मंगळवार, ८ मार्च, २०२२

स्त्री-पुरुष स्थिती गती



                                           

                                                                                       

आज 8 मार्च जागतिक महिला दिन यानिमित्त केलेला लेखन-प्रपंच

 


विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. युरोप खंडातल्या अनेक देशांत व अमेरिकेत स्त्रिया काही प्रमाणात कामाला जाऊ लागल्या होत्या, त्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव हळूहळू होऊ लागली होती. त्यांनी मतदानाच्या हक्कासाठी चळवळ उभारली होती, कामाचे तास 12-14 असे होते या पार्श्वभूमीवर 1910 मध्ये कोपेनहेगे येथे स्त्रियांची परिषद भरली होती. त्यात जर्मनीतील क्लारा झेटकिन या कार्यकर्तीने सुचविले की, या चळवळी स्वतंत्र होता नये एकच चळवळ व्हावी.

       न्यूयॉर्कमध्ये 1857 साली शिलाई कारखान्यातील शेकडो कामगार स्त्रियांनी दहा तासांच्या दिवसासाठी व कामाच्या बाबतीत माणुसकीचे नियम असावेत म्हणून मोठे निदर्शन केले होते, ते मोडून काढले गेले. स्त्रिया त्यात जखमी झाल्या होत्या, तो दिवस होता 8 मार्च.  म्हणून 8 मार्चलाच हे आंदोलन करण्याचे ठरले व तो दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचेही ठरले.  8 मार्च 1910 ला या दिनाची सुरुवात झाली तेव्हापासून आपण हा दिन साजरा करतो.

       असे दिन साजरे करण्यामागे महत्त्वाचा उद्देश असतो तो म्हणजे सद्यस्थितीतील वाईट गोष्टी दूर होऊन चांगल्या गोष्टींची रुजवण व्हावी. आजची स्रियांची स्थिती बघता त्यामध्ये निश्चितपणे बदल होण्याची आवश्यकता वाटते. सिमॉन द बोव्हा या लेखिकेने स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर तिला तसे घडवले जाते असे म्हटले आहे. या विधानावरून असे लक्षात येते की कुटुंब, समाज स्त्रीला स्त्री म्हणून घडवतात. लहानपणापासून आपण स्त्रीवर काही बंधने लालेली असतात. तू असेच कर’, असे करू नकोस असे देवा-धर्माच्या नावाखाली तिला सांगितले जाते. त्यातून त्या स्त्रीला सुद्धा आपण पुरुषांपेक्षा वेगळे आहोत आणि आपली मर्यादा एवढीच आहे, असा समज मनात पक्का होतो.  जगभरातील स्त्रियांची स्थिती लक्षात घेऊन बोव्हा जरी वरील विधान करत असल्या, तरी वरील विधानातील एक अध्याहृत भागही लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे पुरुष सुद्धा पुरुष म्हणून जन्माला येत नाही तर त्याला पुरुष म्हणून घडवले जाते.  कुटुंबात, समाजात जशी स्त्रीवर बंधने घातली जातात, तसे पुरुषाला स्वातंत्र्याचे धडे, पराक्रमाचे धडे दिले जातात अगदी लहानपणी मुलींना बाहुली, भातुकली असे खेळ दिले जातात, तर मुलांना बंदूक, विमान असे खेळ दिले जातात. मुलीने सातच्या आत घरात आलं पाहिजे, मुलाला मात्र हा दंडक नाही. त्यातून ही मुले घडत जातात.

       स्त्री-पुरुषांमध्ये नैसर्गिक शारीरिक बदल असले तरी भेदभाव मात्र आपणच केले आहेत. कामाची विभागणी आपणच केली आहे. खरं म्हटलं तर पूर्वीच्या काळी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिकार करायच्या; परंतु जेव्हा अग्नीचा शोध लागला तेव्हा अग्नीचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्त्रीने स्वेच्छेने घेतली आणि तेव्हापासून स्त्री स्वयंपाकाशी बांधील झालीमानवी समुहामध्ये जेव्हा युद्धे सुरू झाली तेव्हा स्त्रीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुरुषावर पडली. त्यातूनच ते तिच्यावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करत गेले आणि इथेच आसमानतेला सुरुवात झाली. खरंतर स्त्री आणि पुरुष एका रथाची दोन चाके आहेत दोघांना समान न्याय, समान संधी मिळाली पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. आपल्याकडे स्त्रीला एकतर देवता मानले गेले किंवा एकदम खालचा दर्जा दिला गेला.  आजची सुशिक्षित स्त्री किंवा स्त्रीवादी विचारवंत स्त्रीला फक्त माणूस म्हणा अशी मागणी करताना दिसतात आणि ती अत्यंत रास्त आहे.

