शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

आमचे सण आणि आमची जबाबदारी

 



भारत हा सण-उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. बरेचसे सण हे केवळ धार्मिक विधींशी संबंधित नसून, ते आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जाणीवांचेही प्रतीक आहेत. प्रत्येक सणामागे एक कथा, एक सांस्कृतिक संदर्भ आणि निसर्गाशी असलेले नाते दडलेले आहे. या सणांमध्ये एक विशेष सौंदर्य आहे, ते निसर्गाशी एकरूप आहेत, पर्यावरणपूरक आहेत आणि समाजाला एकत्र आणणारे आहेत. हे सण केवळ धार्मिक नसून सामाजिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक संदेश देतात. मात्र, अलीकडच्या काळात सणांचे मूळ स्वरूप बरेच बदलले असून त्यामागे आधुनिकतेची छाया दिसू लागली आहे, ज्यामुळे सणांचा खरा हेतू काहीसा हरवताना दिसतो.  

आपले अनेक सण हे निसर्गावर आधारलेले आहेत. उदा. वटसावित्री व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा करून त्याचे संवर्धन केले जाते.(वडाच्या पाने, फळे आणि मुळांपासून मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात येतो) दिवाळीत घरगुती माती वापरून दिवे लावले जातात, ज्यामुळे अंधार दूर होतो आणि तेलातील सुगंध वातावरणात पसरतो. श्रावणातील नागपंचमीमध्ये सर्पांचे संरक्षण हा संदेश दिला जातो. पोळ्याचा सण जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्व सणांतून निसर्गाशी जोडलेले नाते दृढ केले जाते आणि अनेक वृक्षांचे, प्राण्यांचे संवर्धन होते.

मकरसंक्रांतीला तीळगुळ हे हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ आहेत. दिवाळीत तेलाचे दिवे लावल्याने हवेतील जीवाणू कमी होतात आणि स्वच्छता होते. आपल्या पूर्वजांनी सणांमध्ये असे नियम आखले की जे पर्यावरणपूरक होते. हे सर्व निसर्ग जपणारे आणि आरोग्य सुधारक होते. येथे सणांचे आरोग्याशी असणारे नाते लक्षात घेतले पाहिजे. अनेक सणांमध्ये ऋतूनुसार आहार ठरलेला असतो. संक्रांतीला तीळगूळ, हिवाळ्यात उष्णता देतो. होळीपूर्वी उपवास केल्याने पचनशक्ती सुधारते. दिवाळीत चिवडा-लाडू हिवाळ्यात आवश्यक कॅलरीज देतात. सणांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. मिठाईवाले, फुलवाले, कारागीर, ढोल ताशा पथक, साउंड सिस्टिम भाड्याने देणारे सर्वांचे उत्पन्न वाढते. अनेक सण महिलांना सामाजिक व धार्मिक नेतृत्वाची संधी देतात (उदा. हरतालिका, करवा चौथ, वटसावित्री).

आजच्या काळात मात्र सणांचा व्याप बदलू लागला आहे, स्वरूप बदलू लागले आहे. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे प्रचंड उंच केल्याने अपघात व मृत्यू होतात. यावर्षी  झालेल्या दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यात २ गोविंदा  मृत्यूमुखी पडले  आणि ३१८ जण जखमी झाले. गणेशोत्सवात किंवा इतर सणांमध्ये डीजेच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकार, कानांचे विकार, मानसिक ताण यांसारख्या समस्या वाढतात. लेझर लाईट्सच्या अतिरेकामुळे डोळ्यांचे विकार उद्भवतात. प्लास्टिकची सजावट, रासायनिक रंगांची मूर्ती यामुळे पाणी व माती प्रदूषित होते.

आधुनिकतेमुळे या सणांच्या स्वरूपात बदल होऊन काही समस्या निर्माण झालेल्या दिसतात.  या समस्यांवर उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सणांचे मूळ उद्दिष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भक्ती, आनंद, निसर्गाशी नाते यांचा समन्वय राखला पाहिजे. सणांमध्ये सुरक्षेला महत्व दिले पाहिजे. आवाजावर नियंत्रण ठेवणे, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करणे. पर्यावरणपूरक साहित्य वापरणे, मातीच्या मूर्ती, कागदाची सजावट, नैसर्गिक रंग वापरणे गरजेचे आहे, यासाठी शाळा, महाविद्यालये, सोसायट्यांमध्ये कार्यशाळा घेवून जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

सणांचे खरे महत्त्व जपणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे स्वरूप फक्त मनोरंजनासाठी बदलू नये, तर त्यातून संस्कार, जाणीव आणि एकात्मता निर्माण व्हावी. आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी सणांचे पावित्र्य जपून ठेवायचे असेल, तर आपणच जबाबदारी घेऊन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आरोग्यदायी पद्धतीने सण साजरे करणे गरजेचे आहे. मातीच्या मूर्त्या, नैसर्गिक रंग, कागदी सजावट आणि पारंपरिक गाणी ह्याकेवळ निसर्गाला हानी करणार नाहीत, तर सांस्कृतिक परंपरा टिकवतील. सणानंतर प्रचंड कचरा जमा होतो उदा. फुले, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक डेकोरेशन. त्यांची सफाई करणे ही आपली जबाबदारी आहे. आपत्ती व्यवस्थापन करणे ही आपली जबाबदारी आहे.

सणांमद्धे वापरल्या जाणाऱ्या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाचा स्तर 85 dB पेक्षा जास्त नसावा; 100 dB इतका आवाज कानाला गंभीर हानी पोहचवू शकतो. Earplugs वितरित करणे आणि त्यांच्या वापरास प्रोत्साहन देणे आवश्यक ठरेल. या सणांमद्धे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.  सततच मोठा आवाज शरीराला ताण देतो, त्यातून  उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्राहीनता, मानसिक तणाव यांचा धोका निर्माण होतो. आजची मुले मोबाईलमध्ये जास्त रमलेली आहेत. त्यांना सणांचे खरे महत्त्व समजवणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना सणांचे शास्त्र, कथा सांगाव्यात, त्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे.

सण म्हणजे केवळ उत्सव नाहीत तर ते आपल्या संस्कृतीचे आरसे आहेत. या आरशाला डाग लागू नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे पण आपण सर्वांनीच सणांचे मूळ उद्दिष्ट, पावित्र्य आणि पर्यावरणपूरकता जपली पाहिजे.


1 टिप्पणी: