बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

सन्मान उपक्रमशीलतेचा

   


तमाम भारतीयांची, महाराष्ट्रीयनांची, किंबहूना शिक्षकांची मान उंचावणारी, ऊर भरून यावा अशी घटना नुकतीच घडली, ती म्हणजे युनेस्को व लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर' पुरस्कार आपल्यातीलच एका मराठमोळ्या शिक्षकाला मिळाला.  हे शिक्षक म्हणजे बार्शी येथील खांडवी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक रणजीत सिंह डिसले. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय.  या त्यांच्या यशाचा प्रत्येक शिक्षकाला, भारतीयाला सार्थ अभिमान असणारच.

     अलीकडेच एका कुठल्यातरी वृत्तपत्राच्या संपादकाने शिक्षकांविषयी अर्वाच्च भाषेत, अशोभनीय वक्तव्य केली होती.  या घटनेने अशा लोकांना एक सणसणीत चपराकच बसणार आहे.  हा सन्मान मिळण्यापूर्वी डिसले गुरुजींना उपक्रमशीलता लक्षात घेऊन, काळाची पावले ओळखून त्यांचे शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग बघून मायक्रोसॉफ्ट या कंपनीनेही पुरस्कार दिला होता.  अर्थात त्यांचे शिक्षण क्षेत्रातील हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे म्हणूनच त्यांचा हा गौरव झाला.

     बऱ्याचदा आपल्या गुणवत्तेवर जेव्हा परदेशातून शिक्का बसून येतो, तेव्हा आपल्याला जाग येते.  खरं म्हणजे आपल्या देशात प्रचंड गुणवत्ता आहे, पण जेव्हा त्या गुणवत्तेची दखल घेतली जात नाही, त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही, तेव्हा ती गुणवत्ता झाकोळली जाते. आज आपल्या देशाचे अनेक उच्चशिक्षित जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये नोकरी करतात तेव्हा त्यांची बुद्धी, कौशल्य ते दुसर्‍या देशाच्या विकासासाठी वापरत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. 

     गरज आहे ती विविध क्षेत्रात अशा गुणवंतांचा, विद्वानांचा शोध घेण्याची. त्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, निवड चाचण्या अशा गोष्टी करून त्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी संख्येने कमी असलेल्या मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्य निर्माण केले यामागे गुणवत्ता ओळखून माणसांची केलेली निवड हे प्रमुख कारण होते.  योग्य माणसांच्या हाती योग्य काम देणे हे सूत्र वापरणे आवश्यक आहे.  आपल्या देशात या गोष्टींची खूप कमतरता जाणवते.  वशिला, पैसा यांचे वर्चस्व वाढल्याने ही आजची अवस्था आहे.  येथे मला स्वर्गीय मच्छिंद्रनाथ कांबळी यांचा 'वस्त्रहरण' नाटकातील एक मालवणी संवाद आठवतो “सगळी साली वशिल्याची पात्रा भरून ठेवल्यानी हत” खरोखरच हा संवाद म्हणजे आजच्या नोकर भरतीबाबतचे जळजळीत वास्तव आहे.  जर कोणतीही गुणवत्ता नसताना केवळ वशिल्याने भरती होणार असेल, तर प्रगती कशी होणार? हा प्रश्न आहे.

     आपल्या प्राथमिक शाळांची ढासळणारी परिस्थिती पाहता शिक्षकी पेशावर प्रेम करणारे, आपल्या कामावर प्रेम करणारे असे अनेक डिसले गुरुजी तयार झाले पाहिजेत.  डिसले गुरुजींकडून प्रेरणा घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे 7 कोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्यावर केवळ त्यांचीच पीढी नाही तर पुढच्या काही पीढ्यांचे कल्याण करू शकणाऱ्या या रकमेतील निम्मी रक्कम त्यांनी आपल्या सारखेच काम करणाऱ्या जगभरातल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीतील नऊ जणांना देऊ केली आणि आपल्यासाठी उरलेल्या रकमेचाही विनियोग शैक्षणिक कामांसाठी करण्याचा मनोदय व्यक्त करण्यातून भारतीयांची एक वेगळी ओळखच त्यांनी जगाला करून दिली.

     काळाची पावले ओळखून त्यांनी राबवलेले 'अराउंड वर्ल्ड’, 'हॉर्न टी.व्ही. ऑफ’, 'व्हर्च्युअल फील्ड ट्रिप’, 'क्यू.आर.कोड' हे विविध स्मार्ट उपक्रम खरोखरच लक्षणीय असेच आहेत.  प्रत्येक क्षेत्रातील असे हिरे शोधून त्या त्या क्षेत्राच्या विकास गटांची निर्मिती केली गेली तर भारताची प्रगती आणखी झपाट्याने होईल यात शंकाच नाही.  अशा उपक्रमशीलतेचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि असे उपक्रम प्राधान्याने आपल्याकडे राबवले गेले पाहिजेत असे मनोमन वाटते.

