मंगळवार, ३० जून, २०२०

विकास मनुष्यत्वाचा…

             माणसाची उत्पत्ती जरी पशूपासून झाली असली तरी, बुद्धीच्या जोरावर माणसाने आपली प्रगती केली.  सद्यस्थितीत मात्र विकासाच्या प्रक्रियेत आणि हव्यासापोटी माणूस आपले मनुष्यत्व हरवत चालला आहे हे वारंवार जाणवते.  महात्मा गांधी म्हणतात “निसर्गात प्रत्येक माणसाची गरज भागवणारे सर्वकाही आहे” हे खरे आहे; पण माणसाने आपणास हवे तेवढे निसर्गाकडून घेतलेच आणि नको तेही घेतले.  निसर्गाशी प्रतारणा करून, निसर्गाची वारेमाप लूट करून आपण आपली प्रगती कधीच करू शकत नाही, कदाचित आपणास ती प्रगती वाटत असली तरी भविष्यकाळासाठी ती अधोगतीच ठरेल; कारण निसर्गाचा असमतोल ही माणसाला एक न परवडणारी गोष्ट आहे. ‌ माणसाची ही घेण्याची प्रवृत्ती त्याच्या विनाशास कारणीभूत ठरणारी आहे.  अधून मधून  निसर्ग आपले रौद्र रूप धारण करून याची जाणीव करून देत आहे.

माणूस नेहमीच अनाकलनीय असाच आहे तो कोणत्या क्षणाला कसा वागेल? हे सांगता येत नाही. तो सरड्याप्रमाणे रंग बदलतो, फरक इतकाच की सरडा आपल्या संरक्षणासाठी, तर माणूस आपल्या स्वार्थासाठी रंग बदलतो.  माणसांचे हे रूप पाहिल्यावर माधवी देसाई यांची एक कविता आठवते. त्या आपल्या एका कवितेतून माणसाचे वागणे खूप चांगल्या शब्दांत व्यक्त करतात.

जंगलात एक बरं असतं

कारण सारं काही तेथे खरं असतं.

            माणसाच्या जंगलाचा कायदाच न्यारा

            ससा म्हणून जवळ घ्यावं तर

            वाघ बनून नरडीचा घोट कधी घेईल सांगता येत नाही

             वाघ म्हणून दूरून जावं तर  

            ससा बनून कधी पायाशी घोटाळेल हे सांगता येत नाही.

          या ओळींमधून माधवी देसाई माणसाच्या बेभरवशी वागण्यावर नेमका प्रकाश टाकतात. आज माणसाचं वागणं बघितलं की याचं जागोजागी प्रत्यंतर येतं आणि मग व. पु. काळे यांची “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही असं माणूस नावाचं एक यंत्र आहे” ही माणसाची व्याख्या पटायला लागते.

आज माणूस आपलं मनुष्यत्व हरवत चाललेला दिसतो. “स्वतःसाठी कमविणे म्हणजे पशुत्व, आपल्यासाठी कमविणे म्हणजे मनुष्यत्व व परोपकारार्थ कमविणे म्हणजे देवत्व” असे शास्त्रवचन सांगते.  सध्य काळात बलात्कार, हुंडाबळी, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार असे माणसाचे कारनामे बघता मन सुन्न होते आणि मग माणसाचा प्रवास मनुष्यत्वा कडून पशुत्वाकडे चालला आहे की काय? असा प्रश्न पडतो. साधुसंत, ज्यांना आम्ही देवत्व बहाल केलं आहे अशा लोकांकडूनही जेव्हा हीन प्रकार घडतात तेव्हा देवत्वाचा बुरखा बाजूला सरून माणसाच्या आतलं पशुत्वाचं खरं रूप उघडं होतं.

