मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

व्हॉट्सॲप वापरूया पण........



       खरंतर सोशल मीडियाचा वापर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण पीढीकडून होतोय की आजची तरुण पीढी त्यातच गुरफटून पडली आहे की काय ? असा प्रश्न पडतो.  सोशल मीडियाचा वापर करणे हे काही चूक नव्हे पण त्याचा वापर जरा जपूनच करावा लागेल.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या बाबत वापरणारा हा जागृत असला पाहिजेत्याचे फायदे-तोटे त्याला नीट माहित असणे आवश्यक आहे.  अन्यथा भविष्यात अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.  (त्यासंदर्भात यापूर्वी मी दिनांक 2 मे 2020 रोजी 'समाज माध्यमांच्या वापराचे भान' हा ब्लॉग लिहिला आहे.) 

       मोबाईलच्या अतिवापराचे धोके अनेक तज्ञांनी वेळोवेळी सांगितलेले आहेतच परंतु 'कळतंय पण वळत नाही' अशी आपली स्थिती आहे: कारण ती तर आता जीवनावश्यक वस्तू बनत चालली आहे.  चार दिवस नव्हे तर केवळ एक दिवस जरी आपला मोबाईल आपल्या सोबत नसेल तर आपली स्थिती काय होते याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा म्हणजे माझे म्हणणे आपल्या लक्षात येईल. आपण मोबाइल शिवाय राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.  मोबाईलवर सर्वाधिक लोकप्रिय झालेले ॲप म्हणजे व्हॉट्सॲप.  लहानापासून ते वृद्धांपर्यंत, गरीबा पासून ते अति श्रीमंतांपर्यंत सर्वांना त्याची भुरळ पडलेली दिसते.  जसे लहान मुलांचे डायपर सारखं सारखं तपासले जात तसे लोक आता व्हॉट्सॲप तपासताना दिसतात.  ही डायपरची कुणीतरी दिलेली उपमा योग्यच वाटते. काहींच्या कानाला सतत हेडफोन, ब्ल्युटूथ असतात - असे लोक तर आपल्याशी बोलताहेत की, इतर कोणाशी बोलत आहेत हेच कळत नाही. असे एक ना अनेक प्रकार आपणास पाहायला मिळतात.  यातून आपण किती सवयीचे गुलाम बनत चाललो आहोत याची प्रचिती येते.

       मेसेज पाठवणे, फाइल्स पाठवणे, इमेज, व्हिडिओ क्षणार्धात पाठवण्या सारख्या अनेक फायद्यांबरोबर व्हॉट्सअॅपचे तोटेही लक्षणीय आहेत.  आपली प्रायव्हसी बर्‍याचदा यामुळे धोक्यात येऊ शकते, खोट्या भूलथापांना बळी पडणे, आय.टी. निरक्षरतेमुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होणे, मेसेजचा चुकीचा अर्थ लावून भांडणे होणे, नातेसंबंध खराब होणे, अनेक गैरसमज पसरणे, नवरा-बायकोमध्ये वितुष्ट येणे अशा कितीतरी गोष्टी व्हॉट्सॲप मुळे घडत आहेत व पुढेही घडू शकतात.  हे सर्व तोटे होऊ नयेत म्हणून गरज आहे ती त्याच्या सुयोग्य वापराची.

       आपल्या जीवनात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कोणती समस्या येऊ नये यासाठी प्रत्येक वापरकर्त्याने सजग असणे आवश्यक आहे.  जेव्हा आपण एखादा मेसेज फॉरवर्ड करतो तेव्हा त्या मेसेजशी आपण पूर्णपणे सहमत आहोत असा त्याचा अर्थ होतो म्हणूनच तो विचारपूर्वक फॉरवर्ड केला पाहिजे. नकळतपणे समाजात विघातक मेसेज पसरवण्यामध्ये, तेढ निर्माण करण्यामध्ये आपला हात असणार नाही याची दक्षता आपणास घ्यावी लागेल.  हे सर्व आभासी जग आहे.  या आभासी जगात वावरण्याची आपल्याला इतकी सवय झाली की, ते जगणं आता हवहवसं वाटू लागलं आहे.  गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅपी बर्थडे, RIP या मेसेज मधली यांत्रिकता बघितली की हे सहजपणे आपल्या लक्षात येते. या शुभेच्छा बर्‍याचदा कोरड्या वाटतात.  त्यात भावनांचा ओलावा दिसत नाही. एकाने शुभेच्छा दिली की दुसऱ्याकडून त्याची री ओढली जाते (कॉपी-पेस्ट). असे हे मेसेजचे सत्र सुरू होते.

       व्हॉट्सॲप ग्रुप बाबत बोलायचे झाल्यास हे ग्रुप सुद्धा खूपच मजेशीर असतात.  बाल मित्रांचा ग्रुप, प्राथमिक शाळा ग्रुप, माध्यमिक शाळा ग्रुप, कॉलेज ग्रुप, एसटी मित्र ग्रुप, खेळाडू मित्र ग्रुप, चुलत भावंडे ग्रुप, सख्खी भावंडे ग्रुप, आडनाव बंधू ग्रुप, वाडीचा ग्रुप, गावाचा ग्रुप, सोसायटीचा ग्रुप, विविध संस्थांचे ग्रुप, कामाच्या ठिकाणाचा ग्रुप, ट्रेनमध्ये भेटणाऱ्या मित्रांचा ग्रुप असे एक ना अनेक ग्रुप व्हाट्सॲप वर तयार होतात.  हे ग्रुप पाहिले की आपणाला सहजच अनेक प्रश्न पडतात यातील किती ग्रुप उपयुक्त आहेत? किती ग्रुप मधील सभासद एटिकेट्स पाळतात? किती ग्रुप मुळे आपल्या ज्ञानात भर पडते? किती ग्रुपमध्ये त्या ग्रुपच्या उद्देशानुसार मेसेज टाकले जातात?  बर्‍याचदा एखादा आपल्या जवळचा माणूस जेव्हा एखादा नवीन ग्रुप बनवतो तेव्हा अगदी सुरुवातीस आपल्या कपाळावर नक्कीच आठी येते.  संबंधिताला दुखवायला नको म्हणून त्या ग्रुप मधून लेफ्ट होणे आपणास जमत नाही आणि मग त्या ग्रुपचे सर्व मेसेज आपल्या बोकांडी बसतात.  व्हॉट्सॲप स्टेटस आणि चॅटिंग या गोष्टी बघितल्या की आम्हा भारतीयांकडे किती वेळ आहे? याचा अंदाज सहजपणे येऊ शकतो.

