रविवार, १२ डिसेंबर, २०२१

सार्वजनिक मालमत्ता आणि आपली जबाबदारी

 


   

      सार्वजनिक मालमत्ता ही वैयक्तिक योगदानातूनच निर्माण झालेली असते. विशेषत: आपण जेव्हा सरकारी मालमत्ता असे म्हणतो तेव्हा आपण त्या मालमत्तेचे मालक असतो, कारण आपल्याच पैशातून ती निर्माण झालेली असते. सार्वजनिक मालमत्ता ही सुयोग्य राखणे, त्याचा सुयोग्य वापर करणे ही नागरिक म्हणून आपली एक फार मोठी जबाबदारी असते; परंतु बरेचदा नागरिकांकडून हे घडताना दिसत नाही, कारण सार्वजनिक मालमत्ते बाबत आपले विचार सुस्पष्ट नसतात.  एखादा संप, मोर्चा यामधून मोठ्या संख्येने लोकसमुदाय गोळा होतो तेव्हा तेथे सामूहिक मानसिकतेतून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड किंवा नुकसान होताना दिसते. अशावेळी ती सार्वजनिक मालमत्ता आपलीच आहे याचे भान अशा लोकांना राहत नाही. हे सर्वथा चूक आहे.

      अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडून सहजपणे अस्वच्छता होते. थुंकणे, लघवी करणे यासारख्या गोष्टी सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी होताना दिसतात. आपण आपल्या घरातील स्वच्छतेबाबत जितके जागरूक असतो तितके सार्वजनिक स्वच्छतेबाबत असत नाही. याचे धडे बालपणापासून मिळाले पाहिजेत. आई-वडिलांकडूनच अशा प्रकारच्या चुका होत असतील तर निश्चितपणे त्यांच्या पाल्यांकडून अशा प्रकारच्या चुका सहजपणे होतात.  

      एस.टी. बस मधे बसल्यावर उगीचच एखाद्याकडून सीटचा कॅनवास फाडला जातो, त्यावेळी ती कृती बघणारा दुसरा माणूस, आपण या मालमत्तेचे मालक आहोत हे लक्षात घेऊन त्याला रोखत नाही.  माझे काय जाते आहे?  ही तर सार्वजनिक मालमत्ता आहे’, हीच त्याची त्यावेळची भूमिका असते आणि त्यामुळे असे प्रकार वाढत जाताना दिसतात.  मी अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही आणि कोणी चुकीच्या गोष्टी करणारा असेल तर माझ्या परीने मी त्याला परावृत्त करेन अशी भूमिका प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. भारताचा नागरिक म्हणून आपणास एक स्वयंशिस्त असलीच पाहिजे.  आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या काही महत्त्वाच्या मूल्यांचे पालन करताना या गोष्टी जबाबदारीने केल्या पाहिजेत हे लक्षात घेतले पाहिजे.

      सरकार विरोधातील आंदोलने करताना विशेषतः एस.टी. बसेस, रेल्वे यांच्यावर दगडफेक करून आंदोलक आपला राग व्यक्त करतात: परंतु बसेसची, रेल्वेची तोडफोड होऊन त्या मालमत्तेचे नुकसान हे आपलेच होते आहे, ती मालमत्ता पुन्हा उभी करण्यासाठी आपल्याच खिशातील पैशांमधून ती उभी राहणार आहे याची जाणीव त्या आंदोलकांना करून देणे आवश्यक आहे. तसेच काही मूठभर लोकांच्या अशा दुष्कृत्यांमुळे त्याची भरपाई सामान्य माणसाला करून द्यावी लागत आहे. अशावेळी सरकारी मालमत्तेची नासधूस करणाऱ्यावर योग्य कारवाई करून त्या मालमत्तेच्या नुकसानीस पूर्णपणे त्या संबंधितास जबाबदार धरले व दंड वसूल करण्यात आला तर काही प्रमाणामध्ये अशा कृत्यांना आळा बसू शकेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सी.टी.व्ही. सारख्या उपकरणांनी अशाप्रकारे आंदोलकांवर किंवा नासधूस करणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवणे फारसे अशक्य नाही.



