मी गेल्याच महिन्यात 'टिकायचं तर शिकायचं' हा AI संदर्भात एक ब्लॉग लिहिला. त्याला अनेक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काही वाचकांनी त्याबद्दल अजून काही लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, आणि त्यातूनच आजचा ब्लॉग लिहावा असे वाटले.
खरंतर एखादं नवीन तंत्रज्ञान जेव्हा दाखल होतं तेव्हा आपण सर्वजण गोंधळलेले असतो, कारण त्याचे फायदे तोटे आपल्यासमोर असतात पण त्याचा पुरेसा अभ्यास झालेला नसतो. फायद्याचा विचार करून त्याचा वापर सुरू केला तर काही तोटे स्वीकारावेच लागतात व तोट्यांचा विचार करून त्याचा वापरच केला नाही तर त्या फायद्यांपासून प्रगतीपासून आपणास दूर राहावे लागते व त्यात आपले नुकसानही होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे खूप मोठी क्रांती होत आहे. त्याचे अनेक तोटे आपणास भोगावे लागतील हे सत्य आहे, अगदी AI चे जनक जेफ्री हिंटन यांनीही हे तंत्रज्ञान विनाशक ठरू शकते ही भीती व्यक्त केली आहे. अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेन हायमर याला झालेले दुःख हे मला याच जात कुळीचे वाटते. कारण AI मुळे अनेक नोकऱ्या धोक्यात येणार आहेत, यामुळे एक खूप मोठी सामाजिक समस्या निर्माण होऊ शकते. दिवसेंदिवस रोबोटची संख्या वाढत जाणार आहे. मानवी कामे आता यंत्र, म्हणजेच रोबो करणार आहेत. त्या रोबोला मानवी भावभावना सुद्धा प्रदान करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील जग कसे असणार आहे? याचे चित्र लक्षात घेतले पाहिजे. एवढेच नव्हे तर साऊथ कोरिया मध्ये एका रोबोटने आत्महत्या केली अशी नुकतीच एक बातमी वाचनात आली, हे चित्र भयावह आहे.
चॅट जीपीटी आणि लार्ज लँग्वेज मॉडेल यांचा सध्य वापर बघितल्यास अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात. स्वार्म तंत्रज्ञान, डीप फेक तंत्रज्ञान आणि AI तंत्रज्ञान अशी तंत्रज्ञाने एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडणे हे विनाशास कारण ठरू शकते, याचा विचार होण्याची आज नक्कीच गरज आहे.
AI कडे माहिती उपलब्ध आहे, पण ती मिळवण्यासाठी AI ला काय विचारायचे? याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. यालाच प्रॉम्प्ट लेखन म्हणतात. आता प्रॉम्प्ट इंजीनियरिंग नावाची एक नवीन शाखा सुरू होत आहे हे इथे लक्षात घेतले पाहिजे. असे लेखन करता येणाऱ्याला, किंवा AI चा वापर करता येणाऱ्याला एआय साक्षर म्हटले जाईल. तेव्हा नुकतेच कुठे संगणक साक्षर होणाऱ्या पिढीवर आता AI साक्षर होण्याची वेळ आली आहे हे नक्की.
जेव्हा AI च्या वापराची दुसरी बाजू आपण लक्षात घेतो तेव्हा योग्य ते भान ठेवून आपल्या विकासासाठी आपण जर त्याचा फायदा करून घेतला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो, याबाबत मला विश्वास वाटतो. आपली दैनंदिन कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपण AI चा चांगला वापर करू शकतो. आपल्या नोकरी / व्यवसायात त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. दैनंदिन पत्र व्यवहारात, विविध प्रकारच्या लेखनात, नेमकी माहिती मिळवण्यात आपण त्याचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतो. आपला कितीतरी वेळ वाचवू शकतो. आपल्या गरजेनुसार आपण AI तंत्रज्ञान वापरून एखादा चॅटबोट बनवू शकतो. मी माझ्या ग्रंथालयासाठी नुकताच एक चॅट बोट बनवला, की जो वाचकांना खूप मोठी मदत करू शकतो. एखादे पुस्तक ग्रंथालयात आहे का? ते नेमके कोणत्या ठिकाणी आहे? अशा प्रश्नांची उत्तरे किंवा ग्रंथालयाबाबत सर्व प्रकारची माहिती तो काही क्षणात उपलब्ध करून देतो. ब्लॉग वाचकांसाठी मी खाली तो चॅटबोट देत आहे, चॅट बोट वापरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आपण त्याला पुढील प्रमाणे वेगवेगळे प्रश्न विचारून बघू शकता, म्हणजे याची क्षमता आणि उपयोग आपल्या लक्षात येऊ शकतो.
1) Please introduce the library of ICS College
2) Please tell me the library hours
3) What is the mission of the library?
4) What is the vision of the library?
5) What are the objectives of the library?
6) What is the area of the library building?
7) Which library automation software is used in the library?
8) State the rules of library.
9) What services and facilities are provided by the library?
10) What are the best practices of the library?
11) What are the activities of the library?
12) How can I use OPAC?
13) Tell me about ICS e-book library.
14) How can I use N-LIST?
15) Tell me the address of the library website.
16) What is Smart Page?
17) Give me details of librarians.
18) Give me information about library staff.
19) What technologies are currently being used in libraries?
एकंदरीतच AI च्या आगमनामुळे काही तोटे सहन करावे लागले तरी आपण आपल्या प्रगतीसाठी त्याचा प्रभावी वापर करू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण सर्वांनीच त्याचा वापर करूया परंतु नीती मूल्य, संस्कृती जपत त्याचा सुयोग्य वापर करूया. संगणकाचे आगमन ज्यावेळी होणार होते त्यावेळी नोकऱ्या जाणार, अशा प्रकारची भीती त्या काळातही व्यक्त करण्यात आली होती; परंतु संगणकाच्या आगमनानंतर काही प्रमाणात नोकऱ्या वाढल्या देखील. त्यासाठी संगणकाचे प्रशिक्षण घ्यावे लागले, तशाच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाणार असे बोलले जात असले तरी देखील त्या संदर्भातील शिक्षण घेऊन आपण सजग बनलो तर निश्चितपणाने या समस्येवर आपण मात करू शकतो. AI चा उत्तम वापर केल्यास ते संकट म्हणून न स्वीकारता त्याला सामोरे जाऊन आपण आपला विकास व पर्यायाने देशाचा विकास निश्चितपणाने करू शकतो याचा विश्वास वाटतो.