एखाद्या व्यक्तीस निरोगी आयुष्य मिळणे ही त्याची एक अमूल्य अशी संपत्ती असते. निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, शारीरिक स्वास्थ्य यासारख्या गोष्टी आवश्यक असतात. स्वास्थ्यासाठी योग महत्वाचा ठरतो. योग हा भारताच्या प्राचीन परंपरेचा एक अमूल्य ठेवा आहे, ज्याला संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ जून रोजी योग दिन साजरा केला जातो. २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघाने या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली आणि त्यानंतर दरवर्षी या दिवशी योगाचे महत्व ओळखून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
योग हा भारताच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. महर्षि पतंजलींनी योगसूत्रे लिहिली असून योगाचा उगम भारतातच झाला आहे. भारतीय तत्त्वज्ञानात योगाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे साधन मानले जाते. योगाने केवळ शरीर स्वस्थ ठेवले जात नाही तर मनःशांती आणि आत्मिक समृद्धी देखील साधता येते. वर्तमान काळात तणाव, चिंता, आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. योगाच्या नियमित अभ्यासाने मानसिक शांती मिळते, तणाव दूर होतो, आणि एकाग्रता वाढते. तसेच, भविष्यातील जीवनशैलीच्या समस्यांवर मात करण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात शारीरिक श्रम कमी होत चालले आहेत, त्यामुळे विविध शारीरिक आजार उद्भवतात. योगाच्या माध्यमातून शरीरातील सर्व अवयवांची योग्यरीत्या व्यायाम होतो आणि शरीर सुदृढ राहते.
योगाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आणि विविध आजारांपासून बचाव होतो. योगामुळे तणाव, चिंता, आणि उदासी कमी होते. योगाने आत्मसाक्षात्कार साधता येतो आणि आंतरिक शांती मिळते. नियमित योगाने एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती तीव्र होते. हे सर्व फायदे लक्षात घेता जो योगी बनेल तो नक्कीच निरोगी बनेल हे लक्षात येते. शारीरिक आसने आणि प्राणायाम यांचा समन्वय साधणारा हठ योग. ध्यान, धारणा आणि समाधीवर आधारित राज योग. भक्ति आणि श्रद्धेवर आधारित, ईश्वराच्या भक्तीत लीन होऊन केला जाणारा भक्ती योग. तत्त्वज्ञान आणि ज्ञानाच्या मार्गाने आत्मज्ञान साधान्यासाठी केला जाणारा ज्ञान योग. असे काही योगाचे प्रकार आहेत.
आजच्या काळात आणखी एका महत्वाच्या योगाची गरज आहे तो योग म्हणजे कर्म योग. निष्काम कर्मावर आधारित, कर्माच्या फळाची अपेक्षा न करता कर्म करणे येथे अपेक्षित आहे. कर्मयोग हा भगवद्गीतेत वर्णन केलेला एक योगमार्ग आहे, ज्याच्या माध्यमातून मानव आपल्या कर्माच्या (कृत्यांच्या) द्वारे आध्यात्मिक प्रगती साधू शकतो. कर्मयोगाच्या तत्वानुसार, व्यक्तीने निःस्वार्थीपणे, फळाची अपेक्षा न करता कर्म करणे अपेक्षित आहे. या मार्गाने कार्य करताना, मनुष्य आपल्या कर्मातून आध्यात्मिक उन्नती करू शकतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना कर्मयोगाचे महत्व पटवून दिले आहे.
आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात, प्रत्येक व्यक्ती आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भल्या बु-याचा विचार न करता काम करत आहे. अशा परिस्थितीत, कर्मयोगाची गरज अधिक आहे. कर्मयोगाने व्यक्ती आपल्या कामात पूर्णपणे मनोभावे तल्लीन होते, ज्यामुळे तणावाची पातळी कमी होते. फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म केल्यास, असफलतेची भीती आणि यशाची लालसा कमी होते, ज्यामुळे मानसिक शांती प्राप्त होते. कर्मयोगामुळे व्यक्ती स्वतःच्या कर्तव्यांचे पालन निःस्वार्थीपणे करते, ज्यामुळे आत्मशोधाची प्रक्रिया सुलभ होते. निःस्वार्थीपणे समाजासाठी काम केल्यास, समाजात एकोप्याची भावना वाढते आणि सामाजिक समरसता प्रस्थापित होते.