       पुरुषाने घराबाहेर पडून घरात पैसा आणावा आणि स्त्रीने मुलांचा सांभाळ करावा, अशी एक अलिखित विभागणी दिसते.  या विभागणीमुळे आपल्या कामात कुठे कमतरता निर्माण झाली तर त्याचे विचित्र परिणाम दिसून येतात. अगदी या विभागणीचा फटका पुरुषांनाही बसतो. आपल्या कुटुंबाचा आपण योग्य प्रकारे सांभाळ करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली, की एखादा पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा लक्षात घेता स्त्री शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत तर त्या पुरुषांनीच केल्या आहेत. दुसर्‍या बाजूला स्त्रीचे चारित्र्य, अब्रू याला समाजाने भलतेच महत्त्व दिल्याने बलात्कार झालेली एखादी स्त्री स्वतःला संपवते.

       यासाठीच स्त्री-पुरुष अशी कामाची विभागणी न होता गरजेनुसार, सोयीनुसार कुटुंबाची कामे पार पडली पाहिजेत. स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याची आज आवश्यकता आहे. स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून न बघता माणूस म्हणून तिचे समाजातील स्थान मान्य करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीने सांगितलेले स्त्रियांचा आदर, सन्मान करणे यासारख्या गोष्टी मनापासून स्वीकारल्या पाहिजेत. आजपर्यंतच्या साहित्यात, समाजमाध्यमांत, चित्रपटात स्त्रीची एक प्रतिमा तयार केली गेली आहे. बऱ्याचदा ही प्रतिमा एक वस्तुरूप होते. अशी चुकीची प्रतिमा बदलण्याचे काम आजच्या सुशिक्षित, प्रतिभावान स्त्रीने केले पाहिजे. शहरातील स्त्रिया आणि ग्रामीण भागातील स्त्रिया यांच्या विविध समस्यांचा वेध घेतला पाहिजे. स्त्री लेखिकांनी स्त्रियांना त्याबाबत लेखनातून योग्य असे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तरच खर्‍या स्थितीची जाण स्रियांना होईल आणि आजचे विषमतेचे चित्र बदलले जाईल असे वाटते.

स्त्रीचे कुटुंब घडवण्या मधील स्थान किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. आज जवळपास सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत किंबहुना काही क्षेत्रात एक पाऊल पुढे आहेत, असे असले तरी एखादी उच्चपदावर काम करणारी स्त्री असेल तर तिथला शिपाई सुद्धा तिला फार किंमत देत नाही, कारण ती उच्च पदावर असली तरी एक 'स्त्री' आहे अर्थात हा पुरुषप्रधान संस्कृतीचा परिणाम आहे.

स्त्रिला आता अबला नव्हे तर सबला होण्याची गरज आहे.  आज दुबळ्या, परावलंबी स्त्रियांवर जास्त प्रमाणात अन्याय व अत्याचार होताना दिसताहेत. स्त्रीने आता शिक्षित होऊन या संपूर्ण व्यवस्थेचा फेर विचार केला पाहिजे. किमान आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव त्यांना झाली पाहिजे.  वर्षानुवर्ष स्त्रियांच्या मनावर बिंबवल्या  गेलेल्या गोष्टीचा पगडा सहजासहजी उतरणार नाही. स्त्री-पुरुषांमधील अंतर कमी करण्यासाठी स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार कमी करण्यासाठी आज स्त्री आणि पुरुषांवर वेगळ्या प्रकारचे संस्कार होण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघण्याची गरज आहे.