रविवार, २८ डिसेंबर, २०२५

माणूसपण देगा देवा

 


     कधीकाळी गावातील एखाद्या वडाच्या झाडाखाली पारावर टेकून बसलेल्या लोकांच्या गप्पा, हसणं, बोलणं, एकमेकांची विचारपूस करणं हे चित्र सर्रास दिसायचं, घरांची दारे कुलूपबंद नसत, आणि मनांमध्ये भिंती नसत. गावात एखाद्याकडे पाहुणा आला तर तो संपूर्ण गावाचा पाहुणा असायचा. आज मात्र हे चित्र पार बदललेले दिसते. आज दारे मजबूत झाली… पण मनं मात्र तुटलेली दिसतात. आजचा माणूस आपल्या हातात मोबाइल धरून दिवसभर “कनेक्टेड” असतो, पण अंतर्मनाने तो कधी नव्हे इतका डिसकनेक्टेड झाला आहे. नाती हळू हळू दुरावलेली दिसतात.

खरंच…
माणूस एकमेकांशी वाईट का वागतो?

द्वेषाची आणि संशयाची सावली इतकी गडद कशी झाली?

आणि नाती एवढी दुर्मिळ का झालीत?

हे प्रश्न मनात घर करतात. मला तर अनेकांच्या मनातल्या जखमांचा भार, न दिसणाऱ्या वेदना हेच त्याचे कारण वाटते. प्रत्येक माणूस चालतो तेव्हा त्याच्यासोबत काही, न दिसणाऱ्या जखमा चालत असतात. काही अपमानाच्या, काही दुर्लक्षाच्या, काही प्रेमभंगाच्या. जे दुखावलेले असतात, तेच कधी कधी इतरांना दुखावतात. बर्‍याचदा वाईट वागणारा माणूस वाईट नसतो; तो जखमी असतो.

     खरं तर संवाद कमी झाल्यावर नाती ‘मूक’ होतात. आज घरात चार लोक असले तरी बोलणं फक्त दोन मोबाईलमध्ये होतं. आपण एकमेकांसोबत नाही… आपण स्क्रीनसोबत जगतो. माणसाला माणसानेच समजून घ्यायला हवे, पण आपण “टायपिंग…” मध्येच गुंतलो आहोत.
बोलणं थांबलं की नाती हळूहळू श्वास घेणं थांबवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

     आनंदाला विषारी करणारी एक गोष्ट म्हणजे तुलना. एकमेकांची तुलना करत करत आपण आयुष्याच्या आनंदावर काळी रेघ ओढली आहे. कोणाचं घर मोठं? कोणाची नोकरी भारी? कोणाचं मूल हुशार? ही तुलना मनातल्या समाधानाला खाऊन टाकते… आणि मत्सराला जन्म देते. मत्सर माणसाला कधी दुसर्‍याच्या डोळ्यातील आनंद दिसू देत नाही; मत्सर, सगळ्यात सुंदर नात्यांचाही गळा घोटतो.

     स्वार्थ ही नात्यांवर पडलेली धूळ असते. आज बहुतेक संबंधांचे गणित असे झाले आहे की, मला काय मिळणार?” जगणे इतके व्यवहारिक झाले आहे, की भावना आता बोनस समजल्या जातात. जोपर्यंत आपण उपयोगी असतो तोपर्यंतच आपल्याला आदर मिळतो. पण नाती उपयोगासाठी नसतात; नाती उपजतात, वाढतात, टिकतात. आपण मात्र त्यांना बोलावून आणण्याऐवजी आजकाल सोडून देणं पसंत करतो. स्वार्थामुळे हे माणूसपण हरवताना दिसते. 

     आज माणसातला माणूस हरवताना दिसतो. आज फक्त भूमिका उरल्या आहेत. प्रत्येक माणूस दिवसभर अनेक भूमिका निभावतो: आई, वडील, मुलगा, शिक्षक, अधिकारी… पण या भूमिका निभावताना आतला ‘माणूस’ कुठे हरवतो ते आपण लक्षातच घेत नाही. आपण नम्रता विसरलो, कृपाशब्द विसरलो, एकमेकांच्या डोळ्यातून दुःख वाचणं विसरलो. माझ्या एखाद्या विखारी शब्दामुळे कुणाचे तरी मन दुखावेल याचा विचार आपण करत नाही. जगण्याच्या स्पर्धेत माणुसकी मागे पडली.

