आपला देश कृषी प्रधान आहे. 70 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आज शेतीवर अवलंबून आहे. सर्वाधिक शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस चांगला आणि योग्यवेळी झाला तरच शेतीला पाणी मिळेल. तो चांगला योग्य वेळी पडलाच तर पुढे गारपीट, वादळे यासारख्या आपत्ती. त्यातून या आपत्ती नाहीच आल्या तर पिकांवरचे रोग. या सर्वांतून ताऊन सुलाखून, वाचून काही पीक हातात आलेच तर पुन्हा त्याला मिळणारा बाजारभाव. हा बाजारभाव शेतकऱ्यांच्या कधीच हातात नसतो. सरकारी धोरणे आणि दलाल यांच्यावर हा बाजारभाव ठरतो आणि मग डोळ्यांदेखत मोठ्या प्रमाणात कष्ट उपसून पीक पदरात पडल्यावर अपुऱ्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच येते.
दुसऱ्या बाजूने आपण सामान्य माणसं या शेतमालाचे ग्राहक आहोत. ग्राहकाला तरी हा शेतमाल स्वस्त मिळतो का? टी.व्ही.वर बातमी येते ‘टॉमॅटोचे भाव गगनाला भिडले' त्यावेळी आपल्याला दुसऱ्या दिवशीपासून टॉमॅटो चढया दराने विकत मिळतात, पण जेव्हा टोमॅटोचे भाव कोसळले, शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले अशा बातम्या आपण बघतो, ऐकतो तेव्हा बाजारात टोमॅटोचा भाव कधीही फारच कोसळले असे होत नाही. येथे शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि ग्राहकाला केली जाणारी विक्री यात प्रचंड तफावत आहे. ही तफावत जर आपण कमी करू शकलो तर शेतीच्या अनेक समस्या आपण कमी करू शकतो.
यासाठी शेतकऱ्याच्या शेतीतला माल थेट ग्राहकापर्यंत ज्यावेळी पोहोचेल त्याचवेळी हे शक्य आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या, इंटरनेटच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे. अगदी अत्यंत महागड्या शेतमालावर क्यू.आर. कोड लावून त्या मालाची, शेतकऱ्याची सर्व माहिती ग्राहकाला कळू शकते आणि येथे शेतकरी आणि ग्राहक दोघांची फसवणूक आपण थांबवू शकतो. उदा. आज इतर राज्यातील,
प्रदेशातील आंबा, देवगड हापूस म्हणून विकला जातो. या गोष्टी अशा पद्धतीने थांबवणे शक्य आहे.
एका बाजूला आम्ही भविष्यकालीन विचार न करता निसर्गाकडून जेवढं ओरबाडून घेता येईल तेवढ ओरबाडून घेतो आहोत आणि त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. म्हणूनच अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण खूपच वाढले आहे. शेतकरी हा प्रशिक्षित नसल्यामुळे, अपुऱ्या भांडवलामुळे, पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीमुळे त्याचा ओढा हा पारंपरिक शेतीकडेच आहे, त्यामुळे खतांचा पुरवठा, पाणीपुरवठा, कीटकनाशकांची मात्रा यांचा चुकीचा वापरही अनेक समस्या निर्माण करू शकतात.
हव्यासापोटी बऱ्याचदा ग्राहकांच्या आरोग्याचा विचार न करता किंवा इतर कोणत्याही परिणामांचा विचार न करता जेव्हा शेतकरी पीक घ्यायला लागतो, तेव्हा तो स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत असतो. हापूस आंबा उत्पादनात कल्टारचा केलेला अतिवापर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. केळ्यासारखी फळं एकदम पिकावीत, लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर केमिकल्स वापरली जातात पण तेव्हा त्याच्या चवीचा आणि ग्राहकाच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. यावर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा निर्माण करण्या बरोबरच शेतकऱ्याचे प्रबोधन, प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तर आज फार मोठा प्रश्न आहे. सरकारी कर्ज काढताना होणारा त्रास लक्षात घेऊन बऱ्याचदा नाईलाजाने शेतकरी खाजगी सावकारी कर्ज घेतो आणि निसर्गाच्या अवकृपेने पीक हातून गेलं, की ते कर्ज कसं फेडावं या चिंतेतून सावकाराच्या त्रासातून बऱ्याचदा या आत्महत्या होताना दिसतात. कधीकधी त्या कर्जाचा सुयोग्य वापर न केल्याने तो पैसा इतर चैनीच्या गोष्टींवर, व्यसनांवर खर्च केल्याने सुद्धा असा आर्थिक ताण येऊ शकतो. या गोष्टी थांबवण्यासाठी शेतीतले अडथळे, समस्या दूर करून शेतकऱ्याची सकारात्मक मानसिकता घडवण्याची गरज आहे. तोट्यातली शेती, निसर्गाची अवकृपा, सरकारी धोरणे, दलालांचे वर्चस्व, पारंपरिक शेती, तरुणांचा नोकरीकडे ओढा असल्याने वृद्धांच्या हातात असणारी शेती अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याला दुष्टचक्रातून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे, नाहीतर शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली तर पैसा आहे पण खायला अन्न नाही अशी आपली दयनीय स्थिती होईल.