देवगड तालुक्यातील 'तांबळडेग' हे माझं गाव तसं साधंच. सर्वसामान्यपणे कोकणातील किनारपट्टीवरील गावांसारखंच, शुभ्रधवल वाळूत पसरलेलं एक छोटेखानी गाव; पण सौंदर्याच्या बाबतीत म्हटलं तर माझं गाव बघून एखाद्या हाडाच्या चित्रकाराच्या हातात कुंचला आल्याशिवाय राहणार नाही, किंवा एखाद्या मुरलेल्या कवीच्या ओठी कवितेच्या चार ओळींनी जन्म घेतलाच पाहिजे असं एक मोहक ठिकाण. कोणीही कलासक्त माणूस या गावाच्या प्रेमात पडलाच पाहिजे असं नेत्रदीपक गाव. पश्चिम बाजूस अथांग सागराची सततची गाज, पूर्वेकडे शांत, संथ वाहणारी मिठबावची खाडी, तर उत्तर बाजूस लाल तांबड्या मातीचा डोंगर कडा आणि एका बाजूस हिरवंकच्च कांदळवन आणि मधोमध पांढऱ्याशुभ्र वाळूत देखण्या सुबक टुमदार अशा घरांची छोटीशी वस्ती.
पश्चिमेकडे आकाशाची निळाई
समुद्राला कधी मिळते तेच कळत नाही आणि कोसळणाऱ्या लाटांतील फेसाळणारा पांढरा रंग
सातत्याने किनाऱ्यावर शुभ्रता आणतो आहे, शांतता आणतो आहे याचा भास होत रहातो.
किनाऱ्यावरची हिरवीगर्द सुरूची बने, लिंगडीची झुडपे या किनारपट्टीला हिरवाईची झालर
लावतात. आणि एकमेकांशी स्पर्धा करणारे उंचच उंच माड या सौंदर्याला चार चांद
लावतात. संध्याकाळी निरोप घेणारा सूर्य जेव्हा लाल केशरी रंगाची आकाशात पखरण करतो
तेव्हा सागरातील त्याचे प्रतिबिंब आणि चमचमता सोनेरी चंदेरी रंग असे किती रंग एकमेकांत
मिसळून जातात? हे सांगणे तसे कठीणच.
ठराविक काळात तर रात्रीच्या चंद्र प्रकाशात लाटां मधून चमकणारा जारा पाहताना प्रत्यक्ष परमेश्वर चांदीच्या स्फटिकांचा वर्षाव करतो आहे की काय? असा भास व्हावा अशी ती चंदेरी झिलई खूपच देखणी असते. नॉकटील्युका हे प्लवंग मोठ्या प्रमाणात जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा पाणी फ्लोरोसंट लाईट प्रमाणे चमकते याला पाणी पेटले किंवा जाळ असे म्हणतात. आमच्याकडे याला ‘जारा’ असे म्हणतात. विशेष म्हणजे हे प्लवंग युक्त पाणी जेवढ्या भागांमध्ये वाळूवर पसरते तेवढ्या भागावर ची वाळू सुद्धा अशाच प्रकारची चंदेरी वर्खाने चमकते. आम्ही लहानपणी रात्रीच्या वेळी मुद्दामून अशा वाळूमध्ये ओरखडे उठवायचो आणि या चमचमणाऱ्या चंदेरी दुनियेचा आनंद लुटायचो. या सहजपणे नजरेस भरणाऱ्या रंगां बरोबरच हेच रंग एकमेकांत मिसळून आणखी विविध छटांचे अनेक रंग तयार होतात. निसर्ग येथे रोजच रंगपंचमी खेळतो आहे असे दृश्य नेहमीचेच आहे.
