निसर्गाने आपणाला अगदी भरभरून दिले आहे. कोकणचा विचार करता तर निसर्गाने उर्ध्वहस्ते खजिनाच बहाल केला आहे. या निसर्गसंपत्तीच्या बाबतीत आपण भाग्यवानच आहोत. देणारा जितका सक्षम असतो, तितकाच घेणाराही सक्षम असला पाहिजे. निसर्गाने भरभरून दिलेला हा खजिना सांभाळण्यासाठी, वापरण्यासाठी, वाढवण्यासाठी दिवसेंदिवस आपण अक्षम बनत आहोत. सोनं – नाणं, दाग – दागिने, जमीन – जुमला अशी संपत्ती जमा करण्याच्या नादात आपण या निसर्गसंपत्तीकडे दुर्लक्ष करतो आहोत की काय? असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज दुबळी माझी झोळी… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देणारा सक्षम आहे; पण घेणारे आपण मात्र अक्षम आहोत असेच म्हणावे लागते.
जून-जुलै ते अगदी ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत कोकणात धो-धो पाऊस कोसळत असतो. अनेक नद्या ओसंडून वाहत असतात, धबधबे फुलून गेलेले असतात; पण हे सर्व पाणी शेवटी जाऊन समुद्राला मिळते आणि ते वापरण्यास अयोग्य बनते. या बहुमूल्य पाण्याचे नियोजन आपण काय करत आहोत? हा खरा प्रश्न आहे.
आपण आपल्या घराच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थितपणे करतो. नगरपालिकेने / ग्रामपंचायतीने सोडलेले पाणी किती वेळ येते याचा विचार करून आपण त्यानुसार आपली साठवण क्षमता निर्माण करतो. गरजेनुसार ते पाणी वापरतो. पाणी कमी असेल तेव्हा अगदी जपून वापरतो. हे नियोजन आम्ही वैयक्तिक पातळीवर करतो; पण असे नियोजन व्यापक पातळीवर मात्र होताना दिसत नाही. पाण्याच्या बाबतीत कोकण समृद्ध असले, तरी देखील जानेवारी फेब्रुवारी मध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा भासायला लागतो. खेड्यापाड्यात कित्येक किलोमीटर डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया आपणास दिसतात. हे चित्र खरोखरच विचारप्रवृत्त करणारे आहे.
एकीकडे पावसाचे भरमसाठ पाणी आपणास मिळते आहे, तर दुसरीकडे त्याच भागात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष, याचा अर्थ काय? योग्य नियोजनाचा अभाव, हेच त्याचे कारण आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती काय आहे? त्याचे विकासात महत्त्व काय आहे? याचा सांभाळ कसा करावा? यासारख्या प्रश्नांचा आम्ही गंभीरपणे कधीच विचार केला नाही. लहानपणापासून याचे धडे आम्हाला दिले गेले नाहीत. पाण्याची बचत ही संकल्पनाच आम्हाला पटत नाही.
आज घाट माथ्यावरचा शेतकरी पाऊस नाही म्हणून दुबार, तिबार पेरणीला सामोरा जातोय आणि कोकणामध्ये धो धो पाऊस पडत असला तरी दिवसेंदिवस पडीक जमिनीची संख्या वाढतच चालली आहे. शेतीत काम करायला माणसं नाहीत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा एकदाच जमीन विकली, की मिळणारी रक्कम आता आम्हाला समाधानकारक वाटू लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा जमिनी विकण्याकडे कल वाढू लागला आहे.
खरं म्हणजे छोटे छोटे बंधारे बांधून पाणी जर जमिनीत मुरवले गेले, धरण क्षेत्रांमध्ये वाढ केली गेली, नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला गेला, त्याबाबतीतल्या संशोधनाला चालना दिली गेली, प्रोत्साहन दिले गेले, थोडक्यात पाण्याचे योग्य नियोजन केले गेले, तर नक्कीच आपण या प्रश्नाला समर्थपणे तोंड देऊ शकतो. पाऊस पडत नाही म्हणून आपणास पाणी मिळत नाही, अशी स्थिती असेल तर आपण एक वेळ समजू शकतो; पण प्रचंड पाऊस पडूनही आपण पाण्यासाठी तहानलेलेच असू तर, तो आपला ‘करंटेपणाच’ म्हणावा लागेल.
खरोखर परमेश्वर प्रसन्न झाला आणि त्याने लोकांना सुवर्ण मोहरा वाटायचे ठरवले, तर जो माणूस जेवढी मोठी पिशवी घेऊन जाईल तेवढ्या त्याला मोहरा मिळतील. छोटीशी पिशवी नेणाऱ्याला तेवढ्याच कमी प्रमाणात मोहरा मिळतील, आणि फाटकी पिशवी घेऊन जाणाऱ्याची पिशवी रिकामीच राहील. निसर्ग संपत्तीच्या बाबतीत नेमकी या फाटकी पिशवी घेऊन जाणाऱ्या माणसासारखी आपली स्थिती आहे. तेव्हा आपणाला निसर्ग हे जे अमूल्य असे पाणी देतो, ते पाणी साठवण्यासाठी, जमिनीत मुरवण्यासाठी, त्याच्या सुयोग्य वापरासाठी नियोजन करण्याची गरज आहे. जेव्हा आपली झोळी बळकट होईल, तेव्हाच या संपत्तीचा खऱ्या अर्थाने आपण उपभोग घेऊ शकतो आणि आम्ही आमचा विकास साधू शकतो.
Thoughtful Article
उत्तर द्याहटवाSuperb Dr.saheb
उत्तर द्याहटवापूर्ण सहमत सर
उत्तर द्याहटवासुशील येरम
उत्तर द्याहटवाअभ्यासपूर्ण लेख आहे.🙏🙏
उत्तर द्याहटवाExcellent and informative article. Congratulations sir and keep going.
उत्तर द्याहटवाखरोखरच अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे . छानच .👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवाFact, nicely written
उत्तर द्याहटवाMITAVA Ravindra Ambupe
हटवाखूप छान लेख आहे. सर्वांनीच या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाKhup chan 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन
उत्तर द्याहटवाखुप छान विचार मांडलेत सर. खरच आपल्या इकडे सर्वांनी असा विचार करणे गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाकोकणातील प्रत्येक व्यक्ती व प्रशासनाला विचार करण्यास प्रवृत्त करणारा सुंदर लेख..
उत्तर द्याहटवा