शनिवार, १३ मे, २०२३

दुष्ट चक्रातील पोशिंदा


 आपला देश कृषी प्रधान आहे. 70 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आज शेतीवर अवलंबून आहे. सर्वाधिक शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस चांगला आणि योग्यवेळी झाला तरच शेतीला पाणी मिळेल. तो चांगला योग्य वेळी पडलाच तर पुढे गारपीट, वादळे यासारख्या आपत्ती. त्यातून या आपत्ती नाहीच आल्या तर पिकांवरचे रोग. या सर्वांतून ताऊ सुलाखून, वाचून काही पीक हातात आलेच तर पुन्हा त्याला मिळणारा बाजारभाव. हा बाजारभाव शेतकऱ्यांच्या कधीच हातात नसतो. सरकारी धोरणे आणि दलाल यांच्यावर हा बाजारभाव ठरतो आणि मग डोळ्यांदेखत मोठ्या प्रमाणात कष्ट पसू पीक पदरात पडल्यावर अपुऱ्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच येते.

दुसऱ्या बाजूने आपण सामान्य माणसं या शेतमालाचे ग्राहक आहोत. ग्राहकाला तरी हा शेतमाल स्वस्त मिळतो का? टी.व्ही.वर बातमी येते टॉमॅटोचे भाव गगनाला भिडले' त्यावेळी आपल्याला दुसऱ्या दिवशीपासून टॉमॅटो चढया दराने विकत मिळतात, पण जेव्हा टोमॅटोचे भाव कोसळले, शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले अशा बातम्या आपण बघतो, ऐकतो तेव्हा बाजारात टोमॅटोचा भाव कधीही फारच कोसळले असे होत नाही. येथे शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि ग्राहकाला केली जाणारी विक्री यात प्रचंड तफावत आहे. ही तफावत जर आपण कमी करू शकलो तर शेतीच्या अनेक समस्या आपण कमी करू शकतो.

यासाठी शेतकऱ्याच्या शेतीतला माल थेट ग्राहकापर्यंत ज्यावेळी पोहोचेल त्याचवेळी हे शक्य आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या, इंटरनेटच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे. अगदी अत्यंत महागड्या शेतमालावर क्यू.आर. कोड लावून त्या मालाची, शेतकऱ्याची सर्व माहिती ग्राहकाला कळू शकते आणि येथे शेतकरी आणि ग्राहक दोघांची फसवणूक आपण थांबवू शकतो. उदा. आज इतर राज्यातील, प्रदेशातील आंबा, देवगड हापूस म्हणून विकला जातो. या गोष्टी अशा पद्धतीने थांबवणे शक्य आहे.

एका बाजूला आम्ही भविष्यकालीन विचार करता निसर्गाकडून जेवढं ओरबाडून घेता येईल तेवढ ओरबाडून घेतो आहोत आणि त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. म्हणूनच अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण खूपच वाढले आहे. शेतकरी हा प्रशिक्षित नसल्यामुळे, अपुऱ्या भांडवलामुळे, पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीमुळे त्याचा ओढा हा पारंपरिक शेतीकडेच आहे, त्यामुळे खतांचा पुरवठा, पाणीपुरवठा, कीटकनाशकांची मात्रा यांचा चुकीचा वापरही अनेक समस्या निर्माण करू शकतात.

हव्यासापोटी बऱ्याचदा ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करता किंवा इतर कोणत्याही परिणामांचा विचार करता जेव्हा शेतकरी पी घ्यायला लागतो, तेव्हा तो स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत असतो. हापूस आंबा उत्पादनात कल्टारचा केलेला अतिवापर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. केळ्यासारखी फळं एकदम पिकावीत, लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर केमिकल्स वापरली जातात पण तेव्हा त्याच्या चवीचा आणि ग्राहकाच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. यावर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा निर्माण करण्या बरोबरच शेतकऱ्याचे प्रबोधन, प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे


शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तर आज फार मोठा प्रश्न आहे. सरकारी कर्ज काढताना होणारा त्रास लक्षात घेऊन बऱ्याचदा नाईलाजाने शेतकरी खाजगी सावकारी कर्ज घेतो आणि निसर्गाच्या अवकृपेने पीक हातून गेलं, की ते कर्ज कसं फेडावं या चिंतेतून सावकाराच्या त्रासातून बऱ्याचदा या आत्महत्या होताना दिसतात. कधीकधी त्या कर्जाचा सुयोग्य वापर केल्याने तो पैसा इतर चैनीच्या गोष्टींवर, व्यसनांवर खर्च केल्याने सुद्धा असा आर्थिक ताण येऊ शकतो. या गोष्टी थांबवण्यासाठी शेतीतले अडथळे, समस्या दूर करून शेतकऱ्याची सकारात्मक मानसिकता घडवण्याची गरज आहे. तोट्यातली शेती, निसर्गाची अवकृपा, सरकारी धोरणे, दलालांचे वर्चस्व, पारंपरिक शेती, तरुणांचा नोकरीकडे ओढा असल्याने वृद्धांच्या हातात असणारी शेती अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याला दुष्टचक्रातून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे, नाहीतर शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली तर पैसा आहे पण खायला अन्न नाही अशी आपली दयनीय स्थिती होईल.

८ टिप्पण्या:

  1. “दुष्टचक्रातील पोशिंदा” हा आपण आपल्या “हितगुज” या ब्लॉग मध्ये लिहिलेला 13 मे 2023 चा लेख वाचला.
    आपण मांडलेले विचार अर्थातच यथायोग्य आहेत व त्याबद्दल आपण व्यक्त केलेली खंत सुद्धा अगदी यथार्थ आह. माणसाने पृथ्वीवरील त्याच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये सर्वप्रथम केलेले कार्य म्हणजे हंटिंग अँड गॅदरिंग अर्थात शिकार आणि मिळेल ते गोळा करणे.
    त्यानंतरच्या टप्प्यात माणूस शेती करायला शिकला म्हणजे आपल्या उपयोगाच्या असलेल्या वनस्पतींची एकत्रितपणे वाढ करून त्या वनस्पती पासून मिळणारे उत्पन्न स्वतःच्या उपयोगासाठी वापरायला शिकला. त्याच सोबत काही वेगवेगळ्या प्राण्यांना पाळीव करून त्यांच्यापासूनही उत्पन्न मिळवायला शिकला उदाहरणार्थ पशुपालन इत्यादी.
    त्या पुढच्या काळात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतीची जमीन कमी पडू लागल्यामुळे जास्तीत जास्त जमिनी ताब्यात घेण्याचा कल वाढू लागला.
    पुढे जाऊन आपल्याकडे असलेले अधिकचे उत्पन्न ज्याला गरज आहे अशा व्यक्तींना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आपल्या गरजेच्या वस्तू मिळविण्यासाठी वस्तूंची देवाण-घेवाण सुरू झाली व पुढे चलन पद्धती अस्तित्वात आली.
    शेती करणे हा जगातील सर्वात प्राथमिक उत्पादकतेचा व्यवसाय असल्यामुळे अर्थातच या व्यवसायामध्ये खूप जास्त प्रमाणात मानवी श्रमांची गुंतवणूक झालेली आहे आणि त्यामुळे गुंतवणूक जास्त आणि प्रमाणात उत्पादन कमी अशी काहीशी अवस्था निर्माण झालेली आहे. त्याच सोबत उत्पादित करण्यात आलेल्या उत्पादनांची प्रत्यक्षात मागणी तितकीशी राहिलेली नसल्यामुळे उत्पादित उत्पादनांना योग्य तो भाव म्हणजेच उत्पादनाच्या गुंतवणुकीच्या आणि खर्चाच्या प्रमाणात आवश्यक असलेले मोल मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
    त्याअर्थी आजही कमी प्रमाणात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांची मागणी जास्त असल्यामुळे त्यांना चांगले मॉल मिळते आणि जास्त प्रमाणात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांची मागणी कमी असल्यामुळे त्यांना चांगले मोल मिळत नाही हे आपण आपल्या लेखामध्येच टोमॅटोचे उत्पादन हे उदाहरण सांगून स्पष्ट केलेले आहे.
    त्या अर्थी पाहता जेवढी मागणी असेल तेवढेच उत्पादन करणे हा एक व्यवस्थापनात्मक सल्ला असू शकतो परंतु ते प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सामाजिक दृष्ट्या विकसित अनेक देशांमध्ये याबाबतीत अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केले जाते व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी व्यवस्था केली जाते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये सामाजिकदृष्ट्या जनतेला तुच्छ लेखण्याची भावना विकसित झालेली आहे व त्यामुळे अशा बाबतीत कोणताही विचार केलेला दिसून येत नाही. परिणामी शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय होत जात आहे. अर्थातच हे एकच किंवा एकमात्र करण नाहीच.
    मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतातून बाहेर पडत आहेत आणि शेतीतून सुद्धा बाहेर पडत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे कधीकाळी शेतीप्रधान आणि शेती उत्पन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेला आपला देश पुढे मागे इतर देशांच्या पुढे हात पसरावा लागेल या स्थितीमध्ये येणार आहे हे निश्चित आहे..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मुख्य लेख आणि उत्तर वाचले.यातील सर्वात महत्वाचा मुद्दा असा की, या विषयावर बोलणं व लिहिणे सहज शक्य आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकरीवर्ग या प्रक्रियेला ठाम पणे प्रतिसाद देत नाहि.शेतकरीवर्ग संघटित होत नाहि. झालाच तर वैयक्तिक स्वार्थ व आपसातील हेवेदावे यामुळे अपव्यय होतोच असतो. आजपर्यंत या संदर्भात अनेक आंदोलनं झाली परंतु निश्चित असे उत्तर सापडले नाहि. भविष्यात तो मिळो व शेतकरीवर्ग सुखी होवो.