या रंगांमध्ये भर घालणारे
पक्षी येथे काही कमी नाहीत दुर्मिळ होत जाणारे कावळे जेव्हा हजारोंच्या संख्येने
एकाच झाडावर दाटीवाटीने बसलेले दिसतात तेव्हा नकारात्मकतेचा, निषेधाचा काळा रंगही
आपणाला हवाहवासा वाटू लागतो. कांदळवनात पांढरे शुभ्र बगळे जेव्हा विश्रांतीसाठी
बहुसंख्येने एकत्र बसतात तेव्हा त्या कांदळवनातील त्या झाडांनाही धन्यता वाटत
असणार हे नक्कीच. या पांढऱ्या बगळ्यां प्रमाणेच त्यांचे रंगबंधू सीगल जेव्हा
मोठ्या थव्याने समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन हेलकावे खातात तेव्हा हा हलता
देखावा डोळ्यांचे पारणे फेडतोच.
एका रांगेत येणारे
डॉल्फिन जेव्हा पाण्यात विविध कवायती करतात तेव्हा तर मंत्रमुग्धता अनुभवास
आल्याशिवाय राहात नाही. आपले मोफत मनोरंजन करणारा हा नृत्यचमू परमेश्वराने कदाचित
आपल्यासाठीच पाठवला आहे की काय? असं मनाला वाटत राहतं आणि विशाल अशा रंगमंचावर
काहीतरी अद्भुत आविष्कार बघण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आपण स्वतःला धन्य मानायला
लागतो.
कोकणाला खूप मोठी
किनारपट्टी लाभली आहे या किनारपट्टी गावांमध्ये समुद्र कासवांना 'तांबळडेग' हे तर
आपलं हक्काचं माहेरघरच वाटत असावं कारण एखादी बाळंतीण बाळंतपणासाठी ज्या निश्चिंततेने
माहेरी येते त्याच निश्चिंततेने समुद्र कासवं येथे अंडी घालायला येतात. विशेष
म्हणजे आपली सर्व अंडी सुखरूप राहून आपली पिल्ले समुद्रात मुक्तपणे येणार याची
खात्री या कासवांना झाली असावी. एकाच वेळी दोनशे चारशे, अंड्यातून नुकतीच बाहेर
पडलेली पिल्ले जेव्हा समुद्राच्या दिशेने झेपावतात तेव्हा तो एक सुख सोहळा असतो ते
छोटे छोटे जीव आता आपल्या पुढील मुक्त प्रवासाला निघत असतात. लाटांच्या तडाख्यात
त्यांचे काय होणार? असा आपल्या मनात प्रश्न येतो न येतो एवढ्यात आपल्या नजरेसमोर
त्याच लाटांच्या तडाख्याचं बळ त्यांच्या अंगात कधी येतं आणि इवलेसे पाय हलवत ही
चिमुकली पिल्ले त्या अक्राळ-विक्राळ समुद्रात कशी सामावतात? हे बघणं मोठं नयनरम्य
असतं.
माझ्या गावच्या
किनारपट्टीच्या अनेक वैशिष्ट्यांमध्ये मला आणखी आवडणारे एक वैशिष्ट्य म्हणजे चार
किलोमीटरची विस्तीर्ण, स्वच्छ, सुंदर किनारपट्टी. दक्षिणेस खाडी व समुद्र यांचा विलोभनीय
असा प्रेमाचे प्रतीक दाखवणारा संगम आणि उत्तरेला भक्तीचे प्रतीक असणारं गजबादेवीचं
देखणं ठिकाण यामध्ये विधात्याने आपल्या उर्ध्व हस्ताने मुक्त उधळण केलेल्या अनेक
छोट्या-मोठ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि मन प्रसन्न होऊन जाते. येथे तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण खडक दिसेल
हुबेहूब सिंहाच्या जबड्या सारखा त्याचा जबडा आणि बैठक मात्र नंदी बैलासारखी दिसेल.
