आजच्या काळात व्हॉट्सॲप, फेसबूक सारखी समाज माध्यमे खूप मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत, किंबहुना ती जगण्याचा एक भाग बनत चालली आहेत. मोबाईलचा अतिरेकी वापर या माध्यमांमुळे होतो आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. व्हॉट्सॲप वर सतत धडकणारे संदेश बघण्याची, चॅटिंग करण्याची सवय आजच्या तरुण पिढीला जडलेली दिसते. यातूनच व्हॉट्सॲप वरून येणारे संदेश हे खरे मानून तशी कृती करणारे लोक काही कमी नाहीत.
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मानवाने आपल्या विकासासाठी
करण्यात काही चूक नाही: उलट तो केलाच पाहिजे, परंतु त्या
तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामाची बाजूही लक्षात घ्यावी लागेल. (म्हणूनच आज 5G भारतात येऊ नये
अशी काहींची मागणी असलेली दिसते.) या
नवीन तंत्रज्ञानाचा, साधनांचा गैरवापर होणार
नाही, यातून समाजात धोका पोहोचणार नाही ही काळजी आपण
सर्वांनी घेतली पाहिजे.
मानवी प्रवृत्ती मध्ये
काहीवेळा अफवा पसरवण्याची एक प्रवृत्ती असते. एखादी अफवा पसरवायची व नंतर गंमत बघत बसायची अशी
एक वृत्ती काही लोकांकडे असते. काही वेळा
राजकीय पोळी भाजून घ्यायची असते, काही वेळा
जातिभेद - धर्मभेद करायचा असतो. यासाठी अशा लोकांच्या हाती एक प्रभावी साधन आले
ते म्हणजे व्हॉट्सॲप. काही क्षणात एखादी
अफवा पसरवता येते आणि तितक्याच वेगाने त्याचे परिणाम अनुभवता येतात. खरे तर ही एक
विकृतीच म्हणावी लागेल. अशा अफवांना बळी न
पडणे हे सुज्ञ माणसाचे लक्षण ठरेल.
अनेकदा अशा अफवा पसरल्याने जाती-पाती वरून दंगली घडू शकतात, समाजा समाजात तेढ निर्माण होऊ शकते, एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. म्हणूनच असे होणे हे
वाईट आहे. आजच्या कोरोना काळाचा विचार करता, एवढे मोठे गंभीर
संकट आपल्या समोर उभे असताना काही अफवा पसरवणारे लोक या कठीण प्रसंगी ही अफवा
पसरताना दिसतात: आणि दुर्दैवाने काही लोक या अफवांना बळी ही पडताना दिसत आहेत.
व्हॉट्सॲप वर आलेला एखादा संदेश आपण जेव्हा
फॉरवर्ड करतो तेव्हा त्या आधी त्याची पडताळणी करणे एक जबाबदार नागरिक म्हणून आपले
कर्तव्य असते आणि जर आपण त्याची पडताळणी करण्यास असमर्थ असू तर तो संदेश फॉरवर्ड न
करण्याचा शहाणपणा तरी आपल्याकडे असला पाहिजे. खर्या बातमीची, फोटोची
सत्यासत्यता पडताळणीसाठी आज-काल गुगलवर रिव्हर्स इमेज सारखी साधने ही उपलब्ध आहेत.
अशा विविध साधनांचा वापर करून किमान
आपल्याकडून एखादी अफवा पसरवली जाणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो, कारण अफवा पसरवण्याच्या हेतूने ज्याने तो संदेश तयार
केलेला असतो ती व्यक्ती झालेल्या परिणामांना जितकी जबाबदार असते, तितकेच तो संदेश फॉरवर्ड करणारे आपणही जबाबदार असतो.
अशाप्रकारचा संकटात भर घालणारा, समाजात फूट पाडणारा, एखाद्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान करणारा संदेश
सर्वात प्रथम कोणी दिला त्याचा तात्काळ शोध लावणारी सक्षम यंत्रणा आपण निर्माण
केली पाहिजे. इंटरनेटचा महत्तम वापर
करणारा आपला देश असल्याने अशा व्यक्ती शोधणे जरी कठीण वाटत असले तरी
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याला पकडणे नक्कीच कठीण नाही. अशा व्यक्तीवर सक्त कारवाई केली पाहिजे तसेच असा
मॅसेज पसरवणाऱ्या लोकांनाही त्याची शिक्षा मिळाली पाहिजे तरच अशा अफवांवर आपण
अंकुश ठेवू शकतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाने
आपली जबाबदारी ओळखून असे खोटे, अफवा पसरवणारे
संदेश न पसरवणे हेच योग्य होईल. प्रसार
माध्यमांचे योगदानही यासाठी महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने साम टीव्हीवरील ‘व्हायरल सत्य’ हा कार्यक्रम
निश्चितच उल्लेखनीय होता. तसेच एखाद्या जबाबदार व्यक्तीला, एखादा असा संदेश खोडसाळ असल्याचा संशय आल्यास त्याची
सत्यासत्यता पडताळण्याबाबतची यंत्रणा निर्माण केली पाहिजे. सुजाण नागरिकांनी अशा प्रवृत्तींना आळा
घालण्यासाठी पुढाकार घेऊन त्याविषयी समाज प्रबोधन करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
____________________________________________________________________________________

