सोमवार, १८ जानेवारी, २०२१

आम्हा काय त्याचे ?

 

      दिवसेंदिवस माणूस आत्मकेंद्री होताना दिसत आहे. तरुणांमद्धे आजचा दिवस जगून घ्यावा ही मानसिकता रुजू लागली आहे. त्याचबरोबर सामाजिक पातळीवर आपली जबाबदारी माणूस विसरत चालल्याचे चित्रही दिसू लागले आहे. आपल्या वैयक्तिक वागण्यामध्ये आणि सार्वजनिक वागण्यामध्ये बर्‍याचदा फरक पडतो. स्वतःच्या घराची जेवढी स्वच्छता आपण राखतो तेवढे आपण सार्वजनिक स्वच्छतेबाबत सजग नसतो. एकंदर विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशात याबाबत फार काळजी घेतली जाताना दिसत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर गोव्यामद्धे दोन परदेशी पर्यटक खाल्लेल्या बिस्किटांचे वेस्टन फेकण्यासाठी डस्टबीनच्या शोधात काही किलोमीटर फिरताना मला भेटले होते. आपल्या देशातली अशी किती माणसे आपणाला भेटतील? हा खरा प्रश्न आहे.

      सार्वजनिक ठिकाणी आपण सहजपणे थुंकतो, कचरा टाकतो त्यावेळी आपली भूमिका आम्हा काय त्याचे?’ अशी बेफिकिरीचीच असते. रस्त्याच्या कडेला कोणीतरी माणूस अपघात होऊन पडला आहे. लोकांची गर्दी जमली आहे, पण कोणी हात लावायला तयार नाही, आपणही दुर्लक्ष करून तेथून निघून जातो, नंतर बातमी येते तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच जवळचा नातेवाईक होता आणि उपचाराविना तो आपणास सोडून गेला. तेव्हा वेळ गेलेली असते. अशा कितीतरी बातम्या आपण वाचतो. असे घडते ते केवळ आपल्या अशा तटस्थ भूमिकेमुळे. बर्‍याचदा अशावेळी मदतीपेक्षा ती घटना मोबाइल मध्ये शूट करण्यासाठीच आपले हात सरसावतात. एखादी दुर्दैवी घटना समोर घडताना ती निर्विकारपणे पहाणे ही संवेदनहीन मानसिकता खूपच घातक आहे.  

      कितीतरी वेळा हे काम माझे नाही हे सरकारचे काम आहे किंवा यात माझे काय जाते? गेले तर सरकारचेच जाईल अशी वाक्ये आपणाला ऐकायला मिळतात तेव्हा सरकार म्हणजे कोण? हेच आपणाला नीटसे कळलेले नसते. लोकशाही मध्ये जनतेचेच सरकार असते आणि ही जनताच सरकार चालवत असते. लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून दिलेले असते. ज्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिले आहे ती भूमिका ते योग्यप्रकारे पार पाडत नसतील तर त्यांना आम्ही जाब विचारला पाहिजे; पण असे फारसे घडताना दिसत नाही. मतदानाच्या वेळी आम्ही आमची मतंच जेव्हा विकतो, तेव्हा आम्हा काय त्याचे?’ हीच आपली भूमिका असते. पूर्वी निवडणुकीला उभे राहणार्‍या उमेदवाराला लोक पैसे गोळा करून निवडणुकीच्या खर्चासाठी थैली द्यायचे.  आता हे चित्र उलटे झाले आहे. हे चित्र बदलण्यामागेही हीच भूमिका आहे.

      लोकशाही मध्ये जनआंदोलने होत असतात आणि योग्य मागणीसाठी ती झालीही पाहिजेत, पण बर्‍याचदा त्या आंदोलंनांमधून सरकारी वस्तूंची नासधूसच केली जाते हे अत्यंत दुर्दैवी असते. येथे आपणच आपले नुकसान करत असतो हे लोकांना कळत नसते. हे काम माझे नाही म्हणून बर्‍याचदा आपण एखाद्या गोष्टीकडे डोळेझाक करतो. रस्त्याने चालताना एखादी पाण्याची पाईपलाईन फुटलेली दिसते, कित्येक लीटर पाणी वाया जात असते, आपण काय करतो?, किती लोक ते पाणी बंद होण्यासाठी प्रयत्न करतात? उलट दुसर्‍यादिवशी त्या पाण्यात लोकांनी भिजण्याचा आनंद घेतला अशा बातम्या झळकतात. भर दिवसा जेव्हा रस्त्याच्या कडेच्या सार्वजनिक लाईट्स चालू असतात तेव्हा आम्ही काय करतो? असे अनेक प्रश्न आहेत.

      जाता जाता आपणाला एखाद्या ठिकाणी आग लागलेली दिसते आपण घाईत असतो, आपण तेथून निघून जातो. हळूहळू ती आग वाढत जाते आणि खूप मोठा वणवा पेटतो.  कितीतरी वृक्ष, प्राणी, पक्षी, जीव आगीत होरपळतात, त्यांचे निवास नष्ट होतात. हे नुकसान केवळ आम्हा काय त्याचे?’ या भूमिकेमुळेच झालेले असते. आपल्याकडे असणार्‍या किल्ल्यांसारख्या प्राचीन वास्तु हा आपला ऐतिहासिक ठेवा असतो तो जपणे हे आपले सर्वांचेच काम असते; परंतु पर्यटक म्हणून तेथे गेल्यावर कुठेही कचरा टाकायला, थुंकायला आम्हाला काहीच वाटत नाही. सहजपणे आम्ही आपले नाव तिथल्या दगडावर लिहितो. हे का घडते? तर अशाच बेफिकिरीतून.  


      खाद्यपदार्थांमध्ये घातक गोष्टी मिसळून केवळ नफा मिळवण्यासाठी एखादा उत्पादक
, व्यापारी भेसळ करतो, एखादा डॉक्टर केवळ कमिशन मिळवण्यासाठी पेशंटला अनावश्यक चाचण्या करायला लावतो, अनावश्यक औषधे देतो तेव्हा हा माणसाच्या जीवाशी खेळ आम्हा काय त्याचे?’ या भूमिकेतूनच होतो.  आपल्या आजूबाजूला होणारा भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, अनैतिक बाबी आपणाला दिसत असतात; पण आपण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतो. अशा गोष्टी रोखण्यासाठी काही सरकारी यंत्रणा आहेत, हे जरी खरे असले तरी या यंत्रणांना जनतेने योग्य साथ दिली तर त्या यंत्रणा सक्षमपणे काम करू शकतात, पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही.  कारण आम्हा काय त्याचे ही भूमिकाच येथे प्रबळ होते.

      खरं म्हणजे बालवयातच याबाबत मुलावर योग्यते संस्कार झाले पाहिजेत. मूल्यशिक्षणाचे महत्व येथे अनन्यसाधारण आहे. संस्कारक्षम पीढीच देश घडवू शकते, म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी देशप्रेम, बंधुभाव, सहभाव, अशी मूल्ये रुजवली पाहिजेत. परकेपणाची भावना संपून जेव्हा आपलेपणाची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल तेव्हा आम्हा काय त्याचे?’ ही बेफिकिरीची मानसिकता आपल्यातून निघून जाईल आणि त्याचीच आज आपणाला गरज आहे.