त्या खडकावर पाच छोटे छोटे गुळगुळीत दगड दिसतील. (म्हणूनच येथील स्थानिक लोक
त्याला पाच पांडवांचे स्थान म्हणून तेथे पांडव पंचमी ही साजरी करतात.) विविधरंगी शैवाल, म्हेरावे (सी आरचीन), समुद्र
काकडी (सी कुकुंबर), विविध प्रकारचे खेकडे, धारदार डेके असलेले भामुर्टे, रंगीबेरंगी विविध आकाराचे शंख शिंपले, विविधरंगी मासे,
समुद्र फुल (सी अनेमोन), घोंगटे (मोल
क्रॅब) इत्यादींचा खजिनाच येथे पाहायला मिळतो.
मध्येच एखादा समुद्र गरुड
आपल्या चोचीतून एखादा मासा घेऊन आपल्या पिलांसाठी उंच घरट्याकडे उडताना दिसेल. मध्येच
मासे पकडून हळूच किनारपट्टीवर लपवून ठेवणारे एखादे हुद दिसेल. मध्येच एका पायावर
भक्ष्याची वाट बघणारा स्थितप्रज्ञ बगळा दिसेल, त्या बगळ्या प्रमाणेच पाण्यामध्ये गळ
टाकून मासा गळाला लागण्याची तासनतास वाट बघणारा एखादा मच्छीमार ही दिसेल किंवा पाच
पंचवीस माणसे एकजुटीने रापणीचे अजस्त्र जाळे ओढताना दिसतील. ज्यांच्याशी आपणाला
पाठशिवणीचा खेळ खेळण्याची इच्छा होईल असे केशरी आणि पांढऱ्या रंगाचे चपळ
हडगे (स्यांड क्रॅब) दिसतील. मधेच एखादा
स्टारफिश दिसेल. एखादी निळी पांढरी पोटकी (जेली फिश चा एक प्रकार) दिसेल आणि मग
आपण कोणत्याही वयाचे असलो तरी त्या पोटकीचा फुगा पायाच्या अंगठ्याने फोडण्याचा मोह
आपणाला होणारच. असे एक ना अनेक नमुने
पाहता येतील.
आमच्या
लहानपणी आम्हाला खेळ खेळण्यासाठी कोणत्या फाईव्हस्टार गार्डनला जाण्याची गरज वाटली
नाही. किंवा असे गार्डन नाही म्हणून खंत कधी वाटली नाही कारण या निसर्गानेच आमची
खेळण्याची परमोच्च सोय करून ठेवली होती. जेव्हा आम्ही लहान मुले समुद्राच्या
लाटांवर आरुढ व्हायचो तेव्हा तो आनंद कुठल्याही जायंटव्हील मध्ये बसण्यापेक्षा कमी
नव्हता, लाटांवर स्वार होऊन किनाऱ्यावर गिरी घेत येणे हा तर अवर्णनीय असा आनंद होता.
कधीतरी नजरचुकीने एखादी अक्राळविक्राळ लाट बरोबर डोक्यावर येऊन कोसळायची तेव्हा तो
आमच्यासाठी मौत का कुआच असायचा. पुळणीतली घळण म्हणजे
आमच्यासाठी जगातली सर्वात मोठी घसरगुंडी असायची. तिथल्या वाळूत वळणदार
धुळाक्षरे गिरवता यायची, वाळूच्या मुर्त्या, किल्ले बनवता यायचे.
तांबळडेगच्या
या निसर्गाने आम्हाला घडवलं, लहानाचं मोठं केलं, सहन करायला शिकवलं, आनंद घ्यायला शिकवलं,
आनंद द्यायला शिकवलं, लढायला शिकवलं, झगडायला शिकवलं, खेळायला शिकवलं, एकूणच आनंदी
जीवन जगायला शिकवलं. हा निसर्ग आमचा सखा, सोबती, मित्र, मायबाप, परमेश्वर सर्वकाही
आहे आणि म्हणूनच नोकरीनिमित्त आपण कितीही दूर गेलो तरी पुन्हा त्याच्या भेटीसाठी मन
नेहमीच आतुर असते एवढे मात्र नक्की.
