माझे दत्तक झाड
जादूगाराने आपल्या पोतडीतून वाट्टेल ते
बाहेर काढून प्रेक्षकांना दाखवावे तसे माझ्या आठवणींच्या पोतडीत हात घातला तर अनेक
रंगीबेरंगी आठवणींचा खजिनाच हाती लागतो. त्यातही माझ्या गावाकडच्या आठवणी, माझ्या प्राथमिक शाळेतल्या आठवणी तर मनाच्या तळाशी कुठेतरी
खोलवर झिरपून राहिल्या आहेत. त्यातलीच एक आठवण म्हणजे दत्तक झाडाची.
माझ्या प्राथमिक शाळेने माझ्यावर जे अनेक
संस्कार केले त्यातला एक संस्कार म्हणजे वृक्ष प्रेमाचा. माझी प्राथमिक शाळा म्हणजे
खेडेगावातील शाळा असली तरी जिल्हा परिषदेच्या शाळेहून वेगळी होती. किनारपट्टी
भागामद्धे सरकारने प्रत्येक तालुक्यात एक फिशरीजचे शिक्षण देणारी एक शाळा असावी या
हेतूने देवगड तालुक्यात माझ्या तांबळडेग गावाची निवड केली होती. जि.प.च्या
शाळेपेक्षा येथे वेगळं म्हणजे फिशरीज आणि सुतारकाम हे दोन विषय शिकवले जात. दोन
अडीचशे घरे असणारं माझं छोटसं गाव असलं तरी सातवी पर्यंतच्या सर्व वर्गांमद्धे खूप
मुलं असायची. इंग्रजी ‘सी’ आकाराची सात वर्ग खोल्यांची एक सुबक इमारत, बाजूलाच स्वतंत्र ऑफिस, स्टाफ रूम, सुतारकामा साठी प्रशस्त
खोल्या असणारी दुसरी इमारत, आठ दहा शिक्षक, एक शिपाई, एक नाईट वॉचमन आणि मुलांनी भरलेले सात वर्ग असा आमच्या
शाळेचा रुबाबदार थाट होता.
‘मत्स्यव्यवसाय
शाळा, तांबळडेग’ ही आमची शाळा जशी बाहयांगाने सुंदर होती तशीच ती अंतरंगानेही
सुंदर होती. शाळेमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम व्हायचे त्यातून आमच्यावर चांगले
संस्कार होत गेले. आठवड्यातून एक दिवस संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असायचे.
त्यासाठी प्रत्येक वर्गाचा एक कलाविष्कार हवा असायचा त्यामुळे नकळतपणे आम्ही गायन, वादन, नृत्य, अभिनय कधी करू लागलो ते कळलेच नाही. सकाळची परिसर सफाई, प्रार्थना, सुविचार, संध्याकाळी विश्वशांतीचा संदेश देणारे पसायदान या सर्वातून
आम्हा विध्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडत गेले.
माझ्या शाळेचे नाव समोर आलं, आठवण आली की एक आठवण एकदम ताजीतवानी होऊन माझ्या समोर येते, ती म्हणजे ‘दत्तक
झाडाची’. इयत्ता सातवीत असताना आमच्या शाळेने एक उपक्रम हाती घेतला होता तो म्हणजे वृक्ष लागवडीचा.
वृक्षलागवडीचे अनेक कार्यक्रम पुढे मी पाहिले अगदी एकाच खड्ड्यात दरवर्षी
वृक्षलागवड करणारेही दिसतात किंवा केवळ फोटोसाठी असे उपक्रम राबवणारे कमी नसतात. पण
आमच्या शाळेची ही दत्तक झाडाची संकल्पना खूपच छान होती. आम्हाला आमच्या शिक्षकांनी
वृक्षलागवडीचे महत्व समजावले आणि प्रत्येकाच्या हस्ते शाळेच्या परिसरात एक झाड
लावलं जाणार आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी समजावून सांगितली. त्यावेळी
वयापरत्वे आमच्या चेहर्यावर नाखुशी पसरली असली तरी हळूहळू आपल्या हस्ते एक झाड
लावलं जात आहे ही भावनाही सुखद वाटू लागली.
आमच्या कडून सुबाभूळ, निलगिरी, सुरू, आकेशिया अशी विविध प्रकारची झाडे लावली गेली. कार्यक्रमाला
गावातील प्रतिष्ठित मंडळीही उपस्थित होती. माझ्या वाट्याला निलगिरीचे झाड आले.
अगदी प्रवेशद्वारा जवळच त्याला जागा मिळाली. त्याचवेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला
आपापलं झाड मोठं करायचं, त्याला रोज सकाळी पाणी
द्यायचं, त्याची निगा राखायची अशा अनेक सूचना दिल्या.
