अलीकडच्या काळात निसर्गाने अनेकदा आपले रौद्ररूप दाखवले आहे.
कितीतरी नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड
द्यावे लागत आहे. अगदी अलीकडच्या काळातील
निसर्ग वादळ तौक्ते वादळ, खेड, चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर परिसरात
झालेला महापूर, भूस्खलन यासारख्या संकटांचा विचार करता आपत्ती
व्यवस्थापन आणि त्याची गरज सहजपणे लक्षात येते; परंतु आपत्ती
व्यवस्थापनात आपत्ती येऊच नये यासाठी उपाययोजना आणि आपत्ती आलीच तर आम्ही त्याला
कसे तोंड देऊ याचा प्रामुख्याने विचार असतो. एकंदरीत आपत्तीपूर्व
नियोजनात आपण कमी पडतो आहोत असे लक्षात येते.
आपत्ती आल्यावर काय करणार? याचे नियोजन
जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा आपत्ती
येण्याअगोदरचे नियोजन जास्त महत्त्वाचे आहे. आपत्ती ही बऱ्याचदा अचानक येते, काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं होतं; पण काही आपत्ती अशा आहेत की ज्या येऊ शकतात याचा आपण
अगोदरच अंदाज बांधू शकतो. ज्या आपत्तींचा आपण अंदाज बांधू शकतो अशा आपत्तींना तोंड
देणं तुलनेनं सोपं असतं. आपत्तीपूर्व नियोजनातून अशा संकटांना आपण निश्चितपणे तोंड
देऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण
आज आपल्या विकासासाठी अनेक क्षेत्रात करत आहोत. आपत्ती व्यवस्थापनासाठी या आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संकटाची तीव्रता खूपच कमी करू शकतो. हवामान
विभागाकडून अलीकडच्या काळात बऱ्याचदा पूर्व अंदाज उत्तम प्रकारे सांगितले जात आहेत.
बर्याचदा ते अंदाज खरे ठरत आहेत, पण असे असले तरी संकटांची संख्या मात्र कमी झाली
नाही किंवा नुकसानही कमी होताना दिसत नाही. अर्थात जागतिक
तापमान वाढ आणि निसर्गामध्ये मानवाचा अवाजवी हस्तक्षेप यामुळेही हे घडताना दिसत
आहे.
एखादे वादळ, महापूर, अतिवृष्टी आपण थांबवू
शकत नाही; पण त्यापासून होणारी जीवीतहानी, वित्तहानी
मात्र आपण निश्चितपणे कमी करू शकतो; परंतु त्यासाठी
गरज आहे ती आपत्तीपूर्व नियोजनाची. जपानमध्ये वारंवार भूकंप होतात, म्हणून तिथल्या लोकांची घरे की पुठ्ठ्याची बनवलेली असतात
आणि भूकंप होऊन गेल्यावर काही वेळातच त्यांचं पडलेलं घर परत उभं राहतं, हे असं का घडतं; कारण तिथला
प्रत्येक नागरिक आपत्तीस सरावलेला आहे, त्यांने आपत्ती
गृहीत धरली आहे, त्याचा बाऊ न करता ती आपत्ती तो स्वीकारतो आहे.
अशा प्रकारे आपल्या देशातील नागरिकांना
घडवले गेले पाहिजे, हा सुद्धा एक
आपत्तीपूर्व नियोजनाचा भाग आहे.
सरकारी पातळीवर आपत्ती घडल्यावर मोठमोठी
पॅकेजिस जाहीर होतात. मृतांच्या
नातेवाईकांनी एवढे लाख, जखमींना एवढे, नुकसान झालेल्यांना एवढे, असे पैसे जाहीर
होतात. याची तर गरज आहेच; पण अगोदरच काही पैसा आपत्ती येऊच नये म्हणून उपाययोजना
करण्यावर खर्च केला तर कदाचित अशा प्रकारच्या पॅकेजिसची गरजच पडणार नाही. सरकारी पातळीवर सक्षम अशा आपत्ती व्यवस्थापन
यंत्रणेची आज गरज निर्माण झाली आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा
लागेल. हे तंत्रज्ञान येथील स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्माण केले
जावे. त्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा
अभ्यास करणेही आवश्यक आहे.
नद्यांमधील गाळ काढणे, गटारे साफ करणे, अनधिकृत
बांधकामे रोखणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, भूस्खलन रोखण्यासाठी यंत्रणा राबवणे याबरोबरच आपत्तीच्या
वेळी मोठ्या आवाजाचे स्वयंचलित आलार्म वाजले पाहिजेत, अलार्म वाजल्यावर नागरिकांनी काय करावे? त्याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला दिले पाहिजे. संकटकाळात लोकांचे स्थलांतर करायची वेळ आली तर
लोकांनी काय करावे? त्यासाठी शिस्तबद्ध
यंत्रणा उभी करावी लागेल. एन.डी.आर.एफ. चे
जवान येण्याची वाट बघावी लागू नये. त्यासाठी स्थानिक पातळीवर युवकांना प्रशिक्षण
देण्याची गरज आहे. अशा संकटकालीन मदतीच्या
वेळी केवळ सरकारी पातळीवरून संकटाला तोंड देणं शक्य नाही, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था व सरकार यांच्यात
समन्वय असलाच पाहिजे. आजवरच्या निसर्गातील
मानवी हस्तक्षेपाचा विचार करता अशा आपत्ती या येतच राहणार आहेत; परंतु या आपत्ती मधून होणारे नुकसान टाळण्यासाठी
आपत्तीपूर्व नियोजनावर सर्वाधिक भर द्यावा लागेल, तरच अशा
प्रकारच्या आपत्ती रोखणे व त्याची तीव्रता कमी करणे शक्य आहे.




