आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाची ओळख ‘तरूणांचा देश’ म्हणून जगाला करून देतात. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम तरूणांकडून अनेक अपेक्षा करायचे, स्वप्न बघायला सांगायचे. आपल्या देशासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. दारिद्रय, बेरोजगारी, अंधश्रध्दा, निरक्षरता, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न असताना, ज्यांच्यावर देशाच्या प्रगतीची, भविष्याची जबाबदारी आहे अशा काही तरूणांपुढे मात्र एक गंमतीशीर प्रश्न उभा आहे तो म्हणजे, वेळ कसा घालवू?
जपान सारख्या देशात सुट्ट्यांचा कंटाळा येणारे उद्योगी लोक दिसतात पण आम्ही
मात्र नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच, नवीन कॅलेंडर घेऊन सुट्ट्या मोजतो व वर्षभराचे कामाचे नियोजन करण्याआधीच सुट्टयांचं नियोजन
करतो. नोकरी किंवा काम नसणार्या माणसांपुढे, वेळ कसा घालवू?
हा प्रश्न आहे. तर नोकरी किंवा काम करणार्या काही माणसांपुढे नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी
वेळ कसा घालवू? हा प्रश्न
असतो. इथून तिथून वेळ घालवण्याचं काम
आम्ही खूप प्रामाणिकपणे करतो.
कट्ट्यावर बसून गप्पा झोडणारी माणसं, शाळा कॉलेजच्या आजुबाजूस, किंवा सार्वजनिक ठिकाणी मुलींची छेडछाड
करणारी तरूणांची टोळकी, पानाच्या टपरीवर
घोळका करून तंबाखू, सिगरेट सारखी
व्यसने करणारी तरूणाई हे सर्व बघितल्यावर नक्कीच त्यांचा वेळ कसा घालवू? हा प्रश्न सुटलेला दिसत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी बर्याचदा अनेक प्रकार केले जातात, त्यात मोबाईलवर तासनतास गप्पा मारणं, हातातली सर्व कामे टाकून टी.व्ही.वरील मालिका
बघणं, त्यावर रंगतदार चर्चा करणं,
क्रिकेटच्या मॅचेस अगदी चालेंज लावून घोळक्या घोळक्यांनी बघणे, त्यावर आपणालाच खूप कळते अशा अविर्भावात निरर्थक गप्पा मारणे हे प्रकार सर्रास दिसतात.
जीवना बद्दलचं बदलतं तत्वज्ञान, चुकीची मानसिकता, जबाबदारीची नसलेली जाणीव, देशप्रेमाचा अभाव, मोठ्या ध्येयाचा अभाव इत्यादी गोष्टी बर्याचदा वेळ कसा घालवू? हा प्रश्न निर्माण करतात.
आज बहुतेक तरूण आजचा दिवस महत्त्वाचा, तो समरसून जगायचा, उद्या कोणी पाहिला? वगैरे प्रश्न विचारून दिवस ‘एन्जॉय’ करतात. तो दिवस एन्जॉय करताना वेळ घालवणे हा एक त्यातला अपरिहार्य
भाग. त्याला ‘टाईमपास’ हे गोंडस नाव दिले जाते आणि टाईमपास करण्यासाठी वर उल्लेखिलेल्या कितीतरी
गोष्टी केल्या जातात, अगदी प्रेम सुद्धा केलं जातं.
त्यात कढी म्हणून की काय आजच्या तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर इंटरनेट, फेसबुक, हॉटसअॅप हे म्हणजे वेळ कसा घालवू? या प्रश्नाचं नेमकं उत्तर आहे, असंच आजच्या तरूण पिढीला वाटू लागले आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर निश्चितच चांगला आहे; पण त्याच्या चुकीच्या आणि अतिरेकी वापरावरच तरूणांचा भर दिसतो. जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठी झालेली, यशस्वी झालेली माणसे लक्षात घेतली तर त्यांना दिवसाचे चोवीस तास कमी पडत होते, तर आम्हाला मात्र ते खूपच जास्त वाटतात. म्हणूनच वेळ कसा घालवू? हा प्रश्न सतावतो.
माणसाचं सरासरी वय साठ वर्षे गृहीत धरलं तर सज्ञान होईपर्यंत खेळ, मनोरंजन, अभ्यास यात वेळ
जातो. तारूण्यात मित्र-मैत्रिणी, हॉटेलिंग, चित्रपट, मॉल, मोबाईल या सर्वात बराच
वेळ निघून जातो आणि शेवटी वृध्दापकाळात
पहिला वेळ योग्यप्रकारे घालवला नाही म्हणून त्याच्या विवंचनेत, पश्चात्तापात वेळ घालवावा लागतो. वेळ कसा घालवू? या प्रश्नाचं नेमकं उत्तर न मिळाल्यामुळे या दुष्टचक्रात माणूस
अडकतो.
खरं म्हणजे वेळ ही एक अमूल्य अशा प्रकारची
गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात
मिळणारी वेळ आपण जपून, सुयोग्य पद्धतीने वापरणे
फारच महत्त्वाचे आहे. विश्वास नांगरे पाटील आपल्या भाषणातून
वेळेचे महत्त्व सांगताना एकदा म्हणाले होते, तुम्हाला जर एका वर्षाचे महत्व जाणून घ्यायचे
असेल तर परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. एका महिन्याचे
महत्व जाणून घ्यायचे असेल तर आठव्या महिन्यात बाळाला जन्म देणार्या
आईला विचारा. एका आठवड्याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर
साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर रोजंदारीवर
काम करणाऱ्या कामगाराला, ज्यांची दहा
मुले त्याची संध्याकाळी वाट बघतायेत त्याला विचारा. एका तासाचे
महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर वाट बघणार्या प्रेमिकास विचारा. एका मिनिटाचे महत्त्व
जाणून घ्यायचे असेल तर ट्रेन चुकलेल्या प्रवाशास विचारा. एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर अॅक्सीडंट मधून वाचलेल्या माणसास विचारा आणि एका मिली सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर ऑलिम्पिकमध्ये
सिल्वर मेडल मिळणार्या धावपटूस विचारा. यावरून प्रत्येक क्षणाचे महत्व अधोरेखित
होते.
इंग्रजी मध्ये एक उत्तम म्हण आहे, ‘Time is money’. आणि हे अगदी खरेच आहे. वेळ किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव होणे ही स्वविकासाची पहिली पायरी आहे. ज्याला वेळेचे महत्व कळले नाही ती व्यक्ती कधीच आपला विकास करू शकणार नाही. ही एकप्रकारची गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक जितकी जास्त, तितका त्याचा परतावाही जास्त मिळणार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. ‘वेळ कसा घालवू?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबा आमटे, गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इत्यादिंचे जीवनकार्य समजून घ्यावे लागेल. बिल गेट्स, अंबानी, टाटा, बिर्ला यांची नावे प्रसिद्ध उद्योजक म्हणून आम्ही ऐकतो, त्यांच्या संपत्तीबद्दल ऐकतो पण असे उद्योजक होण्यासाठी त्यांनी केलेल्या वेळेच्या नियोजनाचा अभ्यास आपणाला करावा लागेल. जेव्हा ‘वेळ कसा घालवू?’ या प्रश्नाचं उत्तर तरूण पिढीला मिळेल तेव्हा आपल्या देशासमोरील अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास वाटतो.
सही डाॕ.साहेब
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान, वैचारिक लेख.
उत्तर द्याहटवा