आज जगभरात तंत्रज्ञानाचा प्रचंड विकास होताना दिसत आहे. मानवी जीवन सुकर होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचे शोध लागत आहेत आणि वापरही होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आज नवीन वाटणारे तंत्रज्ञान उद्या जुने होताना पाहायला मिळते. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI ) खूप मोठा प्रभाव अनेक क्षेत्रांवर होताना दिसत आहे. या तंत्रज्ञानामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती होत आहे, त्यामुळे अनेक नोकऱ्यांवर गदा येऊ लागली आहे. ( AI बद्दल यापूर्वी मी माझ्या ३१ जुलै २०२३ च्या ब्लॉग मधून सविस्तर मांडणी केली आहेच) माणसाचे काम जर मशीन कडून अधिक अचूक व अत्यंत वेगवान होणार असेल तर माणसाची गरजच काय? हा प्रश्न आहे.
म्हणूनच आज प्रत्येकासमोरचा मुख्य प्रश्न आहे तो टिकण्याचा. आय.टी. किंवा संगणक शास्त्र यासारख्या क्षेत्रांनाच याची झळ बसेल असे आपणास वाटत असेल तर ते चूक ठरेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये नोकरीच्या समस्या निर्माण होत आहेत आणि भविष्यात होणार आहेत. आज आपल्या क्षेत्रात टिकायचं असेल तर काही वर्षांपूर्वी घेतलेले शिक्षण पुरेसे ठरत नाही, तर त्यात झालेले आधुनिक बदल आपणालाही शिकावे लागतील, त्यातील कौशल्ये विकसित करावी लागतील. ज्या तंत्रज्ञानाने आपले महत्त्व कमी केले आहे ते तंत्रज्ञान आपणाला शिकून घ्यावे लागेल, तरच आपण कोणत्याही क्षेत्रात टिकणार आहोत.आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग सारख्या विषयांमध्ये आपण एकदम तरबेज झालो तरी त्याचा अर्थ असा नव्हे, की आपणाला आता वेगळे काही करायला नको. खरंतर याही तंत्रज्ञानाचा एक विशिष्ट काळ असणार आहे. लवकरच यापेक्षा नवीन काहीतरी तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे सतत आपणास नवीन शिक्षणामध्ये गुंतून राहावे लागणार आहे. नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. आपले बहुआयामी व्यक्तिमत्व घडवावे लागणार आहे. म्हणूनच आपण आज न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारत आहोत. बदलांना सामोरे जाताना जर आपणास टिकायचं असेल तर शिकायलाच हवं. त्याला दुसरा कोणताही पर्याय असणार नाही.
कोणत्याही शाखांच्या अभ्यासात कोडिंग, डेटा सायन्स आणि AI सारखे विषय अविभाज्य भाग बनले आहेत, जे आजच्या नोकरीच्या बाजारपेठेत आवश्यक ठरतात. आज सतत शिकणे आणि कौशल्य विकास आवश्यक झाले आहे, कारण आज आपण जे ज्ञान मिळवतो ते उद्या कालबाह्य होऊ शकते. AI चा व्यापक प्रभाव लक्षात घेता, प्रत्येकाने त्याची तत्त्वे आणि त्याच्या वापराची मूलभूत समज विकसित करणे अत्यावश्यक आहे. हे ज्ञान व्यक्तींना AI साधनांचा प्रभावीपणे लाभ घेण्यास, त्यांच्या संबंधित क्षेत्रात नाविन्य आणण्यासाठी आणि स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारपेठेत पुढे राहण्यासाठी सक्षम करू शकते. आरोग्यसेवा, वित्त आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांसह AI ला जोडणारे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन नावीन्यपूर्ण आणि करिअरच्या संधींसाठी नवीन मार्ग तयार करत आहेत.
तंत्रज्ञान आणि ज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत आहे, नवीनतम घडामोडींशी जुळवून घेण्यात अयशस्वी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जे आपली कौशल्ये अद्ययावत करत नाहीत त्यांना नोकरी विस्थापन आणि रोजगारक्षमता कमी होण्याचा धोका निर्माण होणार आहे. एकेकाळी सुरक्षित वाटणाऱ्या नोकऱ्या आता AI मुळे असुरक्षित वाटू लागल्या आहेत. सतत शिकणे आणि जुळवून घेतल्याशिवाय भविष्यात आपण टिकू शकणार नाही हे सत्य आहे.
AI समजून घेणे आणि शिकणे हा केवळ एक पर्याय नाही तर वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी आवश्यक आहे. सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या वृत्तीमुळे आपण अनेक समस्यांना तोंड देऊ शकतो. आपण आज केवळ कौशल्य मिळवून चालणार नाही, तर ती सतत अद्यावतही केली पाहिजेत. तरच आपण जगाच्या बाजारात टिकून राहणार आहोत. आपण जर आपापल्या क्षेत्रात माहितीपूर्ण आणि कुशल असलो तर आपणास नोकरीचे समाधानही मिळेल आणि आपण आपली प्रगती ही करू शकू. आपण सक्रियपणे शिकत राहिलो आपली कौशल्ये विकसित करत राहिलो तर नवनवीन तंत्रज्ञानाला आपण आत्मविश्वासाने स्वीकारू शकतो आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहू शकतो.
अद्ययावत राहून आणि सतत शिकत राहून, आपण AI चे वर्चस्व असलेल्या जगाच्या आव्हानांना तोंड देऊ शकतो, त्याच्या क्षमतेचा उपयोग करू शकतो आणि एक समृद्ध भविष्य सुरक्षित करू शकतो. त्यामुळे भविष्यात आपणाला टिकायचं असेल तर आज शिकावच लागेल.