      लोकशाहीमध्ये आंदोलन करणे, मोर्चा काढणे हे चुकीचे नसले तरीदेखील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून असे मोर्चे काढणे किंवा आंदोलने करणे हे मात्र फारसे मनाला पटणारे नाही.  आपल्याकडे सार्वजनिक मुताऱ्या, संडास बांधले जातात परंतु त्याची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता याची तजवीज केली जात नाही. त्यातच नागरिकांच्या चुकीच्या सवयींमुळे ही अस्वच्छता वाढतच जाते. आपल्याकडील सार्वजनिक शौचालये बघितल्यावर आपल्याला त्याचे प्रत्यंतर येते. सार्वजनिक वस्तू जेव्हा चोरी होऊ नये म्हणून साखळीने बांधल्या जातात तेव्हा खर तर आपल्या स्वतःलाच आपली लाज वाटली पाहिजे.

      आपल्या कुटुंबात आपणास आपल्या कुटुंब प्रमुखांचा किंवा कुटुंबीयांचा राग आल्यास तो व्यक्त करताना आपल्याच घरातील टी.व्ही. आपण फोडतो का? फ्रिज, वॉशिंग मशीनची तोडफोड करतो का? मग सरकारच्या विरोधात राग व्यक्त करताना सरकारी मालमत्तेची( म्हणजे आपल्याच मालमत्तेची) तोडफोड करून तो का व्यक्त करावा?  हा प्रश्न आहे.  भारतीय संस्कृतीत हिंसात्मक आंदोलन हे निषिद्ध आहे.  महात्मा गांधींनी केवळ उपोषणाच्या मार्गाने ब्रिटिश सरकारकडून कितीतरी गोष्टी मिळवल्या होत्या.  बऱ्याचदा सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी आंदोलने होतात: पण सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हिंसे पेक्षा इतर अनेक चांगले मार्ग आहेत त्याचा अवलंब करायला हरकत नाही.  सरकारी यंत्रणांनीही अशी आंदोलने करण्याची वेळच येऊ देऊ नये किंवा अशा आंदोलनांकडे दुर्लक्ष करून आंदोलनाला खतपाणी घालू नये,

      थोडक्यात लोकशाही असलेल्या देशांमध्ये आंदोलने होणार: परंतु ती आंदोलने अहिंसात्मक असावी.  त्यासाठी एक संहिता तयार करावी.  त्या विशिष्ट चौकटीत ही आंदोलने व्हावीत.  त्या संहितेत आंदोलकांवरील निर्बंधांबरोबरच सरकारी जबाबदारी ही स्पष्ट असावी.  असे झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलने होतील आणि सरकारी मालमत्तेचे होणारे नुकसानही टाळता येईल. सार्वजनिक स्वच्छता, देशप्रेम, आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या मनावर बालवयापासून बिंबवल्या गेल्या पाहिजेत तरच आपण अशा चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालू शकू.


शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

अखंड प्रेरणास्त्रोत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 


                   अखंड प्रेरणास्त्रोत डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम

आजचा 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे आपल्या देशाचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. सर्वत्र हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा होतो. मी मागील वर्षी सुद्धा ‘प्रेरणा वाचनाची' हा ब्लॉग लिहिला होता. काही विषय किंवा व्यक्तिमत्वं अशी असतात की त्या बद्दल कितीही लिहिले तरी कमीच वाटते.  'वाचन' हा विषय ही असाच आहे आणि डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्व ही त्यातीलच एक आहे.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेरणा ही खूप महत्त्वाची असते. यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की त्यांनी कोणत्यातरी गोष्टीपासून, विशेषतः एखाद्या पुस्तकापासून प्रेरणा घेतलेली असते आणि त्यांच्या जीवनात ते यशस्वी झालेले असतात.  आपण डॉ. कलाम वाचत गेलो, समजून घेत गेलो, त्यांची वैचारिक बैठक तपासली, त्यांची बुद्धिमत्ता अनुभवली तर ते अखंड प्रेरणेचे स्त्रोत कसे होते? व आहेत, हे सहजपणे लक्षात येते.  त्यांचे विचार तर सर्वश्रुत आहेतच.  हे विचार त्यांच्या लेखनातून पुस्तक रूपाने आजही आपल्या सोबत आहेत. त्यांची भाषणे तर या महत्त्वपूर्ण, प्रेरणा देणाऱ्या, जगण्याची दिशा दाखवणाऱ्या विचारांनी ओतप्रोत भरलेली आणि भारलेली असायची.  