दुसर्या दिवसापासून आमचं एक नवीन काम सुरू
झालं. सुरूवातीला थोडसं नाखुशीने सुरू झालेल्या कामाची पुढे पुढे एकदम सवयच लागून
गेली. त्यातच माझ्या या सवयीला खत पाणी घालण्याचे काम रामा सादये या माझ्या मित्राने केले. आम्हा सर्वांमध्ये रामा आपल्या
सुबाभुळीच्या झाडावर खूपच प्रेम करायचा. तो आपल्या झाडाला सकाळी शाळा सुरू
व्हायच्या आत आणि संध्याकाळी शाळा सुटल्यावर
अशा दोन वेळा पाणी द्यायचा. त्याच्याबरोबर मी सुद्धा तसेच करू लागलो. हळूहळू
झाडांच्या वाढीबरोबर आमचा उत्साहही वाढू लागला. मोंडकर गुरुजी, कोचरेकर गुरुजी आम्हाला प्रोत्साहन देवून आम्हाला आणखी
प्रेरित करायचे. याचा परिणाम म्हणजे आमची झाडे खूप छान जोम धरू लागली होती.
लावलेल्या झाडांमध्ये दोन चार झाडे मेली असली तरी जगलेली आमची झाडं शाळेच्या
परिसराची शोभा वाढवू लागली.
अनेक वर्षांनंतर आता जेव्हा शाळेच्या
परिसरात जाणं होतं तेव्हा सर्वप्रथम माझं लक्ष जातं ते मी लावलेल्या, मी जगवलेल्या माझ्या दत्तक झाडाकडे. आज त्या झाडवरच्या
पक्ष्यांचा किलबिलाट, त्याने दिलेली प्रशस्त सावली, शाळेच्या परिसराची वाढवलेली शोभा पाहिली की ते झाड वाढवण्यातला आपला
खारीचा वाटा आठवतो आणि भूतकाळात हरवायला होतं, आणि मन
प्रसन्न होतं.
अलीकडेच शाळेकडे जाणं झालं आणि उंच
वाढलेल्या माझ्या झाडाकडे लक्ष गेल्यावर झालेल्या आनंदा पेक्षा आपले झाड
सर्वांपेक्षा चांगले वाढावे म्हणून जीवापाड प्रयत्न करणार्या माझ्या मित्राचे, रामाचे झाड त्याच्यासारखेच अकाली मृत झालेले बघून माझा कंठ
दाटून आला. आज रामा या जगात नाही, शाळेच्या परिसरात गेल्यावर त्या झाडाच्या रूपाने त्याची आठवण मला नियमित
व्हायची, आता मात्र त्या जागेवर ते झाड नसल्याने माझे मन
विषण्ण होते. शाळेने मला एक गोड संधी दिली होती आणि रामाने मला वृक्ष प्रेम शिकवले
होते.
आज शाळेची इमारत जुनी झाली
आहे, शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे, शिक्षक संख्या कमी झाली आहे, विद्यार्थी संख्या कमी
झाली आहे, आम्ही लावलेली झाडेही कमी झाली आहेत पण
त्याच्याबरोबरच्या आठवणी मात्र आजही ताज्या अशाच आहेत. आणि त्यात रममाण होण्यातला आनंदही निर्भेळ असाच
आहे.

👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेखन आणि मनातील खोलवर जपलेल्या आठवणींना दिलेला उजाळा वाचून माझेही मन भूतकाळात एक स्वैर फेरफटका भरून आले ,जीवनातील अगदी छोट्या प्रसंगांना सुद्धा किती मोठे महत्व असते हे यावरून कोणाच्याही ध्यानात यावे ...खूप मन:स्पर्शी लेखनाबद्दल खूप आभार .
उत्तर द्याहटवाप्रदीपकुमार सारंग ...ठाणे .
उत्तर द्याहटवाखुप छान सर 👌
उत्तर द्याहटवाAjit Mane
Nice sir
उत्तर द्याहटवासुंदर।
उत्तर द्याहटवाInspiring and Emotional Article.
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग आहे.
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाDr Ravindra Ambupe
उत्तर द्याहटवाApratim
उत्तर द्याहटवाभावूक करणारा तुझा लेख खूप आवडला.झाडांविषयी प्रेम आपोआप या कोकणात आपल्या मध्ये निर्माण होत.पण हा उपक्रम मात्र मला खूप आवडला.मी ही नक्की प्रयत्न करेन मुलांना माझ्या विद्यार्थ्यांना असा विचार देण्याचा.
उत्तर द्याहटवामस्तच
उत्तर द्याहटवा