शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

अखंड प्रेरणास्त्रोत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

 


                   अखंड प्रेरणास्त्रोत डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम

आजचा 15 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे आपल्या देशाचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. सर्वत्र हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा होतो. मी मागील वर्षी सुद्धा ‘प्रेरणा वाचनाची' हा ब्लॉग लिहिला होता. काही विषय किंवा व्यक्तिमत्वं अशी असतात की त्या बद्दल कितीही लिहिले तरी कमीच वाटते.  'वाचन' हा विषय ही असाच आहे आणि डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्व ही त्यातीलच एक आहे.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेरणा ही खूप महत्त्वाची असते. यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की त्यांनी कोणत्यातरी गोष्टीपासून, विशेषतः एखाद्या पुस्तकापासून प्रेरणा घेतलेली असते आणि त्यांच्या जीवनात ते यशस्वी झालेले असतात.  आपण डॉ. कलाम वाचत गेलो, समजून घेत गेलो, त्यांची वैचारिक बैठक तपासली, त्यांची बुद्धिमत्ता अनुभवली तर ते अखंड प्रेरणेचे स्त्रोत कसे होते? व आहेत, हे सहजपणे लक्षात येते.  त्यांचे विचार तर सर्वश्रुत आहेतच.  हे विचार त्यांच्या लेखनातून पुस्तक रूपाने आजही आपल्या सोबत आहेत. त्यांची भाषणे तर या महत्त्वपूर्ण, प्रेरणा देणाऱ्या, जगण्याची दिशा दाखवणाऱ्या विचारांनी ओतप्रोत भरलेली आणि भारलेली असायची.  

त्यांच्या लेखन संपदेवर प्रकाश टाकला तर देशप्रेम आणि चिरस्थायी विकासाबद्दलची त्यांची दूरदृष्टी आणि अदम्य आशा आपणास सहजपणे नजरेस येते. त्यांची अनेक पुस्तके अनुवादकांनी आपणास मराठीतूनही उपलब्ध करून दिली आहेत. विशेषतः 'माझी जीवन यात्रा’, 'अग्निपंख’, 'मिसाईल मॅन’, ‘कर्मयोगी’, 'ए.पी.जे. अब्दुल कलाम संपूर्ण जीवन' 'बियाँड 2020' उद्याच्या भारतासाठी, 'असे घडवा तुमचे भविष्य’, 'टर्निंग पॉइंटस्’, 'मिशन इंडिया' 'माझ्या स्वप्नातील भारत' ही पुस्तकांची शीर्षके जरी वाचली तरी त्यांच्या लेखनाची दिशा लक्षात येते. आपल्याला झोपेत पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा झोपू न देणार्‍या स्वप्नांना तरुणांनी उराशी बाळगले पाहिजे असे त्यांना वाटत होते. लहान लक्ष्य ठेवणे हा गुन्हा आहे, उद्दिष्ट ही महान असली पाहिजेत. अपयशी लोकांच्या कथा वाचायचा ते आपणाला सल्ला देतात, त्यातून यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात असे ते आवर्जून सांगतात.

वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहिलेलं बरं असा अनुभवाचा सल्लाही ते देतात.  अपयश नावाच्या रोगासाठी 'आत्मविश्वास' आणि 'अथक परिश्रम' ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. हा मंत्र ते तरुणांना सांगतात. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही, स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा असा सल्ला ते देतात.  आपण आपले भविष्य बदलू शकत नाही; परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकतो, निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील. असा महान संदेशही ते देतात.  'जर तुमचा जन्म पंखांनीशी झाला आहे तर तुम्ही रांगत का आहात?, त्या पंखांनी उडायला शिका.  जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्ही सूर्यासारखे जळायला शिका.  संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.  एकाग्रचित्त होऊन लक्ष्यावर फोकस केले पाहिजे असेही ते सांगतात.

देश जर भ्रष्टाचार मुक्त बनवायचा असेल तर वडील, माता आणि शिक्षक या तीन सामाजिक सदस्यांमुळे ते शक्य आहे असं ते म्हणतात. संकटे आवश्यक आहेत त्याशिवाय यशाचा आनंद मिळवता येणार नाही.  जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.  चांगले मित्र बनवण्याचा ते सल्ला देतात व चांगल्या मित्राला ते ग्रंथालयाची उपमा देतात.  युद्ध हा कोणत्याही समस्येचा कायमचा उपाय नाही. आनंदी राहण्याचा एक मंत्र आशा फक्त स्वतःशीच बाळगा कुणा दुसऱ्या व्यक्तीशी नाही.  एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे, पण कोणाला जिंकणे खूप कठीण आहे.  जर तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला कोणालाही सलाम करण्याची गरज नाही पण जर तुम्ही तुमचे कर्तव्य केले नाही तर मात्र तुम्हाला सर्वांना हात जोडावे लागतील.  वाट पाहणाऱ्याना फक्त तेवढेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे सोडून देत असतात. अशा एकापेक्षा एक सुंदर विचारांचा खजिना त्यांनी आपणाला खुला करून दिला आहे.

या महान विचारांचा मी येथे एकत्र परामर्श घेतला असला तरी हा प्रत्येक विचार स्वतंत्रपणे व वेळ देऊन चिंतन करून जर आपण वाचला तर डॉ. कलाम सरांची वैचारिक पातळी, प्रगल्भता सहजपणे लक्षात येते. या विचारांची पाठराखण करत अंगीकार करत आपण आपले जीवन पर्यायाने देशाचे भविष्य घडवू शकतो, असे निश्चित वाटते. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, इंदिरा गांधी अवार्ड, वीर सावरकर अवार्ड  असे त्यांना मिळालेले अनेक नामांकित पुरस्कार, सन्मान त्यांच्या महान कार्याची साक्ष देतात. एका नावाड्याच्या पोटी, गरीब कुटुंबात जन्म झालेल्या एका व्यक्तीचा एक महान शास्त्रज्ञ व राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास आपणास नक्कीच थक्क करतो, प्रेरणा देऊन जातो. त्यांच्या विविधांगी विचारांतून खूप मोठी प्रेरणा घेऊन आपण नक्कीच यशस्वी होऊ असा सार्थ विश्वास वाटतो. आणि ही प्रेरणा आपण घेऊ शकलो तर आपण नक्कीच आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो यात संदेह नाही.