त्यांच्या लेखन संपदेवर प्रकाश टाकला तर देशप्रेम आणि चिरस्थायी विकासाबद्दलची त्यांची दूरदृष्टी आणि अदम्य आशा आपणास सहजपणे नजरेस येते. त्यांची अनेक पुस्तके अनुवादकांनी आपणास मराठीतूनही उपलब्ध करून दिली आहेत. विशेषतः 'माझी जीवन यात्रा’, 'अग्निपंख’, 'मिसाईल मॅन’, ‘कर्मयोगी’, 'ए.पी.जे. अब्दुल कलाम संपूर्ण जीवन' 'बियाँड 2020' उद्याच्या भारतासाठी, 'असे घडवा तुमचे भविष्य’, 'टर्निंग पॉइंटस्’, 'मिशन इंडिया' 'माझ्या स्वप्नातील भारत' ही पुस्तकांची शीर्षके जरी वाचली तरी त्यांच्या लेखनाची दिशा लक्षात येते. आपल्याला झोपेत पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा झोपू न देणार्‍या स्वप्नांना तरुणांनी उराशी बाळगले पाहिजे असे त्यांना वाटत होते. लहान लक्ष्य ठेवणे हा गुन्हा आहे, उद्दिष्ट ही महान असली पाहिजेत. अपयशी लोकांच्या कथा वाचायचा ते आपणाला सल्ला देतात, त्यातून यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात असे ते आवर्जून सांगतात.

वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेलं बरं असा अनुभवाचा सल्लाही ते देतात.  अपयश नावाच्या रोगासाठी 'आत्मविश्वास' आणि 'अथक परिश्रम' ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. हा मंत्र ते तरुणांना सांगतात. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही, स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा असा सल्ला ते देतात.  आपण आपले भविष्य बदलू शकत नाही; परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकतो, निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील. असा महान संदेशही ते देतात.  'जर तुमचा जन्म पंखांनीशी झाला आहे तर तुम्ही रांगत का आहात?, त्या पंखांनी उडायला शिका.  जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्ही सूर्यासारखे जळायला शिका.  संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.  एकाग्रचित्त होऊन लक्ष्यावर फोकस केले पाहिजे असेही ते सांगतात.

देश जर भ्रष्टाचार मुक्त बनवायचा असेल तर वडील, माता आणि शिक्षक या तीन सामाजिक सदस्यांमुळे ते शक्य आहे असं ते म्हणतात. संकटे आवश्यक आहेत त्याशिवाय यशाचा आनंद मिळवता येणार नाही.  जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.  चांगले मित्र बनवण्याचा ते सल्ला देतात व चांगल्या मित्राला ते ग्रंथालयाची उपमा देतात.  युद्ध हा कोणत्याही समस्येचा कायमचा उपाय नाही. आनंदी राहण्याचा एक मंत्र आशा फक्त स्वतःशीच बाळगा कुणा दुसऱ्या व्यक्तीशी नाही.  एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे, पण कोणाला जिंकणे खूप कठीण आहे.  जर तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला कोणालाही सलाम करण्याची गरज नाही पण जर तुम्ही तुमचे कर्तव्य केले नाही तर मात्र तुम्हाला सर्वांना हात जोडावे लागतील.  वाट पाहणाऱ्याना फक्त तेवढेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे सोडून देत असतात. अशा एकापेक्षा एक सुंदर विचारांचा खजिना त्यांनी आपणाला खुला करून दिला आहे.