     सरड्यापेक्षाही रंग बदलणारी माणसे जागोजागी आपणास दिसू लागली आहेत. म्हणूनच व. पु. काळे यांनी सांगितल्याप्रमाणे “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही, असे माणूस नावाचे यंत्र आहे” ही व्याख्या खरी वाटू लागते. माणूस आज दिवसेंदिवस अनाकलनीय, भावनाशून्य आणि यांत्रिक बनू लागला आहे. एखादी वाईट घटना समोर घडत असताना, मदत करायचे सोडून आपली बोटे मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात गर्क होतात. तेव्हा माणूसपण संपल्याचे जाणवते.

     खरंतर कोणाला त्रास होणार नाही अशा दोन शब्दांनी संवादाची सुरुवात झाली तर अनेक प्रश्न सुटतात. कधीकधी “कसा आहेस?” हे दोन शब्द एखाद्याला उभारी देऊ शकतात. क्षमा करायला शिकलं तर नाती अजून घट्ट होतील. मनातल्या रागाने आपणच स्वतः भाजत असतो, सोडून द्यायला शिकलो तरच नाती घट्ट होतील. आपणास एकमेकांशी तुलना थांबवावी लागेल. आपल्या वाटेवर आपणच चालतो. इतरांचा प्रवास वेगळा असतो. नात्यांना वेळ दिला तरच नाती टिकतात. कधी कधी एका हसण्याने, एका स्पर्शाने, एका मनापासूनच्या शब्दाने एका माणसाचं जगणं बदलतं. वेळ दिली की नाती बोलू लागतात. आपण वेळ काढला नाही की नाती शांत होतात. माणसामध्ये भावनांचा ओलावा असला पाहिजे, त्या ओलाव्याशिवाय जगणे म्हणजे कोरडं वाळवंट ठरेल.

     आजची बदलणारी परिस्थिती, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, यांत्रिक जीवनपद्धती यामुळे माणूस बदलतो आहे. माणुसकी म्हणजे करुणा, संवेदनशीलता, सहअस्तित्व आणि परस्पर सन्मान. दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही घटनांनी या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सामाजिक माध्यमांवरील द्वेष व अपमान, महिलांवरील अत्याचार व असंवेदनशील वागणूक, वृद्ध व आजारी व्यक्तींची उपेक्षा, गरीब व गरजूंचा अमानुष छळ,, मुलांवरील शोषण व बालमजुरी, धार्मिक-जातीय तेढीमुळे होणारी हिंसा, अपघातग्रस्तांना मदतीऐवजी व्हिडिओग्राफी या घटना आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. माणुसकी जपणं म्हणजे मोठ्या घोषणा नव्हेत; तर दैनंदिन आयुष्यातील लहान-लहान कृती—मदत, सहानुभूती, न्याय्य वागणूक.

     आपण प्रत्येकाने थोडं थांबून “मी माणूस म्हणून काय केलं?” असा प्रश्न स्वतःला विचारला, तरच समाज अधिक मानवी बनेल.हरवलेले माणूसपण सिद्ध करणार्‍या, माणुसकीला काळिमा फासणार्‍या अनेक घटना जेव्हा घडतात, तेव्हा परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते, माणूसपण देगा देवा.


बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन – पुरुषत्वाची नव्याने व्याख्या करण्याची गरज

 


      आज 19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. जगभरात या दिवशी पुरुषांच्या योगदानाबरोबरच त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याबद्दलही चर्चा केली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जगताना अनेकदा पुरुषांच्याच भावना, संघर्ष आणि वेदना यांची गळचेपी होताना दिसते.

      पुरुष प्रधान संस्कृती जरी पुरुषांनीच बनवली असली तरी पुरुषच त्या साचेबद्ध अपेक्षांमध्ये अडकलेले दिसतात. भारतीय किंवा मराठी संस्कृतीवर एक नजर टाकली तर “पुरुष हा घराचा कर्ता, शक्तीचा आधार, कमावता आणि निर्णायक” अशी प्रतिमा पारंपरिकपणे रंगवली गेली आहे. या चौकटीत समाज पुरुषावर काही अपेक्षा लादतो. पुरुष मजबूत असतो, त्याने जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजेत, तो कधीच खचू नये, त्याने भावना दाखवायच्या नाहीत, त्याने रडणे म्हणजे त्याचा कमकुवतपणा. अशी ही प्रतिमा काहींना गौरवाची वाटेल, पण हजारो पुरुष आज या चौकटीमध्ये अडकून मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत.