दुसऱ्या बद्दल वाईट चिंतणे, एकमेकांची उणीदुणी काढणे, दुसऱ्याला कमी लेकणे, मी पणा मिरवणे, स्वार्थासाठी लाळघोटेपणा करणे यातच माणूस व्यस्त आहे.  आज गर्दीमध्ये दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणारी माणसे दिसतात.  भेसळ करून फायदा लाटताना सामान्यांच्या आरोग्याचा, धोक्याचा विचार न करणारी माणसे दिसतात.  दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळून आनंदाने उड्या मारणारी माणसे दिसतात.  जीवघेण्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कशाची पर्वा न करता, नीतिमूल्ये गुंडाळून भ्रष्ट वागणारी माणसे दिसतात.  ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याच्यावरच कृतज्ञपणे वार करणारी माणसे आपणास दिसतात.  स्वतःच्या चुकांचे समर्थन करत जगणारी माणसं, दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधणारी माणसं आपणास दिसतात.  माणसाची ही रूपे पाहिली की हरवलेली माणुसकी सहजपणे आपल्या लक्षात येते.

                             

भावाकडून बहिणीवर बलात्कार, बापाकडून मुलीवर बलात्कार, शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, हुंडाबळी, ऍसिड हल्ले, एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळणे  हे सर्व पाहिले की खरोखरच शरमेने मान खाली जाते.  दिल्ली बलात्कार प्रकरण, हैदराबाद बलात्कार प्रकरण यासारखी अनेक प्रकरणे नित्यनेमाने चालू आहेत.  ज्यांना आम्ही साधुसंत मानतो त्यांनाही कोणत्यातरी वाईट कृत्या साठी जेल मध्ये जावे लागते आहे.  विकासाच्या अत्युच्च टोकावर असणाऱ्या माणसाकडून अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटना ही माणसाची अधोगतीच म्हणावी लागेल.  अशा घटना पाहिल्यावर माणसाचा प्रवास मनुष्यत्वा कडून पशुत्वाकडे चाललेला आहे की काय?  असा प्रश्न पडतो.

कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या, अपंगांची सेवा करणाऱ्या, गरिबांची सेवा करणाऱ्या अशा माणसांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि अशा काही मोजक्या माणसांकडे बघितल्यावरच आपणाला जगण्याची उमेद येते. जर प्रत्येकाने भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, आई-बाप, मित्र आणी शेवटी माणुस हे नातं जोपासलं तर जग सुंदर व्हायला वेळ लागणार नाही.  “माणसातल्या मनुष्यत्वाचा 100% विकास म्हणजे त्याचा देवत्वाकडचा प्रवास” असे म्हणता येईल.  आज देवत्वा पेक्षा माणसांमध्ये मनुष्यत्व जोपासण्याची गरज निर्माण झाली आहे.  आपणाला पुढच्या पिढी मध्ये मनुष्यत्वाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपणालाच माणुसकी जोपासावी लागेल.  आपल्यातलं मनुष्यत्व विकसित करावं लागेल त्याच वेळी आपण पुढच्या पिढीवर चांगले संस्कार घडवू शकतो.

 