या महान विचारांचा मी येथे एकत्र परामर्श घेतला असला तरी हा प्रत्येक विचार स्वतंत्रपणे व वेळ देऊन चिंतन करून जर आपण वाचला तर डॉ. कलाम सरांची वैचारिक पातळी, प्रगल्भता सहजपणे लक्षात येते. या विचारांची पाठराखण करत अंगीकार करत आपण आपले जीवन पर्यायाने देशाचे भविष्य घडवू शकतो, असे निश्चित वाटते. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, इंदिरा गांधी अवार्ड, वीर सावरकर अवार्ड  असे त्यांना मिळालेले अनेक नामांकित पुरस्कार, सन्मान त्यांच्या महान कार्याची साक्ष देतात. एका नावाड्याच्या पोटी, गरीब कुटुंबात जन्म झालेल्या एका व्यक्तीचा एक महान शास्त्रज्ञ व राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास आपणास नक्कीच थक्क करतो, प्रेरणा देऊन जातो. त्यांच्या विविधांगी विचारांतून खूप मोठी प्रेरणा घेऊन आपण नक्कीच यशस्वी होऊ असा सार्थ विश्वास वाटतो. आणि ही प्रेरणा आपण घेऊ शकलो तर आपण नक्कीच आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो यात संदेह नाही. 


शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

अस्पर्श व्यवहारांसाठी क्यू. आर. कोड

संपूर्ण जगावर कोरोना संकट ओढवले, त्यानंतर आपणाला अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागले. त्यातलीच एक बाब म्हणजे एकमेकांशी अनावश्यक स्पर्श टाळणे. गळाभेट न घेणे, हस्तांदोलन न करणे याबरोबरच असे व्यवहार करणे की सहसा समोरील व्यक्तीला किंवा वस्तूला स्पर्श करावा लागणार नाही. कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अस्पर्श व्यवहारांना गती आली, त्याची मागणी होऊ लागली आणि ती काळाची गरज ही ठरू लागली. विशेषतः डिजिटल इंडियाची घोषणा झाल्यावर अनेक डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली आणि त्यासाठी क्यू. आर. कोड तंत्रज्ञान फारच महत्त्वाचे ठरू लागले. क्यू. आर. कोड हे Quick Response Code चे संक्षिप्त रूप आहे. खरं म्हणजे जपान मध्ये मोटार व्यवसायासाठी 1994 मध्ये याचा प्रथम वापर झाला. हळूहळू या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रात होऊ लागला. अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर होवू लागला आहे, आणि तो होणे ही काळाची गरज आहे.


    क्यू
. आर. कोड हे बारकोड तंत्रज्ञानाचे अधिक सक्षम असे विकसित रूप आहे. संख्या, अक्षरे, ऑडिओ, व्हिडिओ, ग्राफिक्स इत्यादींचा क्यू. आर. कोड तयार करता येतो. तो वाचण्यासाठी अलीकडील नवीन मोबाईल मध्ये स्कॅनर हे टूल अगोदरच स्थित असते किंवा क्यू. आर. कोड समोर केवळ मोबाईल चा कॅमेरा धरला तरी तो कोड आपोआप स्कॅन होतो. आपल्या मोबाईल मध्ये ही व्यवस्था नसल्यास गूगल प्ले स्टोअर वर क्यू. आर. कोड रीडर किंवा द्रुत स्कॅन यासारखी मोफत ॲप्स उपलब्ध आहेत. ती आपण डाऊनलोड करून वापरु शकतो. हा क्यू. आर. कोड वाचण्यासाठी गूगल लेन्स हे ॲपही खूप उपयुक्त आहे. आपल्या मोबाईल मध्ये असणारा एखादा क्यू. आर. कोडही या ॲप मुळे आपण वाचू शकतो. खाली एक क्यू. आर.कोड दिला आहे. आपण तो स्कॅन करून ॲप डाऊनलोड करू शकता. सुरूवातीला पेड असणारे परंतु आता पूर्णपणे फ्री असणारे हे ॲप सुद्धा स्वत:च्या मोबाईल मधील क्यू. आर.कोड स्कॅन करू शकते.

