ऋतुचक्र म्हणजे
निसर्गाच्या बदलत्या चक्राची सुंदर साखळी, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा
हे आपले प्रमुख ऋतू. भारतीय हवामानात या तिन्ही ऋतूंना अत्यंत महत्त्व आहे.
शतकानुशतकांची शेती, जलसाठा, सेंद्रिय
जैवविविधता, मानवी आरोग्य, सण-उत्सव,
सगळंच या ऋतुचक्रावर आधारित आहे. मात्र आज आपल्याला जाणवतंय की या
ऋतूंचं स्वरूप बदलत चाललं आहे आणि तेही अत्यंत असंतुलित पद्धतीने. "ऋतू बदलणे" हे नैसर्गिक आहे, पण "ऋतू
बिघडणे" हे मानवनिर्मित संकट आहे हे जाणण्याची ही योग्य वेळ आहे.
पूर्वी ऋतूंचा क्रम, त्यांची
वेळ, त्यांचे स्वरूप ठरलेले असायचे. शेतकरी, सण, लोकजीवन या सगळ्या गोष्टी या क्रमाशी जुळलेल्या
होत्या. पण गेल्या २५-३० वर्षांत हे चित्र बदलले आहे. एप्रिल-मे महिन्यांत तापमान
४० अंशांवर असताना अचानक एखाद्या दिवशी जोरदार वादळी पाऊस पडतो. परिणामी फळबागा,
आंब्याचा मोहर, कडधान्य पीक यावर वाईट परिणाम
होतो. कोकणातील आंबा उत्पादनावर तर याचा खूपच विपरित परिणाम झालेला दिसतो.
डिसेंबर- जानेवारी
महिने हे थंडीचे असले तरी हल्ली अनेक ठिकाणी दिवसाचं तापमान ३० अंशांच्या जवळ
पोहोचतं. त्यामुळे थंडीशी संबंधित शेतपिकं जसे की गहू, मटार,
भोपळा यांचं उत्पादन घटतं. उत्तर महाराष्ट्रात गहू आणि कांद्याचं
उत्पादन कमी झाल्याचं चित्र आपल्या समोर आहे. जुलै-ऑगस्ट हे सरासरी जोरदार पावसाचे
महिने मानले जातात. पण हल्ली या काळात पाऊस लांबतो किंवा अत्यल्प पाऊस होतो.
परिणामी जलसाठे भरत नाहीत, धरणे रिकामी राहतात, आणि शेतीसाठी पुरेसं पाणी मिळत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात दरवर्षी
पावसाळ्याच्या दरम्यान दुष्काळ जाहीर होतो. कधी कधी पाऊस अतिरेकी पडत्तो आणि
प्रचंड नुकसान करून ते पाणी समुद्रास जाऊन मिळते.
ऊस, भात,
गहू, कांदा या सर्व पिकांचे उत्पादन ऋतूंच्या
अनियमिततेमुळे घटत आहे. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. धरणं, जलाशय यांना पुरेसं पाणी मिळत नाही. अनेक गावांमध्ये 'टँकर योजने'वर अवलंबून राहावं लागतं. डेंग्यू,
मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार वर्षभर
दिसू लागले आहेत. उन्हाळ्यात उष्माघात, हिवाळ्यात व्हायरल
ताप वाढले आहेत. समुद्राचं तापमान वाढत आहे. मासळीचा साठा कमी होत आहे.
मत्स्यव्यवसाय धोक्यात आहे. शेती, पर्यटन, मत्स्यव्यवसाय या क्षेत्रांमध्ये अनिश्चितता आली आहे. शेतीविकासात घट झाली
आहे.
ऋतुचक्र बिघडल्याने
बियाण्यांची उगम क्षमता, फळधारणा व उत्पादन यावर प्रतिकूल परिणाम होतो. वेळेवर व पुरेसा पाऊस न झाल्यास
नदी, विहिरी, तलाव कोरडे पडतात. यामुळे
पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ऋतू अनियमित झाल्याने सर्दी,
ताप, त्वचारोग, व्हायरल
इन्फेक्शन्स यामध्ये वाढ होते. अचानक आलेले पूर, ढगफुटी,
वणवे यामध्ये वाढ होत आहे. ऋतूंनुसार स्थलांतर करणारे पक्षी
विस्थापित होतात. त्यांच्या प्रजनन चक्रात व्यत्यय येतो.