शनिवार, ६ जून, २०२०

चर्चा ऑनलाईन शिक्षणाची

    पाटीवर वळणदार ‘गमभन’ लिहून आमच्या पिढीच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.  हळूहळू त्यात बदल होत होत पुढच्या पायऱ्या सुरू झाल्या. ब्लॅक बोर्ड, ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड, एल.सी.डी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशी काही साधने पुढे पुढे बघायला मिळालीआजची कोरोना पार्श्वभूमीची परिस्थिती पाहता, शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची वेळ आली की काय? असा प्रश्न मनात येतो.  अगदी या परिस्थितीमुळे आज परीक्षाही रद्द करण्याची वेळ आली.  या पास होणाऱ्या बॅचला पुढे कदाचित ‘कोरोना बॅच' असेही ही नाव ठेवले जाईल. कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार हे निश्चित झाले.  त्यात शिक्षण क्षेत्राचे काय होणार? हा शिक्षण तज्ज्ञांबरोबरच सामान्य विद्यार्थ्यालाही पडलेला प्रश्न आहे.
शिक्षण क्षेत्राबाबत जे विविध तर्कवितर्क केले जात आहेत त्यात चर्चा आहे ती ऑनलाईन शिक्षणाची.  -लर्निंग, ब्लेंडेड लर्निंग, रिमोट लर्निंग यांचीही चर्चा झाली. फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने यासारखा उत्तम उपाय दुसरा असूच शकत नाही यात संदेह नाही; परंतु आज आपल्या देशाच्या परिस्थितीचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.  सुमारे ७० टक्के लोक आज खेड्यात राहतात.  खेडेगावात पुरेशा सुविधा आजही पोहोचलेल्या नाहीत.  मुख्य म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी वीज आणि इंटरनेट या दोन गोष्टी ग्रामीण भागात पोहोचल्या आहेत का? पोहोचल्या असतील तर त्यांची स्थिती काय आहे? त्या किती सक्षम आहेत?  किती टक्के विद्यार्थ्यांकडे संगणक आहे?, इंटरनेटची व्यवस्था आहे?, किती टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे?, किती टक्के विद्यार्थ्यांकडे टी.व्ही., रेडिओ आहे?  याचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.   इलेक्ट्रॉनिक साधनांचा डोळ्यांना होणारा त्रास, सखोल वाचनाची सवय कमी होण्याची शक्यता, शिक्षकांच्या नोकऱ्यांचा प्रश्‍न हे धोकेही या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील.  
भारत हा बहुभाषिक देश आहे.  मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगले, हे भाषा तज्ज्ञ सांगतात, मग हे ई-लर्निंग, ऑनलाइन शिक्षण मातृभाषेतून दिले जाणार का? असेही प्रश्न निर्माण होतातदुसऱ्या बाजूने विचार करता ऑनलाईन शिक्षणाचे फायदेही भरपूर आहेत.  विद्यार्थ्यांना एका वेगळ्या अनुभवाची प्रचिती येथे येऊ शकते.  वेगवेगळ्या ऑडिओ- व्हिडिओंच्या माध्यमातून निरनिराळ्या कृती, रंजक उदाहरणांतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकते; पण त्यासाठी काही महागडी साधने उपलब्ध असणे आवश्यक आहे.  अशा काही साधनांची उपलब्धता जरी सरकारी पातळीवरून किंवा दानशूर व्यक्तींकडून केली गेली तरी पुढचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्याच्या वापराचा, प्रशिक्षणाचा.  
नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे सहज शक्य नसते.  अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर, लाॅकडाऊनच्या काळात अनेक वेबिनार्स झाले, त्यावेळी त्याची प्रचिती आली. अगदी वक्त्यांनाही आपला माईक कसा धरावा?, कसे बसावे?, कोठे बसावे? हे माहीत नव्हते.  सहभागी लोकांपैकी काहीजण आपला व्हिडिओ प्रसारित होत आहे हे कदाचित माहित नसल्याने बनियनवर बसलेले पहायला मिळाले. स्वतःला म्यूट कसे करायचे?  हे माहीत नसल्याने घरातला सर्व गोंधळ त्या वेबिनार्स मध्ये व्यत्यय आणत होता. चॅट बॉक्सचा (वेबिनार सुरू असतानाच) गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि सर्टिफिकेट मिळवण्यासाठी केलेली फीडबॅक लिंकची मागणी असा केलेला वापर हे सर्व पाहिल्यावर प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली.
ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम हा भारताचा विचार करून केला गेला पाहिजे.  सर्वप्रथम शिक्षक प्रशिक्षण आणि तेही त्यांच्या मातृभाषेत देणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे.   डी.एड., बी.एड.च्या अभ्यासक्रमांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापराचा समावेश केला पाहिजे.  ज्या शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवणे थोडेसे कठीण वाटत असेल त्यांनी  आजच्या परिस्थितीनुरूप, सकारात्मकतेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतरी भविष्यात हे आपणाला करावे लागणारच आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले जावे केवळ इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्याचे शिक्षण देऊन चालणार नाही, तर ती सुरक्षितपणे कशी वापरावीत हे ही शिकवले गेले पाहिजे.  सायबर क्राईमचाही अभ्यास त्यात असावा.  इंटलेक्च्युअल प्राॅपर्टी राईटचेही शिक्षण दिले गेले पाहिजे.  फेक वेबसाईट कशा ओळखाव्यात? ॲप्स डाऊनलोड करतानाची काळजी हेही शिकवले गेले पाहिजे.  ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुले मोबाईल गेम खेळणार नाहीत ना? यावरही पालकांनी नजर ठेवणे आवश्यक ठरेल. ऑनलाइन कोर्सेस करताना परदेशी कोर्सेस कडे विद्यार्थ्यांचा कल जास्त असेल, मग त्यातून फसवणूक तर होणार नाही ना? याचीही काळजी घ्यावी लागेल.  अभ्यासक्रमांमध्ये या प्रशिक्षणाचा समावेश केला पाहिजे.  उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची निवड झाल्यावर त्यांना लगेचच अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची सक्ती करणे आवश्यक आहे.  तर या वापराची समस्या काही अंशी कमी होईल.
सध्याची परिस्थिती जरी कठीण असली तरी पारंपरिक शिक्षण पद्धत आता लयाला जाणार असे होणार नाही; कारण क्लासरूम टिचींग ची जागा इतर कोणती पद्धत घेणार नाही यात शंकाच नाही.  त्यामुळे आजच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संशोधकांनी, शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी पुढे येण्याची गरज आहे.  पाचव्या लॉक डाऊनला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘पुनश्च हरिओम', ‘ही एक नवीन सुरुवात आहे' असे म्हटले आहे‌.  त्यादृष्टीने शिक्षणाच्या बाबतीतही आपल्याला काही नवीन प्रयोग करावे लागतील,  नवीन सुरुवात करावी लागेल.  सरकारने आज अशा प्रकारच्या संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे.  कोणत्याही समस्येला उत्तर हे असतेच, हे उत्तर आपणाला लवकरात लवकर व आपल्या देशाच्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून मिळवायचे आहे.
विद्यार्थ्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत या समस्येला सामोरं गेलं पाहिजे.  परिस्थितीशी सामना करणारा मोठा होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे.  या सर्व बदलांना संधी मानली पाहिजे.  कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे.  विद्यार्थ्यांनी योग्य शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो अशा शिक्षणक्रमाची निवड केली पाहिजे.  नुकतेच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत' अशी जी घोषणा केली त्यादृष्टीनेही हे महत्त्वाचे ठरेल.  जगाची आजची मागणी काय आहे?  याचा नीट दूरदृष्टीने विचार केला पाहिजे.  पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात पारंपरिक शिक्षण घेण्याचीही परिस्थिती नव्हती 4-5 किलोमीटर पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते.  गरिबीमुळे कित्येकांना शाळा सोडावी लागत होती.  अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही त्यांना त्याचे फळही मिळाले.  त्यामुळे शिक्षण कोणत्याही प्रकारचे दिले गेले, कोणत्याही साधनांतून, माध्यमांतून दिले गेले, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्या सर्व वातावरणाशी जुळवून घेऊन शिक्षण घेतले पाहिजे, एवढे मात्र नक्की.
-------------------------------------------------------------------------------------------------वाचकहो !
सर्वप्रथम आपण माझ्या लेखनासाठी जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवादहा ब्लॉग वाचून आपणाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही खालील टॅबवर क्लीक करून माझ्या "उत्कृष्ट वाचक प्रतिक्रिया स्पर्धेत" सहभागी होऊ शकता.
·       स्पर्धकांसाठी सूचना -
1.  कॉमेन्टबॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया लिहा आणि त्याखाली आपले नाव लिहून ई-मेल आय.डी. लिहा. आणि PUBLISH टॅब वर क्लिक करा. 
2. नाव न लिहिल्यास त्या प्रतिक्रियेचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही
3. आपली प्रतिक्रिया १०० पेक्षा कमी शब्दांमध्ये लिहावी.
4. उत्कृष्ट प्रतिक्रियेसाठी आपणास अमेझॉन गिफ्ट कार्ड मिळेल.
5. स्पर्धेचा निकाल https://drrajeshrajam.in या वेबसाईट वर आपणास सोमवार                             दिनांक १५ जून २०२० रोजी पाहता येईल.