       आपला डीपी, आपले स्टेटस, आपल्या पाठवलेल्या पोस्ट्स यावरून आपले व्यक्तिमत्व सहजपणे दुसऱ्याला समजू शकते. त्यामुळे या कृती खूप काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. गुड मॉर्निंग आणि गुड नाईट या मेसेजनाही तर अनेक जण त्रासलेले दिसतात. लांबच लांब संस्कृती जोपासणारे, ज्ञानाचे डोस पाजणारे कितीतरी मेसेज रोज आपणास वाचायला मिळतात.  त्यातही जणू काही हा मेसेज मीच लिहिलेला आहे किंवा त्यातलं तत्वज्ञान मी पूर्णतः अंगीकारतो अशा अविर्भावात पाठवणारा ते पाठवत असतो. गंमत म्हणजे स्वतःच्या आई-वडिलांना घरातून बाहेर काढणारा माणूसही मातृदिनाला आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असे स्टेट्स ठेवतो.  अशा प्रकारचा विरोधाभास या व्हॉट्सअॅप वर पावलोपावली पाहायला मिळतो.

       सकाळी सकाळीच एखाद्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा एखादा मेसेज येऊन धडकतो आणि खरच त्या व्यक्तीचा वाढदिवस आहे की नाही याची खातरजमा न करताच अगदी स्पर्धा असल्यासारखे दणादण मेसेज येत राहतात. दुसरा एक प्रकार म्हणजे वाढदिवसाचे मेसेज पडत असतात आणि बर्थडे बॉय / बर्थडे गर्ल प्रत्येक मेसेजला धन्यवादची पोचपावती देत असतात. एखाद्याचा ईगो दुखावणे ही तर अधून मधून घडणारी एक मजेशीर गोष्ट असते.  दोघांची मेसेजची जुगलबंदी रंगते आणि बाकीच्या सर्वांचे मनोरंजन होत असते. कधी कधी दोन गटांमध्ये त्याचे परिवर्तन होते. कधीकधी पर्सनल चॅटिंग ही ग्रुप वर केले जाते. बऱ्याचदा कारण नसताना राजकीय पोस्ट, धार्मिक पोस्ट ग्रुप वर येतात आणि अशा वादांना तोंड फुटते.  “आपण पाठवलेल्या मेसेजला जो लाईक करतो, चांगली प्रतिक्रिया देतो तो आपला खरा मित्र.” अशी आता मित्राची व्याख्या होईल की काय असे वाटायला लागले आहे.

       एखाद्याची सर्टिफिकेट्स हरवल्याचा सापडल्याचा मेसेज, एखाद्या ऑनलाईन लॉटरीचा मेसेज, खोटया सेलचा मेसेज, कोणत्यातरी देव-देवतांचे मेसेज दहा जणांना पाठवा, वीस जणांना पाठवा अशा प्रकारचे मेसेज, कसली तरी किरणे पृथ्वीवर येतील आज आपला मोबाइल बंद ठेवा अशी अशास्त्रीय माहिती देणारे मेसेज आपण कसलीही शहानिशा न करता फॉरवर्ड करतो तेव्हा आपण आपल्या अज्ञानाचे, अशिक्षितपणाचे प्रदर्शन करतो हे आपल्या लक्षात येत नाही.

       वाढदिवसाला वैयक्तिक मेसेज पाठवला तर ग्रुप वरची मेसेजची गर्दी कमी होऊ शकते. ज्याचा वाढदिवस आहे त्याने सर्वांचे स्वतंत्र आभार मानण्यापेक्षा केवळ एकदाच सर्वांचे सामुहिक आभार मानायला हरकत नाही. गुड मॉर्निंग, गुड नाईट यासारखे मेसेज टाळणे शक्य आहे. कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची 100 % खात्री केल्याशिवाय तो पाठवणे योग्य नाही.  विनाकारण नवनवीन ग्रुप तयार करणे हे योग्य नाही.  तसेच आपणास अयोग्य वाटणाऱ्या ग्रुपमधून तात्काळ लेफ्ट होणे आवश्यक आहे. एखाद्याचा मेसेज जर आपणास चुकीचा किंवा आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याच्याशी आपण पर्सनल चॅटिंग करू शकतो. आपल्या हातून अनाहूतपणे चुकीचा मेसेज फॉरवर्ड झाल्यास तात्काळ तो डिलीट करणे आवश्यक आहे, नसल्यास त्याबाबत माफी मागणे गरजेचे आहे.

       व्हॉट्सॲपच्या चुकीच्या आणि अतिरेकी वापरामुळे समाजाला नवीन समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे याची भीती वाटते.  त्याचे गंभीर परिणाम आपणास भोगावे लागणार आहेत, या आभासी जगण्याचा एक ना एक दिवस प्रत्येकालाच वीट येईल हे निश्चीत.