तुझे शब्द लेखन.
उत्तर द्याहटवारघुवीर घाटाचे अप्रतिम वर्णन, तुझ्या लेखणीतून उतरलं आहे आहे.
उत्तर द्याहटवाडॉ. आनंद खवणेकर, (डोंबिवली )
उत्तर द्याहटवासुंदर प्रवास वर्णन. मी खेडला आलो की जाऊ आपण.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाछान निसर्गवर्णन केले आहे
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर वर्णन आहे.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर असे लालित्यमय वर्णन
उत्तर द्याहटवाछान वर्णन. 👌👌
उत्तर द्याहटवासर तुमच्या सोबत आम्हीही अनुभव घेतला धन्यवाद 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप छान आहे सर अतिशय सुंदर आणि तुमच्यामुळे रघुवीर घाटाबददल अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच लिहित रहा समजला आहे
उत्तर द्याहटवाखुप छान वर्णन केले आहे, खूप खूप शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा