सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

काय भुललासी वरलीया रंगा ...

 


सध्याचे जग हे आभासी होत चालले आहे. नवीन पिढीला हे आभासी जगच आकर्षित करत आहे आणि या जगातच रममाण व्हायला आवडू लागले आहे. त्यातूनच पुढील काळात काही गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत चालली आहे. अगदी अलीकडच्या अनेक घटना बारकाईने पाहिल्यावर हे सहजपणे लक्षात येते. तरुण पिढीचा चंगळवादाकडे वाढत चाललेला ओढा, भपकेबाजपणा, दिखाऊपणा यावरचा विश्वास, त्यातून जीवन जगण्याच्या चुकीच्या संकल्पना वाढत चाललेल्या दिसत आहेत आणि त्यातूनच नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप सारखे नवनवीन फंडे आज मोठ्या प्रमाणात रुजताना दिसतात.  त्यातूनच श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखी अनेक प्रकरणे आपल्यासमोर येऊ लागली आहेत. अशा प्रकारची बरीच प्रकरणे ही आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत, परंतु अशी कित्येक प्रकरणे दिवसागणिक घडत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

माणसाचे अंतरंग आणि बाह्यरंग हे बऱ्याचदा वेगळे असू शकतात याबद्दल अनेकांनी अनेक वेळा सांगून ठेवले आहे..पु.काळे यांची माणसाची एक व्याख्या मला येथे आठवते “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही असे माणूस नावाचे एक यंत्र आहे” अशी त्यांनी माणसाची व्याख्या केली आहे. म्हणजेच काय तर कुणाही व्यक्तीची शंभर टक्के खात्री आपण कधीच देऊ शकणार नाही. ज्याला आपण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असण्याचा प्रकार म्हणतो. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो; परंतु त्या व्यक्तीच्या अंतरंगात मात्र भलतेच काहीतरी असते. या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आपण करतही नाही.

प्रेमात आंधळे होऊन एखाद्याचा घात होण्याचा प्रकार अनेकदा आपण पहातो. प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमी गोडच बोलेल, कारण गोड बोलल्याशिवाय प्रेम होणारच नाही, हे त्याला चांगले माहित आहे, परंतु त्या व्यक्तीचे अंतरंग तपासण्यासाठी अनेक कसोट्या घ्याव्या लागतील आपल्याकडून त्या कसोट्या घेतल्या जात नाहीत; कारण आपण त्याच्या गोड बोलण्याकडे, त्याच्या बाहयांगाकडेच आकर्षित झालेले असतो. समाजामध्ये सद्यस्थितीत चालू असणाऱ्या, घडत असणाऱ्या घटना, किंबहुना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना पाहिल्या की संत, पंत, तंत साहित्याची आठवण होते. कित्येक शेकडो वर्षांपूर्वी संतांनी, पंतांनी व शाहिरांनी आपणास खूप चांगल्या प्रकारचे उपदेश त्यांच्या त्यांच्या साहित्यातून केले आहेत. ते उपदेश जर आपण तंतोतंत पाळले तर कोणत्याही प्रकारचा धोका आपणास कधीच राहणार नाही. संत चोखामेळा यांनी

'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा l

काय भुललासी वरलीया रंगा ll

हे आपणाला खूप पूर्वी सांगून ठेवले आहे आणि नेमकी बाहय रंगाला भुलण्याची चूक आपण वारंवार करत असतो. त्यातूनच अनेक समस्यांना आपणास सामोरे जावे लागते. ऊस जसा बाहेरून डोंगा म्हणजे वाकडा तिकडा दिसतो तसा तो आत नसतो जेव्हा त्याला आपण तोडतो चुरगळतो त्यावेळी त्यातून आतला रस पाझरतो आणि जेव्हा आपण त्याची चव घेतो त्यावेळी लक्षात येते की तो अत्यंत गोड असा रस आहे. बाह्यांगालाच जर  आपण फशी पडलो तर अंतरंगातल्या मूळ तत्वापर्यंत आपण पोहोचणारच नाही अशाच प्रकारे व्यक्तीच्या बाबतीत ही आपणाला करावे लागेल. माणूस बाहय अंगाने कसा दिसतो? यापेक्षा काही कसोट्या घेऊन, परीक्षा घेऊन आपणाला त्याचे अंतरंग शोधावे लागेल. प्रेम करणे हे चुकीचे नाही; परंतु प्रेमात आंधळे होऊन, विश्वास टाकून आपले जीवन व्यर्थ घालवणे ही गोष्ट चुकीची आहे. बऱ्याचदा आजवर घडलेल्या अनेक घटनांमध्ये आपणास हेच पहावयास मिळते.

एका माणसाची वागणूक वाईट असली म्हणून सर्वच माणसांची वागणूक वाईट असेल असे नाही हे जरी खरे असले, तरी समोरच्या व्यक्तीकडून फसले जाण्याचे अनुभव बऱ्याचदा आपणास येतात आणि यासाठीच आपण समाजात, कुटुंबात कसे जगले पाहिजे? याचे मार्गदर्शन आपणास वडीलधारी मंडळी करायची, परंतु विभक्त कुटुंब पद्धती मध्ये आपण त्यालाही पारखे झालो आहोत. त्यातूनच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आजी आजोबा असले, तरी ते आम्हाला अगदीच निर्बुद्ध वाटू लागले आहेत. माणसाने कसे जगावे? कसे वागावे? याबाबत शाहीर अनंत फंदी यांनी 'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको' या फटक्यामध्ये उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा स्वतःच घेतला पाहिजे असे नाही, तर वाईट क्षणांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी जुन्या जाणकारांनी, तत्त्वज्ञांनी, विचारवंतांनी, संतांनी, पंतांनी, शाहिरांनी सांगितलेले अनुभव जर आपण लक्षात घेतले आणि ते अंगीकारले तर निश्चितच आपण कोणाकडून फसले जाणार नाही. आम्ही आपले जीवन अधिक सुंदर करू शकू.

 

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

मोडतोड सण-उत्सवांची

 


बदल हा सृष्टीचा नियम आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये बदल होणे हे स्वाभाविक आहे. उलट बदलाने विकासही शक्य होतो. काळानुसार, परिस्थितीनुसार बदल होणे हे अपरिहार्य असते; परंतु एखाद्या गोष्टीचा उद्देश बदलण्या इतपत बदल नको असतो. आपल्या उत्सवांच्या बाबतीतही बऱ्याचदा असे काही बदल होताना दिसतात, की त्या सण उत्सवांचा मूळ उद्देशच बाजूला पडावा. हिंदू धर्मातील विविध सण उत्सवांचा अभ्यास केल्यावर असे निदर्शनास येते की, या सर्वांच्या मागे काहीतरी शास्त्र दडलेले आहे. गुढी पाडव्याला कडुलिंबाचा नैवेद्य, श्रावण महिन्यातील उपवास यामागे नक्किच शास्त्र आहे. पूर्वजांनी निर्माण केलेल्या या सणामागे काही तरी खास उद्देश असतो, हा उद्देश लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकदा माणसाने एखादी उपयुक्त गोष्ट करावी असा सरळ सरळ सल्ला न देता,  आपल्या पूर्वजांनी त्या गोष्टींना देवा धर्माची जोड देऊन सण समारंभ निर्माण केलेले दिसतात.  जेणेकरून मनात देवाबद्दलची भक्ती असणाऱ्या प्रत्येकाने हा सण उत्सव साजरा करावा. त्यानिमित्ताने अपेक्षित गोष्ट त्याच्याकडून साध्य होईल. पण आज भक्तिभावाची कमतरता असणाऱ्या वर्गाने बऱ्याच सण-उत्सवांची मोडतोड करुन त्यात ढवळाढवळ सुरू केलेली दिसते.

अनेक सण आणि उत्सवांमध्ये निसर्गपूजा आहे; पण आम्ही ते नीटसे लक्षात न घेता, सण समारंभ साजरे करत आहोत. उदाहरणार्थ वटपौर्णिमेला वडाची पूजा अपेक्षित आहे; पण सोयीनुसार वडाच्या फांदीची पूजा केली जाते आणि त्यामुळे वडाचे रक्षण होण्याऐवजी वडाची कत्तल होताना दिसते. होळीला आपण झाडेच्या झाडे तोडतो,  ती पेटवतो यातून निसर्गाचे नुकसानच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरेअसे सांगणारी आमची संस्कृती असे काही गैर करायला सांगेल असे वाटत नाही.  गटारी अमावास्ये बाबत आपणास माहीतच आहे, त्याचा चुकीचा अर्थ घेऊन ही अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहार करुन घ्यावा असा काहीसा समज निर्माण झाला आणि त्यातूनच श्रावण न पाळणारी माणसेही गटारी अमावस्येला मांसाहार करू लागली. खरंतर हे पटणारे नाही. आपण नागपंचमीला नागाचे पूजन करतो, उंदीरकीला उंदराचे पूजन करतो, कासवाचे पूजन करतो, वृक्षांचे पूजन करतो या सर्वांमधून निसर्ग पूजा आणि अन्न साखळीतील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे; परंतु आपण जरी एका दिवसाची पूजा करत असलो, तरी इतर दिवशी मात्र ही पूजा विसरून आपण सहजपणे सापांना मारतो किंवा तत्सम निसर्गातील घटकांचे नुकसान करतो. खरे तर या सणांच्या माध्यमातून हे विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे.


     काही सण उत्सव हे पौराणिक काळातील प्रातिनिधिक प्रसंग जिवंत करणारे असे आहेत. यशोदा मातेने मडक्यात उंचावर ठेवलेले लोणी कृष्ण, सवंगड्यांच्या मदतीने उंचावर चढून, काढून खायचा. हाच प्रसंग आपण दहीहंडीच्या निमित्ताने साजरा करतो; परंतु हेच दही, लोणी आपण मडक्या मध्ये नऊ ते दहा थरांवर बांधतो. ही दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षीसे लावली जातात, ही दहीहंडी फोडताना अनेकांचे जीवही जातात, काहींना अपंगत्व येते. अलिकडे मृतांच्या नातेवाईकांस सरकार कडून आर्थिक मदत ही जाहीर केली गेली आहे, परंतु गेलेल्या जीवाचे काय? हा खरा प्रश्न आहे. आज अशा सणांचे झालेले राजकारण आपण पाहतच आहोत. लोकांची गर्दी वाढावी म्हणून नर्तिकांचे नृत्य, सेलिब्रिटीजची गर्दी हे सर्व पाहायला मिळते आहे. यातील काही बदल स्वीकारणे शक्य आहे, परंतु त्या सणांचे पावित्र नष्ट होणार नाही याची काळजी आपणास घ्यायलाच हवी, त्या सणांचा उद्देश लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

नुकताच झालेला गणेश चतुर्थीचा सण आपण अनुभवला. गणपतीच्या मूर्ती बाबत तर कितीतरी गोष्टी या मनाला पटणाऱ्या नाहीत.  पुराणकथांनुसार गणपतीच्या हातात परशु आणि पाश ही दोन आयुधे आहेत; पण आज गणपतीच्या मूर्तीच्या हातात धनुष्यबाण किंवा तत्सम कोणतीही आयुधे सहजपणे दिली जातात. अगदी एखाद्या नायकाची गाजलेली पोज आज गणपतीच्या मूर्तीला दिली जाते, ही तर आश्चर्यकारक गोष्ट वाटते. गणपती समोर केले जाणारे देखावे बघितले की राजकारणा सारखे वर्ज्य विषयही तेथे जेव्हा येतात तेव्हा नक्कीच आपण मुळ उद्देशा पासुन दूर चाललो आहोत असेच म्हणावे लागेल. गणपती उत्सवामध्ये डबलबारीची भजने जेव्हा आपण ऐकतो,  तेव्हा अलीकडच्या काळात या भजना मधून मनोरंजनाच्या नावाखाली अत्यंत अश्लाघ्य बोलणे, घाणेरडे शब्द कानावर येतात तेव्हा आम्ही या सर्वांची किती मोडतोड करतो आहोत याची प्रचिती येते. बदल जरूर व्हावेत; परंतु या सण समारंभांचा, उत्सवांचा उद्देशच त्यामुळे बाजूस पडू नये, हीच माफक अपेक्षा. 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

‘राजकारण नको रे बाबा !’




जगातील सर्वात सक्षम लोकशाही असणारा देश, अशी आपल्या भारत देशाची ओळख आहे.  आपल्या देशाला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, 1950 पासून आपण लोकशाही स्वीकारली. लोकशाही म्हणजे ‘लोकांचे लोकांसाठी आणि लोकांकडून चालविलेले राज्य’ अशी अब्राहम लिंकन यांची व्याख्या सर्वश्रुत आहे. आपला देश लोकशाही प्रधान आहे. म्हणजेच आपल्या देशाचे शासन लोक चालवतात, त्यासाठी लोकांचा प्रतिनिधी निवडून दिला जातो आणि तो प्रतिनिधी लोकांचे प्रश्न मांडतो. आपण जर हुकूमशाहीचा अभ्यास केला तर लोकशाही किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईल. 

आज आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहोत. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष आपण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करत आहोत. अभिमानाने छाती फुलून येण्याचा हा क्षण आहे, यात वाद नाही; परंतु हे स्वातंत्र्य आम्हाला ज्यांच्यामुळे मिळाले त्यांना विसरून, त्यांचे विचार विसरून, त्यांचा त्याग विसरून, त्यांचे बलिदान विसरून चालणार नाही. पारतंत्र्य काय असते? हे ज्याला माहीत आहे, त्याला स्वातंत्र्याची खरी किंमत कळते. आमची पीढी स्वातंत्र्यानंतर जन्मल्यामुळे, पारतंत्र्याचा इतिहासच आम्हाला समजून घ्यावा लागतो. या इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. भारत देशाची एक स्वतंत्र ओळख आहे, काही मूल्ये आहेत, एक संस्कृती आहे, याचा आपणाला कधीही विसर पडता कामा नये.  

आज आपणाकडे चालणारे गलिच्छ राजकारण बघितले की, आजच्या तरुणांच्या मनात नक्कीच, ‘राजकारण नको रे बाबा !’ असाच उद्गार येईल. राजकारणाची दिशा कुठेतरी भरकटत चालली आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. समाजकारण आणि राजकारण हातात हात घालून जेव्हा येतील तेव्हा विकास दूर रहाणार नाही, पण समाजकारण धुडकावून फक्त आणि फक्त राजकारण केले जाते, विशेषतः स्वार्थी राजकारण केले जाते, तेव्हा मात्र खरे नुकसान होते. आपण आपले बहुमूल्य मत देऊन ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेले असते, त्या लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वागणे, जेव्हा आपण टीव्हीवर बघतो, तेव्हा आपणाला बर्‍याचदा पश्चाताप होतो. आपले, सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी मांडावेत, अशी आपली प्रामाणिक अपेक्षा असते; परंतु बऱ्याचदा आपली येथे निराशाच होते. सामान्य जनता म्हणून आपल्या हातात काय पडते? हा खरा प्रश्न आहे. 

लोकशाहीमध्ये लोकांचे सरकार असते, तर येथील सामान्य माणसास खरोखरच हे सरकार आपण चालवतो आहोत असे वाटते का? समाजजीवनातील मूल्ये व आचरण पद्धती जपण्याचा आग्रह लोकशाही व्यवस्थेत असतो. लोकशाही ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना पोषक असते. सर्वांच्या हितसंबंधांची ती रक्षण करते. कल्याणकारी भूमिका घेते. येथे लोकमताला प्राधान्य आहे; परंतु आजची परिस्थिती काहीशी वेगळीच दिसायला लागली आहे. विविध अधिवेशनांमध्ये होणारा खर्च आणि त्याचे फलित यांचा कधी आपण गांभीर्याने विचार केला आहे का? अनेकदा वृत्तपत्रातून आपण वाचतो, की हे अधिवेशन इतके इतके तास चालले, इतका इतका वेळ वाया गेला. विरोधकांनी चुकीच्या गोष्टींना विरोध करणे आवश्यकच आहे. उलट त्यामुळेच सत्तेचा दुरुपयोग थांबेल, पण बऱ्याचदा विरोधासाठी विरोध पाहायला मिळतो. ही गोष्ट लोकशाहीस मारक आहे. 

राजकारण्यांची भाषणे ऐकल्यावर काही सन्माननीय अपवाद वगळले तर आपल्या देशाची संस्कृती सुद्द्धा नकळतपणे त्यांच्याकडून विसरली जाते. स्त्रियांना तुच्छ लेखणारी भाषा, गटागटात वाद निर्माण करणारी प्रक्षोभक भाषणे, समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे, जातीयता, धर्मांधता वाढवणारी भाषणे ऐकल्यावर आजच्या तरुणाकडून उद्गार बाहेर पडतात ‘राजकारण नको रे बाबा !’ सत्तेचा वापर करून आज जे घोटाळे केले जात आहेत, ते बघितले की सामान्य जनतेचा पैसा कसा लुटला जातो आहे? हे पाहावत नाही. विशेष म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच घोटाळे आपल्यासमोर येतात, बाकीच्या घोटाळयांचे काय? भारतातल्या पैसा स्विस बँकेत जातो, तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार नाही का? 

आजचे राजकारण हे पैशाच्या भोवती आणि पैशासाठी होताना दिसते आहे. निवडणूक लढवणे ही सामान्य माणसाच्या हातातली गोष्ट उरलेली नाही, कारण निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागतो, हे सर्वजण मान्य करतात. निवडणूक आयोगाकडे दिलेला खर्चाचा आकडा जर पाहिला तर हा आकडा सुद्धा आपले डोळे विस्फारेल. प्रत्यक्ष खर्च त्याहून जास्त असतो॰ आपल्या देशाचा खरा विकास व्हायचा असेल, आपणास आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर प्रथम लोकशाही सक्षम बनली पाहिजे. समाजकारण करून नंतर राजकारण करणारे लोकप्रतिनिधी पुढे आले पाहिजेत. राजकारणातल्या गलिच्छ गोष्टी गेल्या पाहिजेत आणि नि:स्वार्थी राजकारण अस्तित्वात आले पाहिजे. देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग सदैव मनात ठेवून कार्य करणारे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत. सामान्य जनतेचे प्रश्न ओळखणारे, ते ठामपणे मांडणारे, जनतेला न्याय मिळवून देणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत॰ असे प्रतिनिधी घडवणे हे आपल्या सामान्य जनतेच्या हाती आहे. सामान्य जनताच हे काम करू शकते आणि जेव्हा हे सुदृढ राजकारण आजच्या तरुणाला हवेहवेसे वाटेल, त्यावेळी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करतो, त्याला अर्थ उरेल.

बुधवार, १३ जुलै, २०२२

दुबळी माझी झोळी…

   


निसर्गाने आपणाला अगदी भरभरून दिले आहे. कोकणचा विचार करता तर निसर्गाने उर्ध्वहस्ते खजिनाच बहाल केला आहे. या निसर्गसंपत्तीच्या बाबतीत आपण भाग्यवानच आहोत.  देणारा जितका सक्षम असतो, तितकाच घेणाराही सक्षम असला पाहिजे. निसर्गाने भरभरून दिलेला हा खजिना सांभाळण्यासाठी, वापरण्यासाठी, वाढवण्यासाठी दिवसेंदिवस आपण अक्षम बनत आहोत. सोनं – नाणं, दाग – दागिने, जमीन – जुमला अशी संपत्ती जमा करण्याच्या नादात आपण या निसर्गसंपत्तीकडे दुर्लक्ष करतो आहोत की काय? असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज दुबळी माझी झोळी… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देणारा सक्षम आहे; पण घेणारे आपण मात्र अक्षम आहोत असेच म्हणावे लागते. 