      हटवा
  2. दृष्टि चक्रातील पोशिंदा हा हितगुज लेख वाचला आपण मांडलेली व्यथा अगदी बरोबर आहे लेख मनाला भावला असेच सुंदर लेख आपण पाठवावेत

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी खरे आहे, अभ्यासपूर्ण विवेचन... सावधान होण्याची गरज..

    सारंग ठाणेकर.

    उत्तर द्याहटवा
  4. राजम सर, आपला लेख वाचला. अतिशय छांन मांडणी. आपली तळमळ इथे दिसते आहे. गरज आहे ती एकत्रित येऊन SOLUTION काढण्याची . धन्यवाद .

    उत्तर द्याहटवा
  5. दिनकर सागवेकर, कळवा, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.

    लेख उत्कृष्ट आहे.

    माझ्या प्रतिक्रिया.

    १. सरकारने असे एक पोर्टल तयार करायला हवं त्यात शेतकऱ्याचं नाव आणि तो किती एकरामध्ये कोणतं उत्पादन घेणार आहे, हे शेतकऱ्याने त्या पोर्टलवर टाकावे. इतर शेतकरी त्या पोर्टलचा विचार करून कोणते उत्पादन घ्यावयाचे आहे हे ठरवतील. जेणेकरून योग्य उत्पादन योग्य प्रमाणात घेता येईल. जेणेकरून एखादं उत्पादन हे जास्त प्रमाणात उत्पन्न होऊन शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही.

    २. मा. चंद्राबाबू नायडू याने तेलंगणामध्ये एक उपक्रम राबवला होता, की बाजार समितीकडे शेतकऱ्याने, दोन दिवस आधी आपल्या शेतातील उत्पादन (नमुना) हे आपल्या प्रदेशातील बाजार समितीकडे घेऊन जावं. त्यांना दाखवावं, बाजार समिती त्याला त्याने त्या बाजारात कोणत्या भावाने उत्पादन विकावं हे सांगायचे. त्याला बाजारात बसण्याचा दिवस ठरवून दिला जायचा. बाजार समिती शेतकर्‍याला बाजारात जागा, वजन काटा व इतर सुविधा देऊन शेतमाल विकण्यास मदत करायचे. शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांपर्यंत तो शेतमाल पोहोचला जायचा आणि त्याचे पैसे हे शेतकऱ्याला पूर्णपणे मिळायचे.

    यात काही त्रुटी असतील तर तज्ञांच्या मदतीने त्यावर मार्क काढता येऊ शकेल.

    उत्तर द्याहटवा