
जेथे जेथे काहीतरी भव्य दिव्य आहे तेथे तेथे आपले कर आपोआप
जुळतात, ते जोडावे लागत नाहीत. असेच एक भव्य दिव्य काम
करणारे स्थान म्हणजे शिक्षक. एक सर्वार्थाने आदर्श शिक्षक असणारे एक महान शिक्षक
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा
होतो. गुरूजनांच्या प्रती आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस.
प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत त्याच्या गुरूंचा वाटा फारच महत्वाचा असतो. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या झालेल्या व्यक्ती
नेहमीच आदराने आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरूंना देताना दिसतात.
शिक्षक हा एक शिल्पकार असतो. शिक्षक ही काही नोकरी नाही ते एक व्रत
आहे. येथे पावित्र्य, मांगल्य, प्रेम, सद्भावना,
सदाचार, निष्ठा, ज्ञान यांचा ठेवा
असतो. शिक्षकाची भूमिका एखाद्या शिडी सारखी असते, प्रत्येक जण त्या
शिडीचा उपयोग आपल्या जीवनात उंची गाठण्यासाठी करत असतो, पण ही शिडी मात्र आपल्या जागी घट्ट उभी असते. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांप्रती सहभावाने, सद्भावनेने वागतात आणि ज्ञानदानाचे कार्य करतात तेव्हा तेथे एक ऋणानुबंध तयार होतो.
ऋणानुबंधाच्या संदर्भात मला एक प्रसंग उद्धृत करावासा वाटतो
तो म्हणजे, म्हैसूर विद्यापीठातून
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना कोलकाता विद्यापीठात बोलावणं आलं, तेव्हा म्हैसूरचे सारे लोक व्यथित झाले,
त्यांना नाईलाजाने निरोप द्यावा लागला, तेव्हा तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या
बग्गीचे घोडे सोडले आणि स्वतः ती बग्गी ओढली. धन्य ते गुरु आणि धन्य ते
शिष्य ! या प्रसंगावरून डॉ. राधाकृष्णन यांच्यावरील विद्यार्थ्यांचे प्रेम, भक्ती किती दृढ होती याची
कल्पना येते.
शिक्षकाची सेवा ही चैतन्य दायी असते. वर्गाचा चैतन्यमय झरा बनवण्याचे काम शिक्षक
करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद
निर्माण करण्याचे काम शिक्षक करतात.
त्यांना मुलांबरोबर मूल व्हावं लागतं.
उड्या माराव्या लागतात, अभिनय करावा लागतो. सर्वच क्षेत्रातील महान व्यक्तींना घडवण्याचे
कार्य शिक्षक करत असतात. आपला विद्यार्थी
आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावा, उच्चपदस्थ व्हावा
असे शिक्षकांना नेहमीच वाटत असते. इतर
क्षेत्रांमध्ये आपल्याला हे फारसे दिसत नाही.
विद्यार्थ्यांच्या श्रेष्ठपणामुळे, प्रसिद्धीमुळे शिक्षक ओळखले जाणे हा त्या शिक्षकांचाच सन्मान असतो.
आजच्या काळात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काही
अपप्रवृत्तीही दाखल झालेल्या दिसतात. शिक्षणाच्या खाजगीकरणाबरोबर या क्षेत्राला
काही अंशी व्यापारी स्वरूप आलेले दिसते.
शिक्षण देण्याचा उद्देश जेव्हा पैसा असतो तेव्हा त्याचे स्वरूप बदलणे
क्रमप्राप्त आहे. यातूनच पूर्वीचे शिक्षण, त्याचे स्वरूप आणि आजचे शिक्षण आणि त्याचे स्वरूप यात फरक पडत गेला. पूर्वीच्या काळी शिक्षकांप्रती
विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती होती ती आता फारशी राहिली नाही.
चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची
मानसिकताही चांगली असणे आवश्यक आहे. शिक्षक समाधानी असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा शिक्षकांना दिली जाणारी शिक्षणेतर
कामे, बदल्यांचे प्रश्न,
पेन्शनचे बदलणारे स्वरूप, विशिष्ट विषय शिक्षकाला दुसराच एखादा विषय
शिकवायला लागणे, सरप्लस होणे, शिक्षण सेवक, घड्याळी तासिका तत्वांवर नेमणुका यासारख्या असंख्य
प्रश्नांनी शिक्षकांची मानसिकता बदलताना दिसते आहे. या सर्वाचा परिणाम चांगल्या शिक्षणावर निश्चितच
होत आहे.
व्यक्तीच्या जडणघडणी बरोबरच देशाच्या जडणघडणीतील, विकासातील शिक्षण क्षेत्राचे योगदान लक्षात
घेऊन जेवढी गुंतवणूक या क्षेत्रात केली गेली पाहिजे, तेवढी ती केली जात नाही. मराठी शाळांची स्थिती तर खूपच वाईट
होताना दिसते आहे. विद्यार्थी संख्या कमी म्हणून एक शिक्षक चार चार वर्ग सांभाळत
असेल तर तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना काय न्याय देणार? आणि मग चांगले
शिक्षण मिळत नाही म्हणून पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये
पाठवणार असे हे दुष्टचक्र सुरु झालेले दिसते.
हे दुष्टचक्र, अपप्रवृत्ती
थांबाव्यात, शिक्षकांच्या समस्या
सुटाव्यात आणि शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य अबाधित राहावे अशी प्रार्थना या
शुभदिनी करावीशी वाटते.
आजच्या या दिनी माझ्या आई वडिलांबरोबरच मला घडवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. बालपणी संस्कारशील बनवणारे माझे सर्व प्राथमिक शिक्षक, मिठबाव हायस्कूल मध्ये माझ्यातल्या कलागुणांचा विकास करणारे, मला साहित्याची आवड लावणारे आणि माझी आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करणारे श्री. नंदकुमार सोमण सर. नंतर ती आवड आणखी वाढवून तिला खत पाणी घालणारे प्रा. वसंतराव भोसले, ग्रामीण विकासाचे धडे देणारे डॉ.विजय काजळे आणि प्राचार्य डॉ.पी.जी.पाटील. स्पर्धा परीक्षांविषयी जागरूक करणारे प्राचार्य डॉ.व्ही.ए.पाटील, ग्रंथालय शास्त्राचे ज्ञान देणारे डॉ.जी.ए.बुवा, प्रा.एस.एस.पाटील. एन.एस.एस. मध्ये झोकून काम करायला शिकवणारे प्राचार्य डॉ.आर.जी.जाधव, माझे पीएच.डी.चे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.वसंत शेकडे. माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची स्तुती करणारे डॉ.महेंद्र कामत, प्रा.प्रशांत राऊत, प्रा.नागेश दफ्तरदार अशी कितीतरी नावे समोर येतात. या सर्वांच्या ऋणात राहणे मी नेहमीच पसंत करतो, नतमस्तक होतो. त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यासमोर माझे कर आपोआपच जुळतात.


आपले भाग्य म्हणजे खुप चांगले आणि शिकवता शिकवता आभाळाची ऊंची गाठणारे शिक्षक भेटले.... राजु, आपण जे आहोत त्यामागे आपल्याला घडवण्यासाठी / आकार देण्यासाठी झटलेले हे ऋषी तुल्य शिक्षक आहेत... आम्ही त्यांची ऊंची कधीच गाठू शकत नाही... आपण त्यांची सावली आहोत....
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेख सर. तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.तसेच शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा(अजित माने)
छान च सर,
उत्तर द्याहटवाSuperb
उत्तर द्याहटवा