__________________________________________________________________________________
Very good
उत्तर द्याहटवाSuperb
उत्तर द्याहटवामाझ्या गावाचे इतके सुंदर वर्णन काय असू शकते ?बालपणीच्या आपणासर्वांच्या सुखद आठवणींना सर तुम्ही उजाळा दिलात आणि मन भूतकाळात स्वैर फेरफटका मारून आले ...खुप सुंदर ....गावाचे वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे करण्यात तुम्ही यशस्वी झालात ..खूप धन्यवाद ...सारंग ठाणेकर .
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट, अप्रतिम आणि तंतोतंत वर्णन !!!
उत्तर द्याहटवासुंदर लेखन शैलीतील वर्णन वाचून अत्यानंद झाला.
गावाबद्दल ची आत्मीयता आणि ओढ असल्यामुळे असल्यामुळे एवढी सुंदर कल्पना साकार झाली.
जबरदस्त, अफलातून.
शशिकांत सनये.
मस्तच
उत्तर द्याहटवाSuperb best article
उत्तर द्याहटवानिसर्ग रम्य तांबळडेग गावाचे सुंदर वर्णन.खरेच गावाला धावती भेट दिल्यासारखे वाटले. धन्यवाद डॉ. राजेश राजम साहेब.
उत्तर द्याहटवाओढ तांबळडेग खूप छान वर्णन. उत्तम लेख.
उत्तर द्याहटवाSunder!
उत्तर द्याहटवाछान वर्णन... लव यु तांबळडेग....
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर वर्णन.
हटवाVery nice 👌👌👌👌
हटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम तांबळडेग
उत्तर द्याहटवा👌🏼👌🏼फारच सुंदर लेख ... डॉक्टर!
उत्तर द्याहटवाआपल्याला सहज मिळाले म्हणून त्यांची किंमत नसते, त्यावेळी आपल्या सारख्या निसर्गप्रेमी लेखकाची आवश्यकता भासते. आपल्या मायभूमीचे अत्यंत बारकाईने अभ्यास करून, निसर्ग सौंदर्य कसे न्याहाळायचे, यांचा सुरेख नमुना आपल्या लेखनातून दिसला. आपले भाग्य आहे म्हणून तांबळडेग सारखं, निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव आपल्याला लाभला.
अत्युत्कृष्ट लेखनाबद्दल आपले आभार आणि अभिनंदन 🙏💐
असेच अनमोल लेखन आपल्याकडून घडावे, यासाठी खूप खूप शुभेच्छा!
नेहमी प्रमाणेच ओघवते आणि सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवाअप्रतिम. बालपणापासून समृद्ध निसर्गाने तुमचं व तुमच्या मनाचं पोषण केलंय हेच या लेखात प्रकर्षाने जाणवते. अत्यंत तरलतेने तांबळडेगच्या परिसराचे वर्तमानकाळातील रूप शब्दबद्ध केलंय. त्यासाठी वाळूसारखं सर्वकाही झिरपवणा-या आपल्या मनोवृत्तीला मानाचा सलाम. ��������
उत्तर द्याहटवाखूप सुंदर वर्णन..!
उत्तर द्याहटवाडाँक्टर साहेब,धन्यवाद कि आपण गावाबद्आपल्या गावाबद्दल सुरेख लेख लिहिलात,फारच छान
उत्तर द्याहटवाVery nice blog. Keep up the great work. All the best Raju Mama. ������
उत्तर द्याहटवा-sweety
अनेक वेळा वाचल्यानंतर तांबळडेगच्या परिसरात फिरून आल्याचा आनंद मिळाला. खुपच छान
उत्तर द्याहटवाKhup chhan lekh. Sundar warnan.lekhak Ravindra pinge. Maruti chitampalli ya lekhakanchi pan Aatwan aali.
उत्तर द्याहटवाVery well 👌👍
उत्तर द्याहटवाAarti sagar
खुपच छान माझं आवडत ठिकाण म्हणजे तांबळडेग चा समुद्र किनारा.
उत्तर द्याहटवा