     जून-जुलै ते अगदी ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत कोकणात धो-धो पाऊस कोसळत असतो. अनेक नद्या ओसंडून वाहत असतात, धबधबे फुलून गेलेले असतात; पण हे सर्व पाणी शेवटी जाऊन समुद्राला मिळते आणि ते वापरण्यास अयोग्य बनते. या बहुमूल्य पाण्याचे नियोजन आपण काय करत आहोत? हा खरा प्रश्न आहे. 

     आपण आपल्या घराच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थितपणे करतो. नगरपालिकेने / ग्रामपंचायतीने सोडलेले पाणी किती वेळ येते याचा विचार करून आपण त्यानुसार आपली साठवण क्षमता निर्माण करतो. गरजेनुसार ते पाणी वापरतो. पाणी कमी असेल तेव्हा अगदी जपून वापरतो. हे नियोजन आम्ही वैयक्तिक पातळीवर करतो; पण असे नियोजन व्यापक पातळीवर मात्र होताना दिसत नाही. पाण्याच्या बाबतीत कोकण समृद्ध असले, तरी देखील जानेवारी फेब्रुवारी मध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा भासायला लागतो. खेड्यापाड्यात कित्येक किलोमीटर डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया आपणास दिसतात. हे चित्र खरोखरच विचारप्रवृत्त करणारे आहे. 

     एकीकडे पावसाचे भरमसाठ पाणी आपणास मिळते आहे, तर दुसरीकडे त्याच भागात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष, याचा अर्थ काय? योग्य नियोजनाचा अभाव, हेच त्याचे कारण आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती काय आहे? त्याचे विकासात महत्त्व काय आहे? याचा सांभाळ कसा करावा? यासारख्या प्रश्नांचा आम्ही गंभीरपणे कधीच विचार केला नाही. लहानपणापासून याचे धडे आम्हाला दिले गेले नाहीत. पाण्याची बचत ही संकल्पनाच आम्हाला पटत नाही. 

     आज घाट माथ्यावरचा शेतकरी पाऊस नाही म्हणून दुबार, तिबार पेरणीला सामोरा जातोय आणि कोकणामध्ये धो धो पाऊस पडत असला तरी दिवसेंदिवस पडीक जमिनीची संख्या वाढतच चालली आहे. शेतीत काम करायला माणसं नाहीत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा एकदाच जमीन विकली, की मिळणारी रक्कम आता आम्हाला समाधानकारक वाटू लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा जमिनी विकण्याकडे कल वाढू लागला आहे. 

     


खरं म्हणजे छोटे छोटे बंधारे बांधून पाणी जर जमिनीत मुरवले गेले, धरण क्षेत्रांमध्ये वाढ केली गेली, नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला गेला, त्याबाबतीतल्या संशोधनाला चालना दिली गेली, प्रोत्साहन दिले गेले, थोडक्यात पाण्याचे योग्य नियोजन केले गेले, तर नक्कीच आपण या प्रश्नाला समर्थपणे तोंड देऊ शकतो. पाऊस पडत नाही म्हणून आपणास पाणी मिळत नाही, अशी स्थिती असेल तर आपण एक वेळ समजू शकतो; पण प्रचंड पाऊस पडूनही आपण पाण्यासाठी तहानलेलेच असू तर, तो आपला ‘करंटेपणाच’ म्हणावा लागेल.

     खरोखर परमेश्वर प्रसन्न झाला आणि त्याने लोकांना सुवर्ण मोहरा वाटायचे ठरवले, तर जो माणूस जेवढी मोठी पिशवी घेऊन जाईल तेवढ्या त्याला मोहरा मिळतील. छोटीशी पिशवी नेणाऱ्याला तेवढ्याच कमी प्रमाणात मोहरा मिळतील, आणि फाटकी पिशवी घेऊन जाणाऱ्याची पिशवी रिकामीच राहील. निसर्ग संपत्तीच्या बाबतीत नेमकी या फाटकी पिशवी घेऊन जाणाऱ्या माणसासारखी आपली स्थिती आहे. तेव्हा आपणाला निसर्ग हे जे अमूल्य असे पाणी देतो, ते पाणी साठवण्यासाठी, जमिनीत मुरवण्यासाठी, त्याच्या सुयोग्य वापरासाठी नियोजन करण्याची गरज आहे.  जेव्हा आपली झोळी बळकट होईल, तेव्हाच या संपत्तीचा खऱ्या अर्थाने आपण उपभोग घेऊ शकतो आणि आम्ही आमचा विकास साधू शकतो.



मंगळवार, २४ मे, २०२२

वेळ कसा घालवू?

 


               आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाची ओळख ‘तरूणांचा देश’ म्हणून जगाला करून देतात.  आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम तरूणांकडून अनेक अपेक्षा करायचे, स्वप्न बघायला सांगायचे. आपल्या देशासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.  दारिद्रय, बेरोजगारी, अंधश्रध्दा, निरक्षरता, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न असताना, ज्यांच्यावर देशाच्या प्रगतीची, भविष्याची जबाबदारी आहे अशा काही तरूणांपुढे मात्र एक गंमतीशीर प्रश्न उभा आहे तो म्हणजे, वेळ कसा घालवू?