कॅशलेस आर्थिक व्यवहार करताना याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वतःचा खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड इत्यादी माहिती दुसऱ्याला द्यावी लागत नाही. देणारा व घेणारा यांच्याकडे एस. एम. एस. द्वारे येणारा 12 डिजिट चा RRN हा एकच असल्याची केवळ खात्री करावी लागेल. काही विशेष अथवा गुप्त माहिती सांकेतिक शब्दात बदलण्यासाठी या कोडचा खूप मोठा उपयोग होवू शकतो. आर्थिक व्यवहार करताना अलीकडे पॉइंट ऑफ सेल्स (पॉस) यंत्राचा वापर होतो पण अशा व्यवहारा दरम्यान कार्डला, मशिनला स्पर्श करावा लागतोच. त्यामुळे या मशीन ऐवजी क्यू. आर. कोड तंत्रज्ञानाचा वापर निश्चितच फायदेशीर ठरेल. सद्यस्थितीत या तंत्रज्ञानाची गरज आणि होणारा वापर याचा विचार करता पुढील काळात साध्या पान पटरीवर, चहाच्या टपरीवर असे क्यू. आर.कोड चिकटवलेले दिसतील आणि त्याद्वारेच बिल स्वीकारले जाईल, (काहीप्रमाणात त्याची सुरुवातही झाली आहे) त्यामुळे सामान्य माणसाने या तंत्रज्ञानाचा वापर शिकून घेतला पाहिजे.  त्याचे फायदे तोटे समजून घेतले पाहिजेत. विशेषतः एखादा क्यू.आर. कोड स्कॅन करा, तुमच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे जमा होतील अशाप्रकारच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये.

              हा कोड बनवण्यासाठी अनेक वेबसाइट्स मोफत सेवा देतात. स्टॅटिक आणि डायनॅमिक असे दोन प्रकारचे हे कोड असतात. रंगीत किंवा आपल्या लोगो सह डायनॅमिक कोड बनवण्यासाठी काही शुल्क आपणास द्यावे लागते. डायनॅमिक कोड बनवल्यानंतर आपणाला अनेक प्रकारच्या नोंदी मिळवता येतात तसेच त्या माहितीमध्ये काही बदल करणेही शक्य असते. एखाद्या बाबीचे व्हेरिफिकेशन करण्यासाठीही वापर करता येतो. कोव्हिड लसीच्या बाबतीतही आपण हे व्हेरिफिकेशन क्यू.आर.कोड च्या माध्यमातून करू शकत आहोत.

      ग्रंथालयांच्या विकासामध्ये क्यू. आर. कोड हे एक वरदान ठरू शकते क्यू. आर. कोड च्या माध्यमातून ग्रंथालयात अनेक प्रकारच्या सेवा वाचकांना देणे शक्य आहे. सध्या मी माझ्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेडच्या ग्रंथालयामध्ये अशा प्रकारची क्यू. आर. कोड तंत्रज्ञान वापरून सेवा देत आहे आणि वाचकांकडून या सेवेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे.  ग्रंथालयाची सर्व प्रकारची माहिती आपण क्यू. आर. कोड च्या मदतीने वाचकांना अगदी कमी वेळेत देऊ शकतो तसेच ऑनलाइन बुक्स, ऑनलाइन जर्नल्स,  इतर वाचन साहित्य वाचकांना क्यू. आर. कोड च्या माध्यमातून सहजपणे आपण उपलब्ध करून देवू शकतो.

      क्यू. आर. कोडचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये आपणाला सहजपणे करता येऊ शकतो आणि आपले व्यवहार आपण सुकर करू शकतो. भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी केल्यावर सुद्धा क्यू. आर. कोडच्या माध्यमातून आपण त्याचे बिल पेड करू शकतो, शिवाय सुट्ट्या पैशांचा प्रश्नही यामुळे सहजपणे मिटू शकतो. एवढेच नव्हे तर महागड्या फळांच्या बाबतीत ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक फळावर क्यू.आर.कोड लावून त्यात त्या फळाची संपूर्ण माहिती (उदा. शेतकर्‍याचे नाव, ठिकाण इ.) देता येईल.