--------------------

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

माझे दत्तक झाड


 

माझे दत्तक झाड

      जादूगाराने आपल्या पोतडीतून वाट्टेल ते बाहेर काढून प्रेक्षकांना दाखवावे तसे माझ्या आठवणींच्या पोतडीत हात घातला तर अनेक रंगीबेरंगी आठवणींचा खजिनाच हाती लागतो. त्यातही माझ्या गावाकडच्या आठवणी, माझ्या प्राथमिक शाळेतल्या आठवणी तर मनाच्या तळाशी कुठेतरी खोलवर झिरपून राहिल्या आहेत. त्यातलीच एक आठवण म्हणजे दत्तक झाडाची.

      माझ्या प्राथमिक शाळेने माझ्यावर जे अनेक संस्कार केले त्यातला एक संस्कार म्हणजे वृक्ष प्रेमाचा. माझी प्राथमिक शाळा म्हणजे खेडेगावातील शाळा असली तरी जिल्हा परिषदेच्या शाळेहून वेगळी होती. किनारपट्टी भागामद्धे सरकारने प्रत्येक तालुक्यात एक फिशरीजचे शिक्षण देणारी एक शाळा असावी या हेतूने देवगड तालुक्यात माझ्या तांबळडेग गावाची निवड केली होती. जि.प.च्या शाळेपेक्षा येथे वेगळं म्हणजे फिशरीज आणि सुतारकाम हे दोन विषय शिकवले जात. दोन अडीचशे घरे असणारं माझं छोटसं गाव असलं तरी सातवी पर्यंतच्या सर्व वर्गांमद्धे खूप मुलं असायची. इंग्रजी सी आकाराची सात वर्ग खोल्यांची एक सुबक इमारत, बाजूलाच स्वतंत्र ऑफिस, स्टाफ रूम, सुतारकामा साठी प्रशस्त खोल्या असणारी दुसरी इमारत, आठ दहा शिक्षक, एक शिपाई, एक नाईट वॉचमन आणि मुलांनी भरलेले सात वर्ग असा आमच्या शाळेचा रुबाबदार थाट होता.

      मत्स्यव्यवसाय शाळा, तांबळडेग ही आमची शाळा जशी बाहयांगाने सुंदर होती तशीच ती अंतरंगानेही सुंदर होती. शाळेमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम व्हायचे त्यातून आमच्यावर चांगले संस्कार होत गेले. आठवड्यातून एक दिवस संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असायचे. त्यासाठी प्रत्येक वर्गाचा एक कलाविष्कार हवा असायचा त्यामुळे नकळतपणे आम्ही गायन, वादन, नृत्य, अभिनय कधी करू लागलो ते कळलेच नाही. सकाळची परिसर सफाई, प्रार्थना, सुविचार, संध्याकाळी विश्वशांतीचा संदेश देणारे पसायदान या सर्वातून आम्हा विध्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडत गेले.

      माझ्या शाळेचे नाव समोर आलं, आठवण आली की एक आठवण एकदम ताजीतवानी होऊन माझ्या समोर येते, ती म्हणजे दत्तक झाडाची’.  इयत्ता सातवीत असताना आमच्या शाळेने एक उपक्रम हाती घेतला होता तो म्हणजे वृक्ष लागवडीचा. वृक्षलागवडीचे अनेक कार्यक्रम पुढे मी पाहिले अगदी एकाच खड्ड्यात दरवर्षी वृक्षलागवड करणारेही दिसतात किंवा केवळ फोटोसाठी असे उपक्रम राबवणारे कमी नसतात. पण आमच्या शाळेची ही दत्तक झाडाची संकल्पना खूपच छान होती. आम्हाला आमच्या शिक्षकांनी वृक्षलागवडीचे महत्व समजावले आणि प्रत्येकाच्या हस्ते शाळेच्या परिसरात एक झाड लावलं जाणार आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी समजावून सांगितली. त्यावेळी वयापरत्वे आमच्या चेहर्‍यावर नाखुशी पसरली असली तरी हळूहळू आपल्या हस्ते एक झाड लावलं जात आहे ही भावनाही सुखद वाटू लागली.

      आमच्या कडून सुबाभूळ, निलगिरी, सुरू, आकेशिया अशी विविध प्रकारची झाडे लावली गेली. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळीही उपस्थित होती. माझ्या वाट्याला निलगिरीचे झाड आले. अगदी प्रवेशद्वारा जवळच त्याला जागा मिळाली. त्याचवेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला आपापलं झाड मोठं करायचं, त्याला रोज सकाळी पाणी द्यायचं, त्याची निगा राखायची अशा अनेक सूचना दिल्या.

      दुसर्‍या दिवसापासून आमचं एक नवीन काम सुरू झालं. सुरूवातीला थोडसं नाखुशीने सुरू झालेल्या कामाची पुढे पुढे एकदम सवयच लागून गेली. त्यातच माझ्या या सवयीला खत पाणी घालण्याचे काम रामा सादये या माझ्या मित्राने केले. आम्हा सर्वांमध्ये रामा आपल्या सुबाभुळीच्या झाडावर खूपच प्रेम करायचा. तो आपल्या झाडाला सकाळी शाळा सुरू व्हायच्या आत आणि संध्याकाळी शाळा सुटल्यावर  अशा दोन वेळा पाणी द्यायचा. त्याच्याबरोबर मी सुद्धा तसेच करू लागलो. हळूहळू झाडांच्या वाढीबरोबर आमचा उत्साहही वाढू लागला. मोंडकर गुरुजी, कोचरेकर गुरुजी आम्हाला प्रोत्साहन देवून आम्हाला आणखी प्रेरित करायचे. याचा परिणाम म्हणजे आमची झाडे खूप छान जोम धरू लागली होती. लावलेल्या झाडांमध्ये दोन चार झाडे मेली असली तरी जगलेली आमची झाडं शाळेच्या परिसराची शोभा वाढवू लागली.

      अनेक वर्षांनंतर आता जेव्हा शाळेच्या परिसरात जाणं होतं तेव्हा सर्वप्रथम माझं लक्ष जातं ते मी लावलेल्या, मी जगवलेल्या माझ्या दत्तक झाडाकडे. आज त्या झाडवरच्या पक्ष्यांचा किलबिलाट, त्याने दिलेली प्रशस्त सावली, शाळेच्या परिसराची वाढवलेली शोभा पाहिली की ते झाड वाढवण्यातला आपला खारीचा वाटा आठवतो आणि भूतकाळात हरवायला होतं, आणि मन प्रसन्न होतं.

      अलीकडेच शाळेकडे जाणं झालं आणि उंच वाढलेल्या माझ्या झाडाकडे लक्ष गेल्यावर झालेल्या आनंदा पेक्षा आपले झाड सर्वांपेक्षा चांगले वाढावे म्हणून जीवापाड प्रयत्न करणार्‍या माझ्या मित्राचे, रामाचे झाड त्याच्यासारखेच अकाली मृत झालेले बघून माझा कंठ दाटून आला.  आज रामा या जगात नाही, शाळेच्या परिसरात गेल्यावर त्या झाडाच्या रूपाने त्याची आठवण मला नियमित व्हायची, आता मात्र त्या जागेवर ते झाड नसल्याने माझे मन विषण्ण होते. शाळेने मला एक गोड संधी दिली होती आणि रामाने मला वृक्ष प्रेम शिकवले होते.

      आज शाळेची इमारत जुनी झाली आहे, शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे, शिक्षक संख्या कमी झाली आहे, विद्यार्थी संख्या कमी झाली आहे, आम्ही लावलेली झाडेही कमी झाली आहेत पण त्याच्याबरोबरच्या आठवणी मात्र आजही ताज्या अशाच आहेत.  आणि त्यात रममाण होण्यातला आनंदही निर्भेळ असाच आहे.   

 

     

 

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

 

प्रेरणा वाचनाची

___________________________________________________________________________________

आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त केलेला लेखन प्रपंच. 

_________________________________________________________________________

दिसामाजि काहीतरी ते लिहावे I

प्रसंगी अखंडित वाचीत जावे I’

समर्थ रामदास स्वामींनी हे वचन खूप अगोदर आपणास सांगितले आहे.  त्यात रामदास स्वामी लेखन करण्याचा आग्रह धरतात आणि ते शक्य नसेल तर प्रसंगी वाचन करण्याचाही सल्ला देतात.  याठिकाणी ते अखंडित वाचन करण्यास सांगतात, कारण अखंडित वाचनातून वाचनाची सवय लागते.  एकदा वाचनाची सवय लागली की माणूस त्यावर विचार करायला लागतो, चिंतन करायला लागतो, मनन करायला लागतो आणि नंतर त्याच्या मनात एक आनंद निर्माण होतो, अस्वस्थता निर्माण होते.  मिळालेला आनंद इतरांना वाटावा किंवा आलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याला लेखनाचा आधार घ्यावासा वाटतो.  अनेक लेखनाची निर्मिती या अवस्थेतच झालेली दिसते. म्हणजेच वाचन आणि लेखन एकमेकांशी घट्ट धाग्याने विणलेल्या दोन गोष्टी आहेत.

      वाचनाची सवय बालपणापासून लागणे आवश्यक आहे.  त्यामुळे आपल्या पाल्याला वाचण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी पालकांची, गुरुजनांची असते.  मुळात आपल्या हातात पुस्तक असले तरच ते आपल्या मुलाच्या हातात येणार हे प्रत्येक पालकाने लक्षात घेतले पाहिजे.  "माझा मुलगा/मुलगी किती लहान वयात मोबाईल वापरतो/वापरते" याविषयी पालक मोठ्या अभिमानाने बोलत असतात.  येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लहानपणापासून त्या मुलाने घरातील सर्वांच्या हातात मोबाईल बघितलेला असतो आणि त्याला तो सहज उपलब्ध होतो,  तसेच घरातील सर्वांच्या हातात जर त्या मुलाने पुस्तक बघितलं आणि जर त्याला ते सहज उपलब्ध झालं तर त्या मुलाचा कल पुस्तकाकडे स्वाभाविकपणे वळू शकतो.



      वाचनाचे वातावरण निर्माण करण्यासाठी घरामध्ये एक छानसं पुस्तकाचं कपाट असायला हवं.  मोबाईलचं रिचार्ज ज्या सहजतेने होतं त्या सहजतेने पुस्तकं विकत घेतली गेली पाहिजेत.  मुलाच्या वयानुसार त्याला तशी पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत.  एखाद्या ग्रंथालयाचं त्याला सभासदत्व घेऊन दिलं पाहिजे. तो काय वाचतो आहे? यावर पालकांनी त्याच्याशी चर्चा केली पाहिजे. तरच ही वाचन संस्कृती वृद्धिंगत होत राहील. बऱ्याचदा आपण केवळ वाचन संस्कृतीचा लोप होतोय याचाच पाढा वाचत बसतो, पण ती टिकवण्यासाठीचे प्रयत्न करायला तयार नसतो. त्यासाठी सर्वप्रथम वाचनाचे महत्व शिक्षक व पालकांनी जाणून घेणे आवश्यक आहे आणि तरच वाचनाच्या माध्यमातून पुढची पीढी आपण घडवू शकतो. (माझ्या दिनांक 9 ऑगस्ट च्या 'वाचू आनंदे' या ब्लॉग मध्ये मी वाचनाचे महत्व विस्ताराने संगितले आहे.)

          का वाचावे?  काय वाचावे?  कसे वाचावे?  असे काही प्रश्न आजच्या तरुणांसमोर असू शकतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांना सांगणे आवश्यक आहे. वाचनाने काय बदल होतात? हे आपण त्यांना समजावून संगितले पाहिजे. महान व्यक्ती पुस्तकांमुळे कशा घडल्या? याची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवली पाहिजेत. एकदा पुस्तके का वाचावीत? या प्रश्नाचे उत्तर सापडले की मग काय वाचावे? या प्रश्नाचा उलगडा व्हायला मदत होते. बाजारात अनेक प्रकारची पुस्तके असतात, त्यातली कोणती पुस्तके निवडावीत? हे अनुभवाने सहज शक्य होते. आणि ही निवड आपल्या घडण्यावर परिणाम करणार असते. म्हणून निवडही तितकीच महत्वाची आहे.

        का वाचावे?, काय वाचावे? या प्रश्नांच्या उकलींनंतर कसे वाचावे? हा प्रश्नही महत्वाचा आहे. याबाबत बेकन यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. “काही पुस्तकांची नुसती चव घ्यायची असते, काही गिळायची असतात तर काही थोडी सावकाश चर्वण करून पूर्ण पाचवायची असतात.” यातून वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. पुस्तकाच्या स्वरूपानुसार वाचनाचे स्वरूप असले पाहिजे. जी पुस्तके आपणाला विचार प्रवृत्त करतात ती परत परत वाचली पाहिजेत, त्यांचं चर्वण केलं पाहिजे, ती पचवली पाहिजेत आणि त्या विचारांचा उपयोग समाजासाठी करून दिला पाहिजे. अशी पुस्तके आपण एकमेकांना भेट दिली पाहिजेत, ती सर्वांनी वाचावीत यासाठी एकमेकांना प्रेरित केले पाहिजे.



         डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करतो. डॉ. कलाम यांचे विचार, लेखन इतकेच नव्हे तर त्यांचे संपूर्ण जीवनच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. अनेक महान व्यक्ती या वाचनामुळे घडल्या आहेत, त्यामुळे अशा व्यक्तींच्या कृती, उक्ती वाचनातून समजून घेऊन, त्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन फुलवले पाहिजे. पुस्तके म्हणजे बुद्धीचे अन्न आहे. ही पुस्तके ज्ञानदीप आहेत. त्याच्यावरची गुंतवणूक म्हणजे ज्ञान व संस्कृती यातील गुंतवणूक असते. म्हणूनच ही गुंतवणूक आपण सर्वांनी केली पाहिजे. आज या गुंतवणुकीची फारच गरज निर्माण झाली आहे हे निश्चित.    

 

 

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

तेथे कर माझे जुळती…..

 

                                        

जेथे जेथे काहीतरी भव्य दिव्य आहे तेथे तेथे आपले कर आपोआप जुळतात, ते जोडावे लागत नाहीत. असेच एक भव्य दिव्य काम करणारे स्थान म्हणजे शिक्षक. एक सर्वार्थाने आदर्श शिक्षक असणारे एक महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. गुरूजनांच्या प्रती आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत त्याच्या गुरूंचा वाटा फारच महत्वाचा असतो.  प्रत्येक क्षेत्रात मोठ्या झालेल्या व्यक्ती नेहमीच आदराने आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरूंना देताना दिसतात.

