बदल हा सृष्टीचा नियम आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये बदल होणे हे स्वाभाविक आहे. उलट बदलाने विकासही शक्य होतो. काळानुसार, परिस्थितीनुसार बदल होणे हे अपरिहार्य असते; परंतु एखाद्या गोष्टीचा उद्देश बदलण्या इतपत बदल नको असतो. आपल्या उत्सवांच्या बाबतीतही बऱ्याचदा असे काही बदल होताना दिसतात, की त्या सण उत्सवांचा मूळ उद्देशच बाजूला पडावा. हिंदू धर्मातील विविध सण उत्सवांचा अभ्यास केल्यावर असे निदर्शनास येते की, या सर्वांच्या मागे काहीतरी शास्त्र दडलेले आहे. गुढी पाडव्याला कडुलिंबाचा नैवेद्य, श्रावण महिन्यातील उपवास यामागे नक्किच शास्त्र आहे. पूर्वजांनी निर्माण केलेल्या या सणामागे काही तरी खास उद्देश असतो, हा उद्देश लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकदा माणसाने एखादी उपयुक्त गोष्ट करावी असा सरळ सरळ सल्ला न देता, आपल्या पूर्वजांनी त्या गोष्टींना देवा धर्माची जोड देऊन सण समारंभ निर्माण केलेले दिसतात. जेणेकरून मनात देवाबद्दलची भक्ती असणाऱ्या प्रत्येकाने हा सण उत्सव साजरा करावा. त्यानिमित्ताने अपेक्षित गोष्ट त्याच्याकडून साध्य होईल. पण आज भक्तिभावाची कमतरता असणाऱ्या वर्गाने बऱ्याच सण-उत्सवांची मोडतोड करुन त्यात ढवळाढवळ सुरू केलेली दिसते.
अनेक सण आणि उत्सवांमध्ये निसर्गपूजा आहे; पण आम्ही ते नीटसे लक्षात न घेता, सण समारंभ साजरे करत आहोत. उदाहरणार्थ
वटपौर्णिमेला वडाची पूजा अपेक्षित आहे; पण सोयीनुसार
वडाच्या फांदीची पूजा केली जाते आणि त्यामुळे वडाचे रक्षण होण्याऐवजी वडाची कत्तल होताना
दिसते. होळीला आपण झाडेच्या झाडे तोडतो, ती पेटवतो यातून निसर्गाचे नुकसानच आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे सांगणारी आमची
संस्कृती असे काही गैर करायला सांगेल असे वाटत नाही. गटारी अमावास्ये बाबत आपणास माहीतच आहे, त्याचा चुकीचा अर्थ घेऊन ही अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू
होण्यापूर्वी मांसाहार करुन घ्यावा असा काहीसा समज निर्माण झाला आणि त्यातूनच
श्रावण न पाळणारी माणसेही गटारी अमावस्येला मांसाहार करू लागली. खरंतर हे पटणारे
नाही. आपण नागपंचमीला नागाचे पूजन करतो, उंदीरकीला उंदराचे पूजन
करतो, कासवाचे पूजन करतो, वृक्षांचे पूजन करतो या
सर्वांमधून निसर्ग पूजा आणि अन्न साखळीतील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा आहे हे
समजून घेणे आवश्यक आहे; परंतु आपण जरी एका दिवसाची पूजा करत असलो, तरी इतर दिवशी मात्र ही पूजा विसरून आपण सहजपणे सापांना मारतो किंवा तत्सम
निसर्गातील घटकांचे नुकसान करतो. खरे तर या सणांच्या माध्यमातून हे विज्ञान समजून
घेणे गरजेचे आहे.
काही सण उत्सव हे पौराणिक काळातील प्रातिनिधिक प्रसंग जिवंत करणारे असे आहेत. यशोदा मातेने मडक्यात उंचावर ठेवलेले लोणी कृष्ण, सवंगड्यांच्या मदतीने उंचावर चढून, काढून खायचा. हाच प्रसंग आपण दहीहंडीच्या निमित्ताने साजरा करतो; परंतु हेच दही, लोणी आपण मडक्या मध्ये नऊ ते दहा थरांवर बांधतो. ही दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षीसे लावली जातात, ही दहीहंडी फोडताना अनेकांचे जीवही जातात, काहींना अपंगत्व येते. अलिकडे मृतांच्या नातेवाईकांस सरकार कडून आर्थिक मदत ही जाहीर केली गेली आहे, परंतु गेलेल्या जीवाचे काय? हा खरा प्रश्न आहे. आज अशा सणांचे झालेले राजकारण आपण पाहतच आहोत. लोकांची गर्दी वाढावी म्हणून नर्तिकांचे नृत्य, सेलिब्रिटीजची गर्दी हे सर्व पाहायला मिळते आहे. यातील काही बदल स्वीकारणे शक्य आहे, परंतु त्या सणांचे पावित्र नष्ट होणार नाही याची काळजी आपणास घ्यायलाच हवी, त्या सणांचा उद्देश लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
नुकताच झालेला गणेश चतुर्थीचा सण आपण अनुभवला. गणपतीच्या मूर्ती बाबत तर कितीतरी गोष्टी या मनाला पटणाऱ्या नाहीत. पुराणकथांनुसार गणपतीच्या हातात परशु आणि पाश ही दोन आयुधे आहेत; पण आज गणपतीच्या मूर्तीच्या हातात धनुष्यबाण किंवा तत्सम कोणतीही आयुधे सहजपणे दिली जातात. अगदी एखाद्या नायकाची गाजलेली पोज आज गणपतीच्या मूर्तीला दिली जाते, ही तर आश्चर्यकारक गोष्ट वाटते. गणपती समोर केले जाणारे देखावे बघितले की राजकारणा सारखे वर्ज्य विषयही तेथे जेव्हा येतात तेव्हा नक्कीच आपण मुळ उद्देशा पासुन दूर चाललो आहोत असेच म्हणावे लागेल. गणपती उत्सवामध्ये डबलबारीची भजने जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा अलीकडच्या काळात या भजना मधून मनोरंजनाच्या नावाखाली अत्यंत अश्लाघ्य बोलणे, घाणेरडे शब्द कानावर येतात तेव्हा आम्ही या सर्वांची किती मोडतोड करतो आहोत याची प्रचिती येते. बदल जरूर व्हावेत; परंतु या सण समारंभांचा, उत्सवांचा उद्देशच त्यामुळे बाजूस पडू नये, हीच माफक अपेक्षा.