सध्याचे जग हे आभासी होत चालले आहे. नवीन पिढीला हे आभासी जगच आकर्षित करत आहे आणि या जगातच रममाण व्हायला आवडू लागले आहे. त्यातूनच पुढील काळात काही गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत चालली आहे. अगदी अलीकडच्या अनेक घटना बारकाईने पाहिल्यावर हे सहजपणे लक्षात येते. तरुण पिढीचा चंगळवादाकडे वाढत चाललेला ओढा, भपकेबाजपणा, दिखाऊपणा यावरचा विश्वास, त्यातून जीवन जगण्याच्या चुकीच्या संकल्पना वाढत चाललेल्या दिसत आहेत आणि त्यातूनच नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप सारखे नवनवीन फंडे आज मोठ्या प्रमाणात रुजताना दिसतात. त्यातूनच श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखी अनेक प्रकरणे आपल्यासमोर येऊ लागली आहेत. अशा प्रकारची बरीच प्रकरणे ही आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत, परंतु अशी कित्येक प्रकरणे दिवसागणिक घडत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
माणसाचे अंतरंग आणि बाह्यरंग हे बऱ्याचदा वेगळे असू शकतात
याबद्दल अनेकांनी अनेक वेळा सांगून ठेवले आहे. व.पु.काळे यांची माणसाची एक व्याख्या मला येथे आठवते “ज्याच्यावर
आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही असे माणूस नावाचे एक यंत्र आहे”
अशी त्यांनी माणसाची व्याख्या केली आहे. म्हणजेच काय तर
कुणाही व्यक्तीची शंभर टक्के खात्री आपण कधीच देऊ शकणार नाही. ज्याला आपण खायचे
दात आणि दाखवायचे दात वेगळे असण्याचा प्रकार म्हणतो. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या
बोलण्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो; परंतु त्या
व्यक्तीच्या अंतरंगात मात्र भलतेच काहीतरी असते. या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आपण करतही नाही.
प्रेमात आंधळे होऊन एखाद्याचा
घात होण्याचा प्रकार अनेकदा आपण पहातो. प्रेम करणारी व्यक्ती ही
नेहमी गोडच बोलेल, कारण गोड बोलल्याशिवाय प्रेम होणारच नाही, हे त्याला चांगले माहित आहे, परंतु त्या व्यक्तीचे अंतरंग तपासण्यासाठी
अनेक कसोट्या घ्याव्या लागतील। आपल्याकडून त्या कसोट्या घेतल्या जात नाहीत; कारण आपण त्याच्या गोड बोलण्याकडे, त्याच्या बाहयांगाकडेच
आकर्षित झालेले
असतो. समाजामध्ये
सद्यस्थितीत चालू असणाऱ्या, घडत असणाऱ्या
घटना, किंबहुना
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना पाहिल्या की संत, पंत, तंत साहित्याची
आठवण होते. कित्येक शेकडो
वर्षांपूर्वी संतांनी, पंतांनी व
शाहिरांनी आपणास खूप चांगल्या प्रकारचे उपदेश त्यांच्या त्यांच्या साहित्यातून केले
आहेत. ते उपदेश जर आपण तंतोतंत पाळले तर कोणत्याही प्रकारचा धोका आपणास कधीच
राहणार नाही. संत चोखामेळा यांनी
'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा l
काय भुललासी
वरलीया रंगा ll
हे आपणाला खूप पूर्वी सांगून ठेवले आहे आणि नेमकी बाहय रंगाला भुलण्याची
चूक आपण वारंवार करत असतो. त्यातूनच अनेक समस्यांना आपणास सामोरे जावे लागते.
ऊस जसा बाहेरून डोंगा म्हणजे वाकडा तिकडा दिसतो तसा तो आत नसतो जेव्हा त्याला आपण
तोडतो चुरगळतो त्यावेळी त्यातून आतला रस पाझरतो आणि जेव्हा आपण त्याची चव घेतो
त्यावेळी लक्षात येते की तो अत्यंत गोड असा रस आहे. बाह्यांगालाच जर आपण फशी पडलो तर अंतरंगातल्या मूळ तत्वापर्यंत
आपण पोहोचणारच नाही अशाच प्रकारे व्यक्तीच्या बाबतीत ही आपणाला करावे लागेल. माणूस बाहय
अंगाने कसा दिसतो? यापेक्षा काही कसोट्या घेऊन, परीक्षा घेऊन आपणाला त्याचे अंतरंग
शोधावे लागेल. प्रेम करणे हे चुकीचे नाही; परंतु प्रेमात आंधळे होऊन, विश्वास टाकून आपले जीवन व्यर्थ घालवणे ही गोष्ट चुकीची आहे.
बऱ्याचदा आजवर घडलेल्या अनेक घटनांमध्ये आपणास हेच पहावयास मिळते.
एका माणसाची वागणूक वाईट असली म्हणून सर्वच माणसांची वागणूक
वाईट असेल असे नाही हे जरी खरे असले, तरी समोरच्या
व्यक्तीकडून फसले जाण्याचे अनुभव बऱ्याचदा आपणास येतात आणि यासाठीच आपण समाजात, कुटुंबात कसे जगले पाहिजे? याचे मार्गदर्शन आपणास वडीलधारी
मंडळी करायची, परंतु विभक्त कुटुंब पद्धती मध्ये आपण त्यालाही पारखे झालो आहोत. त्यातूनच
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आजी आजोबा असले, तरी ते आम्हाला अगदीच निर्बुद्ध
वाटू लागले आहेत. माणसाने कसे जगावे? कसे वागावे? याबाबत शाहीर अनंत फंदी यांनी 'बिकट
वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा
सोडू नको' या फटक्यामध्ये उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक गोष्टीचा
अनुभव हा स्वतःच घेतला पाहिजे असे नाही, तर वाईट क्षणांना सामोरे जाऊ लागू नये,
यासाठी जुन्या जाणकारांनी, तत्त्वज्ञांनी, विचारवंतांनी, संतांनी, पंतांनी, शाहिरांनी
सांगितलेले अनुभव जर आपण लक्षात घेतले आणि ते अंगीकारले तर निश्चितच आपण कोणाकडून
फसले जाणार नाही. आम्ही आपले जीवन अधिक सुंदर करू शकू.
Rightly said. Nice article.
उत्तर द्याहटवाRightly said. Nice article.
उत्तर द्याहटवाआपले विचार प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहेत.... खूप छान... धन्यवाद
उत्तर द्याहटवाVastav va samarpak shabdat varnan,chhan
उत्तर द्याहटवाआजच्या ज्वलंत प्रश्नाला हात घातल्याबद्दल अभिनंदन.. सवंग लोकप्रियतेसाठी समाजातील बुद्धिवंत लोक अश्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. पालक, मित्र, हितचिंतक यांनी श्रद्धा वालकर सारख्या मुलींना वेळीच सावध केले तर पुढील अनर्थ टळू शकतील अर्थात मुलींनी सुद्धा मोकळेपणाने सर्वांशी संवाद करायला हवा..... सारंग ठाणेकर.
उत्तर द्याहटवा