               जपान सारख्या देशात सुट्ट्यांचा कंटाळा येणारे उद्योगी लोक दिसतात पण आम्ही मात्र नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच, नवीन कॅलेंडर घेऊन सुट्ट्या मोजतो व वर्षभराचे कामाचे नियोजन करण्याआधीच सुट्टयांचं नियोजन करतो.  नोकरी किंवा काम नसणार्‍या माणसांपुढे, वेळ कसा घालवू? हा प्रश्न आहे.  तर नोकरी किंवा काम करणार्‍या काही माणसांपुढे नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी वेळ कसा घालवू?  हा प्रश्न असतो.  इथून तिथून वेळ घालवण्याचं काम आम्ही खूप प्रामाणिकपणे करतो.

               कट्ट्यावर बसून गप्पा झोडणारी माणसं, शाळा कॉलेजच्या आजुबाजूस, किंवा सार्वजनिक ठिकाणी  मुलींची छेडछाड करणारी तरूणांची टोळकी, पानाच्या टपरीवर घोळका करून तंबाखू, सिगरेट सारखी व्यसने करणारी तरूणाई हे सर्व बघितल्यावर नक्कीच त्यांचा वेळ कसा घालवू?  हा प्रश्न सुटलेला दिसत नाही.  हा प्रश्न सोडवण्यासाठी बर्‍याचदा अनेक प्रकार केले जातात, त्यात मोबाईलवर तासनतास गप्पा मारणं, हातातली सर्व कामे टाकून टी.व्ही.वरील मालिका बघणं, त्यावर रंगतदार चर्चा करणं, क्रिकेटच्या मॅचेस अगदी चालेंज लावून घोळक्या घोळक्यांनी बघणे, त्यावर आपणालाच खूप कळते अशा अविर्भावात निरर्थक गप्पा मारणे हे प्रकार सर्रास दिसतात.

               जीवना बद्दलचं बदलतं तत्वज्ञान, चुकीची मानसिकता, जबाबदारीची नसलेली जाणीव, देशप्रेमाचा अभाव, मोठ्या ध्येयाचा अभाव इत्यादी गोष्टी बर्‍याचदा वेळ कसा घालवू?  हा प्रश्न निर्माण करतात.  आज बहुतेक तरूण आजचा दिवस महत्त्वाचा, तो समरसून जगायचा, उद्या कोणी पाहिला?  वगैरे प्रश्न विचारून दिवस एन्जॉय करतात.  तो दिवस एन्जॉय करताना वेळ घालवणे हा एक त्यातला अपरिहार्य भाग.  त्याला टाईमपास हे गोंडस नाव दिले जाते आणि टाईमपास करण्यासाठी वर उल्लेखिलेल्या कितीतरी गोष्टी केल्या जातात, अगदी प्रेम सुद्धा केलं जातं. 


               त्यात कढी म्हणून की काय आजच्या तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर इंटरनेट, फेसबुक, हॉटसअॅप हे म्हणजे वेळ कसा घालवू?  या प्रश्नाचं नेमकं उत्तर आहे, असंच आजच्या तरूण पिढीला वाटू लागले आहे.  तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर निश्चितच चांगला आहे;  पण त्याच्या चुकीच्या आणि अतिरेकी वापरावरच तरूणांचा भर दिसतो. जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठी झालेली, स्वी झालेली माणसे लक्षात घेतली तर त्यांना दिवसाचे चोवीस तास कमी पडत होते, तर आम्हाला मात्र ते खूपच जास्त वाटतात.  म्हणूनच वेळ कसा घालवूहा प्रश्न सतावतो.

               माणसाचं सरासरी वय साठ वर्षे गृहीत धरलं तर सज्ञान होईपर्यंत खेळ, मनोरंजन, अभ्यास यात वेळ जातो.  तारूण्यात मित्र-मैत्रिणी, हॉटेलिंग, चित्रपट, मॉल, मोबाईल या सर्वात बराच वेळ निघून जातो आणि शेवटी वृध्दापकाळात पहिला वेळ योग्यप्रकारे घालवला नाही म्हणून त्याच्या विवंचनेत, पश्चात्तापात वेळ घालवावा लागतो.  वेळ कसा घालवू?  या प्रश्नाचं नेमकं उत्तर न मिळाल्यामुळे या दुष्टचक्रात माणूस अडकतो.

               खरं म्हणजे वेळ ही एक अमूल्य अशा प्रकारची गोष्ट आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात मिळणारी वेळ आपण जपून, सुयोग्य पद्धतीने वापरणे फारच महत्त्वाचे आहे.  विश्वास नांगरे पाटील आपल्या भाषणातून वेळेचे महत्त्व सांगताना एकदा म्हणाले होते,  तुम्हाला जर एका वर्षाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. एका महिन्याचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर आठव्या महिन्यात बाळाला जन्म देणार्‍या आईला विचारा.  का आठवड्याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला, ज्यांची दहा मुले त्याची संध्याकाळी वाट बघतायेत त्याला विचारा. एका तासाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर वाट बघणार्‍या प्रेमिकास विचारा. एका मिनिटाचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर ट्रेन चुकलेल्या प्रवाशास विचारा. एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर अॅक्सीडंट मधून वाचलेल्या माणसास विचारा आणि एका मिली सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळणार्‍या धावपटू विचारा. यावरून प्रत्येक क्षणाचे महत्व अधोरेखित होते.


       इंग्रजी मध्ये एक उत्तम म्हण आहे, ‘Time is money’. आणि हे अगदी खरेच आहे. वेळ किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव होणे ही स्वविकासाची पहिली पायरी आहे.  ज्याला वेळेचे महत्व कळले नाही ती व्यक्ती कधीच आपला विकास करू शकणार नाही. ही एकप्रकारची गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक जितकी जास्त, तितका त्याचा परतावाही जास्त मिळणार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. वेळ कसा घालवू? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबा आमटे, गाडगेबाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इत्यादिंचे जीवनकार्य समजून घ्यावे लागेल. बिल गेट्स, अंबानी, टाटा, बिर्ला यांची नावे प्रसिद्ध उद्योजक म्हणून आम्ही ऐकतो, त्यांच्या संपत्तीबद्दल ऐकतो पण असे उद्योजक होण्यासाठी त्यांनी केलेल्या वेळेच्या नियोजनाचा अभ्यास आपणाला करावा लागेल. जेव्हा वेळ कसा घालवू?या प्रश्नाचं उत्तर तरूण पिढीला मिळेल तेव्हा आपल्या देशासमोरील अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास वाटतो. 

मंगळवार, ८ मार्च, २०२२

स्त्री-पुरुष स्थिती गती



                                           

                                                                                       

आज 8 मार्च जागतिक महिला दिन यानिमित्त केलेला लेखन-प्रपंच

 


विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. युरोप खंडातल्या अनेक देशांत व अमेरिकेत स्त्रिया काही प्रमाणात कामाला जाऊ लागल्या होत्या, त्यांना स्वतःच्या हक्कांची जाणीव हळूहळू होऊ लागली होती. त्यांनी मतदानाच्या हक्कासाठी चळवळ उभारली होती, कामाचे तास 12-14 असे होते या पार्श्वभूमीवर 1910 मध्ये कोपेनहेगे येथे स्त्रियांची परिषद भरली होती. त्यात जर्मनीतील क्लारा झेटकिन या कार्यकर्तीने सुचविले की, या चळवळी स्वतंत्र होता नये एकच चळवळ व्हावी.

       न्यूयॉर्कमध्ये 1857 साली शिलाई कारखान्यातील शेकडो कामगार स्त्रियांनी दहा तासांच्या दिवसासाठी व कामाच्या बाबतीत माणुसकीचे नियम असावेत म्हणून मोठे निदर्शन केले होते, ते मोडून काढले गेले. स्त्रिया त्यात जखमी झाल्या होत्या, तो दिवस होता 8 मार्च.  म्हणून 8 मार्चलाच हे आंदोलन करण्याचे ठरले व तो दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचेही ठरले.  8 मार्च 1910 ला या दिनाची सुरुवात झाली तेव्हापासून आपण हा दिन साजरा करतो.

       असे दिन साजरे करण्यामागे महत्त्वाचा उद्देश असतो तो म्हणजे सद्यस्थितीतील वाईट गोष्टी दूर होऊन चांगल्या गोष्टींची रुजवण व्हावी. आजची स्रियांची स्थिती बघता त्यामध्ये निश्चितपणे बदल होण्याची आवश्यकता वाटते. सिमॉन द बोव्हा या लेखिकेने स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर तिला तसे घडवले जाते असे म्हटले आहे. या विधानावरून असे लक्षात येते की कुटुंब, समाज स्त्रीला स्त्री म्हणून घडवतात. लहानपणापासून आपण स्त्रीवर काही बंधने लालेली असतात. तू असेच कर’, असे करू नकोस असे देवा-धर्माच्या नावाखाली तिला सांगितले जाते. त्यातून त्या स्त्रीला सुद्धा आपण पुरुषांपेक्षा वेगळे आहोत आणि आपली मर्यादा एवढीच आहे, असा समज मनात पक्का होतो.  जगभरातील स्त्रियांची स्थिती लक्षात घेऊन बोव्हा जरी वरील विधान करत असल्या, तरी वरील विधानातील एक अध्याहृत भागही लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे पुरुष सुद्धा पुरुष म्हणून जन्माला येत नाही तर त्याला पुरुष म्हणून घडवले जाते.  कुटुंबात, समाजात जशी स्त्रीवर बंधने घातली जातात, तसे पुरुषाला स्वातंत्र्याचे धडे, पराक्रमाचे धडे दिले जातात अगदी लहानपणी मुलींना बाहुली, भातुकली असे खेळ दिले जातात, तर मुलांना बंदूक, विमान असे खेळ दिले जातात. मुलीने सातच्या आत घरात आलं पाहिजे, मुलाला मात्र हा दंडक नाही. त्यातून ही मुले घडत जातात.

       स्त्री-पुरुषांमध्ये नैसर्गिक शारीरिक बदल असले तरी भेदभाव मात्र आपणच केले आहेत. कामाची विभागणी आपणच केली आहे. खरं म्हटलं तर पूर्वीच्या काळी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिकार करायच्या; परंतु जेव्हा अग्नीचा शोध लागला तेव्हा अग्नीचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्त्रीने स्वेच्छेने घेतली आणि तेव्हापासून स्त्री स्वयंपाकाशी बांधील झालीमानवी समुहामध्ये जेव्हा युद्धे सुरू झाली तेव्हा स्त्रीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुरुषावर पडली. त्यातूनच ते तिच्यावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करत गेले आणि इथेच आसमानतेला सुरुवात झाली. खरंतर स्त्री आणि पुरुष एका रथाची दोन चाके आहेत दोघांना समान न्याय, समान संधी मिळाली पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. आपल्याकडे स्त्रीला एकतर देवता मानले गेले किंवा एकदम खालचा दर्जा दिला गेला.  आजची सुशिक्षित स्त्री किंवा स्त्रीवादी विचारवंत स्त्रीला फक्त माणूस म्हणा अशी मागणी करताना दिसतात आणि ती अत्यंत रास्त आहे.

       पुरुषाने घराबाहेर पडून घरात पैसा आणावा आणि स्त्रीने मुलांचा सांभाळ करावा, अशी एक अलिखित विभागणी दिसते.  या विभागणीमुळे आपल्या कामात कुठे कमतरता निर्माण झाली तर त्याचे विचित्र परिणाम दिसून येतात. अगदी या विभागणीचा फटका पुरुषांनाही बसतो. आपल्या कुटुंबाचा आपण योग्य प्रकारे सांभाळ करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली, की एखादा पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा लक्षात घेता स्त्री शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत तर त्या पुरुषांनीच केल्या आहेत. दुसर्‍या बाजूला स्त्रीचे चारित्र्य, अब्रू याला समाजाने भलतेच महत्त्व दिल्याने बलात्कार झालेली एखादी स्त्री स्वतःला संपवते.

       यासाठीच स्त्री-पुरुष अशी कामाची विभागणी न होता गरजेनुसार, सोयीनुसार कुटुंबाची कामे पार पडली पाहिजेत. स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याची आज आवश्यकता आहे. स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून न बघता माणूस म्हणून तिचे समाजातील स्थान मान्य करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीने सांगितलेले स्त्रियांचा आदर, सन्मान करणे यासारख्या गोष्टी मनापासून स्वीकारल्या पाहिजेत. आजपर्यंतच्या साहित्यात, समाजमाध्यमांत, चित्रपटात स्त्रीची एक प्रतिमा तयार केली गेली आहे. बऱ्याचदा ही प्रतिमा एक वस्तुरूप होते. अशी चुकीची प्रतिमा बदलण्याचे काम आजच्या सुशिक्षित, प्रतिभावान स्त्रीने केले पाहिजे. शहरातील स्त्रिया आणि ग्रामीण भागातील स्त्रिया यांच्या विविध समस्यांचा वेध घेतला पाहिजे. स्त्री लेखिकांनी स्त्रियांना त्याबाबत लेखनातून योग्य असे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तरच खर्‍या स्थितीची जाण स्रियांना होईल आणि आजचे विषमतेचे चित्र बदलले जाईल असे वाटते.

स्त्रीचे कुटुंब घडवण्या मधील स्थान किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. आज जवळपास सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत किंबहुना काही क्षेत्रात एक पाऊल पुढे आहेत, असे असले तरी एखादी उच्चपदावर काम करणारी स्त्री असेल तर तिथला शिपाई सुद्धा तिला फार किंमत देत नाही, कारण ती उच्च पदावर असली तरी एक 'स्त्री' आहे अर्थात हा पुरुषप्रधान संस्कृतीचा परिणाम आहे.

स्त्रिला आता अबला नव्हे तर सबला होण्याची गरज आहे.  आज दुबळ्या, परावलंबी स्त्रियांवर जास्त प्रमाणात अन्याय व अत्याचार होताना दिसताहेत. स्त्रीने आता शिक्षित होऊन या संपूर्ण व्यवस्थेचा फेर विचार केला पाहिजे. किमान आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव त्यांना झाली पाहिजे.  वर्षानुवर्ष स्त्रियांच्या मनावर बिंबवल्या  गेलेल्या गोष्टीचा पगडा सहजासहजी उतरणार नाही. स्त्री-पुरुषांमधील अंतर कमी करण्यासाठी स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार कमी करण्यासाठी आज स्त्री आणि पुरुषांवर वेगळ्या प्रकारचे संस्कार होण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघण्याची गरज आहे.