रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

निश्चय फटाके मुक्त दिवाळीचा

                                                   


  

        ज्या सणाची आपण सर्वजण लहान थोर मंडळी अगदी आतुरतेने वाट बघत असतो असा एक प्रकाशाचा, आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.  विविधरंगी रांगोळ्या, पणत्या, आकाश कंदिल, विद्युत रोषणाई, फराळ, फटाक्यांची आतिषबाजी ही सर्व दिवाळी या सणांची वैशिष्टे आहेत.  आपल्या सर्व सणांवर, ते साजरे करण्याच्या पद्धतीवर नजर टाकली तर हे सर्व सण पर्यावरण पूरक असेच आहेत आणि जर तसे ते नसतील तर ते पर्यावरण पूरक साजरे करण्याची आपली जबाबदारी ठरेल. दिवाळी सणामध्ये असणारे फटाक्यांचे अविभाज्यपण असेच मनाला पटत नाही.   फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. आपण दिवे लावणे, पूजा करणे, मिठाई वाटणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे यासारख्या पारंपारिक विधींवर लक्ष केंद्रित करू शकतो. फटाक्यांचा वापर करून खरं तर आपण या सणाची शान कमी करतो. पर्यावरणाला हानी पोहोचवतो. दिवाळी सारख्या शांत उत्सवाला पणत्यांची रोषणाईच खरी शोभून दिसते, त्यामुळे या सणाचे मांगल्य, पावित्र्य अधिकच उठून दिसते.

फटाके हे मोठ्या प्रमाणात वायु आणि ध्वनी प्रदूषण करत असतात. फटाके जाळल्याने सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि कणिक पदार्थ यांसारखे प्रदूषक बाहेर पडतात, ज्यामुळे वायू प्रदूषणात भर पडते. फटाक्यांचा मोठा आवाज मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि बहिरेपण येऊ शकते. फटाक्यांदरम्यान उत्सर्जित होणारे प्रदूषक श्वसनाच्या समस्या वाढवू शकतात, विशेषत: दमा किंवा श्वसनाच्या इतर समस्या असलेल्या व्यक्तींवर याचा खूप मोठा प्रभाव पडू शकतो. जळलेल्या फटाक्यांचे अवशेष आणि कचरा पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास हातभार लावतात, कारण त्यात बर्‍याचदा अविघटनशील पदार्थ असतात. फटाक्यांच्या वापरामुळे विविध अपघात आणि आगीचे धोके निर्माण होऊ शकतात आणि होत आहेत. आजपर्यंत अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत याकडे आपण पद्धतशीर दुर्लक्ष करतो. आपण एकमेकांना ‘शुभ दीपावली’ अशा शुभेच्छा देतो, पण एखाद्याच्या हातून फटाके लावताना अचानक स्फोट होऊन गंभीर इजा झाली तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला ही दीपावली शुभ ठरेल का? किंवा निसर्गाला ही दीपावली शुभ ठरेल का? याचा विचार होण्याची गरज आहे.

तेजस्वी दिवे आणि मोठा आवाज वन्यजीवांना त्रास देऊ शकतात आणि विचलित करू शकतात, ज्यामुळे त्यांचे नैसर्गिक वर्तन बिघडू शकते आणि त्यांच्या अधिवासावरही परिणाम होऊ शकतो. बर्‍याच फटाक्यांमध्ये हानिकारक रसायने आणि जड धातू असतात, जे जाळल्यावर हवेत आणि मातीमध्ये विषारी पदार्थ सोडतात, ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो. फटाक्यांच्या उत्पादनामध्ये नूतनीकरण न करता येण्याजोग्या संसाधनांचा वापर समाविष्ट असतो, ज्यामुळे संसाधनांचा ऱ्हास आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. फटाके तयार करताना आणि जाळताना हरितगृह वायूंचे उत्सर्जन हवामान बदलाला कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे एकूण पर्यावरण संतुलनावर परिणाम होतो याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.  

आपणास सुरक्षित, उत्साही, आनंदी, आरोग्यदायी दिवाळी साजरी करायची असेल तर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे अत्यंत आवश्यक आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे कदाचित क्षणभर आपणास आनंद वाटत असेलही परंतु त्या आनंदात खोलवर कुठेतरी दु:ख लपलेले असेल तर असा आनंद काय कामाचा ? हा खरा प्रश्न आहे. त्यापेक्षा या मंगल सणामधून फटाके वजा करून त्या वाचलेल्या पैशामधून गरिबांना खाऊ वाटप, अन्न दान, अशा कितीतरी विधायक गोष्टी करता येतील. फटाक्यांचा वापर करून कुणाचे तरी नुकसान करण्यापेक्षा, पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा सर्वांनी निश्चय करून इतरांच्या आनंदात वाटेकरी होऊया असे वाटते.