            पुरुष रडत नाहीत” किंबहुना त्यांनी रडू नये ही समाजाची अपेक्षा असते. खरंतर रडणे हे भावनांचे ओझे कमी करण्याचे नैसर्गिक माध्यम आहे. पण समाज पुरुषाच्या हातात रुमाल देण्याऐवजी तलवार देतो आणि म्हणतो – लढ! एखादा पुरुष ताण, हार, वेदना, नैराश्य दाखवू लागला, तर त्याला ताबडतोब सुनावले जाते. बायकी झाला का?”, “इतकं काय होतंय?” इत्यादी, परिणामी रडू न देण्याचा आग्रह पुरुषाला आतून पोकळ करतो. मानसिक ताण, नैराश्य आणि अनेक वेळा आत्महत्येपर्यंत पोहोचवतो.

      अनेकदा पुरुषांवर कर्तृत्वाची सक्ती असते. प्रत्येक पुरुषासाठी ‘यशस्वीरूप’ होणे आवश्यकच असते. पुरुषाला समाज काही अटींवर स्वीकारतो. त्याला यशस्वी असावंच लागतं, कुटुंबाची जबाबदारी त्याने उचललीच पाहिजे, त्याने कमावलेच पाहिजे, त्याने स्वतः कमकुवत होऊ नये. एखाद्या पुरुषाची नोकरी गेली, व्यवसायात अपयशी झाला किंवा आर्थिक अडचण आली, तर त्याच्यावर समाजाचा कटाक्ष वेगळा पडतो.

स्त्री अपयशी झाली तर तिला सांत्वन मिळते, पण पुरुष अपयशी झाला तर त्याला दोष आणि टोमणे मिळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. पुरुषही माणूस आहे.  पुरुष फक्त ‘पुरुष’ नाही, तो एक मुलगा, एक पती, एक पिता, एक मित्र, एक नागरिक आहे. तो देखील समर्थनाची गरज असलेला, कौतुक ऐकण्याची इच्छा असलेला, कधीकधी खचणारा एक साधा मनुष्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यालाही भावना आहेत, त्यालाही भीती वाटते, त्यालाही रडावेसे वाटते, याची जाणीव सर्वांना असली पाहिजे.

आज याबाबत समाजाला बदलण्याची आवश्यकता आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त यावर विचार होण्याची गरज आहे. पुरुषाला देखील भावनिक स्वातंत्र्य देणे, “रडणे ही कमजोरी नाही” हे शिकवणे, पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी खुली चर्चा करणे, मुलांना लहान वयातच भावनांची अभिव्यक्ती शिकवणे, घरात आणि समाजात संवेदनशीलता वाढवणे याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणजे पुरुषांची स्तुती नव्हे, तर त्यांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक वेदनांचेही वास्तविक दर्शन आहे. नवे पुरुषत्व म्हणजे ताकद + संवेदनशीलता + स्वातंत्र्य + मानवीपणा असे मानले पाहिजे. आज आपण एक निर्णय घेतला पाहिजे. पुरुषाने रडणे लाजिरवाणे नाही, अपयश पेलण्यात तो एकटा नाही, समाजाने खरे तर स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही प्रथम माणूस म्हणून पाहिले पाहिजे”.

आजच्या दिवसाची खरी भेट म्हणजे पुरुषाला समजून घेणे, त्याला मोकळे होऊ देणे आणि त्याच्या भावनांवर ताळेबंद न लावणे. चला, पुरुषांवर अनावश्यक अपेक्षांचे ओझे न लादता माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहूया.


रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

रघुवीर घाटाचा मोहक थाट..

 


        बरेच दिवस रघुवीर घाटाला भेट द्यायची इच्छा मनात घर करून बसली होती. कामाच्या व्यापात आणि दैनंदिन धावपळीत ती इच्छा मात्र नेहमीच पुढे ढकलली जात होती. नुकतेच माझे मित्र प्रा.सागर यांनीही तसाच विचार मांडला आणि मग दोघांमध्ये क्षणभरही उशीर न लावता ठरलं. ‘चला, रघुवीर घाटाला जाऊया!’ या छोट्याशा निर्णयाने मन आनंदाने उड्या मारू लागलं.

        रिमझिम पावसाच्या सरी अनुभवण्यासाठी आम्ही कार न वापरता बुलेटवर प्रवास करायचं ठरवलं. आकाशात मेघांचे रेशीम कापड पसरलेले, पावसाच्या रिमझिम सरी झेलत जाण्याची कल्पनाच मोहक होती. सकाळीच आमची बुलेट गर्जत रघुवीर घाटाच्या दिशेने निघाली. सप्टेंबरमधला तो रविवार, हलकेच सरी कोसळत होत्या. आकाश कधी ढगांनी भरून जायचं तर कधी एखादा निळसर झगमगता तुकडा डोकावायचा. पावसाचा अधून मधून होणारा शिडकावा अंगावर घेत, रेनकोट घालून आमची सफर सुरू झाली. सकाळचा गारवा, दमट मातीचा सुवास, हलका पाऊस आणि इंजिनाची गडगडाटी धून, सारं कसं आल्हाददायक.

        खेडहून तीस किलोमीटरचा प्रवास म्हणजे डोंगरांच्या मिठीत शिरत जाण्याचा अनुभवच. रस्ता जरी खड्डेमय होता, तरी प्रत्येक वळणावर नवी हिरवाई, नवे झरे, आणि दूरवरून दिसणाऱ्या पांढऱ्या धबधब्यांची लकेर मन हरवून टाकत होती. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या रघुवीर घाटाने जणू आम्हाला उबदार मिठी मारली. वाटेत येणारी नागमोडी वळणं, खाली पसरणाऱ्या दऱ्या, हिरवीगार घनदाट झाडं आणि त्यांची ओलसर सुगंधी पाने,  प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावासा वाटत होता. आम्ही घाटमाथ्याकडे जसजसे चढत होतो, तसतसे ढग आमच्याकडे जवळ येत होते, जणू आमचं स्वागत करायलाच ते उभे होते. खड्डेमय रस्ता थोडासा कटकटीचा ठरत होता; पण घाटमाथा जवळ येताच सगळा त्रास विरघळून गेला.

        घाटमाथ्यावर पोहोचल्यावर दाट धुक्याची चादर सगळीकडे पसरली होती. सगळीकडे एक अलौकिक पांढुरकी शांतता. एखाद्या रहस्यमय कादंबरीत वावरतोय की काय, असं वाटावं इतकं ते दृश्य मोहक होतं. अचानक डोंगराच्या पायथ्यापासून जोरदार वारा सुटला आणि त्या वाऱ्याने धुक्याचे पडदे जणू हळूवार बाजूला केले. डोंगराच्या पायथ्यापासून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी सारा नजारा बदलून टाकला. समोर प्रकटलेली दृश्यं मन थक्क करून गेली, हिरव्यागार दऱ्या, झुळझुळ वाहणारी नदी, डोंगरातून झेपावणारे छोटे धबधबे आणि दूरवरचे निळसर आभाळ, सगळं एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासवरचं जिवंत चित्र भासू लागलं.

        त्या वाऱ्याने अंगावर हलकेच पाण्याचे तुषार उडत होते, जणू निसर्गानेच आपलं स्वागत केलं. त्या थंडगार वाऱ्याने अंगावर रोमांच उभे राहिले. रेनकोट आपसूकच उतरले आणि आम्ही त्या गारव्याचा, त्या थंडाव्याचा मनसोक्त आनंद घ्यायला लागलो, पावसाच्या सरींच्या तुषारांनी शरीराबरोबरच मन चिंब झाले आणि नकळत मोबाईलच्या कॅमॅऱ्याने सेल्फी घेणे सुरु झाले. क्षणभरासाठी आपण आभाळाच्या उंच शिखरांवर आहोत आणि ढगांचे पांढरेशुभ्र पुंजके आपल्याला हळुवार स्पर्श करून जात आहेत असं वाटलं. नुकत्याच कोसळलेल्या पावसामुळे डोंगर नटून बसल्यासारखे भासत होते. एखाद्या चित्रकाराने हिरव्या, पांढऱ्या आणि करड्या रंगांचे कुंचले उधळून एखादं मोहक चित्र रंगवलं आहे, अशी ती दृश्यं भासत होती. बालकवींनी वर्णिलेलं “क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” हे श्रावणातील ऊन पावसाचं खेळकर चित्र धुक्याला लागू होत होतं. क्षणभर दाट धुकं, क्षणभर निखळ आकाश हा निसर्गाचा लपंडाव मोहून टाकणारा होता.

