उत्पत्ती, विकास आणि विनाश
हे सृष्टीचे एक चक्र आहे. आज आपण विकासाच्या एका उच्च शिखरावर आहोत. आज तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबरच विकासाची अनेक
कवाडे खुली झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आज आपण अनेक क्षेत्रात उत्तुंग
प्रगती करत आहोत. आपल्या देशाचा
अनेक क्षेत्रात विकास झाला असला, तरी आपला देश अजूनही विकसनशील आहे. विकसित
देशांच्या यादीत यायला आपणाला अजूनच वेळ आहे. लोकांची विकासाची मानसिकता आणि
सरकारी भूमिका या बाबी विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
भ्रष्टाचार रोखणे हे आपल्या समोरचे फार मोठे
आव्हान आहे. हे आव्हान आपण समर्थपणे पेललं तर विकास फार दूर राहणार नाही. आज आपण
विकसित होतोय पण त्याच्या साईड इफेक्टस् कडे आपलं दुर्लक्ष होत आहे, असं नाईलाजाने
म्हणावं लागतं. राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांनी अत्यंत दूरदृष्टीने विकासाची संकल्पना स्पष्ट केली होती. त्यांनी
'खेड्याकडे चला' अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती, कारण खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही
याची जाणीव त्यांना होती. केवळ शहरांचाच विकास झाला तर विकासाचा असमतोल होईल आणि
तो विकास अयोग्य होईल, अशी ती भूमिका होती.
जेव्हा आपणास विकास हवा असतो तेव्हा
त्याच्याबरोबर काही वाईट गोष्टीही आपल्या पदरात पडतात, हे विकासाचे साईड इफेक्टस् असतात.
साईड इफेक्टस् हा वैदकशास्त्राशी संबंधित शब्द
आहे. एखादी वेदनाशामक गोळी किंवा
अँटिबायोटिक घेतल्यावर अॅसिडिटी सारख्या साईड
इफेक्टला आपणाला सामोरं जावं लागतं. यासाठी डॉक्टर अगोदरच अशा औषधांसोबत अॅसिडिटी होऊ नये म्हणून गोळी देतात, तद्वत विकास
करताना इतर साइड इफेक्टस् होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी चिरस्थायी
विकासाची संकल्पना लक्षात घ्यावी लागेल.
रस्ते किंवा इमारतींचा विकास करताना प्रचंड प्रमाणात
वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीचे परिणाम सर्वांना माहीतच आहेत. त्यासाठी
वृक्षतोडी बरोबरच इतरत्र वृक्ष लागवड करणे आवश्यक ठरेल. आज खेडेगावात, विशेषतः
समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन विकास होताना दिसतो; परंतु या पर्यटना
बरोबर गावांचे गावपण हरवत चालले आहे. पर्यटना बरोबर धन दांडग्या लोकांनी स्थानिक
लोकांच्या अल्पमोलाने विकत घेतलेल्या जमिनी, निर्माण झालेली मोठमोठाली हॉटेल्स हे
पाहिल्यावर या विकासातून खरंच खेड्यांचा विकास होतो आहे का? येथील माणसाचा विकास
होतो आहे का? हा खरा प्रश्न आहे. विकास होताना तो केवळ चार दोन बड्या लोकांचा होणे
अपेक्षित नाही तर गोरगरीब, सामान्य माणसाचा विकास झाला तरच खेड्यांचा विकास झाला
असे मान्य करता येईल. 70% लोक हे खेड्यात राहतात, त्यामुळे त्यांचा विकास होणे
आवश्यक आहे.
आजचा विकास हा शहरी भागापुरताच सीमित असलेला दिसतो.
शहरी भागांचा विकास झाला की ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करतात आणि गाव ओस
पडतात. हे थांबवायचे असेल तर गावातच उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत. हे उद्योगधंदे
पर्यावरण पूरक असावेत. अगदी त्यासाठी मोठमोठे उद्योगधंदे हवेतच असे नाही, तर कुटीर
उद्योग, लघु उद्योग
यातूनही आपण खेड्यांचा विकास करू शकतो, आणि पर्यावरण
पूरक उद्योग निर्माण करून आपण हे विकासाचे साईड इफेक्ट्सही कमी करू शकतो.
आज दिल्ली पाठोपाठ मुंबई शहरही प्रदूषणयुक्त
शहर ठरत आहे. सद्यस्थितीतील विकास पाहता प्रदूषण हे अपरिहार्य आहे, कारण विकास
करताना आम्ही त्याच्या साईड इफेक्टस्चा कधीच विचार
केलेला नाही. माणसाच्या प्रचंड स्वार्थी वृत्तीमुळे, हव्यासामुळे, श्रीमंतीच्या चढाओढीत
आम्हाला केवळ 'माझा विकास' हवा आहे, त्यासाठी इतरांचा विचार करण्यासाठी माझ्याकडे
वेळ नाही, अशी आजची स्थिती आहे. चुकीच्या दिशेने, चुकीच्या पद्धतीने आपण विकास
करायला लागलो की प्रदूषण, भूकंप, त्सुनामी, वादळे, अतिवृष्टी, महापूर, कोरडा
दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, हे साईड इफेक्टस्
होणारच. हे साईड इफेक्टस् टाळायचे असतील तर नियोजनबद्ध चीरस्थायी विकासाची गरज आहे
हे निश्चित.