शिक्षक हा एक शिल्पकार असतो.  शिक्षक ही काही नोकरी नाही ते एक व्रत आहे.  येथे पावित्र्य, मांगल्य, प्रेम, सद्भावना, सदाचार, निष्ठा, ज्ञान यांचा ठेवा असतो. शिक्षकाची भूमिका एखाद्या शिडी सारखी असते,  प्रत्येक जण त्या शिडीचा उपयोग आपल्या जीवनात उंची गाठण्यासाठी करत असतो, पण ही शिडी मात्र आपल्या जागी घट्ट उभी असते.  शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांप्रती सहभावाने, सद्भावनेने वागतात आणि ज्ञानदानाचे कार्य करतात तेव्हा तेथे एक ऋणानुबंध तयार होतो.

ऋणानुबंधाच्या संदर्भात मला एक प्रसंग उद्धृत करावासा वाटतो तो म्हणजे, म्हैसूर विद्यापीठातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना कोलकाता विद्यापीठात बोलावणं आलं, तेव्हा म्हैसूरचे सारे लोक व्यथित झाले, त्यांना नाईलाजाने निरोप द्यावा लागला, तेव्हा तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या बग्गीचे घोडे सोडले आणि स्वतः ती बग्गी ओढली. धन्य ते गुरु आणि  धन्य ते शिष्य ! या प्रसंगावरून डॉ. राधाकृष्णन यांच्यावरील विद्यार्थ्यांचे प्रेम, भक्ती किती दृढ होती याची कल्पना येते.

शिक्षकाची सेवा ही चैतन्य दायी असते.  वर्गाचा चैतन्यमय झरा बनवण्याचे काम शिक्षक करतात.  विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम शिक्षक करतात.  त्यांना मुलांबरोबर मूल व्हावं लागतं.  उड्या माराव्या लागतात,  अभिनय करावा लागतो.  सर्वच क्षेत्रातील महान व्यक्तींना घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतात.  आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावा, उच्चपदस्थ व्हावा असे शिक्षकांना नेहमीच वाटत असते.  इतर क्षेत्रांमध्ये आपल्याला हे फारसे दिसत नाही.  विद्यार्थ्यांच्या श्रेष्ठपणामुळे, प्रसिद्धीमुळे शिक्षक ओळखले जाणे हा त्या शिक्षकांचाच सन्मान असतो.

आजच्या काळात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काही अपप्रवृत्तीही दाखल झालेल्या दिसतात. शिक्षणाच्या खाजगीकरणाबरोबर या क्षेत्राला काही अंशी व्यापारी स्वरूप आलेले दिसते.  शिक्षण देण्याचा उद्देश जेव्हा पैसा असतो तेव्हा त्याचे स्वरूप बदलणे क्रमप्राप्त आहे. यातूनच पूर्वीचे शिक्षण, त्याचे स्वरूप आणि आजचे शिक्षण आणि त्याचे स्वरूप यात फरक पडत गेला.  पूर्वीच्या काळी शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती होती ती आता फारशी राहिली नाही.



चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची मानसिकताही चांगली असणे आवश्यक आहे. शिक्षक समाधानी असणे गरजेचे आहे.  बऱ्याचदा शिक्षकांना दिली जाणारी शिक्षणेतर कामे, बदल्यांचे प्रश्न, पेन्शनचे बदलणारे स्वरूप, विशिष्ट विषय शिक्षकाला दुसराच एखादा विषय शिकवायला लागणे, सरप्लस होणे, शिक्षण सेवक, घड्याळी तासिका तत्वांवर नेमणुका यासारख्या असंख्य प्रश्नांनी शिक्षकांची मानसिकता बदलताना दिसते आहे.  या सर्वाचा परिणाम चांगल्या शिक्षणावर निश्चितच होत आहे.

व्यक्तीच्या जडणघडणी बरोबरच देशाच्या जडणघडणीतील, विकासातील शिक्षण क्षेत्राचे योगदान लक्षात घेऊन जेवढी गुंतवणूक या क्षेत्रात केली गेली पाहिजे, तेवढी ती केली जात नाही. मराठी शाळांची स्थिती तर खूपच वाईट होताना दिसते आहे. विद्यार्थी संख्या कमी म्हणून एक शिक्षक चार चार वर्ग सांभाळत असेल तर तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना काय न्याय देणार?  आणि मग चांगले शिक्षण मिळत नाही म्हणून पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवणार असे हे दुष्टचक्र सुरु झालेले दिसते.  हे दुष्टचक्र, अपप्रवृत्ती थांबाव्यात, शिक्षकांच्या समस्या सुटाव्यात आणि शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य अबाधित राहावे अशी प्रार्थना या शुभदिनी करावीशी वाटते.