        अशा प्रसन्न वातावरणात आम्ही त्या घाटावरच्या एकमेव हॉटेलमध्ये शिरलो. गरमागरम कांदा भजीचा सुवास पसरला आणि मोह आवरला नाही. बाहेर पावसाच्या सरी, आत हातात उकळत्या चहाचा कप आणि समोर गरमा गरम भजी, जणू पर्वतराजानेच दिलेला हा प्रसाद वाटत होता. हॉटेलच्या छोट्याशा गच्चीत बसून दूरवरचा घाट, वाऱ्याने डुलणारी झाडं, ढगांच्या सावल्या पाहताना वेळ कसा गेला कळलंच नाही. निसर्गाची ही संगत मनाला अगदी समाधान देऊन गेली.

        रघुवीर घाट खरंतर पर्यटनासाठी एक अद्भुत स्थळ आहे, पण तिथे फारशी गर्दी नसल्याने एक वेगळाच शांत, निर्मनुष्य अनुभव मिळाला. हे ठिकाण खरं तर अजूनही लोकांच्या नजरेआड आहे. गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त निसर्गाचा अवखळ खेळ. मात्र कोणत्याही सुविधा किंवा सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हे ठिकाण अजूनही दुर्लक्षित राहिलं आहे. कोकणातील अशा कितीतरी स्वर्गवत, सुंदर जागा जर सुनियोजित रितीने विकसित केल्या तर त्या स्थानिकांसाठी रोजगाराचं साधन बनू शकतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावू शकतात, हा विचार मनात चमकून गेला.

        परतण्याची वेळ झाली तेव्हा मन अजिबात तयार नव्हतं, मन जड झालं होतं. तरीही वास्तवाची जाणीव ठेवत आम्हाला तिथून निघावं लागलं. मात्र घाटातील ती हिरवाई, धुक्याची नाजूक चादर, ढगांच्या सान्निध्याची अनुभूती, पावसाळी गारवा,  हे सगळं मनात घट्ट कोरून आम्ही घाट उतरलो. बुलेट घाटमाथ्यापासून खाली सरकत होती, पण मन मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होतं, त्या क्षणांत जाऊन रमत होतं.

        खरंच, रघुवीर घाट ही केवळ एक सफर नव्हती, तर आत्म्याला भिडणारा अनुभव होता, जो कायम मनात राहील. भटकंतीच्या छंदात आणखी एक हक्काचं, लोभसवाणं ठिकाण मिळाल्याचा समाधानकारक आनंद या प्रवासानं दिला. पुढच्या वेळेस नक्कीच पुन्हा येथे यायचं, हा निर्धार मनात पक्का करूनच आम्ही घरी परतलो.

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

आमचे सण आणि आमची जबाबदारी

 



भारत हा सण-उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. बरेचसे सण हे केवळ धार्मिक विधींशी संबंधित नसून, ते आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जाणीवांचेही प्रतीक आहेत. प्रत्येक सणामागे एक कथा, एक सांस्कृतिक संदर्भ आणि निसर्गाशी असलेले नाते दडलेले आहे. या सणांमध्ये एक विशेष सौंदर्य आहे, ते निसर्गाशी एकरूप आहेत, पर्यावरणपूरक आहेत आणि समाजाला एकत्र आणणारे आहेत. हे सण केवळ धार्मिक नसून सामाजिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक संदेश देतात. मात्र, अलीकडच्या काळात सणांचे मूळ स्वरूप बरेच बदलले असून त्यामागे आधुनिकतेची छाया दिसू लागली आहे, ज्यामुळे सणांचा खरा हेतू काहीसा हरवताना दिसतो.  

आपले अनेक सण हे निसर्गावर आधारलेले आहेत. उदा. वटसावित्री व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा करून त्याचे संवर्धन केले जाते.(वडाच्या पाने, फळे आणि मुळांपासून मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात येतो) दिवाळीत घरगुती माती वापरून दिवे लावले जातात, ज्यामुळे अंधार दूर होतो आणि तेलातील सुगंध वातावरणात पसरतो. श्रावणातील नागपंचमीमध्ये सर्पांचे संरक्षण हा संदेश दिला जातो. पोळ्याचा सण जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्व सणांतून निसर्गाशी जोडलेले नाते दृढ केले जाते आणि अनेक वृक्षांचे, प्राण्यांचे संवर्धन होते.

मकरसंक्रांतीला तीळगुळ हे हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ आहेत. दिवाळीत तेलाचे दिवे लावल्याने हवेतील जीवाणू कमी होतात आणि स्वच्छता होते. आपल्या पूर्वजांनी सणांमध्ये असे नियम आखले की जे पर्यावरणपूरक होते. हे सर्व निसर्ग जपणारे आणि आरोग्य सुधारक होते. येथे सणांचे आरोग्याशी असणारे नाते लक्षात घेतले पाहिजे. अनेक सणांमध्ये ऋतूनुसार आहार ठरलेला असतो. संक्रांतीला तीळगूळ, हिवाळ्यात उष्णता देतो. होळीपूर्वी उपवास केल्याने पचनशक्ती सुधारते. दिवाळीत चिवडा-लाडू हिवाळ्यात आवश्यक कॅलरीज देतात. सणांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. मिठाईवाले, फुलवाले, कारागीर, ढोल ताशा पथक, साउंड सिस्टिम भाड्याने देणारे सर्वांचे उत्पन्न वाढते. अनेक सण महिलांना सामाजिक व धार्मिक नेतृत्वाची संधी देतात (उदा. हरतालिका, करवा चौथ, वटसावित्री).

आजच्या काळात मात्र सणांचा व्याप बदलू लागला आहे, स्वरूप बदलू लागले आहे. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे प्रचंड उंच केल्याने अपघात व मृत्यू होतात. यावर्षी  झालेल्या दहीहंडी उत्सवात मुंबई आणि ठाण्यात २ गोविंदा  मृत्यूमुखी पडले  आणि ३१८ जण जखमी झाले. गणेशोत्सवात किंवा इतर सणांमध्ये डीजेच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकार, कानांचे विकार, मानसिक ताण यांसारख्या समस्या वाढतात. लेझर लाईट्सच्या अतिरेकामुळे डोळ्यांचे विकार उद्भवतात. प्लास्टिकची सजावट, रासायनिक रंगांची मूर्ती यामुळे पाणी व माती प्रदूषित होते.

आधुनिकतेमुळे या सणांच्या स्वरूपात बदल होऊन काही समस्या निर्माण झालेल्या दिसतात.  या समस्यांवर उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सणांचे मूळ उद्दिष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भक्ती, आनंद, निसर्गाशी नाते यांचा समन्वय राखला पाहिजे. सणांमध्ये सुरक्षेला महत्व दिले पाहिजे. आवाजावर नियंत्रण ठेवणे, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करणे. पर्यावरणपूरक साहित्य वापरणे, मातीच्या मूर्ती, कागदाची सजावट, नैसर्गिक रंग वापरणे गरजेचे आहे, यासाठी शाळा, महाविद्यालये, सोसायट्यांमध्ये कार्यशाळा घेवून जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

सणांचे खरे महत्त्व जपणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे स्वरूप फक्त मनोरंजनासाठी बदलू नये, तर त्यातून संस्कार, जाणीव आणि एकात्मता निर्माण व्हावी. आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी सणांचे पावित्र्य जपून ठेवायचे असेल, तर आपणच जबाबदारी घेऊन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आरोग्यदायी पद्धतीने सण साजरे करणे गरजेचे आहे. मातीच्या मूर्त्या, नैसर्गिक रंग, कागदी सजावट आणि पारंपरिक गाणी ह्याकेवळ निसर्गाला हानी करणार नाहीत, तर सांस्कृतिक परंपरा टिकवतील. सणानंतर प्रचंड कचरा जमा होतो उदा. फुले, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक डेकोरेशन. त्यांची सफाई करणे ही आपली जबाबदारी आहे. आपत्ती व्यवस्थापन करणे ही आपली जबाबदारी आहे.

