रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

वाचू आनंदे


ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त

(९ ऑगष्ट) केलेला हा लेखन प्रपंच.

            आजची पिढी वाचन करत नाही असा आमच्याकडून नाराजीचा सूर नेहमीच उमटतो; परंतु आजची पिढी खरंच वाचत नाही काजर वाचत नसेल, तर का वाचत नाही?  वाचत असेल तर काय वाचते? अशा प्रश्नांचा आपणाला गांभीर्याने शोध घ्यावा लागेल.  आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रचंड प्रभाव तरुण पिढीवर आहे.  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप याचा वापर या पिढी कडून खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. त्याचाच परिणाम वाचन क्रियेवर झाल्याचे जाणवते.

आजची पिढी वाचतच नाही असे म्हणणे काहीसे चुकीचे ठरेल.  ही पिढी वाचते आहे; परंतु त्यांच्यावर या इलेक्ट्रॉनिक साधन-माध्यमांचा प्रभाव जास्त आहे.  स्वाभाविकपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून छोट्या छोट्या तुकड्यातील वाचन या पिढीला आवडू लागले आहे, त्यामुळे एका जागी बैठक मारून एखाद्या आवडीच्या पुस्तकाचा फडशा पाडणारी वाचक मंडळी जरा कमी झालेली दिसते.  व्हॉट्सॲप वर येणारा एखादा छोटासा संदेश, छोटासा किस्सा वाचण्याकडे आजच्या पिढीचा कल जास्त आहे, त्यातूनच 'अलक' हा साहित्यप्रकार रुजू लागलेला दिसतो.  अलक म्हणजे अतिलघुकथा. काळाच्या मागणीनुसार एखादा नवीन साहित्य प्रकार निर्माण झाला व रुजला तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.

प्रश्न उरतो तो सखोल वाचनाचा.  आजच्या पिढीची ही वरवर वाचण्याची सवय सखोल वाचनापासून दूर घेऊन जाणारी आहे.  आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी, अनुभव समृद्धीसाठी सखोल वाचनाची आवश्यकता असते.  वरवरच्या वाचनाने ही पिढी आत्मकेंद्री होण्याची शक्यता दाट आहे.  काळाप्रमाणे आज ई - साहित्याचा वाचक वाढतोय असेही म्हणणे फारसे पटणारे नाही;  कारण ही संख्या खूपच कमी आहे.  त्यातही पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळी पर्यंत ई - साहित्य वाचले जाईल का? याची शंकाच आहे; कारण ई - साहित्य साधनांच्या मर्यादा त्याच्या आड येतात.    

एखादं नवं कोरं पुस्तक त्याच्या सुगंधा सह,  त्यात रममाण होऊन वाचनातला आनंद काही अवर्णनीयच आहे. आमच्या पिढीने हा आनंद अनेकदा मनमुराद अनुभवला आहे;  पण आजच्या पिढीशी संवाद साधता हा आनंद त्यांनी घेतला असेल असे वाटत नाही.  वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि मानवी मन सुविचार संपन्न करण्यासाठी वाचनाची आवड असणे आवश्यक आहे.  आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वाचन खूपच महत्त्वाचे आहे.  सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातून शक्य आहे. वाचनातून बुद्धीची मशागत होते. मानवी जीवन फुलवण्यात वाचनाचा वाटा फारच मोठा आहे. पुस्तके आपणाला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात.  पुस्तकातून आपणाला अनुभव, भावना, कल्पना यांचे भांडार मिळते.  संवेदनशील मन घडवण्याचे काम वाचनाने होते.  वाचनाने आपले ठाम मत तयार होते, ते आपण ठामपणे मांडू शकतो.

पुस्तकासारखा प्रामाणिक मित्र दुसरा असूच शकत नाही, तो तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवेल.  तुमची ज्ञानवृद्धी, लोकांशी आत्मविश्वासाने संवाद साधण्याची कला, विचार करण्याची क्षमता वाढते.  विचार प्रगल्भ व रचनात्मक बनतात.  वाचनाने मेंदूच्या पेशी गतीशील व सक्रीय होतात,  त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.  सशक्त व सक्षम पिढी घडवायची असेल तर वाचन हवेच. बुद्धी, भावना,  विचार यांचे पोषण वाचनानेच होते.  वाचनातून मिळणाऱ्या अनुभवाच्या भांडारातून आपल्या आयुष्याचा एक एक क्षण आपण अर्थपूर्ण जगू शकतो,  संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकतो. वाचनाच्या माध्यमातून आपण बुद्धीला अन्न पुरवू शकतो.  सर्वच महान माणसांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, त्यांचे अनुभव घेऊ शकत नाही; पण त्या माणसांची  चरित्रे,  पुस्तके वाचून त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतो आणि त्यांच्या सानिध्यात आपले जीवनही उजळवू शकतो.  वाचनातून मिळणारे विचारधन वेचताना अमृतानुभव आल्याशिवाय राहणार नाही, स्वानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.

वाचन करताना लेखकाने निर्माण केलेल्या सृष्टीचा एक भाग बनणे फार महत्त्वाचे आहे.  यासाठी जाणीवपूर्वक सखोल वाचन करावे लागेल, वरवर केलेल्या वाचनातून हा तादात्म्य भाव आपण गाठू शकणार नाही व तो आनंदही मिळवू शकणार नाही. वाचन ही एक आनंददायी प्रक्रिया आहे.  लेखकाने लेखन झाल्यावर ब्रह्मानंद सहोदर असा आनंद मिळवलेला असतो, तशाच प्रकारचा आनंद वाचकाने मिळवला तरच ही शृंखला पूर्ण होऊ शकते आणि एकदाका असा आनंद एखाद्या वाचकाने मिळवला तर त्याला 'वाच' असे सांगण्याची गरज उरत नाही, उलट तोच वाचक वाचनातून स्वतः आनंद घेत राहतो व इतरांना तो आनंद घेण्यासाठी प्रवृत्तही करतो.  त्या आनंदाची चव आजच्या पिढीला देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडूया, म्हणजे वाचन संस्कृती अधिक समृद्ध होईल असे मनोमन वाटते.

५ टिप्पण्या: