जंगल
भ्रमंती हा खरंतर माझ्या अनेक छंदांमधील एक आवडता छंद. देवगड मध्ये असताना
आजूबाजूच्या छोट्या मोठ्या जंगलात फिरण्याचा मनमुराद आनंद यापूर्वी घेतला होताच.
अगदी दाजीपूरच्या गवा रेड्यांच्या जंगलात सलग तीन दिवस भ्रमंती ही केली होती. समुद्र
कासव संरक्षण मोहीमेमधील सहभाग, गवा रेड्याचे अगदी जवळून फोटो काढण्याच्या नादात त्याच्या हालचालींकडे झालेले दुर्लक्ष
किंवा हातात लाल रंगाची छत्री असल्याने एका बैलाने केलेला पाठलाग असे लहान मोठे
प्रसंग गाठीशी होतेच. पुढे नोकरीनिमित्त देवगड पासून दूर गेल्यावर थोडी या छंदाला
खीळ बसली, पुढे सर्व मित्रांसोबत होणाऱ्या सहलींची जागा आता
हळूहळू कौटुंबिक सहलीने घेतली होती.
दोन दिवसाच्या सुट्टीचे नियोजन करताना सहजच
माथेरानची सहल सूचली आणि नियोजन सुरू झाले. मुंबईपासून जवळच असल्याने मुंबईचा एक
मित्र महेश यानेही तयारी दर्शवली, मग दोन कुटुंबांनी
माथेरानला जायचे निश्चित झाले. माथेरान या नावातच जंगल आहे आणि उंच अशा
डोंगरांच्या माथ्यावरचे हे जंगल म्हणजे एक वेगळाच आनंद. खरंतर माणसांच्या सततच्या
सहवासाने त्या जंगलाचं जंगलपण हरवलेलं असणार हे निश्चितपणे वाटत होतं. कोणत्याही
जंगल सफारीला जाताना नियोजन महत्त्वाचे असते, गलथानपणा चालत
नाही हे अनुभवाने शिकलो होतोच. त्या दृष्टीने नियोजन ही सुरू झाले.
अगदी
आदल्या दिवशी महेशने आपल्या काही समस्यांमुळे 'मी
माथेरानला सहकुटुंब न येता एकटाच येणार' असे जाहीर केले,
मग थोड्याशा नाराजीने आमचा माथेरान प्रवास सुरू झाला. मी, माझी पत्नी प्रगती आणि छोटा मुलगा सोहम असे आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत,
उंच उंच डोंगरांच्या चढाईचा अनुभव घेत माथ्यावर पोहोचलो. मोठमोठे
चढाव आणि अचानक येणारी वळणे यामुळे मधूनच छातीत धस्स होत होते, पण मजाही वाटत होती. माथेरानमध्ये फिरण्यासाठी आम्ही सज्ज झालो. महेश
मुंबईहून थेट माथेरानलाच येणार होता. माथेरान मध्ये काही वेळा माकडांचा त्रास होतो,
हे ऐकले होते. आमचा मित्र संजय उर्फ भाऊने तर मला बजावून सांगितले
होते, की 'सोबत कोणती बॅग घेऊ नका,
माकडे ती हिसकावून घेऊ शकतात' यामुळे पाण्याची बॉटल हातात
घेऊन बाकीच्या वस्तू खिशात ठेवून आम्ही ठरलेल्या ठिकाणी येऊन महेशची वाट पाहत
होतो.
महेश
मात्र सकाळीच मुंबईहून निघाल्यामुळे त्याच्याकडे किमान एक छोटी सॅक असणे हे
स्वाभाविकच होते. महेशच्या सॅक बाबत मी शंका व्यक्त केली, पण ती सॅक परत आमच्या हॉटेलवर ठेवण्यामध्ये वेळ गेला असता, त्यामुळे तसेच
पुढे गेलो. खरंतर अनेक जण माथेरानचे विविध पॉइंटस बघताना घोड्यांवरून जाणे पसंत
करतात, पण आपण चालतच ही ठिकाणे बघायची असा महेशचा आग्रह होता,
आम्हीही सर्वांनी त्याला तयारी दर्शवली आणि रस्त्यावरच्या दिशादर्शक
फलकांचा आधार घेत आमची भ्रमंती सुरू झाली. पहिलंच ठिकाण होतं मलंग पॉइंट चालत चालत,
रमत गमत आम्ही झाडांच्या गर्द छायेतून आखीव रेखीव बांधलेल्या
रस्त्यावरून चाललो होतो. खरंतर या बांधलेल्या रस्त्यांमुळे जंगलाचं खरं रूप
हरवल्यासारखं वाटत होतं, पण पर्यटकांच्या दृष्टीनेही ते
सोयीचं होतं. बुलबुल, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर या पक्षांचे
मधूनच दर्शन झाले की समाधान वाटायचं.