      हॉटेलमध्ये मेनू कार्ड हाताळताना व्हायरसचा धोका असू शकतो परंतु प्रत्येक टेबलवर क्यू. आर. कोड उपलब्ध करून दिल्यास तो स्कॅन केल्यावर ग्राहकाच्या मोबाइल मध्ये प्रत्येक पदार्थाचा दर सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे हा अस्पर्श व्यवहार सर्वांनाच उपयुक्त ठरू शकतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा आपण क्यू. आर. कोड च्या मदतीने विद्यार्थ्यांना देऊ शकतो.  डीसले गुरुजींचा क्यू. आर. कोड चा प्रयोग सर्वांना ज्ञातच आहे. अशा प्रकारचे काही उपक्रम आपण या माध्यमातून करू शकतो. बँका किंवा सर्व प्रकारची कार्यालये क्यू. आर. कोड च्या मदतीने खूप जलद गतीने काही सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. मंदिरे किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. असे अनेक फायदे या क्यू. आर. कोडचे असल्यामुळे आपल्या देशात याचा प्रसार व प्रभावी वापर होणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे अनेक व्यवहार सुलभ आणि वेगाने होणार आहेत शिवाय ते व्यवहार अस्पर्श होतील हे ही तितकेच महत्वाचे.

 

 


शुक्रवार, ३० जुलै, २०२१

गरज आपत्ती पूर्व नियोजनाची…..

 

अलीकडच्या काळात निसर्गाने अनेकदा आपले रौद्ररूप दाखवले आहे.  कितीतरी नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे.  अगदी अलीकडच्या काळातील निसर्ग वादळ तौक्ते वादळ, खेड, चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर परिसरात झालेला महापूर, भूस्खलन यासारख्या संकटांचा विचार करता आपत्ती व्यवस्थापन आणि त्याची गरज सहजपणे लक्षात येते; परंतु आपत्ती व्यवस्थापनात आपत्ती येऊच नये यासाठी उपाययोजना आणि आपत्ती आलीच तर आम्ही त्याला कसे तोंड देऊ याचा प्रामुख्याने विचार असतो. एकंदरीत आपत्तीपूर्व नियोजनात आपण कमी पडतो आहोत असे लक्षात येते.

      आपत्ती आल्यावर काय करणार? याचे नियोजन जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा आपत्ती येण्याअगोदरचे नियोजन जास्त महत्त्वाचे आहे. आपत्ती ही बऱ्याचदा अचानक येते, काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं होतं; पण काही आपत्ती अशा आहेत की ज्या येऊ शकतात याचा आपण अगोदरच अंदाज बांधू शकतो. ज्या आपत्तींचा आपण अंदाज बांधू शकतो अशा आपत्तींना तोंड देणं तुलनेनं सोपं असतं. आपत्तीपूर्व नियोजनातून अशा संकटांना आपण निश्चितपणे तोंड देऊ शकतो.  आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आज आपल्या विकासासाठी अनेक क्षेत्रात करत आहोत. आपत्ती व्यवस्थापनासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संकटाची तीव्रता खूपच कमी करू शकतो. हवामान विभागाकडून अलीकडच्या काळात बऱ्याचदा पूर्व अंदाज उत्तम प्रकारे सांगितले जात आहेत. बर्‍याचदा ते अंदाज खरे ठरत आहेत, पण असे असले तरी संकटांची संख्या मात्र कमी झाली नाही किंवा नुकसानही कमी होताना दिसत नाही. अर्थात जागतिक तापमान वाढ आणि निसर्गामध्ये मानवाचा अवाजवी हस्तक्षेप यामुळेही हे घडताना दिसत आहे.

