ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठीतील प्रथितयश कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘जागतिक मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा होतो. संत ज्ञानेश्वरांनी अमृताची उपमा दिलेली मराठी भाषा आणि या भाषेचा गौरव करणारा हा दिन. नरेंद्र सारखा एखादा कवी मराठीचा महिमा सांगताना सहा भाषांचे रस एकत्रित करून मराठी तयार झाल्याने तिची गोडी काही औरच आहे असे म्हणतो. इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मराठी भाषेची चिंता व्यक्त केली जाते; परंतु मराठी भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सकस असे साहित्य आहे आणि म्हणूनच आपल्या भाषेतील साहित्यालाही आजपर्यंत चार वेळा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. मातृभाषा ही ज्ञानभाषा व विचारांचे माध्यम म्हणून स्वीकारताना आम्हाला बिलकुल कमीपणा वाटता नये. भारतीय संस्कृतीची मुळे अगदी खोलवर आहेत आणि म्हणूनच मराठी भाषा लोप होईल असे अजिबात वाटत नाही. असे असले तरी मराठी भाषेची समृद्धी, विकास आपल्याला जाणीवपूर्वक केला पाहिजे हेही तितकेच खरे आहे.
माता
जन्म देते, माती आसरा देते तर
मातृभाषा इतिहासातील संस्कार व सुसंस्कार देते व त्यातूनच चांगल्या माणसाची जडणघडण
होते. आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याची वेळ
येत आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे अनेकांचा ओढा आहे. इंग्रजी भाषा शिकण्याबाबत कोणतीही हरकत नाही; परंतु मराठीकडे पाठ फिरवून नाही, कारण कोणत्याही विषयाचे आकलन मातृभाषेतून जितके होईल तितके
ते इतर परकीय भाषेतून होणार नाही असे अनेक भाषातज्ञ सांगतात. त्यामुळे विषयाचे आकलन होण्यासाठी मातृभाषेला
पर्याय नाही.
मराठी
भाषेचा विकास करताना आपणाला बोलीभाषांचा ही विकास करावा लागेल. साहित्य निर्मिती व तिचा आस्वाद दोन टक्क्यांपेक्षा
जास्त लोक घेत नाहीत. ९८ टक्के लोक
बोलीभाषा वापरतात आणि भाषिक गरजा शंभर टक्के लोकांच्या आहेत. त्यामुळे बोली भाषांचा विकास ही महत्त्वपूर्ण
ठरणार आहे. भाषा संवर्धन करताना मराठी भाषेमध्ये सकस
साहित्य निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी
भाषकांमध्ये भाषाभिमान निर्माण झाला पाहिजे. जाणीवपूर्वक भाषेचा वापर केला पाहिजे. जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्रात
नोकरी करणारे नोकरदार यांना मराठी भाषेची सक्ती असायला हवी. सक्ती झाल्यावर भाषा शिकविणारी केंद्रे निर्माण होतील.
पर्यायाने रोजगार निर्मितीही शक्य होईल. आज एखाद्या बँकेत गेल्यावर
सुद्धा आपणास हिंदी किंवा इंग्रजी मधून व्यवहार करावे लागत आहेत. किमान महाराष्ट्रात तरी मराठी भाषेतच हे व्यवहार
करता आले पाहिजेत.
आपल्या
भाषेतील सकस साहित्याची ओळख भाषांतराच्या माध्यमातून इतरांना झाली पाहिजे, तसेच इतर भाषांमधील चांगले साहित्य आपल्या भाषेमध्ये
भाषांतरीत झाले पाहिजे. भाषेच्या
विकासामध्ये प्रसार माध्यमांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे; कारण प्रसार माध्यमांनी वापरलेल्या भाषेचे दृश्य परिणाम
समाजावर होत असतात. भाषा विकासासाठी भाषा
विकास संचालनालयाने प्रयत्न करणे फार आवश्यक आहे. नवनवीन संकल्पनांना मराठी भाषेत पर्यायी शब्द
तयार करणे आणि ते रूढ करणे आवश्यक आहे. विविध शब्दकोश, पारिभाषिक कोशांची निर्मिती आवश्यक आहे. मराठी भाषकांमधला न्यूनगंड नष्ट व्हायला हवा, त्यासाठी भाषा हे एक माध्यम किंवा साधन आहे हे लक्षात घेतले
पाहिजे. इंग्रजी भाषा बोलता येणं हे
प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ नये.
भाषेच्या
विकासामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. इंग्रजी भाषा ही जागतिक पातळीवर आवश्यक असल्याने
ती भाषा ज्ञात असणे आवश्यक आहे; परंतु त्याला
अति महत्त्व देण्याचं कारण नाही. आपल्या देशाच्या तुलनेत अनेक देश इंग्रजी भाषेला फारसे
महत्व देत नाहीत. आपले व्यवहार अडू नयेत यासाठी काही भाषांतर साधने
तयार झाली पाहिजेत. इंग्रजी भाषा आपल्या मोबाईलवर ऐकताना ते वाक्य आपणाला मराठीतून
दिसण्याची सोय झाली पाहिजे आणि आपण मराठी बोलल्यावर इंग्रजी भाषकाला ते वाक्य
मराठीतून दिसले पाहिजे, अशा प्रकारची
ॲप्स तयार झाली पाहिजेत किंवा तशा प्रकारचे डिव्हाइस निर्माण झाले पाहिजेत. ऑनलाइन शब्दकोश निर्माण झाले पाहिजेत. साहित्याचे भाषांतर हे कठीण असते कारण त्यात
केवळ वाच्यार्थ नसतात तर लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ ही असतात. त्यादृष्टीने
भाषांतर सॉफ्टवेअर्स तयार झाली पाहिजेत. एक वाक्य संगणकाला दिल्यावर त्याने ज्या भाषेत
भाषांतर करायचे आहे त्या भाषेतील चार पाच वाक्य सूचवली पाहिजेत. त्यातील आपणास संदर्भानुसार योग्य वाटणारे वाक्य
आपण निवडू शकतो अशी रचना सॉफ्टवेअरमध्ये असावी.
कोणताही
भाषिक व्यवहार करताना मराठी भाषकाला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी
आपणाला घ्यावी लागेल. लहान मुलांना मराठी
वाचन करायला आम्ही प्रवृत्त केले पाहिजे. मराठी भाषकांनी एकमेकांशी बोलताना मराठी भाषेचा
वापर केला पाहिजे. आपली मातृभाषा मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठी भाषेमध्ये
रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
“लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी....
एवढ्या जगात माय, मानतो मराठी II”
असे प्रत्येक मराठी भाषक गर्वाने म्हणू लागला तर
खरोखरच आम्हाला मराठी भाषेची काळजी करायची गरज पडणार नाही आणि अशा सर्वांच्या एकत्रित प्रत्नानेच मातृभाषेचा दर्जा व स्तर उंचावेल यात संदेह नाही.

खूप छान
उत्तर द्याहटवाGreat 👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे
उत्तर द्याहटवाएखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत? हे प्रत्येक मराठी माणसाने एकदा विचार करण्यासारखे आहे
उत्तर द्याहटवा