सणांमद्धे वापरल्या जाणाऱ्या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाचा स्तर 85 dB पेक्षा जास्त नसावा; 100 dB इतका आवाज कानाला गंभीर हानी पोहचवू शकतो. Earplugs वितरित करणे आणि त्यांच्या वापरास प्रोत्साहन देणे आवश्यक ठरेल. या सणांमद्धे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.  सततच मोठा आवाज शरीराला ताण देतो, त्यातून  उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्राहीनता, मानसिक तणाव यांचा धोका निर्माण होतो. आजची मुले मोबाईलमध्ये जास्त रमलेली आहेत. त्यांना सणांचे खरे महत्त्व समजवणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना सणांचे शास्त्र, कथा सांगाव्यात, त्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे.

सण म्हणजे केवळ उत्सव नाहीत तर ते आपल्या संस्कृतीचे आरसे आहेत. या आरशाला डाग लागू नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे पण आपण सर्वांनीच सणांचे मूळ उद्दिष्ट, पावित्र्य आणि पर्यावरणपूरकता जपली पाहिजे.


बुधवार, १८ जून, २०२५

ऋतुचक्र बिघाड: धोक्याची घंटा

 


ऋतुचक्र म्हणजे निसर्गाच्या बदलत्या चक्राची सुंदर साखळी, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे आपले प्रमुख ऋतू. भारतीय हवामानात या तिन्ही ऋतूंना अत्यंत महत्त्व आहे. शतकानुशतकांची शेती, जलसाठा, सेंद्रिय जैवविविधता, मानवी आरोग्य, सण-उत्सव, सगळंच या ऋतुचक्रावर आधारित आहे. मात्र आज आपल्याला जाणवतंय की या ऋतूंचं स्वरूप बदलत चाललं आहे आणि तेही अत्यंत असंतुलित पद्धतीने. "ऋतू बदलणे" हे नैसर्गिक आहे, पण "ऋतू बिघडणे" हे मानवनिर्मित संकट आहे हे जाणण्याची ही योग्य वेळ आहे.

पूर्वी ऋतूंचा क्रम, त्यांची वेळ, त्यांचे स्वरूप ठरलेले असायचे. शेतकरी, सण, लोकजीवन या सगळ्या गोष्टी या क्रमाशी जुळलेल्या होत्या. पण गेल्या २५-३० वर्षांत हे चित्र बदलले आहे. एप्रिल-मे महिन्यांत तापमान ४० अंशांवर असताना अचानक एखाद्या दिवशी जोरदार वादळी पाऊस पडतो. परिणामी फळबागा, आंब्याचा मोहर, कडधान्य पीक यावर वाईट परिणाम होतो. कोकणातील आंबा उत्पादनावर तर याचा खूपच विपरित परिणाम झालेला दिसतो.

डिसेंबर- जानेवारी महिने हे थंडीचे असले तरी हल्ली अनेक ठिकाणी दिवसाचं तापमान ३० अंशांच्या जवळ पोहोचतं. त्यामुळे थंडीशी संबंधित शेतपिकं जसे की गहू, मटार, भोपळा यांचं उत्पादन घटतं. उत्तर महाराष्ट्रात गहू आणि कांद्याचं उत्पादन कमी झाल्याचं चित्र आपल्या समोर आहे. जुलै-ऑगस्ट हे सरासरी जोरदार पावसाचे महिने मानले जातात. पण हल्ली या काळात पाऊस लांबतो किंवा अत्यल्प पाऊस होतो. परिणामी जलसाठे भरत नाहीत, धरणे रिकामी राहतात, आणि शेतीसाठी पुरेसं पाणी मिळत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान दुष्काळ जाहीर होतो. कधी कधी पाऊस अतिरेकी पडत्तो आणि प्रचंड नुकसान करून ते पाणी समुद्रास जाऊन मिळते.

ऊस, भात, गहू, कांदा या सर्व पिकांचे उत्पादन ऋतूंच्या अनियमिततेमुळे घटत आहे. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. धरणं, जलाशय यांना पुरेसं पाणी मिळत नाही. अनेक गावांमध्ये 'टँकर योजने'वर अवलंबून राहावं लागतं. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार वर्षभर दिसू लागले आहेत. उन्हाळ्यात उष्माघात, हिवाळ्यात व्हायरल ताप वाढले आहेत. समुद्राचं तापमान वाढत आहे. मासळीचा साठा कमी होत आहे. मत्स्यव्यवसाय धोक्यात आहे. शेती, पर्यटन, मत्स्यव्यवसाय या क्षेत्रांमध्ये अनिश्चितता आली आहे. शेतीविकासात घट झाली आहे.

