शुक्रवार, १६ जुलै, २०२१

‘स्वयं’ मंत्राचे अस्त्र

 

       कोरोना संकटामुळे सध्याचा काळ हा खूपच कठीण जातो आहे.  जवळपास सर्वच क्षेत्रांवर कोरोनाचा प्रभाव पडलेला दिसतो.  संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आपणास दिसत आहे.  रोजगार, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे नुकसान आहे.  या काळात अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या, त्यातून आलेला मानसिक ताण, शिक्षणाची झालेली दुरावस्था या सर्व बाबी बघितल्या की त्यावर स्वतःलाच स्वतःच्या पातळीवर काहीतरी मार्ग काढण्याची गरज निर्माण झालेली दिसते.

       शिक्षणाचा विचार करता फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला.  या पद्धतीचे अनेक तोटे सर्वांसमोर येऊ लागले, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.  या शिक्षणातून आपण निकाल लावू शकतो, विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकतात; पण ज्ञानाचे काय? हा प्रश्न पडतोच.  शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापनाचे स्थान अनन्यसाधारण असते आणि हे मूल्यमापन योग्य होते आहे का? हा खरा प्रश्न आहे.  ऑनलाइन शिक्षणाच्या अगोदर, 50 टक्के गुण घेणारा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेताना जर 90 टक्के गुण घेत असेल तर हे मूल्यमापन योग्य होते आहे का? हा प्रश्न सहजच पडतो.  आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत पालकांनी आता सजग बनण्याची गरज आहे.  कदाचित विद्यार्थी मित्रांना ऑनलाइन शिक्षणातला काही सोयीचा भाग आवडला असेल, गुण सुद्धा चांगले मिळण्यातला आनंद मिळत असेल,  मेहनत जास्त करावी लागत नाही यातलं सुख मिळत असेल, परीक्षा पद्धतही आवडली असेल; पण याचे दूरगामी परिणाम मात्र फारच घातक ठरू शकतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना शिक्षकांनी, पालकांनी करून दिली पाहिजे.



       अचानकपणे कोरोनाच्या आलेल्या या संकटामुळे ऑनलाइन शिक्षण हाच पर्याय असल्याने, शिक्षक वर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेणे क्रमप्राप्त ठरले आणि हे आव्हान शिक्षकांनी समर्थपणे पेलले देखील.  पण या पद्धतीतील मर्यादा लक्षात घेऊन ती पोकळी भरून काढणे आवश्यक वाटते.  या परिस्थितीत स्वयं हा मंत्र खूपच उपयुक्त ठरू शकतो.  स्वयंअध्ययन, स्वयंशिस्त, स्वयंमूल्यमापन या गोष्टी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.  ऑनलाईन शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर भर दिला पाहिजे.  ऑनलाइन शिक्षणातून कदाचित अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो; पण त्यातले सखोल ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला स्वयंअध्ययन करणे फार आवश्यक ठरेल.  एखादी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी इंटरनेटचा उपयोग विद्यार्थी सहजपणे करू शकेल आज इंटरनेटवर कितीतरी ओपनसोर्स उपलब्ध आहेत.  नॅशनल डिजिटल लायब्ररी सारख्या स्त्रोतांमध्ये कितीतरी माहितीचा खजिना उपलब्ध आहे.  याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घेणे आवश्यक आहे.

       कोविड बॅच असा शिक्का बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम याचं गांभीर्य लक्षात आणून द्यावे लागेल.  नोकरी मिळवताना काय अडचणी येऊ शकतात? हे त्यांना सांगावं लागेल. कदाचित एखाद्या नोकरीसाठी कोविड बॅचच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत असाही शेरा असू शकतो.  याबाबत आपण सतर्क असले पाहिजे.  या लॉकडाउन काळात मी काय केले?  कोणती कौशल्ये विकसित केली? कला, क्रीडा, ज्ञानसाधना काय केली?  हे मुलाखतीच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगता यायला हवं.  विद्यार्थी आज विविध विद्यापीठांचे ऑनलाईन कोर्स करू शकतात.  सरकारच्या स्वयं पोर्टल वरून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.  गरज आहे ती परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पावले टाकण्याची,  गरज आहे स्वयंशिस्तीची,  गरज आहे स्वयं मूल्यमापनाची,  गरज आहे ती कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची,  सावरण्याची.  

       लॉकडाऊन किंवा इतर व्यवहार ठप्प झाल्याने आपण घराबाहेर जात नाही, पण आपल्या वाट्याला येणारे दिवसाचे 24 तास हे तेवढेच आहेत, त्यामुळे त्या वेळेचा सदुपयोग कसा करावा? हे आपल्याच हातात आहे.  शाळा - महाविद्यालये सुरू असताना विद्यार्थ्यांचे एक वेळापत्रक होते, त्यानुसार सर्व व्यवहार सुरू होते; पण शाळा - महाविद्यालये बंद झाल्यावर, वेळापत्रक पूर्णपणे बाजूस पडले. खरं म्हणजे अशा एका परिस्थितीनुरूप वेळापत्रकाची आत्ता खरी गरज आहे.  विद्यार्थ्याने आपल्या दिनक्रमाचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे.  संकटाला संधी मानून काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे, तरच पुढचा काळ विद्यार्थ्यांसाठी सुकर असू शकेल.

       थोडक्यात स्वयंप्रेरणा, स्वयंअध्ययन, स्वयंमूल्यमापन, स्वयंशिस्त या सर्वांचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे.  या सर्व परिस्थितीत स्वयं या मंत्राचे अस्त्र आपणाला नक्कीच तारू शकते.


७ टिप्पण्या:

  1. अत्यंत सोप्या शब्दात केलेले सध्याच्या परिस्थितीचे वर्णन असे म्हणता येईल ,खूप सुंदर मार्गदर्शन मुलांसाठी आणि पालक वर्गासाठी ..

    उत्तर द्याहटवा
  2. Poker at Bally's Casino - 9th floor at Bally's in Scottsdale
    Situated on 3 acres along the banks 광양 출장샵 of the Colorado River, Bally's Casino is the 공주 출장마사지 perfect venue to relax and 공주 출장마사지 recharge for a 밀양 출장샵 quick 동두천 출장샵 getaway.

    उत्तर द्याहटवा