मंगळवार, १५ जून, २०२१

गरज निसर्गभक्तीची

 


              निसर्गाचा उल्लेख आपल्याकडे बऱ्याचदा निसर्गराजा असा करतात; पण मला नेहमी तो राजापेक्षा देवा सारखाच वाटतो.  निसर्ग म्हणजे एक दृश्य देव.  देव आहे की नाही हे माहीत नाही; पण निसर्ग मात्र निश्चित आहे.  निसर्ग आपणास भरभरून देतो, आपल्याला जीवन देतो.  अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची ताकत निसर्गात नक्कीच आहे.  निसर्ग पृथ्वीवर जन्मास येणाऱ्या प्रत्येक बालकाला आवश्यक सर्व गोष्टींची तरतूद आधीच करून ठेवतो.  

              माणसाच्या  हव्यासापोटी, ओरबाडण्याच्या वृत्तीमुळे सध्या निसर्गामध्ये आपण खूपच ढवळाढवळ करतो आहोत. पृथ्वीवर आपणास हवे तेवढे प्रत्येकाने घेतले तर काहीही कमी पडणार नाही; पण आपण हवे ते तर घेतोच पण, बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त घेतो. संचय करण्याच्या प्रवृत्तीतून निसर्गाचा आपण वारेमाप वापर करतो आहोत.  निसर्गाचे संतुलन ढासळणे हे मानवाला अजिबात परवडणारे नाही; पण याचा विचार करायला सुखलोलुप माणसाला वेळ नाही.

        पुनर्निर्माण होणाऱ्या साधनसंपत्तीचे एक वेळ ठीक आहे; पण अशी साधनसंपत्ती जी पुन्हा निर्माण होणार नाही, त्याचे काय?  मर्यादित साठ्यात असणारी जैविक इंधने आणि त्याचा होणारा अमर्याद वापर ही अत्यंत चिंतेची बाब आहे.  विकासाच्या हव्यासापोटी आपली या सर्वाकडे डोळेझाक होते आहे. आज निसर्गाचा मोठ्या प्रमाणात -हास होऊ लागला आहे.  याची कारणे शोधायला गेली तर खूप मोठी एकमेकांवर आधारीत गोष्टींची यादीच द्यावी लागेल.  वाढती लोकसंख्या, त्यांच्या गरजा, रस्ते, कारखाने, वाहने, इलेक्ट्रॉनिक साधने त्यांच्यापासून निर्माण होणारे वायू अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला दिसतात.   वातावरणात हे हरितगृह वायू वाढल्यामुळे, ओझोनचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होते आहे आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरील बर्फ वितळणे, कमी दाबाचा पट्टा वारंवार तयार होणे, मोठमोठी वादळे निर्माण होणे हे आपण सध्या अनुभवतोच.

           खरं म्हटलं तर निसर्गसंपत्ती वर सर्वांचा समान हक्क असला पाहिजे; पण काही मूठभर लोक त्याचा वापर करून श्रीमंत होत आहेत.   तर संख्येने मोठे असणारे गरीब लोक त्याचा दुष्परिणाम भोगत आहेत असे एक विचित्र गणित आहे.  वाढते शहरीकरण व पायाभूत सेवा-सुविधा यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आज होत आहे.  ही वृक्षतोड अशीच होत राहिली तर निसर्गाचं संतुलन पूर्णपणे बिघडून जाणार आहे.  आपल्याकडे काहीतरी कृती करण्यापेक्षा सेलिब्रेशन करण्यावर जास्त भर असतो.  जागतिक अमुक दिन, जागतिक तमुक दिन असे अनेक दिन आपण साजरे करतो.  असे दिन साजरे करण्यामध्ये कोणताही आक्षेप नाही; पण असे दिन साजरे करण्यामागचा उद्देश सफल होतो का? हा खरा प्रश्‍न आहे.  काही वेळा हे दिन सरकारी पातळीवरून लादले जातात.  वृक्ष लागवडीच्या मोठमोठ्या बातम्या आपण वाचतो, जेवढ्या मोठ्या माणसाच्या हस्ते वृक्षारोपण झाले तितकी ती मोठी बातमी ठरते; पण एखाद्या वृक्षारोपण कार्यक्रमानंतर जगलेल्या झाडांची संख्या आणि त्याची बातमी सहसा आपणाला वाचायला मिळत नाही, कारण आम्हाला सेलिब्रेशन करायचे आहे, त्यातून निष्पन्न काय झाले? याचा विचार नको आहे.

             खरं म्हटलं तर मी देवाचा भक्त आहे असे अभिमानाने सांगणारे जसे भक्त भेटतात, तसे मी निसर्ग भक्त आहे असे अभिमानाने सांगणारे भक्त वाढले पाहिजेत आणि अशा भक्तीचे मळे फुलले तर माणूस सुखाने श्वास घेऊ शकतो.   आरोग्यदायी जीवन जगू शकतो. आरोग्यदायी जीवन काय असते? हे आपणाला कोरोना महामारीने शिकवले आहेच, फक्त त्यापासून धडा घेऊन निसर्ग भक्त बनवण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

                     

 

_________________________________________________________