बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

सन्मान उपक्रमशीलतेचा

   


तमाम भारतीयांची, महाराष्ट्रीयनांची, किंबहूना शिक्षकांची मान उंचावणारी, ऊर भरून यावा अशी घटना नुकतीच घडली, ती म्हणजे युनेस्को व लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर' पुरस्कार आपल्यातीलच एका मराठमोळ्या शिक्षकाला मिळाला.  हे शिक्षक म्हणजे बार्शी येथील खांडवी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक रणजीत सिंह डिसले. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय.  या त्यांच्या यशाचा प्रत्येक शिक्षकाला, भारतीयाला सार्थ अभिमान असणारच.

     अलीकडेच एका कुठल्यातरी वृत्तपत्राच्या संपादकाने शिक्षकांविषयी अर्वाच्च भाषेत, अशोभनीय वक्तव्य केली होती.  या घटनेने अशा लोकांना एक सणसणीत चपराकच बसणार आहे.  हा सन्मान मिळण्यापूर्वी डिसले गुरुजींना उपक्रमशीलता लक्षात घेऊन, काळाची पावले ओळखून त्यांचे शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग बघून मायक्रोसॉफ्ट या कंपनीनेही पुरस्कार दिला होता.  अर्थात त्यांचे शिक्षण क्षेत्रातील हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे म्हणूनच त्यांचा हा गौरव झाला.

     बऱ्याचदा आपल्या गुणवत्तेवर जेव्हा परदेशातून शिक्का बसून येतो, तेव्हा आपल्याला जाग येते.  खरं म्हणजे आपल्या देशात प्रचंड गुणवत्ता आहे, पण जेव्हा त्या गुणवत्तेची दखल घेतली जात नाही, त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही, तेव्हा ती गुणवत्ता झाकोळली जाते. आज आपल्या देशाचे अनेक उच्चशिक्षित जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये नोकरी करतात तेव्हा त्यांची बुद्धी, कौशल्य ते दुसर्‍या देशाच्या विकासासाठी वापरत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. 

     गरज आहे ती विविध क्षेत्रात अशा गुणवंतांचा, विद्वानांचा शोध घेण्याची. त्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, निवड चाचण्या अशा गोष्टी करून त्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी संख्येने कमी असलेल्या मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्य निर्माण केले यामागे गुणवत्ता ओळखून माणसांची केलेली निवड हे प्रमुख कारण होते.  योग्य माणसांच्या हाती योग्य काम देणे हे सूत्र वापरणे आवश्यक आहे.  आपल्या देशात या गोष्टींची खूप कमतरता जाणवते.  वशिला, पैसा यांचे वर्चस्व वाढल्याने ही आजची अवस्था आहे.  येथे मला स्वर्गीय मच्छिंद्रनाथ कांबळी यांचा 'वस्त्रहरण' नाटकातील एक मालवणी संवाद आठवतो “सगळी साली वशिल्याची पात्रा भरून ठेवल्यानी हत” खरोखरच हा संवाद म्हणजे आजच्या नोकर भरतीबाबतचे जळजळीत वास्तव आहे.  जर कोणतीही गुणवत्ता नसताना केवळ वशिल्याने भरती होणार असेल, तर प्रगती कशी होणार? हा प्रश्न आहे.

     आपल्या प्राथमिक शाळांची ढासळणारी परिस्थिती पाहता शिक्षकी पेशावर प्रेम करणारे, आपल्या कामावर प्रेम करणारे असे अनेक डिसले गुरुजी तयार झाले पाहिजेत.  डिसले गुरुजींकडून प्रेरणा घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे 7 कोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्यावर केवळ त्यांचीच पीढी नाही तर पुढच्या काही पीढ्यांचे कल्याण करू शकणाऱ्या या रकमेतील निम्मी रक्कम त्यांनी आपल्या सारखेच काम करणाऱ्या जगभरातल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीतील नऊ जणांना देऊ केली आणि आपल्यासाठी उरलेल्या रकमेचाही विनियोग शैक्षणिक कामांसाठी करण्याचा मनोदय व्यक्त करण्यातून भारतीयांची एक वेगळी ओळखच त्यांनी जगाला करून दिली.

     काळाची पावले ओळखून त्यांनी राबवलेले 'अराउंड वर्ल्ड’, 'हॉर्न टी.व्ही. ऑफ’, 'व्हर्च्युअल फील्ड ट्रिप’, 'क्यू.आर.कोड' हे विविध स्मार्ट उपक्रम खरोखरच लक्षणीय असेच आहेत.  प्रत्येक क्षेत्रातील असे हिरे शोधून त्या त्या क्षेत्राच्या विकास गटांची निर्मिती केली गेली तर भारताची प्रगती आणखी झपाट्याने होईल यात शंकाच नाही.  अशा उपक्रमशीलतेचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि असे उपक्रम प्राधान्याने आपल्याकडे राबवले गेले पाहिजेत असे मनोमन वाटते.

--------------------

७ टिप्पण्या:

  1. खरी गोष्ट आहे , आपल्या देशातील कितेक लोक खरच खूप हुशार आहेत . पण त्यांची दाखल घेतली जात नाही. जर सरकारी शाळे कडे सरकारने देखील लक्ष देणे गरजचे आहे. कितेक गरीब मुले भविष्यात खूप पुढे जाऊ शकतील.

    उत्तर द्याहटवा
  2. पण लक्षात कॊण घेतो ?अशी जणू प्राथमिक आणि एकूणच सर्व गुरुजनांची अवस्था आहे .अर्थात रानजीसीह सारखे अनेक जण अत्यंत कसोशीने आणि प्रामाणिक पणे आपले अध्यापनाचे कार्य करीत आहेत ,मात्र काही गुरुजींमुळे संपूर्ण शिक्षकीपेशा बदनाम होत आहे याचे दुःख आहेच ,लेख खूप सुंदर ....सारंग ठाणेकर .

    उत्तर द्याहटवा
  3. Sudhakar Maske,
    Its fact there is no value of the talent in our india.your blog is very informative and useful.

    उत्तर द्याहटवा