___________________________________________________________________________________
आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त केलेला लेखन प्रपंच.
_________________________________________________________________________‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे I
प्रसंगी अखंडित वाचीत
जावे I’
वाचनाची
सवय बालपणापासून लागणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला वाचण्यास प्रवृत्त
करण्याची जबाबदारी पालकांची, गुरुजनांची असते. मुळात आपल्या हातात पुस्तक असले तरच ते आपल्या मुलाच्या
हातात येणार हे प्रत्येक पालकाने लक्षात घेतले पाहिजे. "माझा मुलगा/मुलगी किती लहान वयात मोबाईल
वापरतो/वापरते" याविषयी पालक मोठ्या अभिमानाने बोलत असतात. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की
लहानपणापासून त्या मुलाने घरातील सर्वांच्या हातात मोबाईल बघितलेला असतो आणि
त्याला तो सहज उपलब्ध होतो, तसेच घरातील सर्वांच्या हातात जर त्या मुलाने
पुस्तक बघितलं आणि जर त्याला ते सहज उपलब्ध झालं तर त्या मुलाचा कल पुस्तकाकडे
स्वाभाविकपणे वळू शकतो.
वाचनाचे
वातावरण निर्माण करण्यासाठी घरामध्ये एक छानसं पुस्तकाचं कपाट असायला हवं. मोबाईलचं रिचार्ज ज्या सहजतेने होतं त्या
सहजतेने पुस्तकं विकत घेतली गेली पाहिजेत.
मुलाच्या वयानुसार त्याला तशी पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत. एखाद्या ग्रंथालयाचं त्याला सभासदत्व घेऊन दिलं
पाहिजे. तो काय वाचतो आहे? यावर पालकांनी त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. तरच ही वाचन संस्कृती वृद्धिंगत होत राहील. बऱ्याचदा आपण केवळ ‘वाचन संस्कृतीचा
लोप होतोय’ याचाच पाढा वाचत बसतो, पण ती टिकवण्यासाठीचे प्रयत्न करायला तयार
नसतो. त्यासाठी सर्वप्रथम वाचनाचे महत्व शिक्षक व पालकांनी जाणून घेणे आवश्यक आहे
आणि तरच वाचनाच्या माध्यमातून पुढची पीढी आपण घडवू शकतो. (माझ्या दिनांक 9 ऑगस्ट
च्या 'वाचू आनंदे' या ब्लॉग मध्ये
मी वाचनाचे महत्व विस्ताराने संगितले आहे.)
का
वाचावे? काय वाचावे? कसे वाचावे? असे काही प्रश्न आजच्या तरुणांसमोर असू शकतात. या
प्रश्नांची उत्तरे त्यांना सांगणे आवश्यक आहे. वाचनाने काय बदल होतात? हे आपण त्यांना समजावून
संगितले पाहिजे. महान व्यक्ती पुस्तकांमुळे कशा घडल्या? याची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवली पाहिजेत. एकदा पुस्तके
का वाचावीत? या प्रश्नाचे उत्तर सापडले की मग काय वाचावे? या प्रश्नाचा उलगडा व्हायला मदत होते. बाजारात अनेक
प्रकारची पुस्तके असतात, त्यातली कोणती पुस्तके
निवडावीत? हे अनुभवाने सहज शक्य होते. आणि ही निवड
आपल्या घडण्यावर परिणाम करणार असते. म्हणून निवडही तितकीच महत्वाची आहे.
का वाचावे?, काय वाचावे? या प्रश्नांच्या उकलींनंतर कसे वाचावे? हा प्रश्नही महत्वाचा आहे. याबाबत बेकन यांनी उत्तम
मार्गदर्शन केले आहे. “काही पुस्तकांची नुसती चव घ्यायची असते, काही गिळायची असतात तर काही थोडी सावकाश चर्वण करून पूर्ण
पाचवायची असतात.” यातून वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. पुस्तकाच्या
स्वरूपानुसार वाचनाचे स्वरूप असले पाहिजे. जी पुस्तके आपणाला विचार प्रवृत्त करतात
ती परत परत वाचली पाहिजेत, त्यांचं चर्वण केलं
पाहिजे, ती पचवली पाहिजेत आणि त्या विचारांचा उपयोग
समाजासाठी करून दिला पाहिजे. अशी पुस्तके आपण एकमेकांना भेट दिली पाहिजेत, ती सर्वांनी वाचावीत यासाठी एकमेकांना प्रेरित केले
पाहिजे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण
'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करतो. डॉ. कलाम यांचे विचार, लेखन इतकेच नव्हे तर त्यांचे संपूर्ण जीवनच आपल्यासाठी
प्रेरणादायी ठरणारे आहे. अनेक महान व्यक्ती या वाचनामुळे घडल्या आहेत, त्यामुळे अशा व्यक्तींच्या कृती, उक्ती वाचनातून समजून घेऊन, त्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपले
जीवन फुलवले पाहिजे. पुस्तके म्हणजे बुद्धीचे अन्न आहे. ही पुस्तके ज्ञानदीप आहेत.
त्याच्यावरची गुंतवणूक म्हणजे ज्ञान व संस्कृती यातील गुंतवणूक असते. म्हणूनच ही
गुंतवणूक आपण सर्वांनी केली पाहिजे. आज या गुंतवणुकीची फारच गरज निर्माण झाली आहे
हे निश्चित.



Excellent and much relevant to the present situation. Facts and analysis are explained in simple and highly effective way.
उत्तर द्याहटवाNice sir
उत्तर द्याहटवाNice 👍👍
उत्तर द्याहटवाNice sir एवढी महत्वाची माहिती पोहोचवण्यासाठी खूप आभार
उत्तर द्याहटवाखुप छान सर👍👍
उत्तर द्याहटवा(अजित माने)
खूप छान लेख
उत्तर द्याहटवालेख आवडला,खरंच आज वाचन खुप कमी प्रमाणात होत आहे.
उत्तर द्याहटवाVery Nice Sir
उत्तर द्याहटवा