आजच्या या दिनी माझ्या आई वडिलांबरोबरच मला घडवणाऱ्या  माझ्या सर्व शिक्षकांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. बालपणी संस्कारशील बनवणारे माझे सर्व प्राथमिक शिक्षक, मिठबाव हायस्कूल मध्ये माझ्यातल्या कलागुणांचा विकास करणारे, मला साहित्याची आवड लावणारे आणि माझी आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करणारे श्री. नंदकुमार सोमण सर. नंतर ती आवड आणखी वाढवून तिला खत पाणी घालणारे प्रा. वसंतराव भोसले, ग्रामीण विकासाचे धडे देणारे डॉ.विजय काजळे आणि प्राचार्य डॉ.पी.जी.पाटील. स्पर्धा परीक्षांविषयी जागरूक करणारे प्राचार्य डॉ.व्ही.ए.पाटील, ग्रंथालय शास्त्राचे ज्ञान देणारे डॉ.जी.ए.बुवा,  प्रा.एस.एस.पाटील.  एन.एस.एस. मध्ये झोकून काम करायला शिकवणारे प्राचार्य डॉ.आर.जी.जाधव, माझे पीएच.डी.चे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.वसंत शेकडे. माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची स्तुती करणारे डॉ.महेंद्र कामत, प्रा.प्रशांत राऊत, प्रा.नागेश दफ्तरदार अशी कितीतरी नावे समोर येतात.  या सर्वांच्या ऋणात राहणे मी नेहमीच पसंत करतो, नतमस्तक होतो. त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यासमोर माझे कर आपोआपच जुळतात.  




रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

वाचू आनंदे


ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त

(९ ऑगष्ट) केलेला हा लेखन प्रपंच.

            आजची पिढी वाचन करत नाही असा आमच्याकडून नाराजीचा सूर नेहमीच उमटतो; परंतु आजची पिढी खरंच वाचत नाही काजर वाचत नसेल, तर का वाचत नाही?  वाचत असेल तर काय वाचते? अशा प्रश्नांचा आपणाला गांभीर्याने शोध घ्यावा लागेल.  आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रचंड प्रभाव तरुण पिढीवर आहे.  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप याचा वापर या पिढी कडून खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. त्याचाच परिणाम वाचन क्रियेवर झाल्याचे जाणवते.

आजची पिढी वाचतच नाही असे म्हणणे काहीसे चुकीचे ठरेल.  ही पिढी वाचते आहे; परंतु त्यांच्यावर या इलेक्ट्रॉनिक साधन-माध्यमांचा प्रभाव जास्त आहे.  स्वाभाविकपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून छोट्या छोट्या तुकड्यातील वाचन या पिढीला आवडू लागले आहे, त्यामुळे एका जागी बैठक मारून एखाद्या आवडीच्या पुस्तकाचा फडशा पाडणारी वाचक मंडळी जरा कमी झालेली दिसते.  व्हॉट्सॲप वर येणारा एखादा छोटासा संदेश, छोटासा किस्सा वाचण्याकडे आजच्या पिढीचा कल जास्त आहे, त्यातूनच 'अलक' हा साहित्यप्रकार रुजू लागलेला दिसतो.  अलक म्हणजे अतिलघुकथा. काळाच्या मागणीनुसार एखादा नवीन साहित्य प्रकार निर्माण झाला व रुजला तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.

प्रश्न उरतो तो सखोल वाचनाचा.  आजच्या पिढीची ही वरवर वाचण्याची सवय सखोल वाचनापासून दूर घेऊन जाणारी आहे.  आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी, अनुभव समृद्धीसाठी सखोल वाचनाची आवश्यकता असते.  वरवरच्या वाचनाने ही पिढी आत्मकेंद्री होण्याची शक्यता दाट आहे.  काळाप्रमाणे आज ई - साहित्याचा वाचक वाढतोय असेही म्हणणे फारसे पटणारे नाही;  कारण ही संख्या खूपच कमी आहे.  त्यातही पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळी पर्यंत ई - साहित्य वाचले जाईल का? याची शंकाच आहे; कारण ई - साहित्य साधनांच्या मर्यादा त्याच्या आड येतात.    

एखादं नवं कोरं पुस्तक त्याच्या सुगंधा सह,  त्यात रममाण होऊन वाचनातला आनंद काही अवर्णनीयच आहे. आमच्या पिढीने हा आनंद अनेकदा मनमुराद अनुभवला आहे;  पण आजच्या पिढीशी संवाद साधता हा आनंद त्यांनी घेतला असेल असे वाटत नाही.  वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि मानवी मन सुविचार संपन्न करण्यासाठी वाचनाची आवड असणे आवश्यक आहे.  आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वाचन खूपच महत्त्वाचे आहे.  सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातून शक्य आहे. वाचनातून बुद्धीची मशागत होते. मानवी जीवन फुलवण्यात वाचनाचा वाटा फारच मोठा आहे. पुस्तके आपणाला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात.  पुस्तकातून आपणाला अनुभव, भावना, कल्पना यांचे भांडार मिळते.  संवेदनशील मन घडवण्याचे काम वाचनाने होते.  वाचनाने आपले ठाम मत तयार होते, ते आपण ठामपणे मांडू शकतो.

पुस्तकासारखा प्रामाणिक मित्र दुसरा असूच शकत नाही, तो तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवेल.  तुमची ज्ञानवृद्धी, लोकांशी आत्मविश्वासाने संवाद साधण्याची कला, विचार करण्याची क्षमता वाढते.  विचार प्रगल्भ व रचनात्मक बनतात.  वाचनाने मेंदूच्या पेशी गतीशील व सक्रीय होतात,  त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.  सशक्त व सक्षम पिढी घडवायची असेल तर वाचन हवेच. बुद्धी, भावना,  विचार यांचे पोषण वाचनानेच होते.  वाचनातून मिळणाऱ्या अनुभवाच्या भांडारातून आपल्या आयुष्याचा एक एक क्षण आपण अर्थपूर्ण जगू शकतो,  संकटांना समर्थपणे तोंड देऊ शकतो. वाचनाच्या माध्यमातून आपण बुद्धीला अन्न पुरवू शकतो.  सर्वच महान माणसांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, त्यांचे अनुभव घेऊ शकत नाही; पण त्या माणसांची  चरित्रे,  पुस्तके वाचून त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतो आणि त्यांच्या सानिध्यात आपले जीवनही उजळवू शकतो.  वाचनातून मिळणारे विचारधन वेचताना अमृतानुभव आल्याशिवाय राहणार नाही, स्वानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.

वाचन करताना लेखकाने निर्माण केलेल्या सृष्टीचा एक भाग बनणे फार महत्त्वाचे आहे.  यासाठी जाणीवपूर्वक सखोल वाचन करावे लागेल, वरवर केलेल्या वाचनातून हा तादात्म्य भाव आपण गाठू शकणार नाही व तो आनंदही मिळवू शकणार नाही. वाचन ही एक आनंददायी प्रक्रिया आहे.  लेखकाने लेखन झाल्यावर ब्रह्मानंद सहोदर असा आनंद मिळवलेला असतो, तशाच प्रकारचा आनंद वाचकाने मिळवला तरच ही शृंखला पूर्ण होऊ शकते आणि एकदाका असा आनंद एखाद्या वाचकाने मिळवला तर त्याला 'वाच' असे सांगण्याची गरज उरत नाही, उलट तोच वाचक वाचनातून स्वतः आनंद घेत राहतो व इतरांना तो आनंद घेण्यासाठी प्रवृत्तही करतो.  त्या आनंदाची चव आजच्या पिढीला देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडूया, म्हणजे वाचन संस्कृती अधिक समृद्ध होईल असे मनोमन वाटते.

मंगळवार, ३० जून, २०२०

विकास मनुष्यत्वाचा…

             माणसाची उत्पत्ती जरी पशूपासून झाली असली तरी, बुद्धीच्या जोरावर माणसाने आपली प्रगती केली.  सद्यस्थितीत मात्र विकासाच्या प्रक्रियेत आणि हव्यासापोटी माणूस आपले मनुष्यत्व हरवत चालला आहे हे वारंवार जाणवते.  महात्मा गांधी म्हणतात “निसर्गात प्रत्येक माणसाची गरज भागवणारे सर्वकाही आहे” हे खरे आहे; पण माणसाने आपणास हवे तेवढे निसर्गाकडून घेतलेच आणि नको तेही घेतले.  निसर्गाशी प्रतारणा करून, निसर्गाची वारेमाप लूट करून आपण आपली प्रगती कधीच करू शकत नाही, कदाचित आपणास ती प्रगती वाटत असली तरी भविष्यकाळासाठी ती अधोगतीच ठरेल; कारण निसर्गाचा असमतोल ही माणसाला एक न परवडणारी गोष्ट आहे. ‌ माणसाची ही घेण्याची प्रवृत्ती त्याच्या विनाशास कारणीभूत ठरणारी आहे.  अधून मधून  निसर्ग आपले रौद्र रूप धारण करून याची जाणीव करून देत आहे.

माणूस नेहमीच अनाकलनीय असाच आहे तो कोणत्या क्षणाला कसा वागेल? हे सांगता येत नाही. तो सरड्याप्रमाणे रंग बदलतो, फरक इतकाच की सरडा आपल्या संरक्षणासाठी, तर माणूस आपल्या स्वार्थासाठी रंग बदलतो.  माणसांचे हे रूप पाहिल्यावर माधवी देसाई यांची एक कविता आठवते. त्या आपल्या एका कवितेतून माणसाचे वागणे खूप चांगल्या शब्दांत व्यक्त करतात.