ऋतुचक्र बिघडल्याने बियाण्यांची उगम क्षमता, फळधारणा व उत्पादन यावर प्रतिकूल परिणाम होतो.  वेळेवर व पुरेसा पाऊस न झाल्यास नदी, विहिरी, तलाव कोरडे पडतात. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ऋतू अनियमित झाल्याने सर्दी, ताप, त्वचारोग, व्हायरल इन्फेक्शन्स यामध्ये वाढ होते. अचानक आलेले पूर, ढगफुटी, वणवे यामध्ये वाढ होत आहे. ऋतूंनुसार स्थलांतर करणारे पक्षी विस्थापित होतात. त्यांच्या प्रजनन चक्रात व्यत्यय येतो.

या परिणामांचा विचार करून आपण निसर्गाप्रती सजग झालो पाहिजे. झाडं ही ऋतू संतुलनाची खरी शिल्पकार आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व जंगल संवर्धन करणे गरजेचे आहे. ऋतुचक्राशी सुसंगत पारंपरिक पीक पद्धती व देशी बियाण्यांचा वापर करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी साठवणे, टंचाईच्या भागात जलसंधारण, चेकडॅम्स, परसबागेत जल साठवण या गोष्टी उपयुक्त ठरतील. कोळसा, इंधन, प्लास्टिक यांचा वापर कमी करणे आणि हरित ऊर्जा वापरणे आवश्यक आहे. शाळा- महाविद्यालयांतून पर्यावरण शिक्षण, 'ऋतू निरीक्षण' कार्यक्रम, स्थानिक हवामान नोंद अशा उपक्रमांनी समाजात जागरूकता निर्माण करावी लागेल.   

निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली स्वीकारली पाहिजे, किमान संसाधन वापर, कचरामुक्त जीवनशैली, हरित वाहतूक (इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहतूक) स्वीकारणे आवश्यक आहे. आपणास शेतीत नैसर्गिक व जैविक पद्धतींचा वापर करावा लागेल. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते, पाण्याची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे.  प्रत्येक गावात ‘जलदूत’, ‘जलव्यवस्थापन समित्या’ स्थापन करून पावसाचं पाणी साठवणे, वृक्षारोपण करणे या बाबींवर भर दिला पाहिजे. आज ऊर्जेच्या नूतनीकरणक्षम (Renewable) साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. आपण सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोगॅस यांचा वापर जाणीवपूर्वक केला पाहिजे.

आज झपाट्याने शहरीकरण होत आहे, परंतु शहरीकारण करताना सुयोग्य नियोजन करण्याची गरज आहे. मोठमोठे प्रकल्प, रस्ते बनवताना प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते, अशावेळी तेवढे वृक्ष परत तयार करायची हमी घेणे आवश्यक आहे. हिरवळ राखणे, पर्यावरणपूरक इमारती बांधणे असे उपक्रम हाती घ्यावे लागतील. यासाठी शिक्षण व जनजागृतीची गरज आहे. पर्यावरण शिक्षणाला शाळेतून महत्व दिले पाहिजे, केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याकडून पर्यावरण हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ती एक चळवळ झाली पाहिजे.

निसर्ग आपली आई आहे. ती जर रुसली, तर आपले संपूर्ण जीवनच अंधारात जाईल. ऋतुचक्रातील बिघाड ही केवळ हवामान बदलाची बाब नसून, ती एक सामाजिक, आर्थिक आणि नैतिक बाब आहे. आपण प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत छोटा का होईना, पण सकारात्मक बदल केला तर निसर्ग आपलं ऋतूचक्र पुन्हा संतुलित करेल. आजचा ऋतुचक्रातील बिघाड हा निसर्गाचा इशारा आहे "आता तरी सावध व्हा". मानवाने कृत्रिम सुखासाठी निसर्गावर केलेला अतिरेक आता उलट परिणाम दाखवत आहे. हाच बदल थांबवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या रोजच्या कृतीत बदल घडवायला हवा — मग तो पाण्याचा एक थेंब वाचवण्याचा असो, झाड लावण्याचा असो, की प्लास्टिक टाळण्याचा. निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, कारण तो आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवणार आहे.

‘निसर्ग आपणाला परत देतो, जसे आपण त्याला देतो’ हे लक्षात ठेवले पाहिजे.