या परिणामांचा विचार
करून आपण निसर्गाप्रती सजग झालो पाहिजे. झाडं ही ऋतू संतुलनाची खरी शिल्पकार आहेत.
मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व जंगल संवर्धन करणे गरजेचे आहे. ऋतुचक्राशी सुसंगत
पारंपरिक पीक पद्धती व देशी बियाण्यांचा वापर करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी
साठवणे, टंचाईच्या भागात जलसंधारण, चेकडॅम्स,
परसबागेत जल साठवण या गोष्टी उपयुक्त ठरतील. कोळसा, इंधन, प्लास्टिक यांचा वापर कमी करणे आणि हरित ऊर्जा
वापरणे आवश्यक आहे. शाळा- महाविद्यालयांतून पर्यावरण शिक्षण, 'ऋतू निरीक्षण' कार्यक्रम, स्थानिक
हवामान नोंद अशा उपक्रमांनी समाजात जागरूकता निर्माण करावी लागेल.
निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली स्वीकारली पाहिजे, किमान
संसाधन वापर, कचरामुक्त जीवनशैली, हरित
वाहतूक (इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहतूक) स्वीकारणे
आवश्यक आहे. आपणास शेतीत नैसर्गिक व जैविक पद्धतींचा वापर करावा लागेल. रासायनिक
खतांऐवजी सेंद्रिय खते, पाण्याची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा
वापर गरजेचा आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक गावात ‘जलदूत’, ‘जलव्यवस्थापन
समित्या’ स्थापन करून पावसाचं पाणी साठवणे, वृक्षारोपण करणे
या बाबींवर भर दिला पाहिजे. आज ऊर्जेच्या नूतनीकरणक्षम (Renewable) साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. आपण सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोगॅस
यांचा वापर जाणीवपूर्वक केला पाहिजे.
आज झपाट्याने
शहरीकरण होत आहे, परंतु शहरीकारण करताना सुयोग्य नियोजन करण्याची गरज आहे.
मोठमोठे प्रकल्प, रस्ते बनवताना प्रचंड मोठ्या
प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते, अशावेळी तेवढे वृक्ष परत तयार करायची हमी घेणे
आवश्यक आहे. हिरवळ राखणे, पर्यावरणपूरक इमारती बांधणे असे उपक्रम हाती घ्यावे लागतील. यासाठी शिक्षण व जनजागृतीची
गरज आहे. पर्यावरण शिक्षणाला शाळेतून महत्व दिले पाहिजे, केवळ
अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याकडून पर्यावरण हानी
होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ती एक चळवळ झाली पाहिजे.
निसर्ग आपली आई आहे.
ती जर रुसली, तर आपले संपूर्ण जीवनच अंधारात जाईल. ऋतुचक्रातील बिघाड ही
केवळ हवामान बदलाची बाब नसून, ती एक सामाजिक, आर्थिक आणि नैतिक बाब आहे. आपण प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत छोटा का
होईना, पण सकारात्मक बदल केला तर निसर्ग आपलं ऋतूचक्र पुन्हा
संतुलित करेल. आजचा ऋतुचक्रातील बिघाड हा निसर्गाचा इशारा आहे "आता तरी सावध
व्हा". मानवाने कृत्रिम सुखासाठी निसर्गावर केलेला अतिरेक आता उलट परिणाम
दाखवत आहे. हाच बदल थांबवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या रोजच्या कृतीत बदल
घडवायला हवा — मग तो पाण्याचा एक थेंब वाचवण्याचा असो, झाड
लावण्याचा असो, की प्लास्टिक टाळण्याचा. निसर्गावर प्रेम केलं
पाहिजे, कारण तो आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवणार आहे.
‘निसर्ग आपणाला परत देतो, जसे आपण
त्याला देतो’ हे लक्षात ठेवले पाहिजे.