जंगलात एक बरं असतं

कारण सारं काही तेथे खरं असतं.

            माणसाच्या जंगलाचा कायदाच न्यारा

            ससा म्हणून जवळ घ्यावं तर

            वाघ बनून नरडीचा घोट कधी घेईल सांगता येत नाही

             वाघ म्हणून दूरून जावं तर  

            ससा बनून कधी पायाशी घोटाळेल हे सांगता येत नाही.

          या ओळींमधून माधवी देसाई माणसाच्या बेभरवशी वागण्यावर नेमका प्रकाश टाकतात. आज माणसाचं वागणं बघितलं की याचं जागोजागी प्रत्यंतर येतं आणि मग व. पु. काळे यांची “ज्याच्यावर आय.एस.आय.चा शिक्का मारता येत नाही असं माणूस नावाचं एक यंत्र आहे” ही माणसाची व्याख्या पटायला लागते.

आज माणूस आपलं मनुष्यत्व हरवत चाललेला दिसतो. “स्वतःसाठी कमविणे म्हणजे पशुत्व, आपल्यासाठी कमविणे म्हणजे मनुष्यत्व व परोपकारार्थ कमविणे म्हणजे देवत्व” असे शास्त्रवचन सांगते.  सध्य काळात बलात्कार, हुंडाबळी, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार असे माणसाचे कारनामे बघता मन सुन्न होते आणि मग माणसाचा प्रवास मनुष्यत्वा कडून पशुत्वाकडे चालला आहे की काय? असा प्रश्न पडतो. साधुसंत, ज्यांना आम्ही देवत्व बहाल केलं आहे अशा लोकांकडूनही जेव्हा हीन प्रकार घडतात तेव्हा देवत्वाचा बुरखा बाजूला सरून माणसाच्या आतलं पशुत्वाचं खरं रूप उघडं होतं.

दुसऱ्या बद्दल वाईट चिंतणे, एकमेकांची उणीदुणी काढणे, दुसऱ्याला कमी लेकणे, मी पणा मिरवणे, स्वार्थासाठी लाळघोटेपणा करणे यातच माणूस व्यस्त आहे.  आज गर्दीमध्ये दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणारी माणसे दिसतात.  भेसळ करून फायदा लाटताना सामान्यांच्या आरोग्याचा, धोक्याचा विचार न करणारी माणसे दिसतात.  दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळून आनंदाने उड्या मारणारी माणसे दिसतात.  जीवघेण्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कशाची पर्वा न करता, नीतिमूल्ये गुंडाळून भ्रष्ट वागणारी माणसे दिसतात.  ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याच्यावरच कृतज्ञपणे वार करणारी माणसे आपणास दिसतात.  स्वतःच्या चुकांचे समर्थन करत जगणारी माणसं, दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधणारी माणसं आपणास दिसतात.  माणसाची ही रूपे पाहिली की हरवलेली माणुसकी सहजपणे आपल्या लक्षात येते.

                             

भावाकडून बहिणीवर बलात्कार, बापाकडून मुलीवर बलात्कार, शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, हुंडाबळी, ऍसिड हल्ले, एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळणे  हे सर्व पाहिले की खरोखरच शरमेने मान खाली जाते.  दिल्ली बलात्कार प्रकरण, हैदराबाद बलात्कार प्रकरण यासारखी अनेक प्रकरणे नित्यनेमाने चालू आहेत.  ज्यांना आम्ही साधुसंत मानतो त्यांनाही कोणत्यातरी वाईट कृत्या साठी जेल मध्ये जावे लागते आहे.  विकासाच्या अत्युच्च टोकावर असणाऱ्या माणसाकडून अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटना ही माणसाची अधोगतीच म्हणावी लागेल.  अशा घटना पाहिल्यावर माणसाचा प्रवास मनुष्यत्वा कडून पशुत्वाकडे चाललेला आहे की काय?  असा प्रश्न पडतो.

कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या, अपंगांची सेवा करणाऱ्या, गरिबांची सेवा करणाऱ्या अशा माणसांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि अशा काही मोजक्या माणसांकडे बघितल्यावरच आपणाला जगण्याची उमेद येते. जर प्रत्येकाने भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, आई-बाप, मित्र आणी शेवटी माणुस हे नातं जोपासलं तर जग सुंदर व्हायला वेळ लागणार नाही.  “माणसातल्या मनुष्यत्वाचा 100% विकास म्हणजे त्याचा देवत्वाकडचा प्रवास” असे म्हणता येईल.  आज देवत्वा पेक्षा माणसांमध्ये मनुष्यत्व जोपासण्याची गरज निर्माण झाली आहे.  आपणाला पुढच्या पिढी मध्ये मनुष्यत्वाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम आपणालाच माणुसकी जोपासावी लागेल.  आपल्यातलं मनुष्यत्व विकसित करावं लागेल त्याच वेळी आपण पुढच्या पिढीवर चांगले संस्कार घडवू शकतो.