कर्मयोग व्यक्तीला आपल्या कर्तव्याचे पालन निःस्वार्थपणे करण्याची प्रेरणा देतो. फळाची अपेक्षा न करता कर्म केल्यामुळे व्यक्ती प्रामाणिक राहते. कर्मयोगामुळे व्यक्ती नैतिक आणि सदाचरणाच्या मार्गाने चालते. कर्मयोग व्यक्तीचा मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकास घडवतो. कर्मयोगाच्या तत्वानुसार, निःस्वार्थीपणे समाजाच्या हितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. आजच्या काळात, जिथे प्रत्येकजण आपल्या उद्दिष्टांच्या मागे धावतो, तिथे कर्मयोग हा एक मार्गदर्शक सिद्धांत आहे, जो आपल्याला निःस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा देतो. फळाची अपेक्षा न करता कर्तव्यांचे पालन केल्याने ना केवळ व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, तर समाजात एकोप्याची आणि सामंजस्याची भावना देखील वाढते. त्यामुळे कर्मयोग हा आजच्या काळात अत्यंत आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. योगाच्या नियमित अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच भविष्यातील समस्यांवर मात करण्यासाठी ते एक प्रभावी साधन आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी योगाचा स्वीकार करून एक निरोगी आणि तणावरहित जीवन जगूया आणि योगाच्या प्रचार आणि प्रसाराने सुदृढ भारत बनवूया.

सुंदर
उत्तर द्याहटवाआपण लेखात मांडलेले विचार आणि योगाचे महत्त्व याविषयीच्या मांडणीमुळे मला खूप प्रेरणा मिळाली. निरोगी आयुष्य आणि तणावरहित जीवन जगण्यासाठी योगाचा नियमित अभ्यास करणे किती आवश्यक आहे, हे समजले. विशेषतः कर्मयोगाविषयी आणि त्याच्या नैतिक मूल्यांबद्दल केलेली चर्चा मनाला भावली. हृदयातून आभार!
उत्तर द्याहटवाछान विवेचन...
उत्तर द्याहटवाछान विवेचन.संग्रही ठेवावी अशी माहिती.
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाNice Article
उत्तर द्याहटवायोगी बनेल तो निरोगी बनेल या एकाच संदेशातून तुम्ही योगाचे महत्व आणि गरज अधोरेखित केलीत.
उत्तर द्याहटवाहा ब्लॉक लिहिण्यासाठी तुम्ही किती वाचन केले असेल ,किती संदर्भ ग्रंथ नजरेखालून घातले असतील याची कल्पना येते .
हा ब्लॉग वाचून खूप नवीन काही शिकता आले ,खूप मस्त .
सारंग ठाणेकर .
Sir खूप छान आणि महत्वपूर्ण विचार मांडले आहेत.
उत्तर द्याहटवाढॉ.राजेश सर आपण आंतर्राष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून योगाभ्यासाबद्धल अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.ती समाजास उपयुक्त आहे.आपण नेहमीच महत्वपूर्ण विषय घेऊन त्याबद्धलची सखोल माहिती घेऊन ब्लॉग करता या बद्धल मी आपले अभिनंदन करतो.
उत्तर द्याहटवाढॉ.जे.आर.केळुसकर
वा खूपच छान 🙏🙏
उत्तर द्याहटवाडाॅ. राजेश राजम...नमस्कार...
उत्तर द्याहटवाआपले तिनही लेख जनतेसाठी मार्गदर्शन करणारे आहेत... असे ब्लाॅक लिहून ते लिंक शोधुन वाचण्या पेक्षा आपण सरळ एक लेख दररोज पाठवा ... ते सर्वात उत्तम होईल असे मला वाटते...
आपला उपक्रम चांगला आहे..धन्यवाद...
बबन रामचंद्र येरम.
संपादक ...कवी...लेखक...
आपले सर्वच लेखन अभ्यासनीय आहे सर. धन्यवाद आपल्या लेखांमधून महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच मिळत असते.
उत्तर द्याहटवासौ. संजना
निरोगी आयुष्य मिळणे म्हणजेच एक धनसंपत्ती होय. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार त्याच बरोबर योग देखील महत्त्वाचा ठरतो. सध्या च्या जगात तणाव , चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये योग हा एक महत्तवपूर्ण उपाय आहे. योगा मुळे विविध आजारांपासून बचाव होतो . योगा मुळे तणाव आणि चिंता कमी होते. योग हा केवळ शारिरीक व्यायाम नसून तो जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
उत्तर द्याहटवा