      एखादे वादळ, महापूर, अतिवृष्टी आपण थांबवू शकत नाही; पण त्यापासून होणारी जीवीतहानी, वित्तहानी मात्र आपण निश्चितपणे कमी करू शकतो; परंतु त्यासाठी गरज आहे ती आपत्तीपूर्व नियोजनाची.  जपानमध्ये वारंवार भूकंप होतात, म्हणून तिथल्या लोकांची घरे की पुठ्ठ्याची बनवलेली असतात आणि भूकंप होऊन गेल्यावर काही वेळातच त्यांचं पडलेलं घर परत उभं राहतं, हे असं का घडतं; कारण तिथला प्रत्येक नागरिक आपत्तीस सरावलेला आहे, त्यांने आपत्ती गृहीत धरली आहे, त्याचा बाऊ न करता ती आपत्ती तो स्वीकारतो आहे.  अशा प्रकारे आपल्या देशातील नागरिकांना घडवले गेले पाहिजे, हा सुद्धा एक आपत्तीपूर्व नियोजनाचा भाग आहे.

      आपल्याकडे अशा मोठ्या आपत्ती आल्यावर अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात; परंतु ती मदत सर्व माणसापर्यंत बर्‍याचदा पोहोचत नाही.  एखादी वस्तूरुपी मदत घेऊन येणारी गाडी रस्त्यावरच थांबवून त्या वस्तू आपल्याला जास्तीत जास्त कशा मिळतील यासाठी लोकांची झुंबड उडते; परंतु माझ्यासारखीच इतरांनाही या मदतीची गरज आहे हाँ विचार बर्‍याचदा केला जात नाही. सक्षम व्यक्तीने मदत नाकारणे व अक्षम व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, हे जेव्हा घडेल तेव्हा आम्ही अशा कितीही मोठ्या संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकतो.  त्यासाठी गरज आहे ती लोकांच्या प्रमाणिकपणाची, चांगल्या मानसिकतेची.

      सरकारी पातळीवर आपत्ती घडल्यावर मोठमोठी पॅकेजिस जाहीर होतात.  मृतांच्या नातेवाईकांनी एवढे लाख, जखमींना एवढे, नुकसान झालेल्यांना एवढे, असे पैसे जाहीर होतात.  याची तर गरज आहेच; पण अगोदरच काही पैसा आपत्ती येऊच नये म्हणून उपाययोजना करण्यावर खर्च केला तर कदाचित अशा प्रकारच्या पॅकेजिसची गरजच पडणार नाही.  सरकारी पातळीवर सक्षम अशा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आज गरज निर्माण झाली आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. हे तंत्रज्ञान येथील स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्माण केले जावे.  त्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.

      नद्यांमधील गाळ काढणे, गटारे साफ करणे, अनधिकृत बांधकामे रोखणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, भूस्खलन रोखण्यासाठी यंत्रणा राबवणे याबरोबरच आपत्तीच्या वेळी मोठ्या आवाजाचे स्वयंचलित आलार्म वाजले पाहिजेत, अलार्म वाजल्यावर नागरिकांनी काय करावे? त्याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला दिले पाहिजे.  संकटकाळात लोकांचे स्थलांतर करायची वेळ आली तर लोकांनी काय करावे? त्यासाठी शिस्तबद्ध यंत्रणा उभी करावी लागेल.  एन.डी.आर.एफ. चे जवान येण्याची वाट बघावी लागू नये.  त्यासाठी स्थानिक पातळीवर युवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.  अशा संकटकालीन मदतीच्या वेळी केवळ सरकारी पातळीवरून संकटाला तोंड देणं शक्य नाही, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.  त्यासाठी स्वयंसेवी संस्था व सरकार यांच्यात समन्वय असलाच पाहिजे.  आजवरच्या निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा विचार करता अशा आपत्ती या येतच राहणार आहेत; परंतु या आपत्ती मधून होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्तीपूर्व नियोजनावर सर्वाधिक भर द्यावा लागेल, तरच अशा प्रकारच्या आपत्ती रोखणे व त्याची तीव्रता कमी करणे  शक्य आहे.