मलंग
पॉइंटवर पाऊल ठेवताच सर्वांच्याच तोंडातून आs हाs हाs हे उद्गार आलेच. कारण
तिथला निसर्गच अप्रतिम होता. गर्द झाडी, लांबवर पसरलेल्या,
एकमेकात घुसलेल्या डोंगर रांगा, समोरच एका डोंगराच्या रचनेमध्ये भारताच्या दक्षिणेकडच्या नकाशाची आठवण होत
होती. सकाळचं थोडसं धुकं, गार वारा याने मन अगदी प्रसन्न
झालं, पण आमचा आनंद जास्त काळ टिकला नाही. अचानक दोन माकडं
आमच्या अंगावर चालून आली आणि दात विचकून त्यांनी आक्रमणाचा पावित्रा घेतला.
त्यांना हुसकावण्यासाठी सहजच आमचे हात वर उचलले गेले आणि त्यांना आम्ही हाकलू
लागलो. त्याबरोबर ते अधिकच आक्रमक झाले आणि अगदी जवळ येऊन आम्हाला त्यांनी रोखून
धरले. खरंतर या अचानक आलेल्या प्रसंगाने आम्ही सर्वच गोंधळून गेलो. माकडा
बरोबरच्या झटापटीत महेशचा पायही दुखावला. महेशच्या पाठीवरील सॅक मुळेच त्यांचं हे
आक्रमण होतं हे लक्षात घेऊन महेशने शेवटी आपली किमती सॅक नाईलाजाने खाली जमिनीवर
फेकली, तेव्हा कुठे त्यांनी आम्हाला सोडून त्या सॅक कडे आपला
मोर्चा वळवला.
एक
माकड आमच्यावर लक्ष ठेवून होता तर दुसऱ्याने सॅकचा ताबा घेतला. सॅकचा एक एक कप्पा
खोलायला त्याने सुरुवात केली. त्यात असणाऱ्या वस्तू काढून त्याने फेकून दिल्या. त्यावेळी
महेशची घालमेल स्पष्ट दिसत होती. त्या माकडाच्या दृष्टीने त्या वस्तूंची किंमत
शून्य होती. शेवटी त्याला जे हवे होते ते सापडले, कारण शेवटच्या कप्प्यात वडापाव
होता, तो वडापाव सापडल्यावर त्याचं मिशन पूर्ण झालं होतं.
त्याने तो वडापाव मोठ्या चवीने खायला सुरुवात केली. आम्ही सर्वजण गर्भगळीत होऊन ते
पाहत होतो. शेवटी त्याची सरशी झाल्यावर ते दोघेही पुन्हा जंगलात निघून गेले आणि
आम्ही एक नवा अनुभव गाठीशी बांधून तेथून पुढच्या प्रवासाला लागलो. विशेष म्हणजे घोड्याचा
पर्याय असताना एका पायाने लंगडत, काठीचा आधार घेत महेशने
आमच्या बरोबरीने तो प्रवास पूर्ण केला.
खरंतर
वडापाव हे माकडाचं अन्न नाही, पण मानवी हस्तक्षेपामुळे जंगलामधील पशुखाद्य
कमी झालं असल्याने नाईलाजाने या प्राण्यांना माणसांचं खाद्य हिसकावून घेऊन
खाण्याची वेळ आली हे लक्षात आलं. एका अचानक आलेल्या संकटामुळे आम्ही थोडे भांबावलो
होतो. खरं तर आम्ही त्या प्राण्यांच्या राज्यात गेलो होतो, त्यामुळे त्या माकडांचं
वागणं फारसं काही चुकीचं नव्हतं. माणसांच्या अतिक्रमणाचा फटका पुढच्या काळात किती
बसणार आहे? याची ही एक झलक होती. यावर आमच्या चर्चा अधिकच रंगल्या आणि मग लुइसा पॉईंट, इको पॉईंट, हनिमून पॉईंट, शार्लोट लेक, लॉर्ड पॉईंट असा आमचा
प्रवास सुरू झाला. एकंदरीत माथेरानच्या जंगलात फिरण्याचा अनुभव हा निसर्गाच्या
सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आणि जंगलातील प्राण्यांशी संबंधित अनुभव घेण्याचा होता.
इको पॉइंट आणि लुइसा पॉइंट हे देखील खूप सुंदर होते. इको पॉइंटवरील ध्वनी
परावर्तनाचा अनुभव घेणे आणि लुइसा पॉइंटवरून खाली पसरलेल्या घनदाट जंगलाचे दृश्य
बघणे हे अविस्मरणीय अनुभव होते. शार्लोट लेक आणि लॉर्ड पॉइंटच्या प्रत्येक
टप्प्यावर निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांचा अनुभव घेता आला, ज्यामुळे पूर्ण प्रवास
हा एक सुंदर आणि रोमांचक अनुभव ठरला.
अविस्मरणीय सफर, पण तेवढीच रोमांचकारी, तुम्हां सर्वांबरोबर झाली माझी.
उत्तर द्याहटवाव्वा...खूपच सुंदर.. निसर्गाचं आणि एकंदरीत सफरीचे सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवाव्वा अप्रतिम माथेरान सफारीचे वर्णन
उत्तर द्याहटवावा फार सुंदर निसर्गाच्या सानिध्यात चे अनुभव आल्याचा भास झाला तुझा लेख वाचून
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवालेख खूप आवडला .
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवा