महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय असे वाटत असतानाच अचानक पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. यावेळी काही लोकांच्या बेजबाबदारपणावर अंगुलीनिर्देश करत मुख्यमंत्र्यांनी ‘मी जबाबदार’ ही घोषणा केली. कठीण प्रसंगी घोषणेला खूप महत्व असते. छ.शिवाजी महाराजांनी ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी’ सारख्या घोषणा देऊन लोकांच्या श्रद्धांचा स्वराज्या साठी खूप चांगला वापर केला होता. घोषणेतून एक बळ मिळतं. त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. ‘चले जाव’ या दोन शब्दांमध्ये किती ताकत आहे? याची प्रचिती आपणास स्वातंत्र्याच्या वेळी आली. ‘जय जवान जय किसान’ यासारख्या घोषणांनी इतिहास घडवला आहे. कोणत्याही युध्दाच्या वेळी घोषणेला तर फारच महत्त्व आहे.
कोरोनाच्या
काळात अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणाही तितकीच महत्वाची आहे. आज अर्थव्यवस्था सुरळीत
करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे
आपोआपच भारत देश आत्मनिर्भर बनेल; परंतु यासाठी
देशात प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर बनण्याजोगे वातावरण असले पाहिजे. संपूर्ण जगात
आपला देश जास्त तरुणांची संख्या असणारा देश आहे, हे जरी खरं असलं
तरी त्या तरुणांच्या हाताला काम नसेल तर काय उपयोग? म्हणून आपण हे काम देऊ शकलो
तरच आत्मनिर्भर बनू शकतो. दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या कमी करणे हे
आपल्या समोरचे फार मोठे आव्हान आहे. त्यासाठी बालवयापासून स्वावलंबनाचे संस्कार
होणे आवश्यक आहेत. प्राण्यांचे निरीक्षण केल्यावर एक बाब दिसते ती
म्हणजे जंगलातील प्राणी त्यांची पिल्ले सक्षम होई पर्यंतच त्यांना आपल्या सोबत
ठेवतात आणि त्यांचे रक्षण करतात. ती पिल्ले स्वतः चे खाद्य स्वतः मिळवू लागली, स्वतःचे
रक्षण स्वतः करण्यास सक्षम झाली की ती आपला स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात. अशाच
प्रकारे आपल्या मुलांना एका विशिष्ट मर्यादे पलिकडे जपणे सोडून दिले पाहिजे. त्यांचा
मार्ग त्यांना शोधू दिला पाहिजे.
कोरोनाला
हरवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी अगोदर 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अशी घोषणा
केली आणि नंतर 'मी जबाबदार' ही लोकांना जाणीव करून देणारी दुसरी घोषणा केली. खर
म्हटलं तर आपल्या बाबतीत जे जे घडते त्याला आपण स्वतःच जबाबदार असतो. त्यामुळे
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तर कोरोना पासून दूर राहणे आपणास काही प्रमाणात
नक्कीच शक्य आहे. ‘कोंकणशक्ती’ दिवाळी विशेषांकात (नोव्हेंबर 2020) ‘कोरोना संकट आणि आपली जबाबदारी’ या लेखात मी अशा जबाबदारी विषयीच्या अनेक मुद्द्यांचा
उल्लेख केला आहे. सद्गुरू वामनराव पै यांचे एक वचन प्रसिद्ध आहे “तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार” याप्रमाणे जसं आपलं जीवन आपण घडवायचं आहे, तसंच आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाला व वाईट कामाला
आपणच जबाबदार असतो. बऱ्याचदा ‘कोरोना बाबत लोक
काळजी घेत नाहीत’ असं आपण सर्वच म्हणतो पण
सर्वात आधी ही काळजी मी किती घेतो? हा प्रश्न महत्वाचा आहे. तो प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
सरकारने
मास्क न वापरल्यास 500 ते 1000 रू. दंड लावला आहे. हा दंड आहे म्हणून मास्क
लावण्यापेक्षा मी मास्क लावणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून मास्क लावणे हे जास्त
महत्वाचे आहे. नाहीतर बऱ्याचदा ते मास्क नाकावर असण्यापेक्षा हनुवटीवरच रहाते. बाकीचे
कोणी मास्क लावत नाहीत तर मी कशाला लावू? असा प्रश्न आपणास पडता कामा नये. या
देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे केलेच पाहिजे. आणि दुसऱ्याला प्रवृत्त केले
पाहिजे. स्वतः नियम पाळणे आणि सामान्य माणसाला नियम पाळायला लावणे ही प्रत्येक
सुशिक्षित नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे.
याच
घोषणेचा थोडा दूरवर विचार केला तर केवळ कोरोनाची लढाई जिंकण्यासठीच नव्हे तर भारतातील
प्रत्येक नागरिक जेव्हा जबाबदारीने वागेल तेव्हा आपण महासत्ता बनण्यास नक्कीच
पात्र असू. बऱ्याचदा आपण आपल्या हक्क आणि अधिकाराबाबत जितके जागरूक असतो तितके कर्तव्ये
आणि जबाबदारीच्या बाबत नसतो. कोणत्याही विकसित देशांचा इतिहास पहाता तेथील
नागरिकां मध्ये असणारी स्वयंशिस्त आणि जबाबदारीची वागणूक हे घटक फारच महत्वाचे
ठरले आहेत. कोणाही सरकारला वाटले म्हणून आम्ही कधीही महासत्ता होणार नाही तर
जेव्हा येथील नागरिक जबाबदारीने वागतील त्याचवेळी हे शक्य आहे.

